नागोराव सा. येवतीकर

Friday, 25 May 2018

वाढदिवसाची मेणबत्ती विझवण्यापूर्वी

वाढदिवसाची मेणबत्ती विझविण्यापूर्वी

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जन्मलेला दिवस अत्यंत महत्वाचा असतो. सुंदर अश्या पृथ्वीतलावर जन्म घेतलेला तो जन्म दिवस विसरणे कोणासाठीही अशक्य अशीच ही गोष्ट आहे. दरवर्षी आपण आपल्या स्वतःचा वाढदिवस साजरा करतोच त्याच सोबत कुटुंबातील लहान-मोठया सदस्यांचा, जवळच्या नातलगांचा, जिवलग मित्राचा वाढदिवस सुद्धा मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतो. वाढदिवस साजरा करण्याचीही पद्धत कोणी चालू केली असेल ? असा एक प्रश्न राहून राहून मनात येतो. त्याचे उत्तर अद्यापपर्यंत मिळाले नाही.  परंतु परंपरेनुसार, घराघरातून वाढदिवस साजरे केले जातात वाढदिवस साजरा करण्याची प्रथा व पद्धत बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ही वाढदिवस साजरा करण्याची प्रथा पाश्चिमात्य देशातील आहे. तेथील लोकांना पार्टी देण्याचा व करण्याचा एक बहाना पाहिजे असतो. म्हणून त्यांनी ही पद्धत सुरू केली असावी. कदाचित इंग्रज आपल्या देशात आलेच नसते तर आपणाला वाढदिवस साजरे करण्याची पद्धतच माहीत झाली नसती. तसे पाहिले तर वाढदिवस साजरा करणे ही काही वाईट बाब नाही. त्याद्वारे आपले वय किती झाले व आपण वयाने किती मोठे झालो ? याची माहिती होते. त्याचसोबत मागील वर्षी आपण काय चुकलं होतं किंवा कुठे प्रगती केली याचे सिंहावलोकन या वाढदिवसामुळे होते. त्याचबरोबर येणाऱ्या वर्षात मला काय साध्य करायचे आहे हे ठरविले तर दरवर्षी वाढदिवस साजरा करताना अजून जास्त आनंद होईल. परंतु सद्यस्थितीत वाढदिवस साजरा करण्याचे ध्येय मात्र काही वेगळेच दिसते. श्रीमंत वर्गातील लोकांना पैशांची काही कमतरता नसते. त्यामुळे ते आपला वाढदिवस धूमधडाक्यात मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र त्यांचे बघून गरीब वर्गातील मंडळीसुद्धा पोटाला चिमटा देऊन आपल्या लाडक्या लेकरांची हौस पूर्ण करण्यासाठी त्याच पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करीत असतात. दरवर्षी वाढदिवस साजरा करताना आपली वैचारिक पातळी व आपली दृष्टी यात थोडा बदल केल्यास आपल्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना वाढदिवस साजरा करण्यात आनंद वाटेल. आपल्या जीवनात तसेच कुटुंबातील सदस्य मंडळींच्या जीवनात काही वयोगटाचे प्रसंग येतात. त्यावेळी न विसरता व न चुकता त्यांचे वाढदिवस साजरे केल्यास आपोआपच त्यांना त्यांची ध्येय व कर्तव्याची जाणीव होत राहील.
कुटुंबात असलेली वयस्कर मंडळी जसे की, आजी-आजोबा, आई-वडील यांची अष्टचंद्रदर्शन, पंचाहत्तरी, षष्ठी,  पन्नाशी साजरी केल्याने कुटुंबात प्रेमाचे वातावरण बघायला मिळते. त्यानिमित्ताने नातलग व मित्रांच्या गाठीभेटी होऊन ओळखी वाढतात. आपल्या पाल्याचा पहिला वाढदिवस हा प्रत्येकासाठी एक आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे हा वाढदिवस सर्वांनी अगदी आनंदात साजरे करावेत याची शंकाच नाही. यापुढील सहावा वाढदिवस आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचे आहे या जबाबदारीची जाणीव ठेवून साजरा केल्यास पाल्याचा प्राथमिक शिक्षणाच्या प्रारंभाची जाणीव सर्वांना होईल. यानंतर पंधरावा वाढदिवस साजरा करताना दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविण्याचे धोरण आखावे. तशी जाणीव त्यांच्यात निर्माण व्हावी या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्यास पाल्यांच्या मनात आनंद, उत्साह येईल आणि ते जोमाने अभ्यास करून नक्कीच यश मिळवतील. आपल्या पाल्याचा अठरावा वाढदिवस साजरा करून यापुढे भारतीय नागरिक म्हणून मतदान करण्यासाठी सक्षम झाले आहेत याची माहिती त्यांना देता येते. त्याचसोबत वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात याची सुद्धा ह्या निमित्ताने आठवण त्यांना देता येऊ शकते. भारतातील विवाह कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचा विवाह करणे गुन्हा आहे. त्यास तो मुलींचा अठरावा वाढदिवस साजरा करताना प्रत्येकालाच आपापल्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव देऊन जाते तसेच मुलांचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणे गुन्हा आहे तेव्हा मुलांचा 21 वा वाढदिवस साजरा करून विवाहयोग्य वय झाल्याची ओळख त्याला देता येऊ शकेल.
भारतात बालविवाह मध्ये सर्वात जास्त विवाह मुलींचे होतात. त्यास्तव पालकवर्गात जागृती निर्माण होणे व बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. सनातन पद्धतीने वाढदिवस साजरा न करता मोजकीच वाढदिवस साजरी केल्यास आपणाला कर्तव्याची जाणीव तर होईलच शिवाय कुटुंबातील आनंद सुद्धा टिकून राहील असे वाटते. म्हणून वाढदिवसाची मेणबत्ती विझविण्यापूर्वी जरूर विचार करावा. वाढदिवसाच्या शुभेच्छा नेहमी आपल्या सोबत आहेतच.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

1 comment: