नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 26 November 2019

शिक्षकांना स्वातंत्र्य हवं

शिक्षकांना स्वातंत्र्य असावे

देशाचे भवितव्य शाळेतून घडत असते कारण येथेच देशाचा भावी आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो. याच माध्यमातून समाज देखील घडत असतो म्हणून शाळा आणि तेथील सर्व यंत्रणा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. पन्नास वर्षांपूर्वी ची शैक्षणिक स्थिती आणि आजची शैक्षणिक स्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पन्नास वर्षांपूर्वीचे शिक्षक आणि आजचे शिक्षक यात देखील खूप फरक जाणवतो. आजचे शिक्षक पूर्वीच्या शिक्षकांपेक्षा खूप बुद्धिमान असून देखील पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे अध्यापन करू शकत नाहीत किंवा पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे विद्यार्थी घडवू शकत नाहीत. काय कारण असू शकते ? यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. 
त्याकाळी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला नव्हता त्याकाळी शिक्षण घेणे खूप मोठे आणि अवघड काम समजले जायचे. शाळा शिकणे हे येरागबाळ्याचे काम नाही असेच सर्वाना वाटायचे. शिक्षणासाठी त्यांना घरदार सोडून खूप दूरवर जावे लागायचे. त्यांना शिक्षणाचा छंद लागलेला असायचा आणि ते मिळविण्यासाठी ते अक्षरशः वेडे व्हायचे. त्यासाठी कसलाही त्रास झाला तरी ते सहन करायचे. गुरुजींनी शिक्षा केली म्हणून ते कधी पळून गेले नाहीत तर उलट त्यांची छडी वाचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळाले होते. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांना कळून चुकले म्हणून तर अपार कष्ट सोसत अनेकांनी त्याकाळी शिक्षण घेतले. एक गोष्ट येथे लक्षात येते की, त्याकाळी शिक्षकांना कोणाची भीती नव्हती, त्यांना कोणाचा त्रास नव्हता. त्यांच्या डोळ्यासमोर एकच लक्ष्य होतं ते म्हणजे विद्यार्थी शिकला पाहिजे. त्यांना कोणाचेही दडपण नव्हते, ते अगदी मनमोकळेपणाने मुलांना शिकवायचे. माणसाच्या मनावर कशाचे दडपण नसेल तर माणूस उत्तम कलाकृती तयार करू शकतो, ते ही स्व इच्छेनुसार. तेच जर त्याच्यावर जबरदस्ती केली किंवा त्याच्या डोक्याला ताण देऊन काम करायला लावले तर तो उत्तम कार्य करेल याची खात्री नसतेच. दबावाखाली तो काही तरी चुकतो, कंटाळा तरी करतो किंवा कामचुकार पणा देखील करू शकतो. आज शिक्षणाच्या वर्तुळात काय घडत आहे तर हेच घडत आहे. आजच्या काळातला कोणताच शिक्षक आपल्या इच्छेनुसार कार्य करू शकत नाही. त्याला आखीव आणि रेखीव काम सोपविले जाते आणि हे एवढं झालंच पाहिजे असा ताण दिला जात आहे. मनमोकळेपणाने आज शिक्षकांना जगणे खूप अवघड आहे. दिलेल्या रस्त्याने गेलं तरच वेतन मिळणार अन्यथा नाही, अशी बंधने त्याच्यावर टाकण्यात येत असल्यामुळे आजचा शिक्षक मानसिक तणावाखाली वावरत आहे. स्वतः च्या मनाने जगण्याची त्याची पद्धत आज बंद झाली आहे. अधिकारी वर्गांचा त्याच्यावर खूप मोठा प्रभाव आहे. त्या प्रभावाखाली शिक्षक पूर्णपणे दबला जात आहे. घरातल्या कुटुंब प्रमुखांविषयी मनात प्रेम असण्याऐवजी भीती असेल तर घरातील लोकं तणावाखालीच वावरत असतात. अशीच काहीशी स्थिती आज निर्माण झाली आहे. हे केलंच पाहिजे असा आदेश शिक्षकावर काढला जातो. शासनाची सर्व कामे पहिल्या प्राधान्याने करायची आणि शिकविणे दुय्यम स्थानावर गेले आहे. शिक्षणाच्या विकासासाठी काय करता येईल यावर कधीही कोणी बोलत नाही मात्र इतर कामे शिक्षकांकडून कसे पूर्ण करता येतील याचा प्रामुख्याने विचार केला जातो. प्राथमिक शिक्षणाकडे साफ दुर्लक्ष केले जाते आणि दहावीचा निकाल चांगला लागला पाहिजे यासाठी कॉपी मुक्ती सारखी योजना राबवितात. झाड लहान असताना काळजी घेऊन त्याला खतपाणी योग्य प्रमाणात दिल्यास ते झाड मोठे झाल्यावर अपेक्षेप्रमाणे फळ देईल. पण प्राथमिक वर्गात अध्यापन करण्यासाठी पुरेशी शिक्षक संख्या देत नाहीत. दोन ते तीन वर्गासाठी एका शिक्षकांची नियुक्ती केली जाते तेंव्हा खरंच आपण याठिकाणी चुकत नाही का ? असे एकही शिक्षणतज्ञाना वाटत नाही, याचे आश्चर्य वाटते. प्राथमिक वर्गात पुरेशी शिक्षक संख्या असल्यास पुढील वर्गात अध्यापन करणे कठीण जात नाही. पण याच गोष्टी कडे अनेकांचे अजूनही लक्ष गेले नाही. आज ही महाराष्ट्रात आशा अनेक शाळा आहेत जेथे चार वर्ग एक किंवा दोन शिक्षक अध्यापनाचे काम करतात. त्याच सोबत शिक्षकांवर अनेक गोष्टीचे दडपण नेहमी टाकले जाते. सध्याचा शिक्षक नेहमीच दडपणाखाली वावरताना दिसतो. मागील काही दिवसांत याच दडपणाखाली काही शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या घटना देखील घडले आहेत. 
शिक्षक तणावमुक्त असल्या शिवाय विद्यार्थी घडणार नाहीत, हे उघड सत्य आहे. म्हणून सर्वात पहिल्यांदा शिक्षकांना तणावमुक्त करून त्यांना स्वातंत्र्य मिळवून द्यायला हवे
- नागोराव सा. येवतीकर

2 comments: