नागोराव सा. येवतीकर

Monday, 25 June 2018

प्लॉस्टिकबंदीचा निर्णय चांगला पण ....

प्लॉस्टिकबंदीचा निर्णय चांगला पण ....

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 23 जूनपासून राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या निर्णयाचे स्वागत करत प्लास्टिक बंदी लागू करत असल्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाने जसे जनता आश्चर्यचकित झाली होती अगदी तसेच या निर्णयाने झाली म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्लास्टिकचे शहरातून आणि गावातून समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुढीपाडव्याला घोषणा करून २३ मार्च रोजी अधिसूचना काढली. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर २३ जूनपासून प्लॉस्टिकबंदी प्रत्यक्षात लागू झाली आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यास प्रारंभ झाले. यापूर्वी शासनाने दारूबंदी, गुटखाबंदी आणि इतर महत्वपूर्ण निर्णय घेतले पण त्यात काही मंडळींनी पळवाट शोधून काढले आणि त्या बंदीचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. परंतु प्लॉस्टिकवर टाकण्यात आलेली बंदीचा सर्वसामान्य जनतेवर खूप मोठा परिणाम होत असल्याचा गेल्या दोन-तीन दिवसांत बघायला मिळाले. प्लॉस्टिकच्या वस्तुशिवाय माणूस जीवन जगूच शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. प्लॉस्टिक वस्तूच्या एवढ्या आहारी गेले होते की, घरातून बाहेर पडताना हात हलवत जायचे आणि येताना प्लॉस्टिकच्या पिशव्या भरून माल आणायचे सवय लागली होती. आज यावर बंदी आणल्यामुळे जी माणसे पिशवी बाळगत नव्हते त्यांची खरी पंचायत झाली. महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम २००६ नुसार नियमभंग केल्यास पहिल्या वेळी पाच हजार रुपये आणि दुसऱ्या वेळी दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तिसऱ्या वेळी पकडले गेल्यास २५ हजार रुपये व तीन महिन्यांच्या कैदेची तरतूद त्यात करण्यात आली. बंदी लागू केल्या नंतर पुणे, मुंबई, नांदेड सारख्या शहरात नोंद घेण्यासारखी कारवाई झाली. लगेच त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे जे बोलले जायचे ते दिवस पुन्हा एकदा समोर दिसत आहेत. सर्वात जास्त वापरण्यात येणारे थर्माकोल व प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या व एकदाच वापरून फेकल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे ताट, वाटय़ा, ग्लास, चमचे इत्यादींवर आणलेली बंदी पर्यावरणासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण लग्न असो वा समारंभ यात या प्लॉस्टिकच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर वापर करून उघड्यावर फेकले जाते. त्याचा त्रास जनावरांना तर होतोच शिवाय आजूबाजूच्या परिसरात पडून नाल्या बरोबर वाहत नाहीत, तुंबून जातात, वातावरण देखील खराब करतात. पूर्वी लग्न किंवा इतर कार्यक्रमात पळसाच्या पानांची पत्रावळी व द्रोण वापरले जात असत. कमळाच्या पानांची आणि केळीच्या पानांची देखील वापर केला जात असे. एवढेच नाही तर महाप्रसादसाठी सागाच्या पानांचा ही वापर होत होता. मात्र कालांतराने या सर्व बाबी मागे पडल्या आणि त्याची जागा प्लॉस्टिकने घेतली. पूर्वी दूध आणण्यासाठी ग्लास किंवा तांब्याचा वापर होत असे. चिकन किंवा मटण आणण्यासाठी स्टीलच्या डब्याचा वापर केला जात होता. डबा हातात घेऊन कोणी दिसला की लोकं समजून जायचे की, आज त्यांच्या घरी काय शिजणार ? पण लोकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे गेल्या 15-20।वर्षांपासून याचा वापर जरा जास्तच वाढले होते. अति तेथे माती या म्हणीप्रमाणे या प्लॉस्टिकची माती करण्याची वेळ आली होती. शासनाने घेतलेला हा एक महत्वपूर्ण आणि चांगला निर्णय आहे पण ......लोकांनी यास सहकार्य करणे आवश्यक आहे तसे आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पहिल्याच दिवशी दिली. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडताना कापडी पिशव्या सोबत ठेवावे आणि त्याचा वापर करावा. घरातून निघताना सोबत पिशवी घेऊनच निघण्याची सवय केल्यास भविष्यात आपल्या सोबत दुकानदारांना देखील त्रास होणार नाही. बहुतेक जणांनी शासनाला विरोध दर्शविताना प्लॉस्टिक निर्मितीच्या कारखान्यावर बंदी आणण्याऐवजी सामान्य लोकांवर कारवाई करून अन्याय करीत आहे. लोकांचे हे बोलणे सत्य आणि रास्त आहे मात्र आपण स्वतः एक जागरूक नागरिक या नात्याने प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर टाळले आणि शासनाच्या निर्णयाला साथ दिली तर आपलेच पर्यावरण संतुलित राहील आणि आपले आरोग्य देखील. म्हणून सद्सद्विवेकबुद्धी जागे ठेवून प्लॉस्टिकला आपल्या जीवनातून हद्दपार करू या.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

1 comment:

  1. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे हद्दपार करण्याच्या प्रयत्नात शासनाने अगोदर प्लॅस्टिक पिशव्या निर्माण करणाऱ्या कंपन्या वरती बंदी घातली पाहिजे,त्यानंतर त्यांच्या वापरावरती हे कठोर नियम लादली पाहिजे तरच कालांतराने त्यांचा वापर कमी होईल. तसेच यासंदर्भात अधिक जागरूकता निर्माण केली पाहिजे,विशेषकरून ग्रामीण भागात. अन्यता ग्रामीण भागातील जनता या कठोर नियमाला अनुसरून लावलेल्या शिक्षेस/ दंडास सहज बळी पडेल.......एस.एम.रचावाड

    ReplyDelete