नागोराव सा. येवतीकर

Thursday, 24 May 2018

लेख क्रमांक 33 संस्कार

बालपणीचे संस्कार

एकविसावे शतक हे ज्याप्रमाणे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते तसे धावपळीचे सुद्धा युग आहे. एखाद्या यंत्राप्रमाणे आज मनुष्य काम करीत आहे. आपल्या लेकरांना सुखी व आनंदी ठेवण्यासाठी आई आणि वडील हे दोघेही विविध क्षेत्रात नोकऱ्या करीत आहेत. घरातील चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिलांही कुटुंबाच्या प्रगतीसाठी घराबाहेर पाऊल ठेवले आहे. हा बदल देशाच्या प्रगतीसाठी निश्चितच अभिमानास्पद व प्रेरणादायक आहे. परंतु या बदलामुळे घरात काही समस्यांचा देखील जन्म झाला आहे, हे विसरून चालणार नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमधील दोघेही नवरा बायको नोकरी करणाऱ्या कुटुंबात तणावाचे वातावरण दिसून येते. जिथे योग्य समायोजन होते तेथे शांतता सुद्धा दिसून येते. परंतु ती शांतता अल्पकाळासाठी टिकून राहते. कामाच्या व्यापात मुलांवर संस्कार करायचे राहून चालले आहे. पैशाच्या बळावर सर्वकाही मिळविता येईल परंतु संस्कार मिळविता येणार नाहीत. संस्कार हा जीवनाचा अनमोल ठेवा आहे. बालपणी मुलांवर जे संस्कार होतात ते आयुष्यभर त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मुलांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होतील या बाबीकडे प्रत्येक पालकाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आपले पारंपरिक सण किंवा उत्सव साजरे करताना त्यातून मुलावर संस्कार कसे टाकता येतील ? याचा विचार करून कार्यक्रम साजरे केल्यास तेथे एक वेगळाच आनंद अनुभवास येतो. त्याचप्रमाणे मुलांना याच वयात स्वावलंबनाची ही शिकवण द्यायला हवी. लहान वयापासून दिलेले हे स्वावलंबनाचे धडे मुलांना भावी आयुष्यात निश्चितच उपयोगी पडतील. लहान वयात मुलांवर योग्य संस्कार करणे ही एक प्रकारे हिऱ्याच्या खड्यावर केलेली प्रक्रियाच आहे. या संस्कारामुळे त्यांचे जीवन हे हिर्‍याप्रमाणे प्रकाशमान होऊन चमकत रहाते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment