नागोराव सा. येवतीकर

Monday, 24 December 2018

नामकरण ते अंत्यविधीचा प्रवास

नामकरण ते अंत्यविधीचा प्रवास

माणूस जन्माला येतो तेंव्हा त्याचे नाव नसते. त्याला एक ओळख मिळावी म्हणून जन्मलेल्या बाळाचे सर्वात पहिल्यांदा जे संस्करण केल्या जाते त्यास नामकरण किंवा बारसे असे म्हटले जाते. हा विधी बारा दिवसानी, एकवीस दिवसानी किंवा सव्वा महिन्याच्या नंतर केल्या जाते. काही समाजात परंपरेनुसार हा सोहळा संपन्न केल्या जाते. नाव ठेवण्याची ही पद्धत फार पुरातन काळापासून चालू आहे. फार पूर्वीच्या काळाचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की, घरातील वाडवडिलांचे किंवा आजी - आजोबांचे नाव नातू-नातवाला दिले जात असत. त्यामुळे नाव शोधण्याची किंवा त्यासाठी डोके खाजविण्याची काही गरज राहत नसे. मात्र काळ बदलत गेला तसे नावे ठेवण्याची पद्धत देखील बदलत गेली. आधुनिक पद्धतीने आजकाल नाव ठेवल्या जातात. त्यासाठी आज गुगलची देखील मदत घेतली जाते. ज्या अक्षराने घरात नावाची सुरुवात होते त्याच नावाने इतरांची नावे ठेवली जातात. विनोदाचा भाग म्हणून विचार केल्यास एकाच्या घरी सात मुले झाली तर त्यांची नावं सोमवार ते रविवार असे ठेवण्यात आली. काही जण प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची नावे आपल्या अपत्याना देतात. नव्वदच्या काळातील बहुतांश मुलांची नावे सचिन असे ठेवण्यात आल्याचे दिसून येते. यावरून लक्ष्यात येईल की, नावाचे किती महत्व होते. पूर्वी कुटुंबनियोजन नव्हते त्यामुळे एकाच नावाच्या समोर मोठा, मधवा आणि लहान असे कोड वापरत असत. जेंव्हा निवडणुकीच्या काळात ही मंडळी मतदानासाठी जातात त्यावेळी मतदान अधिकाऱ्यांची खरी पंचाईत होते. कारण ही नावे एकसारखीच दिसतात. विल्यम सेक्सपियर यांनी नावात काय ठेवलंय ? असा प्रश्न विचारला आहे. मात्र नावात खूप काही दडलेलं आहे. सेक्सपियरला नाव राहिले नसते तर त्यांची ओळख कशी राहिली असती. प्रत्येकजण दिसायला वेगळा असतो. सर्वांची ओळख स्मरणात ठेवण्यासाठी त्यास काही तरी कोड देणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने ही नाव देण्याची प्रथा मानवी जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. अन्यथा आज आपण ज्या कोणत्या महान व्यक्तीची महापुरुषांची ओळख ठेवतो हे त्यांच्या नावावरूनच ना ! याच नामकरणचा फायदा शाळेत प्रवेश घेतांना होतो. आदिवासी बहुल भागात तेथील लोकं नामकरण सोहळा वगैरे काही करत नसत त्यामुळे शाळा प्रवेश करतांना त्यांना नावं लिहिताना त्रास होत असत. मुलांना ते बाला तर मुलींचे नावं बाली या पद्धतीने ठेवत असत. आज ती प्रथा नाही.  शाळेत मुलांची ज्या नावाने प्रवेश होतो त्याच नावाने पुढील आयुष्यभर त्याची ओळख निर्माण होते. काही जणांचे घरात एक नाव तर बाहेर एक नाव असते. पण शाळा कार्यालयात दप्तरी ज्या नावाची नोंद होते तेच नाव कायम त्याच्यासोबत राहते. शाळा प्रवेशानंतरची पुढील वीस वर्षे शिक्षणात जाते. या वीस वर्षात आपल्या नावासाठी दिवसरात्र अभ्यास करतो आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी कुठे ना कुठे नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. त्यानंतर त्याचे लग्न होते आणि संसार प्रारंभ होतो. दोनाचे चार हात झाल्यावर त्याची कीर्ती हळूहळू पसरत जाते. शालेय जीवनात असलेल्या अनेक सवयी संसारात डोकावले जातात. काही जण वाईट सवयी कडे झुकतात तर काही आपल्या चांगल्या सवयी जीवनभर जोपासतात. काही वर्षानंतर त्यांना अपत्य प्राप्ती होते आणि पुन्हा त्यांचे नामकरण संस्कार होते. वयाच्या साठीच्या आसपास सर्वच बाबतीत ते निवृत्त होतात. त्यांच्यावर घरातील लहान मुले सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडते. त्यांच्या नावानेच त्यांची मुले आणि घर ओळखल्या जाऊ शकते. पूर्वी माणसाचे सरासरी आयुष्य शंभर होते पण आज तितके वर्ष कोणी ही जिवंत राहत नाही. वृद्धापकाळामुळे माणूस शेवटी मृत्युमुखी होतो. ज्यावेळी माणसाचा मृत्यू होतो त्यावेळी त्याच्या जवळचे नातलग सर्वच उपस्थित होतात जसे नामकरण विधीला उपस्थित होते. माणसाच्या जीवनातील शेवटचे संस्कार स्मशानभूमीत केले जाते. अंत्यविधीच्या वेळी त्याच्या नावाची आणि त्याने केलेल्या कर्माची सारेच जण आठवण काढतात. म्हणूनच म्हटले जाते मरावे परी कीर्ती रुपी उरावे. आपल्या माघारी सुद्धा आपले नाव अजरामर राहावं असे वाटत असेल तर निस्वार्थी भावनेने कार्य करीत जावे. सत्कार्य केलेल्या व्यक्तीचे नाव कधी ही बुडत नाही. काही जण तर असे कर्म करून जातात की, घरातल्या लोकांना नाव लक्षात ठेवायला लाज वाटते. आपण कामच असे करायला हवे की, आपल्या जाण्याने खरोखरच तिथे पोकळी निर्माण व्हावी आणि आपली आठवण यावी. कवी भा. रा. तांबे यांनी जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय ? असे म्हटले आहे. आपले कार्य हीच आपली ओळख असते म्हणून चांगले काम करणे अत्यावश्यक आहे. समाजात काही लोकं सहज म्हणतात की, हा पोरगा किंवा पोरगी आई-बापाचं नाव नक्की कमावेल ! याचा अर्थ आपण जाणून घेऊ या. नामकरण ते अंत्यविधीपर्यंतचा प्रवास समजून घेऊ या. आपण येताना काही सोबत आणलो नाहीत आणि जाताना देखील काही घेऊन जाणार नाहीत त्या सिकंदराप्रमाणे खाली हात जाणार. म्हणून मित्रांनो निस्वार्थ भावनेने काम करण्यासाठी आपल्या मनाची तयारी करू या आणि आनंदाने जीवन जगू या. या नवीन वर्षात पदार्पण करतांना असाच एक चांगला संकल्प करूया ज्यातून संपूर्ण मानवजातीचा कल्याण करता येईल. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ...!

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment