नागोराव सा. येवतीकर

Thursday, 26 April 2018

सुरक्षित प्रवास करू या

सुरक्षित प्रवास करू या

राज्यात दरवर्षी ६० हजारांहून अधिक रस्ते अपघात होतात आणि १ लाख लोकसंख्येमागे हे प्रमाण ५२ ते ६० इतके आहे. अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे तरुणांचे झाले आहेत. राज्यात रस्त्यांवरील अपघातात गेलेले ५३ टक्के बळी हे १५ ते ३४ वयोगटातील आहेत. अपघाताची बातमी नाही असे वृतपत्र प्रकाशित होऊच शकत नाही. रोज कुठे न कुठे अपघात घडतच असते. आजकाल प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. प्रवासाला निघलेला व्यक्ती सुखरूप घरी परत आल्यावर घरातले सर्व सदस्याचे जीव भांड्यात पडल्यासारखे होते. हायवेचे रस्ते तर जणू अपघाताचे माहेरघरच बनले आहेत. दररोज किती तरी अपघात होतात आणि कित्येक लोकांचे जीव जातात याची काही गिनती नसते. इकडे छोट्या रस्त्यावर सुध्दा अपघात घडतात पण त्यांची संख्या फारच कमी असते. हे एका दृष्टीकोनातून चांगली बाब आहे. वास्तविक पाहता अपघात घडण्यासाठी फार छोटी घटना कारणीभूत असते आणि क्षणाचा फरक असतो. काही क्षणात म्हणजे आपल्या मेंदूला कळायच्या आत अपघात घडत असतो. अपघात घडून गेल्यानंतर असे केल्यामुळे तसे झाले माझी काही चूक नव्हती समोरचाच मला येऊन धडकला असे स्पष्टीकरण सुध्दा ऐकायला मिळते. असे काही बोललेले ऐकायला मिळते. मात्र अपघातामुळे झालेली हानी कधीच भरून निघत नाही हे विसरून चालणार नाही. 
त्यामुळे प्रवासाला जाताना काही गोष्टीची काळजी आपण स्वतः घ्यावी ज्यामुळे अपघात घडण्याची संख्या कमी होईल आणि आपल्यासह इतरांचे प्राण सुध्दा सुखरूप राहतील. 
सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपण आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करण्यापेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर करावा उदा. रेल्वे आणि बस. या वाहनांतून केलेला प्रवास सुरक्षित आणि सुखदायक असतो. हे प्रथमतः जाणून घ्यावे. बहुतांश जण आपली स्टेटस आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी सार्वजनिक वाहने शक्यतो टाळतात. प्रवासात आपल्या जवळ असलेल्या सामानाची उचल आणि ठेव त्रासदायक असते म्हणून काही लोकं खाजगी वाहनांचा वापर करताना दिसून येतात. तर काही लोकं आपला प्रवास लवकर व्हावा म्हणून खाजगी वाहनांच्या मागे धावतात. मात्र या आपल्या घाईमुळे काय नुकसान होते याची जराशी देखील कल्पना आपण करीत नाही. त्यामूळे असे जीवघेणे अपघात घडलेले दिसून येतात. 
बस किंवा रेल्वे या वाहनांतून प्रवास करतांना आपण किती विश्वासाने प्रवेश करतो तेवढा विश्वास अन्यत्र पहायला मिळत नाही. या वाहनांचे सुध्दा अपघात घडतात पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असते. हे वाहन चालक जबाबदारीपूर्वक वाहन चालवितात. त्यांच्याजवळ ती क्षमता असल्याचा पुरावा म्हणजे परवाना असतो. त्याशिवाय त्यांना वाहन चालविण्यासाठी दिले जात नाही. याउलट चित्र खाजगी वाहनांत प्रवास करतांना आढळून येते. वास्तविक पाहता वाहन चालविण्याऱ्याच्या हातात वाहनांत बसलेल्या सर्व प्रवाशांचे जीव असतात या गोष्टीची जाणिव प्रथमतः त्या वाहन चालकास असली पाहिजे. याच गोष्टीची कमतरता खाजगी वाहनांतून प्रवास करतांना आढळून येते आणि वाहनाच्या वेगावर कसल्याही प्रकारचे नियंत्रण न ठेवता वाहन चालवितात आणि इतरांच्या जिवांसाठी यमदूत बनतात.
काही दिवसापूर्वी तेलंगण राज्यात म्हैसा या गावाजवळ झालेल्या ऑटो आणि टिप्परच्या धडकेत 13 जण जागीच ठार झालेत. या अपघातात एकाच कुटूंबातील 9 जण ठार झाले. संपूर्ण कुटुंब या अपघातात संपले. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळी नांदेड जिल्ह्यातील ऑटो अपघातामध्ये नुकतेच लग्न झालेल्या वधू-वर यांचे दुःखद निधन झाले. या अपघातात चूक कोणाची होती ? हे तपासणी अंती समोर येईलच परंतु अपघातात गेलेले ते जीव परत येणार आहेत का ? त्या घराला लागलेले कायमचे कुलुप उघडल्या जाणार काय ? हा अपघात रात्रीच्या वेळी घडला किंवा पहाटे साखरझोपेत. आजपर्यंतच्या अपघाताचा अभ्यास केल्यास ही बाब प्रकर्षाने समोर येते की, रात्री दहाच्यानंतर अपघातास सु्रुवात होते आणि पहाटेच्या वेळी संपतात. म्हणून शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा. वाहनचालक पूर्ण ओळखीचा असेल तरच त्या वाहनांतून प्रवास करावा किंवा ओळखीच्या वाहन चालकाचा शोध घेऊन प्रवास करावा. सलगपणे प्रवास न करता दर दोन तीन तासाला थोडा वेळ चहा पाणी किंवा विश्रांती साठी थांबावे. त्यामूळे चालकाच्या डोळ्यांवरचा ताण कमी होतो. डोळ्यावर ताण येईपर्यंत वाहन चालविणे हे अत्यंत धोक्याचे असते. त्यामुळे वाहन चालकास विश्रांतीची अत्यंत गरज असते याची जाणिव आपणाला असली पाहिजे. बहुतांश वेळा प्रवाशांच्या घाईमुळे अपघात होत असतात कारण त्यांना घाई असते आणि त्या घाईत ते वाहन चालकास कुठेही विश्रांती देत नाहीत. मग त्याचे रुपांतर एका मोठ्या अपघातात होते. लग्नाचा विधी किंवा इतर कार्यक्रमासाठी ट्रक, टेंपो किंवा ऑटोमध्ये लोकं दाटीवाटीने बसतात. आपल्या जिवाची पर्वा न करता उन्हातान्हात प्रवास करतात. हे ही धोक्याचे नव्हे काय ? विविध कारणे आहेत अपघात होण्याची त्यात प्रामुख्याने रस्त्यांची खराब अवस्था, गतीरोधकांवर पांढरे पट्टे नसणे, धोक्याच्या ठिकाणी दुभाजक असणे, अतिवेगामुळे वाहनावरचा ताबा सुटणे, दारू पिऊन गाडी चालवणे, समोरून गाडी येत असूनही ओव्हरटेक करणे, धोकादायक वळणावर वेगाने गाडी चालवणे, पार्किंग लाईट न लावता महामार्गावर गाडी थांबवणे, अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात. अनेक उपाययोजना राबवूनही राज्यात अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे स्वतः वर नियंत्रण ठेवून वाहन चालविणे आवश्यक आहे. घराबाहेर पडल्यानंतर बऱ्याच बारीकसारीक गोष्टी लक्षात ठेवून वागणे आपल्यासाठी खूपच हितकारक असतात. म्हणूनच शेवटी एवढेच सांगावे वाटते, की जीवन अनमोल आहे, आपल्या कुटुंबाला आपली खरी गरज आहे, याबाबीचा विचार करून जीवघेणा प्रवास करण्याचे टाळावे. सध्या सुरक्षित रस्ता सप्ताह चालू आहे. त्यानिमित्ताने वाहतुकीचे सर्व नियम आपण समजून घेऊ या आणि आपल्यासह इतरांचे जीव देखील धोक्यात नेण्यापासून वाचवू या.

नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता.धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment