नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 28 March 2018

परीक्षा आणि शाळा

*परीक्षा संपल्यावर ही शाळा*

मार्च आणि एप्रिल महिना हा शक्यतो परीक्षेचा असतो. परीक्षा संपल्या की मुलांना सुट्टयाचे वेध लागतात. त्यामुळे मुले नेहमी शिक्षकांना विचारतात की, परीक्षा कधी आहे ? पण यावर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतरही एक मेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने नुकतेच दिले आहेत. सरासरी एप्रिल महिन्याच्या १५ ते १६ तारखेपर्यंत परीक्षा संपतात मात्र संचालकांच्या या पत्राअन्वये पुन्हा पंधरा दिवस विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार आहे. शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमांतून परिपूर्ण विद्यार्थी घडत असतो. श्रीमंत पालकांच्या लेकरांना शाळेतील परीक्षा संपल्यानंतर विविध शिबीर वर्गात प्रवेश दिला जातो. ज्यामुळे मुलांचे अंगभूत कौशल्याची जपणूक केली जाते. मात्र गरीब पालक आपल्या मुलांना असे कोणते शिबीर वर्गात प्रवेश देऊ शकत नाहीत. त्यामुळे ही मुले या दिवसात काही करत नसलेले दिसून येते. याच अनुषंगाने विद्या प्राधिकरण विभागाने परिपत्रक काढले आहे तो एक स्तुत्य उपक्रम होऊ शकतो. कारण या माध्यमातून मुलांना विविध कला कौशल्याची माहिती मिळू शकते. यात गाणी, गोष्टी, गप्पा, नाटक इत्यादी करवून घेता येतील. अवांतर पुस्तक वाचन करणे, चित्राचे पुस्तक वाचन करणे याबाबी करवून घेता येतील. शिक्षकांच्या डोक्यातील अनेक कल्पना आणि उपक्रमामुळे मुले शाळेत काही वेळ तरी नक्की थांबतील असा विश्वास वाटतो. मुलाकडून वेगवेगळे चित्र काढून घेणे आणि चित्र रंगभरण करणे यासारख्या उपक्रमामुळे मुलांना करमणूक होते. त्याचबरोबर रद्दी पेपरमधल्या विविध माहिती आणि चित्रांचे कात्रण करून वहीमध्ये चिकटविणे हा उपक्रम देखील मुलांना बरच काही माहिती देऊन जातो. तयार केलेली चिकटवही एकमेकांना देऊन त्याचे वाचन करताना मुलांना खूप मजा येते. परिसरातील प्राणी, वनस्पती, पक्षी त्याचे घर आणि ठिकाण याची माहिती गोळा करणे, स्थानिक कारागीरची मदतीने हस्तकला आणि चित्रकलेची माहिती मिळविणे, शैक्षणिकदृष्ट्या दर्जेदार असलेले चित्रपट दाखविणे असे पंधरा ते वीस दिवसाचा वेळापत्रक सोमवार ते शनिवार तयार करून त्याची अंमलबजावणी केल्यास परीक्षा संपल्यावर देखील मुले शाळेत राहतील अशी आशा वाटते. जसे की सोमवारी गाणे म्हणणे ज्यात देशभक्ती गीत, भावगीत, भक्तीगीत, कविता आणि मुलाना काही गाणे करा ओके वर म्हणायला लावणे करता येईल. मंगळवारी गोष्टीचे पुस्तक वाचून इतरांना तीच गोष्ट सांगणे. त्याच सोबत मुलांना यु ट्यूब वरील ड्रॅमा देखील दाखविता येऊ शकेल. बुधवार रोजी रद्दी पेपरमधील चित्र, माहिती याचे कात्रण करणे आणि चिकटविणे, गुरुवारी चित्र काढणे आणि चित्रात रंग भरणे या अनुषंगाने काम करता येते. शुक्रवारी मुलांना प्रेरणा देणारे चित्रपट दाखविणे. आणि शनिवारी आठवड्यातील शेवटच्या दिवशी बैठे खेळ खेळणे जसे की करम, लुडो, आष्टा चमक असे विविध खेळ खेळता येऊ शकतात. याठिकाणी शासनाने आदेश काढले म्हणून नाही तर गरिबांच्या लेकरांसाठी आदेश नसताना ही जे शिक्षक मन लावून काम करतात तेच विद्यार्थ्यांचे गळ्यातील ताईत बनू शकतात. मात्र एकदा वार्षिक परीक्षा संपली की, निकालाच्या दिवशीच शाळेत येण्याची काही विद्यार्थ्यांची मानसिकता असते. अशा परिस्थितीमध्ये किती विद्यार्थी नियमित वर्गात येतात आणि खरोखरच शाळा एक मे पर्यंत सुरू राहणार का याविषयी राहून राहून मनात शंका देखील निर्माण होत असताना शालेय शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे यांनी तो आदेश मागे घेतल्याचे लगेच जाहीर केले. पण निर्णय विद्यार्थी हिताचा होता हे मात्र खरे आहे.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment