नागोराव सा. येवतीकर

Sunday, 17 March 2019

होळी स्पेशल

पळस, होळी आणि धुलिवंदन

होळीची चाहूल म्हणजे आजूबाजूच्या परिसरात फुललेला पळस. पळसाची फुले आपल्या विशिष्ट रंगामुळे सर्वाना आकर्षित करत असतात. मराठी वर्षातील शेवटच्या फाल्गुन महिन्याला सुरुवात झाली की शेतात आणि जंगलात पळसाच्या झाडाला अनेक फुले दिसू लागतात. असे म्हटले जाते की पूर्वीच्या काळातील माणसे ही पळसाची फुले एकत्र करून त्याचा रंग तयार करीत असत आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवर हा रंग टाकून धुलीवंदनाचा सण साजरा करीत. परंतु काळ बदलत गेला तसा लोकांच्या सण साजरा करण्याच्या पद्धती देखील बदलत गेल्या. आज या पळसाच्या फुलांकडे लोकांचे फक्त लक्ष जात आहे मात्र त्याचा रंग म्हणून कोणी वापर करत नाहीत. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध रंगाचा वापर आज केल्या जात आहे, ज्यामुळे अनेकांना त्वचारोग होण्याचा धोका देखील संभवत असतो. काही महाभाग मंडळी वोर्निश कलर ही वापरतात. ज्यामुळे खूप त्रास होतो. मित्रा-मित्रात हा खेळ खेळताना कोण कशाचा वापर करेल हे सांगता येत नाही. एकमेकांवर अंडे फोडण्याचे प्रकार देखील काही ठिकाणी होतात. अंड्याच्या उग्र वासामुळे रंगाचा खेळ बेरंग होऊ शकतो. म्हणून सर्व बाबी लक्षात घेऊन नैसर्गिक रंगाचा वापर करून रंगपंचमीचा सण साजरा केल्यास ते सर्वासाठी सोईस्कर होईल. 

सायंकाळच्या कातरवेळी
शेतात करूया मुक्त विहार
रखरखत्या वातावरणात
पाहू पळस फुलांचा बहार

*झजरी दादा, झजरी दादा*

फाल्गुन महीना सुरु झाला की आमच्या बच्चे कंपनीला खुप आनंद व्हायचा कारण सर्वात आवडणारा आमचा होळीचा सण जवळ आलेला असायचा. होळीच्या पंधरा दिवासपूर्वीच आम्हाला वेध लागायाचे. तीन चार मित्र मिळून एक गट केल्या जायचे. सुताराजवळ जाऊन दोन छान लाकडे तासुन घ्यायचे, ज्यास आज टिपरी म्हणतात हे कळले. ते दोन लाकडे एकमेकावर आपटून प्रत्येकाच्या घरा समोर जाऊन *झजरी दादा, झजरी दादा* हे गीत म्हणून खांद्यावर असलेल्या झोळीमध्ये घरातील माई, ताई, अक्का वाटीभर ज्वारी टाकायचे. हे दिवस म्हणजे प्रत्येकांच्या घरी शेतातून ज्वारी आलेली असायची त्यामुळे ज्वारी देताना कोणी कुरकुर करायचे नाही. जर कोणी दान दिले नाही तर त्यांच्या नावाने बोंबा मारुन पुढे जायचो. असे आम्ही रोज पंधरा दिवसात पूर्ण गाव पिंजुन काढायचो. जवळपास एक-दीड पायली ज्वारी जमा व्हायची. ते सर्व ज्वारी दुकानात विकून मिळालेल्या पैश्यात खोबऱ्याचे व साखरचे हार प्रत्येकाला एक-एक मिळेल असे घ्यायचो आणि उरलेल्या पैश्यात रंग घेत असू. होळीच्या सायंकाळी आम्ही सर्व मित्र मारोतीच्या पाराजवळ जेथे होळी तयार केलेली असायची तेथे जमा व्हायचो. वेगवेगळ्या नावाने मग बोंबा मारायचो. गावातील मानकरी वाजत गाजत येऊन होळी पेटवायचा. आम्ही होळीतील जाळ घरी नेऊन छोटी होळी करायचे आणि त्यात खोबरा व हरभरा भाजून खायचो. मग रात्री जेवताना पूरणपोळी आणि कढीची मजा काही औरच असायची. दुसऱ्या दिवशी सकाळ होण्याची वाटच पाहत असू. सकाळपासून मग मित्रामध्ये रंग खेळण्याची मजा यायची. कोणी कोणास ओळखू येणार नाही एवढा रंग लावले जायचे. दुपारपर्यंत रंग खेळून झाल्यावर स्नान करून मग घरातच बसायचो. आज परत ते सर्व दिवस आठवू लागले. ते मित्र परत दिसू लागले. परत एकदा छोटे व्हावे आणि खुप मजा करावे असे वाटते.

धुलिवंदन

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. मनातील राग, द्वेष इत्यादी भावनाना मोकळी वाट करून देण्यासाठी हा सण अत्याधिक महत्वाचा आहे. एकीकडे मुले रंगात न्हाऊन निघतात तर याच दिवशी कुमारिका मुली प्रत्येकाच्या घरी जाऊन ओवाळणी करतात आणि त्यांच्याकडून भेट म्हणून धान्य किंवा पैसे घेतात. घरात काम करणारे जे काही कामगार मंडळी असतात ते देखील खुशाली मागतात आणि घरधनी त्यांना खुशाली देऊन खुश करतात. शहरापेक्षा ग्रामीण भागात हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. 

दरवेळी सण येतात नि जातात
एकमेकांत प्रेम निर्माण करतात
सणाचे महत्व समजून घेतले तर
प्रत्येक सण सदा आनंदच देतात.

आपली आठवण अशीच येत राहो, मित्रांनो आपणा सर्वाना होळी आणि धूलिवंदनच्या रंगबिरंगी शुभेच्छा.

नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment