नागोराव सा. येवतीकर

Friday, 23 February 2018

कॉपी : एक कलंक

कॉपी म्हणजे एक कलंक

कॉपी करणे म्हणजे नकला करणे असा सारासार अर्थ घेतला जातो. परीक्षेचा काळ आला की कॉपी हा शब्द कानावर पडतो. वर्षभर अभ्यास न करणारे विद्यार्थी परीक्षेच्या काळात कॉपी करण्याचा विचार करतात. नकला मारण्यासाठी ही मुले नाना प्रकारच्या क्लृप्त्या किंवा योजना तयार करतात. नकला मारणे म्हणजे एक प्रकारे चोरी करण्यासारखेच आहे, तो सुद्धा एक गुन्हाच आहे. शालेय विद्यार्थ्यांचे कामच असते अभ्यास करणे. तेच काम जर तो यशस्वीपणे पूर्ण केला नाही तर भविष्यात त्याला त्याचे फळ भोगावेच लागतात. गेलेली वेळ कधीच पुन्हा परत मिळत नाही म्हणून वेळेचा सदुपयोग जो करतो तो जीवनात कधीच अयशस्वी होत नाही आणि त्याला कॉप्या करण्याची देखील गरज भासत नाही. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करत बसण्यात काही अर्थ नाही. आपल्यासोबत शिकलेले मित्र जेव्हा अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून आपल्यासमोर येतात, त्यावेळी आपल्या तोंडून सहज शब्द बाहेर पडतात की, मी त्यावेळी शिक्षकांच्या बोलण्याकडे किंवा शिकवण्याकडे लक्ष दिलं नाही अन्यथा मी सुद्धा काहीतरी बनलो असतो. शिक्षकांच्या शिकवण्याकडे किंवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देणारे, वर्गात अनुपस्थित असणारे आणि शिक्षकाने दिलेले कार्य पूर्ण न करणारे विद्यार्थी या कॉप्याला बळी पडतात. कॉप्या करून एकवेळ या पुस्तकी अभ्यासक्रमातून बाहेर पडाल पण आयुष्याच्या परीक्षेत कसे उत्तीर्ण व्हाल ? एखादा विद्यार्थी कॉप्या करून जर डॉक्टर झाला तर एखादा रुग्ण दगावले, एखादा विद्यार्थी कॉप्या करून जर इंजिनियर बनला तर धरण कोसळून शे दोनशे लोक मरतील पण एखादा विद्यार्थी जर कॉप्या करून शिक्षक झाला तर त्याच्या हाताखालच्या किती पिढ्या बरबाद होतात ? याचा कधी विचार केला आहे काय ? परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, कॉप्या करून शिक्षण क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस भरमसाठ वाढत आहे. पैशांच्या बळावर जो तो शिक्षक बनत आहे, हे पुढील भविष्यासाठी नक्कीच चांगली बाब नाही.
दहावी व बारावीच्या परीक्षेत फार मोठ्या प्रमाणावर कॉप्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येते. कारण हे दोन वर्ग आयुष्यातील महत्त्वाचे वळण देणारे वर्ग असतात. पण जास्तीत जास्त मार्क मिळवायचे म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालक देखील गैरमार्गाचा अवलंब करतात. नुकतेच बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाले आणि पहिल्याच दिवशी 12वीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. याला काय म्हणावे ? लोकांची नीतिमत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या कॉप्यावर बंदी यावी आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा संपन्न व्हावेत म्हणून नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी सन 2010 मध्ये नांदेड जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षेचे आयोजन केले. त्यामुळे त्यावर्षी जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी लागला. पण परीक्षेला लागलेली कीड बाजूला करता आले हे महत्त्वाचे आहे. यामुळे नकलावर अवलंबून न राहता मुले अभ्यास करू लागली. एक परिणाम असा झाला की जो निकाल लागत होता तो पूर्ण सत्य होता. त्यात फुगीरपणा नव्हता. त्याचबरोबर परीक्षेच्या काळात होणारा पूर्ण सावळागोंधळ बंद झाला होता. या परीक्षावर अनेक जणांची पोटे अवलंबून होते, झेरॉक्सवाले, नकला लिहिणारे, पुरवठा करणारे, शाळेत असलेली शिपाई, शिक्षक, संरक्षणासाठी असलेले पोलीस, हॉकर्स, एवढेच काय हॉलमध्ये पाणी देणारे वाटर बॉय यांची देखील चलती राहत होती. या काळात शहरातील सर्व धाबे, बियरबार आणि परमिट रूम हाऊस फुल्ल राहत असे. पण हे सारे बंद झाले या कॉपीमुक्त अभियानामुळे. कॉप्या करून भरपूर गुण घेतलेला विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या यादीत सर्वात खाली असायचा. प्रत्येक ठिकाणी कॉपी कामाला येत नाही. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी कॉफी करणे हा योग्य मार्ग नाही ते एक प्रकारचे बांडगूळ आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने याविषयी गंभीरतेने विचार करून एक वेळा नापास झाले तरी चालेल पण कॉपी करणार नाही असे ठरविणे आवश्यक आहे. कॉप्यामुळे अभ्यास केलेल्या मुलांचे खूप नुकसान होते. अपार मेहनत करून रात्रंदिवस अभ्यास केलेल्या मुलांना कमी गुण मिळतात आणि कॉप्या केलेल्या मुलं जास्त गुण मिळतात. अभ्यास करणारा देखील पुढे अभ्यास करीत नाही. पर्यवेक्षक मंडळीनी देखील जरासा कडकपणाची  भूमिका घेतली तर या कॉपी प्रकरणाला निश्चितच आळा बसू शकेल असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )

Thursday, 22 February 2018

छंद जगावेगळा

असा छंद असा ध्यास

तब्बल तीस देशातील दुर्मिळ नाणी, नोटाचा संग्रह

 छंद मग कोणताही असो, तो पुर्ण करेपर्यंत जीवाला आराम नसतो. प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम जि. नांदेड येथे कार्यरत असलेले राजेश जेटेवाड बरबडेकर यांनाही अनोखा छंद जडला आहे. देशविदेशातील विविध नाणी आणि नोटा संग्रह करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे. 

 'रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा'  मानून अतिशय नम्र असलेला एक आरोग्य सेवक आपल्या सेवकपदाची जबाबदारी सांभाळत स्वत:चा छंद जोपासण्यासाठी मिळेल त्या वेळेत, जमेल त्यांच्याकडून, वाटेल तेवढे पैसे देऊन देशी, विदेशी नाणी व नोटांचे संकलन करतो. 

अमेरिका, आस्ट्रेलिया, अरब, ओमान, बेल्जियम, बेंकाॅक, बांग्लादेश, कॅनडा, फ्रान्स, हाँगकाँग, इंडोनेशिया, इराक, केनिया, कुवैत, मलेशिया, मेक्सिकोस, माॅरिचश, मालदीव, नेपाळ, पिलिपिन्स, पाकिस्तान, श्रीलंका, सिंगापुर, सौदी अरेबिया, आदी देशासह १९१९ पासूनची भारतीय नाणीही त्यांनी संकलित केली आहेत. 

          विशेष बाब म्हणजे एवढ्यावरच न थांबता आपल्या दर्जेदार लेखणीतून कवी मन देखील जागविले आहे. सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांना एक दुर्मिळ नोट सापडली अन् तेव्हापासून दुर्मिळ नाणे, नोटा संकलित करण्याचा छंद लागला. तो आजतागायत कायम आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जगतांना त्यांनी अनेक संकटांवर मात करित सेवेत अतिशय नम्रपणा जपला आहे. त्यांच्या बालपणातच आई अपघाती मृत्यूने त्यांना सोडून गेल्या. प्रत्येक रुग्णात आई शोधणा-या जेटेवाड यांनी या सेवेला सर्वोच्च स्थानी मानले आहे. 

          एक आना, दो आना, एक पैसा, एक नया पैसा, दो पैसे, दो नये पैसे, तीन पैसे, पाच पैसे, पाच नये पैसे, दहा पैसे, विस पैसे, पाव रुपया, चार आना, पच्चीस पैसे, आधा रुपया, एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये, आदी एक आण्यापासून ते दहा रुपयाच्या नाण्यापर्यंत. जुन्या नवीन एक रुपयाच्या नोटा पासून ते नवीन दोन हजार रुपयांच्या नोटा त्यांच्या संग्रही आहेत. 

          विशेष म्हणजे शेवटच्या तीन क्रमांकात १११, ३५८, ७८६, या नोटासह ०००००१ या क्रमांकाची नोट सर्वांचे लक्ष वेधून घेते. पुर्वीच्या जुन्या एक, दोन, पाच, दहा, वीस, पन्नास, व शंभर रुपयांच्या नोटांवर 'अशोक स्तंभ' आहे. त्या नोटासह आताच्या पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची फोटो असलेल्या सर्व नोटा संग्रही आहेत. 

          ८ नोव्हेंबर २०१६ पासून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नव्याने चलनात आलेल्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटांवर समोरील बाजूला 'महात्मा गांधी' यांचा फोटो तसेच पाठीमागील बाजूला 'स्वच्छ भारत. एक कदम स्वच्छता की ओर' असा संदेश पहावयास मिळतो. जुन्या व नवीन एक रुपयाच्या नोटेवर वित्त सचिव यांची स्वाक्षरी तर त्या पुढील मुल्याच्या नोटांवर गव्हर्नर यांची स्वाक्षरी पहावयास मिळते. जेटेवाड यांच्या संग्रहात आय. जी. पटेल, रा. ना. मल्होत्रा, एस वेंकटरमणन, सी. रंगराजन, बिमल जालान, या. वे. रेड्डी, दु. सुब्दाराव, रघुराम जी राजन, रतन पी वातल, उर्जित आर पटेल, आदी गव्हर्नर यांच्या स्वाक्षऱ्या केलेल्या वेगवेगळ्या मुल्याच्या नोटा संग्रहात जपून ठेवल्या आहेत. 

          ऑगस्ट २०१७ मध्ये प्रथमच स्वातंत्र्यानंतर २०० रुपयाची नोट अस्तित्वात आली. दोनशे रुपयाच्या तेजस्वी पिवळ्या रंगाच्या नोटेसह ५० रुपयाची नवीन नोट चलनात आली. त्याही नोटा संग्रही आहेत. 

          विदेशी नाणी, नोटासह आपल्या देशातील एक, दोन, पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशे, हजार आणि दोन हजार रुपये अशी जवळपास अकरा वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटाही त्यांच्या संग्रहात जपून ठेवल्याचे पहावयास मिळते.

श्री माता वैष्णोदेवी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा बसवेश्वर, जगतगुरु श्री नारायणा, गुरुदेव, बृहदीश्वर मंदिर, भगवान महावीर, स्वामी विवेकानंद, स्वामी चिन्मयानंद, जन्म शताब्दी निमित्त काढण्यात आलेली विशेष नाणी त्यानी जतन करून ठेवली आहेत. 

छत्रपती शिवाजी, महाराणा प्रतापसिंह, वीर दुर्गादास या वीर महापुरुषांचीही नाणी त्यांनी जपून ठेवले आहेत. यासह महात्मा गांधी, शहीद भगतसिंह, सुभाषचंद्र बोस, यांच्या जन्मशताब्दी निमित्त काढण्यात आलेली नाणी विशेष लक्ष वेधून घेतात. 

          प्रथम स्वतंत्रता संग्राम १५० वर्ष, कुका आन्दोलन के १५० वर्ष, दांडी यात्रा के ७५ वर्ष, स्वतंत्रता का ५० वा वर्ष, १९६५ वीरता और बलिदान सामारिक अभियान का स्वर्ण जयंती वर्ष २०१५, ही नाणी पहातांना अंगावर शहारे येतात. 

          भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, कु कामराज, मदर तेरेसा, डॉ. बी. आर. आंबेडकर, राजीव गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकनायक जयप्रकाश नारायण, मदनमोहन मालवीय की १५० वी जयंती निमित्त काढण्यात आलेली विशेष नाणी जेटेवाड यांनी जीवापाड जपून ठेवली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याजवळ दादाभाई नवरोजी, देशबंधु चित्तरंजन दास, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अरविंद, लुई ब्रेल, रवींद्रनाथ टागोर, मोतीलाल नेहरू, सी. सुब्रमणियम, पेररिज्ञर अन्ना, संत अलफोन्सा, बेगम अख्तर, आचार्य तुलसी, होमी भाभा जन्म शताब्दी निमित्त विशेष नाणी काढण्यात आली होती. ती नाणीही त्यांच्या संग्रहात आहेत. 

          येवढेच नाही तर त्यांच्याकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या ५० व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली नाणी सुध्दा जपून ठेवली आहे. यासह आंतरराष्ट्रीय परिवार वर्ष, स्वास्थ मां से स्वास्थ्य शिशु, खुशहाल बालिका भविष्य देश का, छोटा परिवार खुशियाँ अपार, ही नाणी परिवाराबद्दल बरीच प्रेरणा देणारी आहेत. 

          श्रम जगत, मत्स्य उद्योग, इलाहाबाद उच्च न्यायालय का १५० वां वार्षिकोत्सव, भारतीय स्टेट बैंक, भारतीय रिजर्व बैंक प्लैटिनम जयंती, छोटे किसान, जैविक विविधता विश्व खाद्य दिवस, भविष्य के लिए भोजन, जल जीवन का आधार विश्व खाद्य दिवस, भारतीय कृषि का विश्व व्यापीकरण एग्री एक्सपो ९५, नवम एशियाई खेल दिल्ली १९८२, ८९ वा अंतर संसदीय संघ सम्मेलन १८८९-१९९३,भारत की संसद के ६० वर्ष १९५२-२०१२, दक्षिण अफ्रीका से वापसी शताब्दी स्मरणोत्सव १९१५-२०१५,अंतरराष्ट्रीय योग दिवस २०१५, रेल्वे १५० गौरवपूर्ण वर्षे २००३, या निमित्ताने काढण्यात आलेली विशेष नाणी काळजीपूर्वक जपून ठेवली आहेत. 

          यासह पोस्टाची तिकिटेही त्यांच्या संग्रहात आहेत. त्यांनी सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. त्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रुग्णांना फळे - खिचडी वाटप, 'दारु नको, दुध प्या व्यसनमुक्त व्हा' आदी उपक्रम हाती घेतले आहेत. 'रक्तदान हेच श्रेष्ठदान' समजून अनेक वेळा रक्तदान केले आहेत. 

          दुर्मिळ नाणी, नोटाचे व पोस्टाच्या तिकिटांचे प्रदर्शन भरविण्याचा मानस. ध्येयवेडया जेटेवाड यांच्या या लाखमोलाच्या छंदाला घरच्यासह नातेवाईक व मित्र परिवारांनी मोठी साथ असल्याचे त्यांचे मित्र परिवार सांगतात.

          गरिबी, दु:ख, संकटे अनुभवलेल्या जेटेवाड यांना सामाजिक दायित्व पार पाडण्याची तळमळ आहे. त्यांनी आतापर्यंत शेकडो कविता लिहिल्या असून त्यांचा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अनेक साहित्य संमेलनात त्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या असून त्यांच्या अनेक काव्यरचना विविध दैनिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत. 

          दुर्मिळ नाणी, नोटाचे प्रदर्शन भरवून त्याद्वारे मिळालेल्या पैशातून सामाजिक कार्यासाठी तो उपयोगात आणावा असा त्यांचा मानस आहे.

शब्दांकन : ना. सा. येवतीकर, 
स्तंभलेखक, नांदेड

Tuesday, 20 February 2018

शांतता ....... परीक्षा चालू आहे !

शांतता ........परीक्षा चालू आहे !

फेब्रुवारी - मार्च महीना उजाडला की सर्वत्र परीक्षेचे वारे वाहायला लागते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी - बारावीच्या परीक्षेने दिनांक 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सत्राला सुरुवात होत आहे. ज्यांच्या घरात दहावी किंवा बारावीच्या वर्गात शिकणारी मुले असतात त्यांच्या घरात कमालीची शांतता दिसून येते. आपल्या मुलांना अभ्यास करताना कसलाच त्रास नको म्हणून आई वडील मुलांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. मुलांना काय हवे आणि काय नको याची दक्षता घेतात. त्यामुळे राहून राहून वाटते की परीक्षा पाल्याची आहे की पालकांची. कारण प्रत्येक बाबतीत ते मुलांच्या अभ्यासाची काळजी करतात. यात मुलांना ही काही तरी विशेष अशी जाणीव होते आणि ते सुद्धा नेमके याच वर्षी धीर गंभीर होतात. दहावीच्या वर्गात येण्यापूर्वी पालक आणि विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाकड़े लक्ष देत नाहीत. मग दहावीच्या वर्गात प्रवेश केल्याबरोबर पालक आणि विद्यार्थी दोघे पण जागे होतात. ऐन वेळी अभ्यास केल्याने यश मिळते काय ? याचा जरा देखील विचार करीत नाहीत.

घरातील वातावरण -
परिक्षेच्या काळात घरातील वातावरण मजेशीर आणि हसत-खेळत असायला पाहिजे परंतु त्या उलट परिस्थिती प्रत्येक घराघरात पाहायला मिळते. सर्वात पहिल्यांदा घरातील सर्वाना आवडते असलेले टीवी बंद केल्या जाते. या टीवीचा परिणाम सर्वावर होतो विशेष करून घरात अभ्यास करणाऱ्या मुलांवर होतोच होतो. सायंकाळच्या वेळी मुले जेंव्हा अभ्यासाला बसतात नेमके त्याच वेळी टीवीवर कोणता ना कोणता खास कार्यक्रम चालू असतो. ते कार्यक्रम पहावे अशी मुलांची पण ईच्छा असते मात्र पालक त्यास अभ्यास कर म्हणत खोलीत बसवितात. तो शरीराने जरी खोलीत असला तरी मनाने तो पुस्तकात नसतो मुळीच. या वाचनाचा किंवा अभ्यासाचा काही अनुकूल परिणाम दिसतात काय ? अर्थात त्याचे उत्तर नाही असेच येते. त्यामुळे घरातील टीवी बंद ठेवणे हा सर्वोत्तम उपाय आहे काय ? क्रिकेट हे मुलांचे सर्वात आवडते खेळ आहे. मुले आपला जास्तीत जास्त वेळ खेळण्यात घालवितात, त्यातल्या त्यात क्रिकेट खेळण्यात. क्रिकेट मंडळ सुध्दा नेमके परीक्षेच्या काळातच क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करतात. त्यामुळे मुलांचे अभ्यासात अजिबात लक्ष राहत नाही आणि त्याचा परिणाम निकालावर होतो. याविषयी क्रिकेट मंडळाने विचार करून परीक्षा संपल्यावर म्हणजे एप्रिल- मे महिन्यात सामन्याचे आयोजन केल्यास मुलांचे नुकसान होणार नाही. परिक्षेच्या काळात घरातील प्रत्येकजण काळजीपूर्वक वागतात. मुलांच्या अभ्यासासाठी त्रास होणार नाही यांची काळजी प्रत्येक सदस्य घेताना दिसून येतो. एवढेच नाही तर पाहुणे मंडळी सुध्दा विचार करूनच घरी येतात. मुलांची आई शेजाऱ्यां-पाजाऱ्यांकडे सहज बोलून जाते, यावर्षी मुलां-मुलींचे दहावीचे वर्ग आहे बाई, मला कुठे जायलाही जमत नाही. त्यांना सोडून कुठे जावे. त्यांचा अभ्यास बुडेल आणि त्यास कमी मार्क पडतील असे बोलते. त्यांच्या परीक्षेमुळे आई कोणाच्या ही घरी जाणे किंवा कार्यक्रमास जाणे टाळते. मुलांच्या परीक्षेचा घरात वर्षभर परिणाम जाणवतो. आई-बाबा कुणाच्या लग्नाला तर जात नाहीतच शिवाय घरात कोणाचे लग्नाच्या कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा केल्या जात नाही. दरवर्षी सहलीला जाणारे कुटुंबसुध्दा आपली सहल रद्द करुन मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देतात. काही क्षणापुरतेच सण समारंभ साजरे केली जातात. मुलांच्या परिक्षेच्या काळात घरातील मंडळी सर्व काही त्याग करतात. याचे मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल काय ? हा एक मोठा प्रश्न आहे.

परिक्षेची काळजी -
एक काळ होता ज्यावेळी दहावीच्या परिक्षेला खुप महत्त्व होते. दहावी झाली की डी एड करायचे आणि लगेच शिक्षकाची नोकरी लागायाची. त्यासाठी दहावीला चांगले गुण मिळणेे आवश्यक होते. त्यासाठी पालक मंडळी वेगवेगळ्या योजना वापरत असत. कसे ही करून दहावीला 75% च्या वर गुण मिळावे यासाठी ज्या ठिकाणी नकला खुप चालतात अश्या शाळेत पैश्याच्या बोलीवर मुलांना प्रवेश दिल्या जायचे. शाळेचा तो एक प्रकारे व्यवहार सुरु झाला होता. ऐन परिक्षेच्या काळात मुलांना मोकळेपणाने म्हणजे नकला मारुन पेपर लिहू द्यावे यासाठी ही पालकांची धडपड असायची. शाळेकडे जे तोंडी गुण असायचे त्यासाठी सुध्दा पैसा दिला जायच्या. यात नकलाचा एवढा सुळसुळाट वाढला होता की, लिहिता-वाचता न येणारा विद्यार्थी देखील चांगल्या मार्काने पास होऊ लागला. पुढे डी एड ला ही त्यांचा नंबर लागू लागला आणि तीन वर्षात शिक्षक म्हणून नोकरी सुरु. अश्या या पध्दतीत विद्यार्थ्यापेक्षा पालकाना त्यांच्या परीक्षेची जास्त काळजी असायची. मात्र गेल्या दहा वर्षात सर्व पध्दती बदलून गेल्या. बोर्डाने सुद्धा परीक्षा पध्दतीत आमुलाग्र बदल केला आणि प्रशासनाने ही यात मोलाची साथ देत कॉपीमुक्त परीक्षा घेण्यास सहकार्य केले. त्यामुळे पूर्वी दहावी आणि बारावीच्या परिक्षेला जे जत्र्याचे स्वरुप येत होते, ते आत्ता बंद झाले. बारावी नंतर डी एड करण्यात आले आणि गेल्या सहा वर्षा पासून शिक्षक भरती  बंद आहे त्यामुळे डी एडचे ही आकर्षण कमी झाले. म्हणजे आज पालकांच्या डोक्यावरील ओझे खुप प्रमाणात कमी झाले आहे असे वाटत असले तरी काही पालक आपल्या मुलांच्या करियर साठी कोणत्याही स्तरावर जाऊन समोरच्याशी बोलणे करतात. असे अनेक गैरप्रकार परिक्षेच्या काळात वाचायला आणि पाहायला मिळतात. एखादा विद्यार्थी अभ्यासात मध्यम असेल तर अश्या मुलांच्या पालकाना तर खुपच काळजी लागते. त्या मुलांचे भविष्य त्यांना अंधकारमय वाटते. त्याची काळजी मुलाने करण्याऐवजी पालकच करतात. त्या पेक्षा पालकानी त्या मुलाची आवड निवड लक्षात घेऊन त्यास मार्गदर्शन केल्यास तो जीवनात नक्की यशस्वी होऊ शकतो. पालक आपल्या मुलांना लहान सहान गोष्टीत त्यास कसल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता मदत करतात याचा अर्थ ते आपल्या मुलांना पंगू करतात, असे नाही काय ? असे केल्याने मुले आळशी होणार नाहीत कश्यावरुन ? सर्वसाधारण पाहणीमध्ये असे दिसून येते की गरीबाची लेकरे ज्या तन्मयतेने शिकतात श्रीमंताची लेकरे ज्यास कोणतीही वस्तू मागितली की मिळते ते शिकत नाहीत. असे का ? यावर कधी पालकानी विचार केला आहे काय ? शिक्षणाची गरज आणि आवश्यकता जोपर्यंत मुलांना समजणार नाही तोपर्यंत पालकाचे सर्व प्रयत्न असफल आहेत. कोणत्याही गोष्टीची कमतरता नसलेल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व लवकर कळणार नाही. बाप कमाई वर काही एक कळत नाही. जेंव्हा आप कमाई चालू होते त्यावेळी एक-एक पैश्याचे महत्त्व कळते. म्हणून कमवा आणि शिका यासारखे धोरण खुप मोठे काम करून जातात. वास्तवतेचे चटके लागले पाहिजे तर तो अभ्यासाकडे वळतो. आज मोठ्या शहरात असे अनेक मुले आहेत जे बापाच्या पैश्यावर आणि अभ्यासाच्या नावाखाली मजा करीत फिरतात. परीक्षेत यश नाही मिळाले की पेपर अवघड होता, नशीब साथ दिली नाही, थोडक्यात हुकला, स्पर्धा खुप वाढली असे अनेक कारणे सांगून वेळ मारून नेतात. त्याच परीक्षेत अगदी गरीब असलेल्यां मुला-मुलींची ज्यानी कोठे ही शिकवणी लावले नाही त्यांची निवड होते. हे कश्यावरुन तर मुळात मुलांना अभ्यास करण्याची गोडी असावी लागते, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. म्हणून पालकानी आपल्या मुलांच्या परीक्षा आणि त्यात मिळत असलेले यश यांचे मुलांवर दडपण येणार नाही याची सर्वप्रथम काळजी घ्यावी. परीक्षेत अमुक गुण मिळाले पाहिजे अशी जबरदस्ती मुलांना अधोगतीकडे नेते. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करते. भीती निर्माण करते. पहिल्या वर्गापासून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणाऱ्या पालकाना दहावी बारावी किंवा इतर कोणत्याही परिक्षेच्या काळात विशेष काही धडपड करावी लागत नाही. तहान लागली की विहीर खोदणाऱ्या पालकांची अवस्था खुप बिकट होते. त्याहुन बिकट त्या मुलांची होते. म्हणून पालकानी आपल्या पाल्याची अभ्यासाची काळजी प्राथमिक वर्गापासून घ्यावी अन्यथा ऐन महत्वाच्या परिक्षेच्या काळात परीक्षा पाल्यांची आहे की पालकांची असा प्रश्न निर्माण

परीक्षेला जाता जाता ....
फेब्रुवारी महिना उजाडला की, सर्वांना परीक्षेचे वेध लागतात. महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक परीक्षा मंडळाद्वारे या परीक्षेच्‍या कार्यक्रमाचे उदघाटन बारावीच्‍या परीक्षेने दरवर्षी करीत असते. तसे बारावीच्या परीक्षेला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होत असते, तर दहावीच्‍या परीक्षेला मार्च महिन्यापासून सुरूवात होत असते. मग इयत्‍ता पहिली ते नववी पर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांची परीक्षा होते. विद्यापीठाच्‍या परीक्षेने या परीक्षांचा शेवट होतो. परीक्षेच्‍या काळात मुलांवर एक वेगळ्याच प्रकारचे दडपण जाणवते. वर्षभर केलेल्‍या अभ्‍यासाची फक्त दोन ते तीन तासात परीक्षा द्यावी लागते. बहुतांश वेळा असे होते की ऐनवेळी विद्यार्थी प्रश्‍नाचे उत्‍तर विसरुन जातात. त्यामुळे परीक्षेच्या काळात गोंधळून जाऊ नये किंवा मनावर जास्‍तीचे दडपण घेवू नये. परीक्षेच्‍या आदल्‍या दिवशी जागरण करून अभ्‍यास न करता निश्चित झोपी जावे. उद्याचा पेपर कसा जाईल ?याची अजिबात काळजी न करता आपले डोके शांत ठेवल्‍यास त्‍याचा परिक्षेच्या काळात निश्चितपणे फायदा होतो. नावडता विषय आपणाला अवघड वाटतो, त्‍याची जास्‍तच काळजी वाटते. त्‍यामुळे त्या विषयातील येत असलेला भाग सुध्‍दा आपण विसरून जातो. असे होऊ नये यासाठी त्‍या विषयाची धास्‍ती मनात न ठेवता परीक्षेला सामोरे जावे. इयत्‍ता पहिली ते आठव्‍या वर्गाची परीक्षा पध्‍दत बंद केल्‍यामूळे विद्यार्थ्‍यांचा परीक्षेला तोंड देण्याचा सराव कमी झाला असे म्‍हणणे चूकीचे ठरणार नाही. पूर्वी पहिल्‍या वर्गापासून घटक चाचणी व सहामाही म्‍हणजे प्रथम व द्वितीय सत्र परीक्षा होत असत. परिक्षेच्या काळात शाळेमध्‍ये सर्वत्र परीक्षेचे वातावरण असायचे, जो तो आपले डोके पुस्‍तकांत खुपसून अभ्‍यास करीत बसायचे, शक्‍यतो गृहपाठाच्‍या वह्या वाचून काढले जायचे कारण त्‍यातीलच प्रश्‍न परीक्षेत विचारल्‍या जायचे. परीक्षेला जातांना आपल्या उजव्या हाताच्या करंगळीने सामसोळीच्या शेपटाला स्पर्श केला तर पेपर सोपा जातो असं परीक्षेच्या आदल्या दिवशी मित्रांमध्ये चर्चा व्हायची. नेमकं परीक्षेला निघताना ती सामसोळी मात्र कुठेच दिसायची नाही. पेपर सोपा गेला तर त्याची आठवण सुध्दा यायची नाही. परंतु जर पेपर अवघड गेला असं जर वाटलं तर मनात रुखरुख लागायची. परीक्षेला जातांना अजून एक प्रकर्षाने व्हायचं परीक्षेच्या पॅडला तुळशीचे दोन पान लावायचे. त्याचं काय गुपित आहे ते आजपर्यंत कळाले नाही. आज शहरात अंगण नाही तर तुळस कुठं दिसणार. पण ही बाब अजूनही घरोघरी दिसून येत आहे. परीक्षेचा दिवस उजाडला की, सकाळी सर्व कामे आटोपून परीक्षेला पॅड घेऊन निघतांना आई ओरडून म्‍हणायची " अरे देवाच्‍या पाया पड, पेपर सोपा जाईल"  तिच्‍या या बोलण्‍याचं मला हसू यायचे आणि  मी म्‍हणायचो ‘वर्षभर अभ्‍यास केल्‍यामूळे माझं पेपर सोपं जाणारच आहे. त्‍यासाठी देव काय मदत करणार आहे. तो काय स्वत: येऊन मला लिहायला मदत करणार आहे कां ? असा प्रति प्रश्‍न तिला विचारायचा. आपल्‍या देवाला कुणी काही असं बोललेलं तिला खपायचे नाही, रुचायचे नाही. ती मला समजावून सांगे की, ‘देवाला पाया पडल्‍याने आत्मिक समाधान लाभते, बळ मिळते, एक वेगळा उत्‍साह येतो. यामूळे देवाला नमस्‍कार करायचा’. मग शेवटी आईचे मन रहावे म्‍हणून देवासमोर नतमस्तक व्‍हायचो. पहिला पेपर सोपा गेला की, आपसुकच दुस-या दिवशी परीक्षेला जाण्‍यापूर्वी पाय देवघरांकडे वळायचे. मग यानंतर जीवनात कोणती ही परीक्षा असो त्‍यापूर्वी आपले पाय देवघरांकडे वळतातच. आज ही आम्‍ही हीच प्रथा किंवा परंपरा आपल्‍या मुलांपर्यंत पोहचवित आहोत. आज आपली मुले जेंव्हा परीक्षेला निघतांत त्यावेळेस ‘जा देवाचे पाया पड आणि मग परीक्षेला जा’ असे आपण अगदी सहज म्‍हणतो. परीक्षेला जातांना देवाच्या पाया पडावे किंवा नाही हा वादातीत विषय आहे. त्‍यावर चर्चा केल्‍यास वादंग होण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही. मात्र देवाच्या पाया पडल्यानंतर जो आत्‍मविश्‍वास मनात तयार होतो, ते अत्‍यंत महत्‍वाचे आहे. परीक्षा म्‍हणजे एक कसोटी, आयुष्‍यात घेत असलेले महत्‍वाचे वळण. या कसोटीत निर्भेळ यश मिळविण्‍यासाठी देवांसोबत घरातील वाड-वडिलांचे आशीर्वाद घेणे सुध्‍दा अत्यंत महत्‍वाचे आहे असे वाटते. ज्‍याप्रकारे पूर्वी रंणागणावर जातांना राजे महाराजे आपल्‍या पूर्वजांचे आशीर्वाद घ्‍यायचे तसेच काहीसे या परीक्षेच्‍या बाबतीत होत असते. स्‍वामी समर्थाच्‍या ‘भिऊ नकोस  मी तुझ्या पाठीशी आहे’ या वाक्‍याने त्‍यांच्‍या भक्‍तात एक नवी प्रेरणा, उत्साह दिसून येतो दे रे हरी  पलंगावरी अशी ज्‍याची वृती नाही त्‍याला परीक्षेची अजिबात भीती वाटत नाही. परीक्षेत जास्‍तीत गुण मिळावे यासाठी नकला मारणे ही स्वतः सोबत केलेली फार मोठी चूक आहे. त्‍यामूळे नकला मारून पास होण्‍यात काही अर्थ नाही. या परीक्षेत कदाचित तुम्‍ही पास व्‍हाल पण आयुष्‍याच्‍या परीक्षेत नकलाच  नसतात तिथे मात्र नापास होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. नकला मारणे म्‍हणजे चोरी करणे. आणि चोरी  कधी ना कधी पकडली जाते. म्‍हणून मुलांनो, परीक्षेत यशस्वीपणे तोंड देण्‍यासाठी परमेश्‍वर आपणास सुबुध्‍दी देवो, आत्मिक बळ देवो. परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना खुप खूप शुभेच्छा.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Sunday, 18 February 2018

आयुष्यातील महत्वाचे वळण

..... Motivational Article .....

*आयुष्यातील महत्वपूर्ण वळण...!*

आज आपण आयुष्याच्या अशा वळणावर आहोत. वळण जसे घ्याल तसे आपले जीवन वळणार आहे. आपण वळणच घ्यायचे नाही असे ठरविले तर आपण यश मिळवू शकणार नाही.  शिक्षण हे एक असे माध्यम आहे ज्यामुळे आपल्या आयुष्याला अनेक वळण घेता येऊ शकतात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला. महात्मा गांधीजी जीवन शिक्षणावर भर देत असत. भारतात सर्वच जण शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. कारण भारत देशाला प्रगतीपथावर जर न्यायचे असेल तर देशातील सर्व लोक शिकले पाहिजेत.
आपण आज एका महत्त्वपूर्ण अशा वळणावर आलो आहोत. म्हणून आज आपण आपली ध्येय आणि त्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. नियोजन न करता काम करू लागलो तर त्यात यश मिळेल ही कदाचित परंतु ते यश जीवन सुधारणा करण्यात बदल करता येणार नाही. महात्मा फुले असो वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रत्येकजण का घेतात ? याचा आपण कधी विचार केला आहे काय ? महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाची घटना लिहीली. म्हणून प्रत्येकजण त्यांचे आज स्मरण करतात, हे तर सत्य आहेच. त्याचबरोबर त्यांनी केलेले वाचन चिंतन आणि लेखन यामुळे ते आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. रात्रंदिवस पुस्तकाचे वाचन करणे, त्यावर चिंतन करणे आणि लोकांचा, समाजाचा पर्यायाने देशाचा विकास व्हावा यासाठी लेखन करणे असे फार मोठे कार्य त्यांनी केले.
आपणाला सुद्धा जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वाचन चिंतन आणि लेखन या तीन गोष्टी वर जास्त भर दिला पाहिजे. वरील तीन गोष्टी जीवनात मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्याजवळ हवी कठोर मेहनत आणि अविरत काम करण्याची इच्छा. याशिवाय आपण काहीच मिळवू शकत नाही.  यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. म्युनिसिपाल्टिच्या दिव्याच्या उजेडात त्यांनी अभ्यास केला. ग्रंथालयातील वेळ वाचविण्यासाठी आणि जास्तीचा वेळ वाचन करता यावे यासाठी ग्रंथपालांचे डोळे चुकवून पाव खायचे पण पुस्तक वाचायचे. वाचाल तर वाचाल या उक्तीची ओळख त्यांच्या जीवनचरित्रातून दिसून येते. आठरा तास अभ्यास करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती म्हणूनच ते भारताची घटना रात्रंदिवस कष्ट करून लिहू शकले.
दहावी आणि बारावीचे वर्ग म्हणजे अत्यंत महत्वाचे वर्ष असते. दिवस-रात्र एक करून अभ्यास केल्याने यश मिळते का ?  तर याचे नाही असे उत्तर मिळते.  कामात अविरतपणा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे आधी कष्ट मग फळ । कष्टाविना सर्व निष्फळ ।। त्यामुळे देरे हरी पलंगावरी ही वृत्ती आपण सोडून द्यायला हवे. कष्ट केल्यावर यश मिळणारच जर यदा कदाचित यश मिळाले नाही तर नाउमेद न होता,  पुन्हा जोमाने काम करावे. सचिन तेंडुलकर जेव्हा शून्यावर बाद होत असे तेही पहिल्याच चेंडूवर, तेव्हा स्वतः आत्मपरीक्षण करून सरावावर भर देऊन पुढील सामन्यात शतक ठोकत असे. असेच काही काम आपल्याला करायचे आहे. नाउमेद व्हायचे नाही, खचून जायचे नाही, भविष्यात अनेक संकटांना तोंड द्यायचे आहे, त्याची ही पूर्वतयारी समजून कार्य करावे.
*आरोग्याची काळजी -
परीक्षेच्या काळात स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. तब्येतीची काळजी नाही घेतली तर वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या मेहनतीवर पाणी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षा तोंडावर असताना जास्त काळजी, चिंता, किंवा अस्वस्थ न राहता, हसत-खेळत राहावे. कुटुंबातील सर्वांशी वार्तालाप करावे. मन प्रसन्न ठेवल्याने आपल्या बुद्धिमत्तेची कार्यक्षमता वाढू लागते तर गांगरून किंवा गोंधळून गेल्यामुळे आपण विस्मृतीत जातो आणि प्रश्नाचे उत्तर सोपे असूनसुद्धा सोडविले जात नाही.  मनाची घालमेल आणि भीती घालवण्यासाठी मन प्रसन्न ठेवणे हाच एकमेव उपाय आहे. परीक्षेच्या काळापुरतेच नाही तर जीवनात सुद्धा या वागण्याचा फायदा होतो. शालेय जीवनातल्या प्रत्येक बाबींचा परिणाम जीवनात बघायला मिळतो. त्यासाठी काही गोष्टी आणि बाबींचा सराव आवश्यक आहे.
आज आपणाला उशीर झाला आहे असे मुळीच समजू नका. कल करे सो आज कर या उक्तीनुसार आतापासून आपण अभ्यासाला लागू या. जे पूर्वीपासून अभ्यास करीतच आहेत ते थोड्या जोमाने कामाला लागा. सर्व परीक्षार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769