नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 4 December 2019

एक राष्ट्र, एक रेशनकार्ड


एक राष्ट्र एक रेशनकार्ड

गरीब लोकांसाठी रेशनकार्ड एक महत्वाचे साधन आहे. यामुळे गरिबातल्या गरीब लोकांना पोटभर खाण्यास मिळते. परंतु काही स्थलांतर करणाऱ्या लोकांना रेशन मिळविण्यासाठी आपल्याच गावात येऊन ठराविक वेळेत रेशन घ्यावे लागते. बहुतांश वेळा ते गावात येईपर्यंत कधी कधी रेशन संपण्याच्या घटना घडतात त्यामुळे रिकाम्या हाताने परत जावे लागते. मात्र नुकतेच अन्नधान्य पुरवठा मंत्री मा. रामविलास पासवान यांनी एक देश एक रेशनकार्ड योजना संपूर्ण देशात एक जून पासून राबविण्याचे सुतोवाच केले. सध्या 14 राज्यामध्ये पॉश मशीन द्वारे ही सुविधा सुरू झाली असून लवकरच 20 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ही सुविधा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे याचा फायदा सर्व लोकांना होणार आहे. विशेष करून स्थलांतरित लोकांना याचा जास्त फायदा होणार. आधारकार्ड आणि रेशनकार्ड यांचा समन्वय करून सदरील योजना अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे या रेशनिंग मध्ये होणारा गडबड गोंधळ देखील काही अंशी कमी होण्यास मदत मिळेल. त्याच बरोबर रेशन दुकानात वर्षभर धान्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहे त्यामुळे जनतेला जेव्हा गरज असेल तेंव्हा धान्य घेता येऊ शकेल. हे करत असताना परत एकदा सर्व्हे करून खऱ्या गरीब लोकांचा शोध घेणे आवश्यक आहे असे वाटते. दारिद्र्य रेषेखालील लोकांची यादी जी की खूप जुनी आहे त्यात देखील सर्व्हे करून खऱ्या लाभार्थ्यांचा त्यात समावेश केल्यास ही योजना सफल होऊ शकते. दारिद्र्य रेषेखालील यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी काही मध्यम वर्गीय आणि श्रीमंत लोकं प्रयत्न करतात त्यांच्यावर आळा घालणे आवश्यक आहे. लोकांना कमी दरात धान्य मिळत असल्यामुळे लोकं आळशी होत आहेत अशी ओरड देखील अधूनमधून ऐकायला मिळते. ग्रामीण भागात तर काम करायला देखील माणूस मिळत नाहीत असे ही बघायला मिळते. त्यामुळे खरे लाभार्थी शोधून त्यांनाच या योजने अंतर्गत लाभ मिळेल याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्रीला जातात असे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. यापुढे असे होणार नाही याकडे ही लक्ष देण्याची खरी गरज आहे. समाजात असे ही काही गरीब लोकं दिसून येतात ज्यांच्याकडे धान्य खरेदी करण्यासाठी पैसे नसतात. असे लोकं कोणाकडून तरी पैसे उधार घेतात. रेशन दुकानात माल विकत घेतात आणि अन्यत्र विक्री देखील करतात. या सर्व बाबीचा विचार करून ही योजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे, असे वाटते. 

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment