नागोराव सा. येवतीकर

Saturday, 6 July 2019

लोकसंख्या दिवस

लोकसंख्या शिक्षणात शिक्षकांची भूमिका

सध्या भारताची लोकसंख्या 1 अब्ज 34 कोटी झालेली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीनच्या खालोखाल असलेला आपला भारत देश येत्या काही वर्षात पहिल्या क्रमांकावर येईल, ही बाब निश्चितच अभिमानास्पद नाही. या लोकसंख्या वाढीमुळे देशातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लोकांची वस्ती वाढून जंगल कमी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोलपणा पूर्णपणे ढासळत चालला आहे. भारतातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे. परंतु या शेतीवर देखील घरांचे अतिक्रमण वाढत आहे. अन्नधान्य उत्पादन लोकसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात होत आहे. अर्थात लोकसंख्या वाढीमुळे राष्ट्रीय विकासाच्या साधनांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन राष्ट्रीय विकासाला खीळ बसत आहे. मानवी कल्याणासाठी निर्माण होत असलेल्या प्रत्येक योजना असफल होताना दिसत आहेत. महागाईचा डोंगर आकाशाला गवसणी घालत आहे. यामुळे देशातील सर्वसामान्य मानव जातीचा जीवन जगण्याचा स्तर खालावत चालला आहे. याबाबतीत आज खरंच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे यास अनेक कारणे आहेत. आज ही समाज छोटे कुटुंब ठेवण्यास तयार नाहीत. हम दो हमारे दो हे शासनाचे ब्रीद आहे मात्र याबाबतीत जनता अजूनही अनभिज्ञ आहे. गरीब आणि अशिक्षित लोकांना छोट्या कुटुंबाचे महत्व अजून ही कळाले नाही. गरिबांच्या घरातील मुले कुटुंबाच्या कमाईमध्ये भर टाकतात, मदत करतात. जितकी जास्त मुले तितकी जादा कमाई करता येते, त्यामुळे मुले म्हणजे त्यांना एकप्रकारे वरदानच वाटतात. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त स्त्रिया अशिक्षित आणि निरक्षर आहेत. मुले म्हणजे देवघराची फुले असे ते समजतात. त्याचसोबत जन्मलेली सर्व अपत्ये जगतातच याची देखील त्यांना खात्री नसते म्हणून ही मंडळी दोनच्या वर अपत्यांना जन्म देतात. ही अवस्था अशीच चालू राहिली तर भारतातील लोकांचे जीवन जगणे असह्य होईल यात शंका नाही. ही बाब त्या प्रौढ माणसांना समजावून सांगणे, पटवून देणे अवघड आहे. परंतु भावी काळात प्रौढ बनणारी आजच्या शाळकरी मुलांना या लोकसंख्या वाढीच्या समस्येबाबत जाणीव करून दिल्यास ही मुले भावी काळात छोटे कुटुंब ठेवण्याकडे लक्ष देतील.
शाळेतील मुलांना शिकविण्याची जबाबदारी अर्थात शिक्षकांची असते. आज लोकसंख्या वाढत चालल्यामुळे जनता कोणकोणत्या संकटाचा मुकाबला करीत आहे ? याची जाणीव मुलांना अगदी सहज देता येईल. त्यासाठी एखादा स्वतंत्र विषय ठेवण्यात यावे असे काही नाही. अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या घटकातून मुलांना याबाबत अवांतर माहिती दिल्यास त्यांच्यात सजगता निर्माण होईल. लोकसंख्या वाढ झाल्यामुळे समाजात कश्याप्रकारे असमतोलपणा निर्माण झाले आहे हे चित्र विद्यार्थ्यांसमोर उभे केल्यास भविष्यात काही अंशी तरी ते नक्की विचार करतील. याबाबतीत एक चलचित्र जे की दूरदर्शन वाहिनीवर दाखविले जात असे ते आठवते. एका फिश टॅकमध्ये दोन मासे होते आणि त्यांना खाण्यासाठी भरपूर धान्य होते. काही दिवसांनी त्यात काही मासे वाढले आणि त्यामुळे अगोदर जे धान्य भरपूर होते असे वाटत होते ते बरोबर होऊ लागले. पुन्हा काही दिवसांनी त्यात मासे वाढले आणि धान्य कमी पडू लागले. त्यानंतर असा एक दिवस आला की, फिश टॅकमध्ये मासे भरपूर वाढले आणि धान्य मिळविण्यासाठी प्रत्येक मासा धावपळ करू लागला. त्यात त्या फिश टॅकचा स्फोट झाला. सारे मासे जमिनीवर पडले आणि काही क्षणात मृत्युमुखी पडले. यातून मुलांना खूप चांगला संदेश देता येऊ शकते. असे काही माहितीपट मुलांना दाखविले तर त्यांच्या डोक्यावर अनुकूल परिणाम होईल. आज समाजात अशिक्षित कुटुंबात पाच अपत्य दिसून येतात तसे सुशिक्षित कुटुंबात देखील दिसून येते. तेंव्हा प्रश्न पडतो की या शिक्षणाचा काय फायदा झाला ? शालेय जीवनात त्यांना लोकसंख्या शिक्षण बाबत मार्गदर्शन मिळाले नाही त्यामुळे ते चांगले शिकलेले असून देखील छोटे कुटुंब ठेवू शकले नाहीत. जास्त अपत्य असणाऱ्या घरातील सुखसोईचे चित्र आणि कमी अपत्य असणाऱ्या घरातील सुखसोईचे चित्र या दृश्यावरून मुलांच्या मनावर या समस्येच्या बाबतीत फार मोठे प्रतिबिंब शिक्षकांना टाकता येईल. लोकसंख्या शिक्षण प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षकांनी हे काम स्व इच्छेने मनावर घेऊन प्रामाणिकपणे केल्यास पुढील दहा वर्षात चित्र थोड्या फार प्रमाणात बदललेले दिसेल. विद्यार्थी गुरुजींची आज्ञा कधीच मोडत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी लोकसंख्या शिक्षणात स्वतः ला झोकून द्यावे तरच देशाचा अर्थात आपला विकास शक्य आहे.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment