नागोराव सा. येवतीकर

Friday, 10 August 2018

तंबाखूमुक्त जीवन

तंबाखूमुक्त जीवन जगता येईल ?

जागतिक आरोग्य संघटनेने WHO तंबाखूला जागतिक समस्या म्हणून घोषित केले आहे. जगामध्ये प्रत्येक वर्षी तंबाखूच्या आजाराने पन्नास लक्ष लोक मरतात तर एकट्या भारतात दहा लक्ष लोक तंबाखूमुळे आपले जीवन गमावितात. तंबाखूच्या वापरामुळे हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार तसेच इतर असंसर्गजन्य रोग होतात. भारतामध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण जगाच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तंबाखू खाणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आढळून येते. पुरुष मंडळी तर सोडाच त्याठिकाणी लहान मुले आणि स्त्रिया सुद्धा तंबाखूच्या आहारी गेलेली दिसून येतात. विडी, सिगारेट, गुटखा, जर्दा अशा विविध माध्यमातून व्यक्ती तंबाखूचा वापर करीत असतो. ज्याप्रकारे चहा पिल्यामुळे मनाला तरतरी मिळते असे वाटते त्याच धर्तीवर तंबाखूच्या सेवनाने तरतरी मिळते, माइंड फ्रेश होते, बुद्धीला चालना मिळते, डोकं चालायला लागते असा काही लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरलेला आहे. तंबाखू खाणारे मंडळी वरील कारणे सांगून तंबाखू खाण्याचे समर्थन करणारी वक्तव्य करतात. तंबाखू सेवनाने कर्करोग होतो किंवा नाही या विषयावर अजूनपर्यंत संशोधन झाले नाही किंवा हे खरच आहे असेही सांगता येत नाही. यावर मागील काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चा झाली आणि वाद-विवाद सुद्धा झाले. तंबाखूचे समर्थन व्यक्त करणारी मंडळी तंबाखूसेवनाने काही ही होत नाही, कोणताच आजार होत नाही असे सांगतात. आमचे आजोबा तंबाखू खात होते परंतु ते वयाच्या ऐंशीव्या वर्षी नैसर्गिकपणे वारले असे घरातील उदाहरण देऊन पटवून सांगतात. त्यास्तव कधीकधी अशा बोलण्यावर विश्वास टाकला जातो. परंतु तंबाखू सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच गेले तर मात्र अति तेथे माती या म्हणीप्रमाणे आपल्या जीवनाची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही, हे ही तेवढेच खरे आहे. म्हणून तंबाखू खाणे किंवा सिगारेट, बिडी पिण्याची सवय आपणास लागू नये याची प्रथम काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वास्तविक पाहता तंबाखूचे सेवन करणे ही वाईट सवय आहे. समाजामध्ये या सवयीला कोणी ही चांगले म्हणणार नाही. कारण यामुळे चार-चौघात बसलेले असताना आपणास वारंवार बाजूला जावे लागते, थुंकावे लागते. बोलताना त्रास होतो, आपल्या थुंकण्याचा इतरांना त्रास होतो. म्हणून आपल्या पासून सर्वजण चार हात दूर राहणे चांगले असे ते समजतात. सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्याच्या शेजारी असलेल्या लोकांना त्याचा जास्त त्रास होतो.
तंबाखू खाण्याची सवय सहवासातून लागते. मित्रांच्या संगतीत राहून तंबाखूच्या आहारी गेलेली बरीचशी मंडळी भेटतात आणि अगदी हताशपणे बोलतात की ही सवय सुटणे फारच अवघड बाब आहे. खूप प्रयत्न करून पाहिला पण सवय काही तुटत नाही, राव असे एकांतात मित्रांशी बोलतात. जास्तीत जास्त मित्रांचा सहवास शाळा आणि महाविद्यालयाच्या काळात असतो आणि त्याच कालावधीत तंबाखू सेवनाची सवय लागण्याची दाट शक्यता असते. या शालेय वयात तंबाखू खाण्याची सवय मोठेपणी काही केल्या सोडवत नाही. आणि जे या काळात तंबाखूपासून दूर राहतात त्यांच्या जीवनात तंबाखू कधीच प्रवेश करत नाही, असा बर्‍याच लोकांचा अनुभव आहे. म्हणूनच या शाळा-महाविद्यालयात मुलांना तंबाखूची सवय लागणार नाही याची काळजी मुख्याध्यापक, शाळा व संस्थेचे घटक आणि पालक या सर्वांनी घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे तंबाखू खाण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तंबाखूवर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तंबाखू वापरावर नियंत्रण आणण्याचे निर्देश दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी शैक्षणिक संस्थेसह सार्वजनिक ठिकाणी तंबाखूवरील बंदी सक्तीचे करण्यात आले आहे. लहान मुलांकडून तंबाखू विक्री करण्यास मनाई तर आहेच शिवाय शालेय परिसरात 100 यार्ड मध्ये तंबाखू विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा मोठ्या अक्षरात फलक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्याचे बंधनकारक केले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दंडासह शिक्षापात्र गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. या नियमाची कठोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. मात्र तरीही शाळा कॉलेज च्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकत मिळतात हे खरोखरच चिंतनीय बाब आहे. मुलांना सहजरित्या हे मिळत असल्यामुळे मुले त्याकडे आकर्षित होतात. सर्वप्रथम शाळेला लक्ष्य करून तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम सर्व राज्यभर राबविण्यात यावा. प्रत्येक शाळेतवरील दर्शनी भागात दिसेल आणि तंबाखूचे दुष्परिणाम काय होतात याचे चित्र शाळेत लावल्यास त्याचे अनुकूल परिणाम नक्कीच बघायला मिळेल. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनासुद्धा त्याची माहिती होईल आणि त्यांच्या घरी कोणी तंबाखू खाणारे असतील तर मुले त्यांना तंबाखू खाण्याचा सल्ला देऊन तंबाखू खाण्यापासून परावृत्त करू शकतील. मुलांनी दिलेल्या सल्ल्याचा परिणाम नक्की दिसून येतो, हा एक अनुभव आहे. तेंव्हा आज जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त तंबाखूला आपल्या जीवनातून वेळीच हद्दपार करण्यासाठी जागे व्हा व तंबाखूमुक्त जीवन जगूया.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment