नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 10 April 2018

सुट्या

हुश्श !.... संपली परीक्षा 

हुश्श !... संपली एकदाची परीक्षा म्हणत मुले वर्गात आनंदात नाचत होती. आज वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर होता. जशी जशी परीक्षेची संपण्याची वेळ जवळ येऊ लागली तशी तशी मुलांमध्ये उत्सुकता वाढू लागली होती. मुले चुळबुळ करू लागली त्यावेळीच सर वर्गात आले तसे मुले शांत झाली. पण सरांना मुलांच्या सुट्टीची भणक लागली म्हणून मुलांना विचारले, " उद्यापासून तुम्हाला सुट्या लागणार आहेत ? तेंव्हा कोण काय करणार आणि कुठे कुठे जाणार या सुट्यामध्ये ? " सर प्रश्न विचारल्याबरोबर मुलांनी एकच गलका केला, तेंव्हा सरांनी एका-एकाला बोलण्याची संधी दिली. एक जण म्हणाला मामाच्या गावाला जाणार, एक जण आजोळी जाणार म्हणाला, एक म्हणाला आय पी एल चे मॅच पाहणार, काही जण म्हणाले कार्टून पाहणार, क्रिकेट खेळणार, स्विमिंग करणार, खूप आंबे खाणार, असे अनेक कामे मुलांनी सांगितली. मुलांच्या चेहऱ्यावरील तो आनंद खरोखरच अवर्णनीय होता. मुलांनो, उन्हाळ्यात खूप ऊन असते, वातावरण खूप गरम असते त्यामुळे आपले आरोग्याकडे लक्ष ठेवा सर मुलांना सल्ला दिला असता मुलांनी लगेच त्यास होकार ही दिला. वर्षभर शाळा, घर, ट्युशन आणि अभ्यास या गोष्टीने मुले खरोखर कंटाळवाणी होतात हे त्यांच्या आजच्या वर्तनावरून नक्कीच लक्षात येते होते. तसे तर त्यांना मार्च महिन्याच्या एक तारखेपासून परीक्षेचे वेध लागलेले असतात. काही मुले तर रोजच विचारतात सर परीक्षा कधी आहे ? त्यांना सुट्यात मजा करायची फारच हौस असते. सुट्याची मजा काय असते हे मोठ्याना काही कळणार नाही. ते बाराही महिने त्याच आवेशात एकाच धुंदीत जीवन जगतात असे कधी कधी मुलांना वाटून राहते. ज्या मुलांना वरील पैकी काही ही करण्याची संधी मिळत नाही अश्या मुलांना या सुट्याचे काही घेणे-देणे नसते. त्यांना सर्व दिवस सारखे असतात. काही पालक सुट्या सुरू झाल्या नाही की, मुलांचे नाव विविध क्लासेसमध्ये नोंदवून ठेवतात आणि एका पिंजऱ्यातून मोकळे झाले म्हणायला उशीर दुसऱ्या पिंजऱ्यात बंदीस्त करून टाकतात. त्यामुळे लहान मुलांच्या भावना आपण मारून टाकत नाही काय ? याचा एक वेळ पालकांनी जरूर विचार करावा. परीक्षा संपल्यावर निदान दहा एक दिवस तरी त्या मुलांना मुक्तपणे खेळू द्यावे. मुक्तपणे वावरू द्यावे. मनासारखे करू द्यावे. त्यामुळे त्याच्या मनात काही एक अढ राहणार नाही. अन्यथा मुले एकलकोंडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकांच्या भीतीने मुले काही बोलत नाहीत याचा अर्थ आमची मुले शहाणी आहेत असे नाही. जी मुले स्पष्ट बोलतात ती मुले चुपचाप बसलेल्या मुलांपेक्षा कधी ही चांगले. शांत शांत किंवा चुपचाप बसलेली मुले आपल्या भावना कधी उघड करतील ते सांगता येत नाही. ज्यावेळी ते उघड करतात त्यावेळी आपल्या हातात काही शिल्लक नसते शिवाय पश्चातापाच्या ! मुलांना मिळालेल्या सुट्या ह्या त्यांच्या अभिव्यक्तीसाठी मुक्तपणे वापर करू दिल्यास त्यांचे भविष्य निश्चितपणे उज्ज्वल होईल. परंतु पालक म्हणू आपण मुलांची अति काळजी घेतो आणि त्यांच्या भावविश्वावर घाला घालतो. वर्गातील साऱ्याच मुलांची चेहरे आज हेच सांगत होती आत्ता आम्ही खूप मजा करणार. परीक्षा संपल्याची टोल वाजली तसे सर्व मुले आरडाओरड करत वर्गाबाहेर पडले. त्यांचा आनंद पाहून थोडा वेळ सरांना देखील आनंद वाटले. परीक्षा संपलेल्या सर्वाना उन्हाळी सुट्याच्या हार्दीक शुभेच्छां .....

- नागोराव सा. येवतीकर
( जिल्हा परिषद नांदेडमध्ये प्राथमिक शिक्षक आहेत.)
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment