नागोराव सा. येवतीकर

Sunday, 31 May 2020

लालपरीला बदलावेच लागेल

लालपरीला बदलावेच लागेल
मातीचा धुरळा उडवीत लाल रंगाची एसटी ज्याला ग्रामीण भागात बस या नावाने ओळखले जाते, ती येत असताना पाहून बालपणीच्या मनाला कोण आनंद व्हायचा. ' बस आली बस आली ' म्हणून उड्या मारत सर्वाना सांगत आणि ओरडत जाणारी लहान मुले आज कुठेच दिसत नाहीत. मामाच्या गावाला जाण्यासाठी झुक झुक गाडी फार कमी लोकांच्या नशिबात असते. मात्र लाल परी म्हणजे बस सर्वांच्याच नशिबात असते. कारण ती सर्वांच्या गावात जाते. 25-30 वर्षांपूर्वीचा काळ आठवला तर लक्षात येते की, दळणवळणासाठी बस किती महत्वाचे होते. ग्रामीण भागात त्याकाळी बैलगाडीच्या नंतरचे प्रवासासाठी बस हेच माध्यम होतं. सायकल वगळता कसल्याही प्रकारचे वाहन गावात नजरेस येत नसे. त्याचमुळे प्रत्येक व्यक्ती दररोज या लालपरीची चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो अगदी त्याप्रमाणे वाट पाहत असत. बस आल्याचा सर्वात जास्त आनंद बालगोपाळाना व्हायचा. आज तशी परिस्थिती राहिली नाही आणि बसनेच प्रवास करावा लागेल असे ही नाही. आज प्रत्येकांच्या घरी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे बसची वाट पाहणे किंवा बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेने फार कमी झाली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तरी ही बसने प्रवास करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, कारण लोकसंख्या ही त्या प्रमाणात वाढत आहे ना ! ग्रामीण भागात तुलनेने कमी फेऱ्या मारणाऱ्या बसेस असतील मात्र लांबपल्यासाठी धावणाऱ्या बसेसची संख्या काही कमी नाही. तालुका, जिल्हे, मोठी शहरे व तीर्थक्षेत्राच्या बसस्थानकातील गर्दी पाहून आजही बसेसला अच्छे दिन आहेत याची प्रचिती येते. खाजगी वाहनांची प्रचंड स्पर्धा लक्षात घेता प्रवासी आज ही बसलाच पहिली पसंदी देतात. काही वेळा नाईलाजास्तव प्रवाश्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. पण खाजगी वाहनाने प्रवास करतांना इच्छित स्थळी सुखरूप पोहोचणार काय ? याबाबत प्रवाश्यांच्या मनात नेहमीच धाकधूक असते. कारण या वाहनाच्या ड्रायव्हरकडे वाहन चालविण्याचा परवाना असतोच असे नाही. ते सुरक्षित वाहन चालवित नाहीत. रस्त्यावर आजपर्यंत जे अपघात झाले आहेत ते जास्तीत जास्त अश्या खाजगी वाहनाचे आहेत. त्याउलट बसचे ड्रायव्हर हे शिक्षित आणि जबाबदारीने चांगल्याप्रकारे वाहन चालविणारे असतात. म्हणूनच बसचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक वाडी, पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे एसटी होय. जेष्ठ नागरिकांसाठी ही हक्काची गाडी समजली जाते. लोकसभापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या निवडणुकीच्या कामासाठी एसटीच महत्वाचे आधार असते. संकट काळात धावून येणारी ही एसटीच असते.  ' प्रवाशांच्या सेवेसाठी' ह्या ब्रीद वाक्याला जगणारी सेवा म्हणजे एसटीची सेवा होय. पण आजकाल हीच एसटी तोट्यात चालली आहे किंवा डबघाईला आली आहे असे अनेकजण बोलत असतात. कदाचित ते खरे ही असेल कारण एसटीला आज भरपूर प्रतिस्पर्धी निर्माण झाले आहेत. आज दळणवळण करण्यासाठी फक्त एसटी हे एकच साधन उरले नाही. ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटीला स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. 
आज एसटी वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहेत जसे की लाल, निळी, हिरवी, शिवशाही. निळ्या रंगाच्या गाड्या फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जसे चालविले जाते तसे लाल रंगाच्या गाड्या ह्या जिल्ह्यातल्या तालुक्यात आणि खेड्यासाठी वापरले जावे. सर्व हिरव्या गाड्या लांबपल्यासाठी वापरले जावे. खाजगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी शिवशाहीसारख्या गाड्या चालविले जावेत. या गाड्या चालविण्यासाठी खाजगी ड्रायव्हर न घेता महामंडळाचेच ड्रायव्हर असतील तर अपघात कमी होतील. शिवशाही गाड्याचे अपघात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने लोकं या गाडीने प्रवास करणे टाळत आहेत. काही चालक, वाहक आणि कंट्रोलर प्रवाश्यांसोबत हुज्जत घालतात किंवा अरेरावीची भाषा बोलतात. एसटी म्हणजे आपले एक रोजंदारीचे साधन आहे असे त्यांना मुळात वाटत नाही. जो लगाव असायला पाहिजे ते दिसत नाही. मला देखील अनेकवेळा एसटीचे वाईट अनुभव आलंय. अंबाजोगाईच्या कंट्रोलरला नांदेडला जाणारी बस किती वाजता आहे ? असे तीन वेळा विचारल्यावर देखील त्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर न देता कंट्रोल रूममध्ये एका मित्रासोबत गप्पा मारत होते. शेवटी मी रागात बोललो तर ते माझ्यावरच उलटून म्हणाले तुम्ही शिकलेले आहात ना फलक बघून घ्या. काय म्हणता येईल यास ? तसेच स्थानकात बस योग्य ठिकाणी थांबविले जात नाहीत. बस आली की लोकं जागा धरण्यासाठी बसकडे धाव घेतात. जागा मिळावे याच कारणामुळे स्थानकात यापूर्वी अनेक प्रवश्याचे जीव गेले आहे. पण अजून ही याबाबत काही नियोजन नाही. बसमधून उतरणाऱ्या प्रवाश्यांना थेट स्थानकात न उतरविता एका बाजूला उतरावे आणि त्यानंतर स्थानकात गाळ्यावर बस लावावी ज्यामुळे चढणारे आणि उतरणारे प्रवाशी यांची गर्दी होणार नाही. कोणत्याही प्रवाश्यांना स्थानकात फिरू देऊ नये म्हणजे असे अपघात कमी होऊ शकतात आणि  याचा त्रास कमी होईल, हे नियोजन आवश्यक आहे. सोशल मीडियाचा वापर करणे एसटीला आवश्यक आहे. एसटी बसस्थानाकात आल्यावर जी उद्धघोषणा होते ती काही वेळापूर्वी करता येईल. जसे रेल्वेचे दहा मिनिटंपूर्वी उद्घोषणा केली जाते. अगदी त्या पद्धतीने लांबपल्याच्या गाडीचे बसस्थानकात येण्यापूर्वी दहा मिनिटं अगोदर उद्घोषणा केल्यास प्रवाश्यांना ते सोईस्कर होईल. जवळचे कंट्रोलरद्वारे आणि एसटीच्या वाहकाद्वारे ही माहिती घेता येईल. आज संपूर्ण कार्यालये व्हाट्सअप्पचा वापर करत आहेत तर एसटीने का करू नये ? दिवसातून निदान दोन वेळा तरी राज्यातल्या प्रत्येक गावात एसटी पोहोचली पाहिजे. गाव तेथे एसटी यावर नियोजन करणे आवश्यक आहे. आरटीओ आणि महामंडळ एकत्रितरित्या काम केल्यास बेकायदेशीर चालणाऱ्या अनेक खाजगी वाहनावर बंदी आणता येऊ शकते. यासाठी गरज आहे ती फक्त ईच्छाशक्तीची जे की महामंडळाने आजपर्यंत दाखविली नाही. आज एसटी महामंडळाचा वर्धापनदिन आहे, त्यानिमित्ताने शुभेच्छा देतांना त्यांच्याकडून काही बदल देखील अपेक्षित आहेत, प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी लालपरीने कात टाकल्याशिवाय त्यास अच्छे दिन मुळीच येणार नाहीत. 

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

No comments:

Post a Comment