नागोराव सा. येवतीकर

Thursday, 24 May 2018

लेख क्रमांक 37 शिक्षक

शिक्षक हेच शिल्पकार
भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून गुरूला समाजात मानाचे स्थान आहे. येथील संस्कृतीने शिक्षकाला ब्रह्मा, विष्णु आणि महेश एवढेच नाही तर परब्रह्म असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीने शिक्षकाला एवढे मोठे मानाचे स्थान का दिले असेल ? या प्रश्नाचा सद्सद्विवेक बुद्धीने थोडासा विचार केला तर लक्षात येते की, शिक्षक हाच फक्त आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. ज्याप्रमाणे पाथरवट दगडावर घाव टाकून टाकून सुंदर मूर्ती तयार करतो. पाथरवटा शिवाय दगडाची मूर्ती दुसरा कोणी करू शकत नाही. कच्या मातीला आकार फक्त कुंभार देऊ शकतो. अगदी तसेच व्यक्तीचे जीवन यशस्वीरीत्या जगण्यासाठी शिक्षकाची प्रत्येकाला गरज असते. त्याशिवाय आपण यशस्वी जीवन जगू शकत नाही.
पूर्वीच्या काळी गुरुगृही म्हणजे आश्रमामध्ये जाऊन शिकावे लागत असे. धनुर्विद्या असो किंवा इतर विद्या हे शिकणे फक्त राजघराण्यातील लोकांचे काम होते. त्यामुळे एकलव्यासारख्या कनिष्ठांना गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्यास शिकविण्यास नकार दिला. मात्र त्या गुरूंच्या पुतळ्यानेच एकलव्याला बरेच काही शिकविले. आज तशी स्थिती नाही. शिक्षक आज कोणाला विद्या घेण्यापासून रोखू शकत नाही. उलट सर्वांना शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाने त्यांच्यावर टाकलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाऊ यांच्यासारखी आई आणि गुरू मिळाली म्हणूनच राजे शिवाजी घडले. त्यांनी तलवार चालविणे, घोडेस्वारी करणे इत्यादी रणनीती तर शिकविल्याच. तसेच रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगून शिवाजी महाराजांना त्यांनी माणुसकीचे धडे ही दिले. डॉक्टर बाबासाहेब यांना आंबेडकर आणि केळुस्करासारखे चांगले शिक्षक मिळाले म्हणून आपणाला महामानव अनुभवता आले. त्यांच्या शिक्षकाने आपल्या शिष्यांना आडनाव दिल्याची घटना कदाचित पहिलीच आहे. परमपूज्य साने गुरुजी यांनी तर जगालाच प्रेमाचा संदेश देऊन शिक्षकांचे समाजात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ज्यांच्या जीवनात चांगले शिक्षक येतात त्यांचे जीवन फळाला येऊन नक्कीच यशस्वी होते. म्हणून सर्वांनी चांगल्या शिक्षकाचा शोध घ्यावा, कारण शिक्षक हाच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment