नागोराव सा. येवतीकर

Sunday, 29 July 2018

अध्ययन स्तरनिश्चिती तपासणी मोहीम

रोज एक शैक्षणिक लेख

*अध्ययन स्तरनिश्चिती तपासणी मोहिम*

शिक्षण हा माणसाच्या विकासातील खूप मोठा घटक आहे. शिक्षणा मुळे अनेक बाबी आपणास कळायला लागतात. न शिकलेला माणूस प्रगती करत नाही काय ? हा प्रश्न वादातीत आहे. मात्र शिक्षणामुळे जीवन जगण्याची एक नवी दिशा मिळते. जीवन का जगावे याचे महत्व कळते. त्यामुळे बालपणापासून प्रत्येकजण मुलांच्या शिक्षणाकडे विशेष असे लक्ष देतात. मुलांच्या शिक्षणा साठी शाळा हे एकमेव पर्याय आहे. म्हणून शाळेत प्रवेश घेतल्या शिवाय शिक्षण मिळणं अशक्य आहे असे वाटते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अनेक स्रोत जरी निर्माण झाले असतील तरी प्राथमिक शाळेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची सर त्यास येत नाही. मूल शाळेत आले की शिकतेच, असे सर्वांना वाटते. मात्र काही मुले खूप वेगात शिकून पुढे जातात तर काही मध्यम गतीने शिकतात तर काहीची शिकण्याची गती खूपच मंद असते. सामान्य मुलाप्रमाणे तो शिकत नाही. शासनाच्या नापास न करण्याच्या धोरणामुळे तो विद्यार्थी आठव्या वर्गापर्यंत तसाच जात होता आणि नवव्या वर्गात नापास होऊन घरी बसत होता. असे कित्येक वर्षे चालले. त्यास यावेळी शासनाने नापास न करण्याचे ऐतिहासिक घेऊन एकप्रकारे मुलांसाठी न्यायाची भूमिका घेतली आहे. आपल्या मुलांना काहीच येत नाही हे पालकांना खूप उशिरा म्हणजे तिसऱ्या चौथ्या वर्गात गेल्यानंतर कळते. काही जणांना तर काही कळत देखील नाही, हे काय शिकत नाही म्हणून त्यांना शाळेला पाठवायचे बंद करून टाकतात. आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो. डॉक्टर सर्व प्रकारच्या तपासण्या करून कोणता आजार झाला आहे याचे निदान करतात आणि त्यावर औषधोपचार देतात. डॉक्टरला जर रोगाचे निदान व्यवस्थित झाले असेल तरच योग्य गोळ्या औषध देऊ शकतो आणि त्याचा परिणाम दिसू शकतो. पण डॉक्टरांचे निदान चुकले असेल तर इलाज लवकर होत नाही मग आपण डॉक्टर बदलतो. मात्र तंदुरुत व्यक्ती कधी ही डॉक्टर कडे जात नाही कारण त्याला गरज नसते. मात्र वर्षातून एकदा आपल्या शरीराची आवश्यक ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आपली गाडी जे की निर्जीव वस्तू आहे मात्र त्याची दर दोन महिन्यांनी सर्व्हिसिंग करून त्याची काळजी घेतो. तीच काळजी आपल्या शरीराची घ्यायला पाहिजे. असंच काही आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत होते. पालक आपल्या मुलांना शाळेत प्रवेश देतात आणि शिक्षकांच्या स्वाधीन करून मोकळे होतात. त्या मुलांची प्रगती कशी होत आहे ? याची चाचपणी जे पालक नित्यनेमाने करतात ती मुले अभ्यासात कधी ही मागे राहत नाही. पण काही मुले असे असतात की, त्यांच्या कडे पालक ही लक्ष द्यायला तयार नाहीत आणि शिक्षक ही त्यामुळे कालांतराने ही मंडळी एवढं शिकून निरक्षर म्हणून समाजात वावरू लागली. प्रत्येक मूल शिकू शकते आणि भविष्यात मुलांना शाळा शिकून मला काही येत नाही अशी म्हणण्याची पाळी येऊ नये म्हणून काही तरी केलं पाहिजे. प्रथम किंवा असर सारख्या अशासकीय संस्था इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांची रँडम ली चाचणी घेतात आणि निष्कर्ष काढता की, पाचवीच्या मुलास दुसरीच पुस्तक वाचन करता येत नाही आणि आठवीच्या मुलास भागाकार येत नाही. असे विदारक चित्र पेपरमधून मांडल्यावर शिक्षण विभागाला खाली मुंडी घालून उभे राहावे लागते. त्यांचे सर्वेक्षण चूक आहे असे अजिबात नाही मात्र शिक्षक कुठे तरी कमी पडत आहे किंवा इतर यंत्रणा त्यास साथ देत नसेल. कोणताही मुलगा वाचन करू लागला की, त्याच्या विकासाला सुरुवात होते. लेखन तर कोणी ही करू शकतो. अक्षर लेखन म्हणजे पहिल्या वर्गाच्या दृष्टीने पेंटिंग होय. कारण जोपर्यंत त्याला अक्षराचा आवाज कळणार नाही तोपर्यंत ती प्रतिमाच असते. मुलांची भाषा आणि गणित या विषयाची तयारी कशी आहे ? हे तपासण्यासाठी अध्ययन स्तर चाचणी तयार करण्यात आले आहे. नांदेडच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण  केंद्राने खूप सुंदर असा कार्यक्रम तयार केला आहे. ज्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील इयता दुसरी ते आठवी वर्गात शिकणारे मूल नेमके कोठे आहे ? याची खात्री होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातील प्रत्येक मुलगा भाषा आणि गणित विषयांत योग्य आहे को नाही याची माहिती या माध्यमातून मिळणार आहे. गेल्यावर्षी पासून हा उपक्रम चालविला जात आहे. ठाणे जिल्ह्याला हा उपक्रम खूपच आवडल्याने त्यांनी नांदेड चा उपक्रम जशास तसे राबविण्याची ठरविले आहे. 
काय आहे अध्ययन निश्चिती आणि कसे केल्या जाते. ही बाब सर्वप्रथम शिक्षकांनी समजून घेतलेच पाहिजे सोबत पालकांनी समजून घेतले तर अजून चांगले सहकार्य मिळू शकते. 
प्राथमिक वर्ग म्हणजे इयता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग मुलांच्या जडणघडण मध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. या वर्गात शिकणाऱ्या मुलांची भाषा आणि गणित याचा पाया मजबूत झाला तर भविष्यात अनेक अडचणी सुटतात. मुले गुणवंत होऊ शकतात. मात्र याच ठिकाणी नेमके चुका होतात, मुले या विषयात प्रगत न होता तसेच वरच्या वर्गात ढकलले जातात. मग सुरू होतो त्याचा गुणवत्तेशी पाठशिवणीचा खेळ. वाचन करता येत नाही आणि गणिती क्रिया जमत नाही म्हणून खूप मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जातात. ही बाब लक्षात आल्यानंतर मुलांची मूलभूत तपासणी करण्यासाठी अध्ययन स्तर चाचणीची निर्मिती करण्यात आली. अशी चाचणी सर्वप्रथम जालना जिल्ह्यात घेण्यात आली. प्रत्येक मुलांची तपासणी करण्यात आली आणि वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्यात सुधारणा करण्यात येऊ लागली. रोगाचे निदान झाल्यावर रोग बरा होण्यास वेळ लागत नाही. ह्याच तत्वावर आधारित सर्वप्रथम मुलांची चाचपणी करणे आवश्यक आहे म्हणून हा उपक्रम सुरुवात करण्यात आले. त्यानंतर हा उपक्रम नांदेड जिल्ह्यात देखील गेल्या वर्षी राबविण्यात आली. परत यावर्षी पुन्हा नव्या जोमात आणि उत्साहात सुरू झाले असून 30 जुलै ते 03 ऑगस्ट या दरम्यान जिल्ह्यातील सर्व शाळांमधून इयत्ता दुसरी ते आठवी वर्गात शिकणाऱ्या मुलांची अध्ययन स्तर चाचणी होणार आहे. आणि प्रत्येक मुलांची नोंद ऑनलाईन पद्धतीने एका अँप द्वारे संकलित केल्या जाणार आहे. तेंव्हा पालकांनी या चाचणीचे महत्व लक्षात घेऊन आपले मूल या दिवशी शाळेत अनुपस्थित राहणार नाही याची काळजी घ्यावी. मुलांना नियमित शाळेत पाठवावे. या चाचणीच्या बाबतीत सर्व माहिती समजून घ्यावे. इयत्ता दुसरी ते पाचवीपर्यंतच्या मुलांना उतारावाचन करता येणे हे अंतिम उद्दिष्ट्य आहे तर आठवी वर्गापर्यंतच्या मुलास समजपुर्वक वाचन करता आले पाहिजे असे आहे. गणित या विषयात सर्व मुलांना दोन अंकी संख्या ओळखता आले पाहिजे पहिल्या चाचणीस पहिला वर्ग वगळून. दुसरीच्या मुलांना गणिती क्रिया मध्ये बेरीज - वजाबाकी येणे आवश्यक आहे, तिसऱ्या वर्गातील मुलास गुणाकार आले पाहिजे तर चौथी ते आठव्या वर्गापर्यंतच्या मुलांना भागाकार ही गणिती क्रिया आलीच पाहिजे. हुशार मुलांसाठी हे काही अवघड बाब नाही. परंतु जे अभ्यासात मागे आहेत असे मुले नेमके काय चुकतात ? हे या चाचणीद्वारे कळणार आहे. मुलांचा स्तर कळाला की त्यानुसार शाळेत उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून त्या त्या मुलांना कृती आराखडानुसार शिकवायचे आहे. आजपर्यंत वर्गात समानतेने शिकविले जायचे मात्र या चाचणीमुळे सर्वाना समतेने शिकविणे आवश्यक आहे. या चाचणीविषयी पालक अनभिज्ञ असून चालणार नाही. आपल्या मुलांना अभ्यासाची गोडी लागावी असे वाटत असेल तर एकच काम करावे रोज मुलांकडून एका पानांचे वाचन करून घ्यावे. रोज पाच संख्या ओळखा आणि अक्षरात लिहा, बेरीज, वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या गणिती क्रिया सोडवून घेण्याचा सराव करावा. असे केल्याने आपले मूल दहाव्या वर्गात चांगल्या गुणाने नक्की उत्तीर्ण होतील. वाचनाची आवड लागली की मूल अभ्यास करू लागते आणि ज्यांना वाचनाची आवड राहत नाही किंवा वाचन करता येत नाही ते अभ्यासापासून दूर जातात. म्हणूनच ही अध्ययन स्तरनिश्चिती प्राथमिक वर्गात मोलाची भूमिका बजावणार आहे, असे वाटते. 

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment