नागोराव सा. येवतीकर

Saturday, 11 August 2018

अवयवदान

13 ऑगस्ट - जागतिक अवयवदान दिनानिमित्त प्रासंगिक लेख

मरावे परी अवयवरूपी उरावे

जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ? गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना ही कविता मनात शिरली. मराठीच्या शिक्षकांनी तसा जीव ओतून शिकविला त्यामुळे ती कविता आज ही मनात घर करून आहे. कवितेतील प्रत्येक ओळीतून एकच अर्थ मिळतो की, आपल्या मरणानंतर आपले येथे काहीच उरत नाही. जसे राम आणि कृष्ण आले व गेले तसे आपण ही आलो आहोत आणि एके दिवशी जाणार आहोत. आपल्या मृत्यूनंतर घरातील मंडळी आणि नातलगामधील लोक काही काळासाठी शोक करतील, दुःख व्यक्त करतील आणि त्यानंतर नित्यनेमाने कामाला लागतील. जो जन्माला आलेला आहे तो उद्या मरणारच आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहे यात शंकाच नाही. या पृथ्वीवर जन्माला येताना रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. याबाबतीत जगजेत्ता सिकंदराचे उदाहरण तंतोतंत लागू पडते. त्याची शेवटची ईच्छा होती की, दोन्ही हात बाहेर दिसतील असे ठेवा म्हणजे लोकांना कळेल की, एवढं श्रीमंत असून देखील त्यांनी सोबत काही नेले नाही. आपण केलेली कमाई, धनदौलत, जमीनजुमला, घर, संपत्ती, सर्व काही येथेच राहते. फक्त आपल्या चांगल्या कर्मामुळे आपले नाव तेवढे जिवंत राहते. म्हणूनच म्हटले जाते की, पैसा कमाविण्यापेक्षा माणुसकी कमवा. धनाने गरीब असाल तरी चालेल पण मनाने गरीब राहु नका. चांगली कर्मे करणारा व्यक्ती हा कधी ही गरीब राहू शकत नाही. समाजात त्याला चांगली प्रतिष्ठा , मानसन्मान ह्या सर्व गोष्टी अगदी फुकटात मिळतात. पैसा खर्च करून सुध्दा ह्या बाबी सहजासहजी मिळत नाहीत. समाजाला आणि देशाला उपयोगी पडेल असे कार्य केल्यास आपले जीवन व्यर्थ जाणार नाही. देशाच्या रक्षणापायी आजपर्यंत कित्येक जवान मृत्यूमुखी पडले. त्यांचे जीवन व्यर्थ गेले नाही. ते अजरामर झाले आहेत. आपले अनमोल जीवन ही व्यर्थ जाऊ नये, आपण ही या देशाचे व समाजाचे ऋण फेडावे असे वाटत असेल तर अगदी फारच सोपे कार्य आपणासमोर आहे ते म्हणजे आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करणे. आज आपण एकविसाव्या शतकाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील संगणक युगात वावरत आहोत. अवयवदाना बाबत आपल्या देशात प्रचंड उदासीनता आहे. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यामुळे आपण अवयवदानापासून कोसो दूर आहोत. अमेरिका आणि श्रीलंका या देशात अवयवदानाचे प्रमाण 100 टक्के असून आपल्या देशात तेच प्रमाण एक टक्का देखील नाही. कवी केशवसुत यांनी आपल्या तुतारी कवितेत म्हटल्याप्रमाणे जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका. जुन्या चालिरिती, पध्दती, प्रथा यांना तिलांजली देऊन आपल्या मृत्यूनंतर अवयवदान देण्याची तयारी ठेवणे गरजू लोकांसाठी एक संजीवनी ठरणार आहे, एवढे मात्र नक्की.
आपल्या शरीरातून जेंव्हा चेतना नष्ट होते तेंव्हा आपला मृत्यू झाला असे जाहीर केल्या जाते. आपल्याला मृत्यू म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. हा विषय देखील चर्चिला जाऊ नये असे वाटते. पण प्रत्येक सजीवाला मृत्यू अटळ आहे.  आपल्या मृत्यूनंतर परंपरेनुसार त्या शरीराची काही जण दफन करतात तर काही जण दहन करतात. म्हणजेच मृत्यूनंतर ते शरीर काहीच कामाचे नाही म्हणून ही कृती केल्या जाते. परंतु आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शोधातुन माणसाच्या मृत्यूनंतर काही तास शरीरातील काही अवयव त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे जिवंत राहतात. जसे की, डोळे ( सात ते आठ तास ) किडनी, हृदय, त्वचा, इत्यादी ठराविक वेळासाठी मेलेल्या व्यक्तीमध्ये जिवंत राहतात. तसेच ते अवयव गरजू लोकांना ठराविक कालावधीत प्रत्यारोपण करून बसविता येते. म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते. त्यामुळे त्या व्यक्तीची ती गरज पूर्ण होते आणि त्यास दीर्घकाळाचे जीवन मिळू शकते. अवयवदान तीन प्रकारचे असते. जिवंतपणी आपण एक किडनीचा भाग दान करू शकतो, परंतु आपल्या नात्यातील व्यक्तीलाच. दुसरा प्रकार म्हणजे निसर्गत: मृत झालेल्या व्यक्तीचे डोळे आणि त्वचा दान करता येते. तसेच तिसरा प्रकार म्हणजे अपघाताने किंवा ब्रेन हॅमरेज झाल्यास ब्रेनडेड झाल्यास हृदय, किडनी, लिव्हर, डोळे, हृदयाच्या झडपा, कानाचे पडदे, हाडे आणि त्वचा दान करता येतात. जसे रक्त कोठेच तयार करता येत नाही अगदी तसेच  मानवाच्या शरीरात असलेले अत्यंत महत्वाचे असे डोळे, किडनी, हृदय इत्यादी अवयव कोणत्याच कारखान्यात तयार करता येत नाही. त्यास मनुष्य जन्मच घ्यावा लागतो. त्यास्तव तो देह जाळणे आणि पुरणे एवढ्याच कामासाठी शिल्लक असेल तर त्यास दान दिल्याने काय बिघडते ? मात्र यामुळे अनेकांच्या समस्या दूर होऊ शकतात. अनेक गरजूना नवजीवन मिळू शकते. तसे जिवंत असताना आपण अनेक प्रकारचे दान देऊन पुण्य मिळविण्याचा प्रयत्न करतो. दानशूर व्यक्ती त्यालाच म्हटले जाते जो आपल्या जवळील सर्व वस्तूचे दान देतो. यासाठी महाभारतातील कर्णाचे उदाहरण दिले जाते. बहुतांश लोक अन्नदान करतात. काही नवयुवक मंडळी रक्तदान करतात. काही लोक पैसा दान करतात तर काही कपडे दान करतात. काही मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान करण्याचा संकल्प करतात. या सर्व दानाच्या प्रकारात अवयवदान सर्वश्रेष्ठ आहे. त्याची आपणास पूर्ण माहिती झाल्याशिवाय तसेच प्रचिती आणि स्वअनुभव आल्याशिवाय त्याची महती कळणार नाही. अवयवदान केल्यामुळे मृत्यू झालेली व्यक्ती सुद्धा त्या अवयवाच्या रुपात दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून जिवंत असू शकतो. म्हणजे जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी या स्लोगनप्रमाणे. दक्षिण भारतीय चित्रपटातील नागार्जुना, सौंदर्या आणि श्रीकांत या अभिनेत्यांनी नुवस्तावनी या तेलगू चित्रपटात या अवयवदानाचे महत्त्व फार सुंदररित्या अधोरेखित केले आहे. प्रशासन आणि वैद्यकशास्त्र विभागानी या अवयवदानाबाबत लोकामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. चित्रपट क्षेत्रातील मंडळीनी या विषयावर चांगला चित्रपट तयार करून लोकांमध्ये अवयवदानाची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न करावा. नांदेडचे मुक्त पत्रकार श्री माधव अटकोरे यांनी यावर पार्थिवाचे देणे नावाचे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. तसेच नांदेड येथील।प्रसिद्ध निवेदक दिवाकर चौधरी हे देखील याविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावे म्हणून खूप मोठे कार्य करीत आहेत. आज 13 ऑगस्ट म्हणजे जागतिक अवयवदान दिनानिमित्त कविवर्य भा. रा. तांबे यांच्या " मी जाता राहील कार्य काय ? " या प्रश्नाचे उत्तर अवयवदानाच्या संकल्पनेतून नक्कीच करता येईल. याविषयी सर्वानी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असे वाटते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे असे पूर्वी म्हटले जायचे पण आत्ता मरावे परी अवयवरूपी उरावे असे म्हणणे उचित ठरेल.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment