नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 3 July 2018

परिपाठ

परिपाठ म्हणजे शाळेचा आत्मा

वर्गात पाऊल टाकता क्षणीच रोज जे आनंदाचे चेहरे दिसतात ते आज दिसत नव्हते. सकाळची वेळ होती तरी मुलांच्या चेहऱ्यावर नाराजी कसे काय ? याचे कोडे मला पडले होते. वर्गात मुलामुलींचे बसण्याच्या जागेवरून वाद झाले असतील, पण ती शंकासुद्धा निरर्थक झाली. शेवटी न राहवल्यामुळे " इतना सन्नाटा क्यू है .... भाई ?" या भावनेतून वर्गाला प्रश्न केला. तरीही सारा वर्ग स्तब्ध आणि शांत. जणूकाही आज संपाचा दिवस आहे आणि विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून शालेय कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. कोणी तोंड उघडायला तयार नाही. वर्गनायिका असलेली पूजा जागेवर उभे राहत शांततेचे कारण सांगितले, " सर, आज आपल्या वर्गाचा परिपाठ होता, परंतु तो परिपाठ न झाल्यामुळे आम्ही सर्वजण नाराज आहोत." खरे कारण कळाल्यावर क्षणभर मी सुद्धा विचारात पडलो. आदल्या दिवशी रविवारची सुट्टी असल्यामुळे सोमवारच्या परिपाठाचे नियोजन शनिवारीच मुलांना करून दिली होती. सुट्टीच्या दिवशी चांगली तयारी करा आणि सुंदर परिपाठ सादर करा असे मुलांना सांगितलं होतं. त्याअनुषंगाने मुलांनी भरपूर तयारी केली होती परंतु बाहेर पडणार्‍या धो धो पावसाच्या सरीने मुलांच्या सर्व तयारीवर पाणी टाकले होते. त्यांची मेहनत वाया जाऊ नये यासाठी वर्गातच परिपाठ साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि फक्त वर्ग मर्यादित परिपाठ संपन्न झाला. परंतु जी मजा किंवा आनंद मैदानातील परिपाठ मधून मिळते ते या वर्गातून नक्कीच मिळत नाही, याची मनात जाणीव जागृती झाली. एका टोलनंतर एक टोल पडू लागले. दिवस संपला. मुले आपापल्या घरी गेली आणि आम्ही आमच्या घरी. परंतु आज सकाळी जे घडले त्या विचाराने आजचा दिवस अस्वस्थ वाटत होते. कोणत्याही कामात रुची वाटत नव्हती. वारंवार मनात एक आणि एकच प्रश्न पडत होता. वर्गखोलीत केलेला परिपाठ आणि मैदानावर केलेला परिपाठात असा काय फरक आहे ? विचार करीत करीत घरी आलो, विचारप्रक्रिया चालूच होती.
चार भिंतीच्या आतल्या वर्गखोली दिले जाणारे शिक्षण मुलांच्या मनावर तेवढे प्रभाव टाकू शकत नाही जेवढा प्रभाव उघड्यावर म्हणजे मैदानात घेण्यात येणाऱ्या परिपाठमधून टाकला जातो. शालेय वेळापत्रकातील सर्वात महत्त्वाची तासिका म्हणजे परिपाठ आहे. संपूर्ण वेळापत्रकातून परिपाठ जर वजा केले तर त्या शाळेत काही रस आहे असे वाटत नाही. दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. शाळेच्या दिवसाची सुरुवात प्रत्येक ठिकाणी परिपाठ या उपक्रमाने केला जातो. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी परिपाठ नावाचा उपक्रम थोड्याफार प्रमाणात राबविला जात होता. त्याला स्वरूप किंवा योग्य अशी दिशा नव्हती. काही मोठ्या शाळेतून गुरुपुष्प नावाचा उपक्रम दर गुरुवारी केल्या जात असे. ज्यात संस्कारक्षम गोष्टी सांगणे व श्लोक म्हणण्याची पद्धत होती. हळूहळू सुधारणा होत होत परिपाठ ही संकल्पना व त्याची उद्दिष्टे लक्षात येऊ लागले. संपूर्ण महाराष्ट्रात परिपाठ उपक्रमाची संकल्पना विद्याग्राम या नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. गोविंद नांदेडे यांच्या उपक्रमातून देण्यात आला. आजही सर्वत्र याच पुस्तकाच्या आधारे परिपाठ घेतला जातो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बहुतांशी शाळेत जागेअभावी आणि विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे परिपाठ घेतल्या जात नाही. ज्या ठिकाणी दररोज परिपाठ घेतल्या जातो त्या ठिकाणच्या मुलांना एक दिवस परिपाठ झाला नाही तर रुखरुख वाटते. नैतिकता घसरली आहे अशी समाजातून जी ओरड चालू आहे त्यास आळा घालण्याचे काम या परिपाठाच्या माध्यमातून करणे शक्य आहे. 
शाळा आणि परिपाठ यांचा एकमेकांचा खूप जुना संबंध आहे. परिपाठाशिवाय शाळा सुरू करणे म्हणजे मूर्तीविना मंदिर असल्यासारखे होय. परिपाठ ज्या शाळेत सुरेख पद्धतीने चालतो त्या शाळेत पटनोंदणी, उपस्थिती आणि गुणवत्ता 100 टक्के दिसून येते. दिवसाची सुरुवात छान मनोरंजनात्मक पद्धतीने सुरू झाली तर मुलांना दिवसभर थकवा येत नाही. परिपाठ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थी या वेळात शाळेत उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागण्यासाठी परिपाठ एक उपयोगी तंत्र म्हणून वापरता येऊ शकते. कोणते विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात हुशार आहेत याची सर्वात प्रथम जाणीव येथे होते. काही विद्यार्थी खूप छान गीत गायन करू शकतात. मात्र वर्ग अध्यापन करतांना विशेष लक्षात येत नाही. पण जेव्हा परिपाठ मध्ये प्रार्थना किंवा समूहगीत गायनासाठी विद्यार्थी समोर येतात तेंव्हा ते मनमोकळेपणाने गायन करतात. देशाविषयी असलेले अभिमान राष्ट्रगीत, संविधान आणि प्रतिज्ञाच्या माध्यमातून बाळगणे शिकविता येऊ शकते. काही शाळेत मुलांचे वाढदिवस साजरा करतात. अश्या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि शाळा यांचा जवळचा संबंध निर्माण होऊ शकतो. परिपाठ हा 15-20 मिनिटांचा असतो पण खरा विद्यार्थी याच ठिकाणी घडतो. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्राविषयी आदर भावना तयार करणे, राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहणे, समाजात समता, समानता, बंधुता निर्माण करणे, एकमेकांविषयी प्रेम निर्माण होणे, सभाधीटपणा, वक्तशीरपणा, श्रमप्रतिष्ठा, स्वच्छता आणि आरोग्य ही मूल्ये रुजविण्याचे काम याच परिपाठामधून केल्या जाते. मुलांमधील सुप्त गुणांचा शोध त्याच ठिकाणी घेतला जातो.  परिपाठातून मुलावर झालेले संस्कार दीर्घकाळ टिकणारे असतात. परिपाठ म्हणजे शाळेचा आत्मा आहे म्हणून प्रत्येक शाळाप्रमुखांनी, शिक्षकांनी परिपाठाकडे एक संस्कार केंद्र म्हणून लक्ष द्यावे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
(लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील।प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. )

1 comment: