अन्न म्हणजे पूर्णब्रह्म
अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. अश्मयुगीन काळातील लोक अन्नाच्या भटकंतीत अनेक वर्षे घातली. या अन्नाच्या शोधातच त्यांनी अग्निचा शोध लावला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. गरज ही शोधाची जननी आहे या म्हणीनुसार अश्मयुगीन काळातील माणूस प्राण्याची शिकार करून कच्चे मांस खात असे. याच बरोबर जंगलातील फळे आणि कंदमुळे हे त्यांचे प्रमुख खाद्य होते. अग्निचा शोध लागल्यानंतर हा माणूस प्राणी भाजुन खाऊ लागला. त्याला भाजलेल्या अन्नाची चव माहित झाली तसे प्रत्येक अन्न पदार्थ भाजुन खान्यास सुरुवात केली. पाण्याजवळ वास्तव्य करून राहत असल्यामुळे त्यांनी मग हळू हळू शेती करण्यास सुरुवात केली. शेतातुन आलेल्या अन्नधान्याचा वापर जेवण्यात करता येतो हे कळायला लागल्यावर माणसाचे जेवण्यात सुधारणा होऊ लागली. मग माणूस एकत्र राहू लागले. त्यांचा समूह तयार झाला या समुहाचे एका वस्ती मध्ये रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. पाहता पाहता गाव आणि नगर त्यानंतर महा नगर ही तयार झाले. अन्नाच्या शोधात आपण आज या स्तरापर्यन्त येऊन पोहोचलो आहोत आणि आज ही आपण त्याच अन्नाच्या शोधात रोजच फिरत असतो. मात्र याच अन्ना विषयी किंवा आहार विषयी आपण खरोखर जागरूक आहोत ? याचा एकदा तरी विचार करीत नाही. मानवाला जीवन जगण्यासाठी किंवा शारीरिक वाढीसाठी अन्नाची गरज असते. म्हणून अन्न मिळविण्यासाठी प्रत्येकजण जीवाचे रान करीत असतो. आज आपण जे काही काबाडकष्ट करीत आहोत ते सर्व या अन्नासाठी नव्हे काय ? आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पोट भर खायला मिळावे म्हणून कुटुंबप्रमुख या नात्याने पुरुष आणि स्त्री दिवस रात्र काम करीत असतात. त्याच केलेल्या कामाच्या मोबदल्यात पैसा मिळतो आणि त्या पैश्यावर घरात लागणाऱ्या अन्नाची पूर्तता करीत असतो. अन्न जर नसेल तर आपल्या पोटाचे नीट पोषण होणार नाही. त्यामुळे प्रत्येक मानवाला मग तो गरीब असो वा श्रीमंत त्याला अन्नाची गरज आहे. भारतात एका बाजूला उपासमारी ने मरणारी माणसे दिसतात तर दूसरी कडे जास्त जेवल्यामुळे पोटाच्या विविध आजाराने त्रस्त माणसे दिसतात हे पाहून मन खिन्न होते. अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्यामुळे अन्न वाया घालवू नये असे वाडवडील मंडळी नेहमी सांगत असतात. परंतु जेंव्हा एखाद्या कार्यक्रमात जेवणाच्या ठिकाणी जे अन्नाची नासाडी दिसून येते ते पाहून मन फारच उदास होऊन जाते. फार पूर्वी पंगतीत बसून जेवण दिल्या जायचे. त्यामुळे लोकं पोटभर जेवत असत आणि अन्न देखील वाया जात नसे. मात्र जेवण्याच्या बुफे पद्धत आल्यापासून अन्नाची नासाडी वाढलेली आहे. वास्तविक पाहता अन्नाची बचत व्हावी आणि जेवढा लागेल तेवढा लोकांना घेता यावं या उद्देशाने ही पद्धत सुरू झाली मात्र ही पद्धत आज एका वेगळ्याच वळणावर आली आहे. कार्यक्रमात उरलेले अन्न फेकून देण्यापेक्षा समाजातील गोरगरीब आणि गरजू लोकांना दिलेले केंव्हाही चांगले. अन्नाचे महत्व कळाले की माणूस अन्न फेकून देत नाही, हे मात्र खरे आहे.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
No comments:
Post a Comment