नागोराव सा. येवतीकर

Monday, 14 October 2019

डॉ. अब्दुल कलाम - मिसाईल मॅन ते राष्ट्रपती


चित्र रेखाटन - विनायक काकुळते, नाशिक

मिसाईल मॅन ते राष्ट्रपती

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील रामेश्वर या छोट्या बेटासारख्या गावात मध्यमवर्गीय कुटुंबात 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाबदिन तर आईचे नाव आशिअम्मा असे होते. डॉ. कलाम यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या छोट्याशा गावातच झाले. त्यांचे आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र आणि तेथील परिसराच्या वातावरणाचे त्यांच्यावर विलक्षण असे संस्कार झाले. त्यांच्या घराशेजारी मंदिर होते आणि मशीद सुद्धा. संपूर्ण रामेश्वर बेटावर इंग्रजी जाणू शकणारे एकच व्यक्ती होते ते म्हणजे डॉ. कलाम यांचे वडील जैनुलाबदिन. त्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण होते. जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांनी सुद्धा नकळत डॉ. कलामावर संस्कार केले. शाळेतून शिकायला न मिळणारे उपजत शहाणपण जलालुद्दीन यांच्याकडून तर चेहऱ्यावरून दुसऱ्यांच्या मनातील भाव ओळखायचे, शरीराची व डोळ्यांची भाषा शमसुद्दीन यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यांचे बालपणीचे तीन जीवश्च कंठश्च हिंदू मित्र होते ते म्हणजे रामनाथ शास्त्री, अरविंदन आणि शिव प्रकाशन, यांच्या सहवासामुळे त्यांच्या मनात कधीच धार्मिक तेढ निर्माण झाले नाही. उलट त्यांचे प्रेम दिवसागणिक वृद्धिंगत होत गेले.
डॉ. कलाम लहान असताना समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जात असत. त्या ठिकाणी खेळताना हवेत उडणारे पक्षी बघून विचार मग्न होत असत. या उडणाऱ्या पक्षांना पाहून आपण सुद्धा असे हवेत उडाण करावे अशी उत्कट इच्छा त्यांच्या मनात निर्माण होत असे. यातूनच त्यांनी रॉकेट उडवण्याचा अभ्यासाकडे वळण्याचा विचार केला. लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न करीत राहिले. लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार  करताना त्यांना बऱ्याच वेळा अपयश मिळाले. अनेक प्रकारची संकटे आली. विविध समस्या निर्माण झाल्या. परंतु सर्व संकटे, अपयश आणि समस्यांना तोंड देत त्यांनी यश मिळविले. जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि नियमितपणा यामुळे ते जीवनात यशस्वी झाले. शालेय जीवनात इंग्रजी, गणित, विज्ञान व तमिळ हे त्यांचे आवडते विषय होते. ते मुलांना नेेहमी स्वप्न पाहण्याचा संदेश देत असत कारण स्वप्नातून जग साकारता येते. आपली जर काही स्वप्ने नसतील तर आपल्यासाठी विश्व शून्य आहे असे ते मानत.
कलाम यांनी 1950 मध्ये विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली. सन 1954 ते 1957 या काळात आयआयटी चेन्नईमधून एरोनॉटिकल इंजीनियरिंगचा अभ्यास पूर्ण केले. वायुदल आणि तंत्रज्ञान विकास व निर्मिती मुख्यालयात कार्यरत असताना त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, भारतीय अंतराळ संशोधन समिती आणि थुंबा आण्विक प्रक्षेपण केंद्रावर काम केले. 11 मे 1998 रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणुस्फोट चाचणी केली त्याचे शिल्पकार डॉ. अब्दुल कलाम हेच होते. आण्विक क्षेपणास्त्र संशोधनात दहा वर्षे काम करून त्यांनी पृथ्वी, त्रिशूल, नाग आणि आकाश यासारखे क्षेपणास्त्रे बनवली. यामुळे भारतातील क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची संपूर्ण जगाला ओळख करून देणाऱ्या डॉ. कलाम यांना क्षेपणास्त्राचे जनक असे म्हटले जाऊ लागले तर भारतातील जनता त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखू लागली.
25 जुलै 2002 रोजी भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदी पदावर ते विराजमान झाले. भारताचे ते 11 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेताना एखाद्या शास्त्रज्ञ व्यक्तीला सर्वोच्च पदावर बसण्याची संधी मिळाली असा अभूतपूर्व प्रसंग जनतेला पाहण्यास मिळाले. याचा सर्वात जास्त आनंद त्यांच्या आईला झाला होता कारण आईच्या शिकवणीमुळे व तिने लहानपणी केलेल्या संस्कारांमुळे ते या पदापर्यंत पोहोचू शकले होते. त्यांची आई त्यांना नेहमी विविध गोष्टी, कथा, प्रसंग प्रसिद्ध विचारवंताचे विचार सांगून त्यांच्यावर संस्कार केले होते. त्यांच्या वडिलांच्या वागणुकीचे नकळत संस्कार त्यांच्यावर झाले होते.  भारताचे राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. त्याचसोबत पद्मभूषण पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार मिळालेले होते. वयाची ऐंशी वर्षे ओलांडलेले असतानाही ते दररोज दहा ते पंधरा तासाचा वेळ वाचन आणि चिंतन करण्यात घालवीत असत. यावरून त्यांची महानता लक्षात येते. त्यांनी पुस्तकाला आपल्या पासून कधीच दूर केले नाहीत कारण ते म्हणत एक चांगले पुस्तक शंभर मित्राप्रमाणे असते. डॉ. अब्दुल कलाम यांची आत्मकथा अग्निपंख ( मराठी अनुवाद ) या पुस्तकातून त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकला आहे. डॉ. अब्दुल कलाम यांचे लहान मुलावर विशेष प्रेम होते. उद्याचा सुदृढ भारत व सशक्त भारत घडविण्याची ताकद फक्त आजच्या मुलांच्या मनगटात आहे असा आत्मविश्वास त्यांना होता. भारतातील लहान मुले त्यांना कलाम चाचा असे संबोधतात. मिसाईल मॅन ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणार्‍या डॉ. अब्दुल कलाम विदेशात एक व्याख्यान देताना दिनांक 27 जुलै 2015 रोजी त्यांचा मृत्यू झाला. शासनाने त्यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने आपण सर्वजण आजच्या दिवशी एकच दिवस वाचन न करता त्यात सातत्य ठेवून नियमीत एक तास किंवा अर्धा तास तरी अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर पुस्तकांचे वाचन करण्याचा संकल्प करू या तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर, प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment