नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 22 May 2018

दृष्टी तशी सृष्टी

दृष्टी तशी सृष्टी

मुलांनो, परमेश्वराने सर्वांनाच दोन डोळे व विचार करण्यासाठी बुद्धी दिली. मात्र प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटे एक समान नसतात त्याप्रमाणे प्रत्येकाचे विचार एकसारखे असूच शकत नाही. रोमा रोला यांनी म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही वस्तूचे सौंदर्य हे पाहणार्‍याच्या दृष्टीमध्ये असते. म्हणूनच दृष्टी तशी सृष्टी असे म्हटले जाते. सृष्टीमधील प्रत्येक वस्तूचे उत्तम सौंदर्य दिसावे असे वाटत असेल तर आपली दृष्टी त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करावा. दृष्टी म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपले ज्ञान आहे. सदगुणाशिवाय आपणाला सौंदर्य दिसत नाही आणि ते प्राप्त सुद्धा होत नाही. जर आपणाला खरच सौंदर्य मिळावे असे वाटत असेल तर पहिल्यांदा आपण सुंदर व्हायला शिकायला पाहिजे असे कवि कलापी याने म्हटले आहे. जेम्स रोस म्हणतात की,  ज्या माणसाच्या अंगी सत्य, सदाचार, शील, आणि सहिष्णुता असते ती व्यक्ती सौंदर्य प्राप्त करते. याच संदर्भात संत चोखामेळा यांनी खूप सुंदर दृष्टांत देताना म्हटले आहे की, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा ? एखाद्याचे बाह्य सौंदर्य पाहून त्याची प्रशंसा वा स्तुती करण्यापेक्षा त्याच्या चांगल्या गुणांचे सौंदर्य पाहण्याची दृष्टी मिळविता येणे फार चांगले. दुरून डोंगर साजरे किंवा दिसतं तसं नसतं या म्हणीप्रमाणे वरवरच्या गोष्टीला भुलून न जाता त्याविषयी सखोल ज्ञान माहिती मिळविल्यास आपणास खरी दृष्टी लाभते आणि तेव्हाच उत्तम दृष्टी व सौंदर्य पाहण्यास मिळते. आचार्य प्र. के. अत्रे यांची दृष्टी खूपच महान होती त्यामुळे त्यांच्या हातून उत्तमोत्तम साहित्य तयार झाले. त्यांच्या दृष्टिकोनातून स्त्रीचे सौंदर्य म्हणजे त्यांचे सामर्थ्य आहे तर पुरुषाचे सामर्थ्य म्हणजेच सौंदर्य आहे. यासंदर्भात धूमकेतू यांचे विचार ही लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणतात की, सौंदर्य जर तुमच्या अंतरंगात नसेल तर सौंदर्याचा शोध घेण्यासाठी सर्व पृथ्वी पालथी घातली तरी ती तुमच्या हाती लागणार नाही. म्हणूनच मनाचे पावित्र्य राखा म्हणजे तुम्हाला सर्वच सृष्टीसौंदर्य दृष्टीस पडेल अशी महात्मा गांधीजींचे सुवचन नेहमी लक्षात ठेवावे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

1 comment:

  1. अगदी बरोबर सर.सौंदर्य हे अंत:रंगात असावे लागते.

    ReplyDelete