नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 22 October 2019

दीपोत्सवाचा सण दिवाळी

दीपोत्सवाचा सण : दिवाळी


दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळी सणाची आबालापासून वृध्दापर्यंत सर्वानाच चातक पक्ष्याप्रमाणे प्रतीक्षा असते. दसरा सण संपला की, सगळ्यानाच दिवाळी सणाचे वेध लागतात. असे म्हटले जाते की, दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला आणि लंकेहून अयोध्याकडे निघाले. तेंव्हा त्यांना एकवीस दिवसाचा कालावधी लागला म्हणून त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ अयोध्यावाशी लोकांनी दीप प्रज्वलन करून भगवान श्रीरामाचे स्वागत केले. तोच दिवस म्हणजे दिवाळी. लहान मुलांना तर दिवाळी हा सण कधीच संपू नये असे वाटते. कारण ना शाळेची कटकट असते ना अभ्यासाची पिरपिर. फक्त खेळणे, उड्या मारणे, फटाके उडविणे आणि आईने तयार केलेला फराळ फस्त करणे एवढेच काम राहते. दिवाळी सण भारतातच नाही तर विदेशात सुध्दा खुप प्रसिध्द आहे.
दिवाळीच्या पूर्व संध्येवर देश-विदेशात स्थलांतरित झालेली अनेक पाखरे ( लोकं ) परत आपल्या घराकडे /गावकडे येतात. जुन्या व खास लोकांच्या गाठीभेटी दिवाळी सणाला होतात. त्यामुळे दिवाळी सण आला की, बहुतांश लोक आपल्या मुळ गावी परतण्याचा बेत आखतात. तसे इतर सण एकाच दिवसात संपतात ; मात्र दिवाळी हा सण तब्बल पाच दिवसाचा असतो. त्याच मुळे या सणाची प्रत्येकानाच ओढ लागलेली असते. शिकण्यासाठी परगावी गेलेली मुले आणि सासुरवाशीन महिलेला घर आणि गाव याच्या भेटीची उत्सुकता दिवाळी सणाच्या निमित्ताने असते.
मराठीच्या आश्विन महिन्यातील शेवटचे तीन दिवस आणि कार्तिक महिन्यातील सुरुवातीचे दोन दिवस असा हा पाच दिवसाचा दिवाळी सण आहे. प्रत्येक दिवस वेगळ्याच नावाने आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. दिवाळीचा पहिला दिवस हा धनत्रयोदशीचा. या दिवशी धन्वंतरीचे पूजन केल्या जाते. धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्याने त्याच्या सेवेमुळे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते म्हणून आरोग्याची देवता असलेली धन्वंतरीची पुजा अर्चा करून सायंकाळी यम दीपन करण्यासाठी घरोघरी दीपोत्सव केला जातो आणि दिवाळी सणास प्रारंभ होते.
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशीचा. हा दिवस म्हणजे जगातील पहिला सामुदायिक स्त्री मुक्ती दिन होय. कारण नरकासुराने पळवून नेलेल्या सोळा हजार स्त्रियांना श्रीकृष्णाने नरकासुराला ठार करून मुक्त केले व त्याच दिवशी त्यांचे पालकत्व घेतले. त्यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले. यातून जगातील तमाम मानवास आदर्श घालून दिला आहे की, आपल्या देशात जेंव्हा स्त्री भ्रष्ट होते म्हणजे देश ही भ्रष्ट होतो, असे समजले जाते. नरकासुर राक्षसाचा वध करण्यात आला. त्याचा आनंद म्हणून महर्षी व्यासानी व पूर्वजानी हा दिवाळीचा सण सुरु केला आहे. उत्सव म्हणून लोक पहाटे उठून अभ्यंगस्नान करतात.
व्यापारी मंडळीच्या दृष्टीने तिसरा दिवस फारच महत्वाचा असतो. अमावस्येच्या दिवशी सर्व व्यापारी मंडळी आपल्या दुकानातील सामनाची साफसफाई करून लक्ष्मीची पूजा मांडतात व पूजा अर्चा करतात. काही गृहिणी आपआपल्या घरी लक्ष्मीमातेची पूजा करतात व साळीच्या लाह्या प्रसाद म्हणून वाटतात. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर खूप फटाके वाजवून आपला आनंद व्यक्त केला जातो. या दिवशी रात्रभर जागरण व्हावे म्हणून बहुतांश ठिकाणी पत्त्याचा आणि जुगारासारखे खेळ खेळल्या जाते. 
त्यांनंतरचा दुसरा दिवस कार्तिक महिन्यातील पहिला दिवस म्हणजे दिवाळी, त्यास बलिप्रतिपदा असे देखील म्हटले जाते. ग्रामीण भागात या दिवसाला पाडवा असे म्हणतात. या दिवशी सर्वचजण सकाळी लवकर उठून अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करतात. नविन कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा देताना दिवाळीच्या फराळाचे आमंत्रण दिले जाते. लाडू, अनारसे, शंकरपाळे, करंज्या, चिवडा, शेव इत्यादी दिवाळीच्या फराळातून सर्वाना प्रेम वाटण्याचा प्रयत्न केला जातो.
आपल्या प्राणप्रिय भावाला उदंड आयुष्य लाभो, अशी देवाजवळ प्रत्येक बहीण प्रार्थना करते, भावाची ओवाळणी करते तो दिवस म्हणजे दिवाळी सणातील सर्वात शेवटचा भाऊबीजेचा सण. अश्या रीतीने पाच दिवस चालणाऱ्या उत्सवामुळे प्रत्येकाच्या मनात आनंदाची उधाणाची भरती येते.

● दिवाळी आणि फटाके

दिवाळी आणि फटाके यांचा वर्षानुवर्षे संबंध आहे. फटाकेविना दिवाळी अशक्य वाटते. लहान मुलांना फटाके वाजवू नका असे म्हटले तर ही मुले लगेच उदास होतात. काही समजदार मुले प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करीत फटाके खरेदी न करता इतर खरेदीला पसंती देतात पण ज्यांचे मन प्रदूषणमुक्त दिवाळी करण्यासाठी तयार झाले नाही, त्यांचा आनंद हिरावून घेतल्यासारखे वाटते. वर्षातून एकदा असा सण येतो ज्यात मनसोक्त उड्या मारायला आणि मजा करायला मिळते त्याच्यावर बंधने आणली तर मुले वर्षभर आनंदी राहतील काय ? अशी चर्चा देखील समाजात होताना दिसून येते. पंचवीस-तीस वर्षापूर्वी दिवाळी साजरी केली जायची तेंव्हा फटाक्याचा आवाज एवढा मोठा नव्हता. एवढे फटक्याचे साहित्य देखील मिळत नव्हते. फार कमी प्रमाणात फटाके वाजविले जायचे. ग्रामीण भागामधील रहिवाशी नोकरीच्या निमित्ताने शहरात राहणारा एखादा व्यक्ती पिशवी भरून फटाके गावात आणायचा आणि सर्व फटाके उडवायाचा तेंव्हा त्यांचे खुप अप्रुप वाटायचे. त्यांचा हेवा देखील वाटायचे की माझ्याजवळ एवढे फटाके का नाहीत ! गरीब मायबाप असलेले कुटुंब मुलांची हौस कशी पूर्ण करतील ? पण दिवाळीच्या दिवशी फक्त फटाके वाजवायला मिळाले तरी त्यांना त्यात आनंद होता. आज गरीब श्रीमंत सारेच जण तेवढ्याच जोशात आणि उत्साहात फटाके वाजवित आहेत. त्यामुळे ध्वनीप्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. शेजारीपाजारी राहणारे आजारी लोक, लहान मुले आणि वयोवृध्द लोकांना त्या आवाजाचा त्रास होतो, याचे भान असणे आवश्यक आहे. मोठ्या आवाजामुळे बहिरेपणा देखील येऊ शकतो. फटाके फोडणे म्हणजे आपल्या मनातील आनंद व्यक्त करणे होय. अनेक लोक दिवाळीला तर फटाके फोडतात त्या शिवाय ज्या ज्या वेळी आनंदी घटना घडते त्या त्या वेळी फटाके फोडले जातात. जसे की निवडणुकीमध्ये विजय मिळाले की फटाके फोडले जातात. भारत पाकिस्तानच्या क्रिकेट सामान्यात भारताचा विजय झाल्यास हमखास फटाक्याचा आवाज येतो. लग्नात शेवटची मंगलाष्टका म्हटले की शामियानाच्या बाहेर फटाक्याचा आवाज येतो. श्रीमंत लोक हवेत फटाके उडवून आपला आनंद व्यक्त करतात. मिरवणुकीच्या वेळी देखील फटाके उडविले जातात. काही लोक अंत्ययात्रेत फटाके वाजवितात तेंव्हा मात्र कोडे पडते की, येथे फटाके का वाजविले जातात ? असे विविध प्रसंगी फटाके फोडले जाण्याचा आनंद लहान मुले अनुभवत असतात. प्रत्यक्षात दिवाळीला त्यांना ती संधी मिळते फटाके फोडण्याची. त्यामुळे त्याची उत्सुकता मुलांना लागून असते, हे सत्य आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यास त्यांचे मन सहजासहजी तयार होणार नाही. वर्षातील दिवाळी हा सण खुप मोठा आहे, त्यात सर्वाना आनंद ही असतो. म्हणून या आनंदात विरजण पडू नये असे कार्य सर्वानी करणे आवश्यक आहे. क्षणभरांच्या आनंदासाठी संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी होणार नाही यासाठी म्हणून लहान मुले फटाके उडवताना मोठ्यांनी सोबत राहावे आणि दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावे.

● सण आणि जुगार

जुगार म्हणजे पत्ते खेळणे, तशी ती वाईट सवय आहे. मात्र लक्ष्मीपूजन किंवा दिवाळीच्या सणात सर्वत्र खुले आम पत्ते खेळले जातात. एरव्ही हा खेळ खेळणाऱ्या लोकांना पोलिस अटक करते. मात्र सणाच्या दिवशी सर्वाना मोकळीक दिली जाते. त्यामुळे लहान मुलांपासून तर मोठ्या माणसापर्यंत सर्वचजण पत्ते खेळताना दिसून येतात. लक्ष्मीपूजन आणि जुगार याचे काय संबंध असेल असा प्रश्न कोणाला विचारले तर पूर्वज लोक सांगतात की, याच दिवशी भगवान शंकर आणि पत्नी पार्वती यांनी सारीपाटचा खेळ खेळले होते. सारीपाट म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे.आजच्या दिवशी ज्याच्या वर लक्ष्मी प्रसन्न होईल त्याच्या सोबत वर्षभर राहील असा ही एक अंदाज बांधला जातो. व्यापारी लोक आजच्या दिवशी रात्रभर दुकान चालू ठेवतात जेणेकरून लक्ष्मी त्यांच्या दुकानात वास करावी. यामुळे ही व्यापारी मंडळी रात्रभर जागरण करण्यासाठी पत्ते खेळण्याच्या डावाचे आयोजन करतात. पौराणिक काळापासून जुगार खेळला जात होता हे महाभारतमधील कथेवरुन लक्षात येते. कपटी शकुनी मामा धर्मराजास द्युत खेळायला लावतो, त्यात संपूर्ण हस्तिनापूर तर जातेच शिवाय पांच पांडवाची पत्नी द्रौपदीला देखील यात गमावितो. हे आपणाला माहित आहेच. जुगार मध्ये कधीही कोणाचे लाभ होत नाही मात्र या खेळाकडे आकर्षित होणाऱ्याची संख्या भरपूर आहे. सण हा एक आनंदाचा उत्सव असतो म्हणून लोक याच्याकडे पत्ते खेळण्याच्या दृष्टीने बघतात. यातून लहान मुलांनी काय बोध घ्यावा ? ही वेगळी बाब आहे. ग्रामीण भागात लक्ष्मीपूजनलाच पत्ते खेळतात असे नाही तर वर्षात कोणताही सण येवो कोणत्याही धर्माचा येवो हे लोक पत्ते खेळतात. रमजान ईद असो वा होळी त्या निमित्त खेड्यातील लोक वेगवेगळ्या माध्यमाद्वारे पैश्याचा खेळ खेळतात. यांना फक्त निमित्त हवे असते. ऐन सणाच्या काळात या पत्याच्या खेळण्यामध्ये अनेक घरे उध्वस्त होतात तर काही जणाचे यातून भांडण होतात, घरे उठून जातात तर काही वाद एवढे विकोपाला जाते की लोक एकमेकाच्या जीवावर उठतात. काही लोकांना याच दिवसापासून पत्ते खेळण्याची सवय लागते, जे की आयुष्यभर सोबत राहते. असे अनेक उदाहरण आजपर्यंत वाचण्यास आणि पाहण्यास  मिळाले आहेत. जेथे आनंद किंवा उत्साहाचा दिवा लागायाला हवे तेथे या खेळामुळे अंधार पसरतो.  त्यामुळे सण म्हटले की पत्ते खेळावेच लागते ही लोकांची मानसिकता बदलायला हवी.

ही आनंदोत्सवाची, दीपोत्सवाची दिवाळी प्रत्येकाच्या जीवनात खुप आनंद, यश, भरभराटी, उत्कर्ष आणि उत्साह देऊन जावो हीच शुभेच्छा....!

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment