नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 23 June 2020

शाळा कधी सुरू होणार ?

शाळा कधी सुरू होणार ? 

शाळा कधी सुरू होणार ? पालक, विद्यार्थी आणि अनेक नागरिकांचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाजवळ नाही. जे सध्या सरकार चालवत आहेत, त्यांच्याकडे देखील या प्रश्नाचे उत्तर उपलब्ध नाही. त्यामुळे ते रोज नवीन घोषणा करतांना दिसून येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक दृष्टीने विचार करतात. शाळा कश्या सुरू करता येतील ? याचे नियोजन शालेय शिक्षण मंत्री सरकार कडे सादर करतात आणि त्या अनुषंगाने शाळा सुरू करायला हरकत नाही असे ते म्हणतात. तर राज्याचे उपमुख्यमंत्री कोरोना आटोक्यात आल्याशिवाय कोणतीही शाळा सुरू करता येणार नाही असे म्हणतात. सामान्य जनता यातून काय निर्णय घ्यावा याच संभ्रमात आहेत. जुलै महिन्यात नववी व दहावी,ऑगस्ट महिन्यात सहावी ते आठवी, सप्टेंबर महिन्यात तिसरी ते पाचवी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने आपल्या अध्यदेशाद्वारे जाहीर केले. त्यानुसार प्रत्येक शाळेने शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन तसा निर्णय घेण्याचे ही सुचविले आहे. त्यानुसार राज्यात सर्वत्र शाळांचे नियोजन ही चालू आहे मात्र तरी ही शाळा कधी सुरू होणार ? याविषयी लोकांमध्ये संभ्रम अवस्था आज ही कायम आहे. यावर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू सक्रिय झाला आहे आणि आज तो प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात स्थिरावला आहे. सहजासहजी हा विषाणू आटोक्यात येईल याची खात्री नाही. लॉकडाऊनचे पाच टप्पे पूर्ण केल्यानंतर अनलॉकमध्ये या जून महिन्यात त्याचा प्रादुर्भाव आणखीन वाढू लागला. शाळा सुरू करण्यासाठी परिवहन क्रिया देखील चालू करावी लागते. बस आणि रेल्वे चालू झाल्यावर अनेक नागरिकांची वर्दळ वाढेल आणि त्याच प्रमाणात कोरोना देखील पसरेल यात शंका नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ न देता शाळा कसे सुरू करता येईल ? यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षण देण्यात अनेक समस्या येत आहेत याचे गेल्या तीन महिन्यात खूप अनुभव मिळालं आहे.  त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी लागू पडत नाही. घरात बसून बसून विद्यार्थी कंटाळलेले आहेत तर पालक देखील मुलांच्या शिक्षणाबाबतीत चिंतातुर झाले आहेत. शाळा बंद असले तरी सरकारी शाळेतील आणि खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांचे वेतन चालू आहेत मात्र विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्य शाळेतील शिक्षकांचे वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी शाळेत नाहीत तर फीसचे संकलन होऊ शकत नाही तेंव्हा येथील कर्मचाऱ्यांचे वेतन संस्थाचालक कुठून देणार ? वेतन नाही तर घर कसे चालवावे ? हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मनात देखील हाच प्रश्न सतावत आहे, शाळा कधी सुरू होणार ? अनेकांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे, असे वाटते. काही मंडळी राज्यातील मंदिरे आणि देवालय दर्शनासाठी खुले करावीत अशी मागणी करत आहेत मात्र कोणता शिक्षक शाळा सुरू करावे म्हणून मागणी किंवा निवेदन देताना दिसून येत नाही, असे शिक्षकांना टोमणे मारत आहेत. खरंच जर शिक्षकांच्या हातात शाळा सुरू करता आली असती तर 15 जूनला ग्रामीण भागात अनेक शाळा सुरू झाल्या असत्या. मात्र लातूर जिल्ह्यातील एक घटना जशी घडली की विना परवानगी एकाने दहावीच्या वर्गास सुरुवात केली अन त्याला कारवाईला सामोरे जावे लागले. लोकांना काय काही ही बोलणे खूप सोपे वाटते मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी करतांना काय त्रास होतो ते त्यांच्या वंशात जन्म घेतल्याशिवाय कळणार नाही. टप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या नियोजनात ज्यांची शाळा सुरू करायची आहे त्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण करून सुरक्षितपणे शाळा सुरू करणे शक्य होईल का ? या सारख्या उपायांचा विचार करण्यात यावे. 

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769 

3 comments:

  1. विद्यार्थी व शिक्षक यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. शाळा हे गावाचे, समाजाचे लहान रुप आहे. चुकूनही एखादा शिक्षक किवा विद्यार्थी ग्रसित झाला तर त्यामूळे पूर्ण शाळा व पर्यायाने गाव ग्रसित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळा सुरु व्हाव्यात पण शासनाने पूर्ण खबरदारी व जबाबदारी घेऊनच.

    ReplyDelete
  2. जोवर शासन विचारपुर्वक निर्णय घेत नाही तोवर शिक्षक,पालक नि शाळा यांना समस्यांना तोंड द्यावे लागणार.कोरोनाच्या नंतर सरकार प्रत्येक निर्णय घेण्यात अयशस्वी झाले आहे.भरकटलेल्या वागण्यामुळे आजही निष्पाप जीव कोरोनाग्रस्त होऊन मरण आहेत.

    ReplyDelete
  3. 50 percent student ni shala suru karavi.

    ReplyDelete