नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 31 July 2019

श्रावण पाळा ; आरोग्य सांभाळा

श्रावण पाळा ; आरोग्य सांभाळा

मराठी वर्षातील पाचवा महिना म्हणजे श्रावण महिना होय. वैशाखाच्या प्रचंड गरमीतून आषाढाच्या सरीमुळे सर्वांची सुटका होते. शुष्क वातावरणाचे सर्वत्र हिरवेगार होण्यास सुरुवात होते. त्याच वेळी श्रावण मासास प्रारंभ होते. याच विषयी बालकवी आपल्या कवितेत श्रावणमासी, हर्ष मानसी असे सुंदर वर्णन केले आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. या महिन्यात बहुतांश लोकं देव देव करण्याकडे वळतात. मांसाहार खाणारे ह्या महिन्यात वर्ज्य करतात. काही लोकं या महिन्यात केस कापणे देखील टाळतात. पूर्ण महिनाभर हिंदू धर्मातील मंडळी कोणतेही अधर्म होऊ नये याची काळजी घेतात. यामागे धार्मिकसोबत काही वैज्ञानिक कारणे आहेत. जसे की या महिन्यात मांसाहार वर्ज्य करणे. श्रावण महिन्यात संपूर्ण दिवसभर वातावरण ढगाळ असते, बहुतांश वेळा सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामुळे माणसाचे चयापचय क्रिया मंदावते आणि विविध आजार बळावू शकतात. त्यातल्या त्यात मांसाहार करणे म्हणजे पोटासाठी कठीण आहे म्हणून ते खाणे टाळले पाहिजे. फार पूर्वी केस कापण्याची क्रिया घरोघरी व्हायचे. या महिन्यात पाऊस खूप पडत होता आणि कापलेले केस घरात राहून अन्नात मिसळले जाण्याची भीती होती म्हणून या महिन्यात फार पूर्वीपासून केस कर्तन करणे टाळले जात होते. पण आज कोणी ही आपल्या घरी केस कर्तन करत नाहीत, तर दुकानात जाऊन ते केस कर्तन करतात. त्यामुळे श्रावण महिन्यात ही नेहमी प्रमाणे केस कर्तन केले जात आहे. पूर्वीच्या काळी श्रावण महिन्यात खूप पाऊस असायचा. पूर्वीचे लोकं असे म्हणायचे की, पाऊस असा पडायचा की लोकांना हगायाला किंवा मुतायला देखील बाहेर पडता येत नव्हते. अति पावसामुळे पिण्याचे पाणी खराब होत असत व त्यामुळे जुलाब, हगवण किंवा कावीळ सारखे आजार बळावू शकतात. म्हणून दिवसभर खा - खा न करता एकवेळचे जेवण करणे किंवा दोन - तीन वेळा जेवण केल्यास साधे जेवण करण्यावर भर देत असत. पावसामुळे लोकांना शेतात किंवा अन्यत्र कोठे ही जाता येत नसत त्यामुळे गावातच ही मंडळी एकत्र येत असत आणि त्यातलाच एखादा ज्याला छानवाचन करता येत असे तो रामायण, महाभारत, किंवा अन्य धार्मिक पुस्तकाचे वाचन करीत याला पारायण असे म्हटले जाई. रात्रीच्या वेळी देखील काही वृद्ध मंडळी एकत्र येऊन पोथी वाचन ऐकण्याचे काम करीत. या महिन्यात सोमवारी शिवलिंगाचे म्हणजे महादेवाचे पूजन केल्या जाते तर शनिवारच्या दिवशी बलोपासक हनुमंताची पूजा केली जाते. सोमवारी आणि शनिवारी महिला भगिनी उपवास करतात तर काही पुरुष मंडळी फक्त शनिवारचा उपवास धरतात. तर काही मंडळी महिनाभर एकवेळचे जेवण धरतात. त्यामागे दुसरे तिसरे काही कारण नसून या महिन्यात माणसांची अन्न पचविण्याची शक्ती कमी असते म्हणून असे करणे आपल्या शरीरासाठी योग्य आहे. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि शेवटी दीप अमावस्याने सुरुवात झालेला महिना पिठोरी अमावस्येला पोळा या सणाने या महिन्याची समाप्ती होते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक,
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

3 comments:

  1. श्रावण महिन्याची माहिती देणारा लेख

    ReplyDelete
  2. अंधश्रद्धा व विज्ञानाची जोड घालणारा सुंदर लेख आपले अभिनंदन

    ReplyDelete
  3. खुपच छान हिन्दु संस्कृती आणि विज्ञानाची सांगड..

    ReplyDelete