नागोराव सा. येवतीकर

Thursday, 15 August 2019

पौर्णिमा - अमावस्या

पौर्णिमा - अमावस्या आणि सण

मराठी महिने एकूण बारा आहेत. प्रत्येक महिना तीस दिवसांचा असून शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे दोन पक्ष आहेत. दर पंधरा दिवसांनी पौर्णिमा आणि अमावस्या तिथी येत असते. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा कोणत्या ना कोणत्या सणाने प्रसिद्ध आहे. मराठी महिन्याची सुरुवात चैत्र पक्षाने होते आणि या महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती असते. हिंदू धर्मातील लोकं भल्या पहाटे सूर्य उगवण्याच्या अगोदर मारोती म्हणजे हनुमानाची यथोचित पूजा करतात. प्रत्येक गावात हनुमानाचे मंदीर असतेच असते. या दिवशी गावोगावी भंडाऱ्याचे आयोजन करून महाप्रसाद वाटप केला जातो.
वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते. गौतम बुद्धांनी सर्व सुख, सोयी, सुविधा याचा त्याग करून जनकल्याणासाठी ते बाहेर पडले. आपल्या अनुयायांना जीवन जगण्याचे सार सांगितले. त्यांची आठवण करण्याचा हा दिवस बौद्ध धर्मीयांत उत्साहात साजरा केला जातो.
स्त्रियांचा वटपौर्णिमा सण जेष्ठ महिन्यात येतो. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून या दिवशी सुवासिनी स्त्रिया वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात.
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरू पौर्णिमा असे म्हटले जाते. महर्षी व्यास यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. शिष्यांनी गुरूला वंदन करून आशीर्वाद घेत असतात.  श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण येतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून औक्षण करते. बदल्यात भाऊ तिला काही भेटवस्तू देतो आणि आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देखील. तसेच यास नारळी पौर्णिमा असे ही म्हटले जाते. कोळी समाजातील लोकं यादिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात. रात्रीला जागरण करून चंद्र दुधात पहायचे आणि त्याचे प्राशन करण्याचा कोजागिरी पौर्णिमा आश्विन महिन्यात येतो. कार्तिक महिन्याचा पौर्णिमेला गुरू नानक जयंती येत असते. शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक होय. या दिवशी गुरुद्वारा मध्ये त्यांच्या धर्मग्रंथाचे पठन केले जाते. श्री दत्तात्रयाची जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. माहूर गडावर असलेल्या दत्तात्रय मंदिरात खूप मोठी यात्रा भरविली जाते. माहूर गडावर या दिवशी मुंगयाच्या रांगेसारखे भक्तांची रांग दिसून येते. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटले जाते. तिला हजारो डोळे होते म्हणून शाकंभरी असे नाव पडले. दुर्गा मातेचे ते रूप आहे. मराठी वर्षातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन, या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात आणि होळीचा सण साजरा करतात. गावोगावी लाकडाची होळी तयार करून पेटविली जाते तर काही ठिकाणी रावणाचा पुतळा तयार करून त्याला जाळले जाते. त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते त्यास धूळवंड असे ही म्हणतात.
पौर्णिमेप्रमाणे काही महिन्यात अमावस्येला सण येतात जसे की, श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात आणि या दिवशी बैलांचा पोळा सण साजरा करतात. शेतकरी लोकांसाठी हा एक महत्वपूर्ण सण आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. आपल्या पूर्वजांना आठवण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पित्राचे जेवण करतात.  दिवाळी सणाच्या अगोदर आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन हा सण उत्साहात साजरा केला जातो. व्यापारी लोकांसाठी हा महत्वाचा सण समजले जाते. दुसऱ्या दिवशी पाडवा म्हणजे दिवाळी असते. पौष महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या ( जैन) म्हणतात. या दिवशी संपूर्ण दिवसभर मौन धारण करणे गरजेचे असते. काही वेळा मौन राहणे खूप महत्वाचे आहे याची शिकवण या सणामुळे मिळते.
अशा रीतीने मराठी महिन्यातील प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या कोणत्या ना कोणत्या सणाने साजरी केली जाते.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment