नागोराव सा. येवतीकर

Thursday, 15 February 2018

बालपणीचे संस्कार भाग 07


पाऊलवाट भाग 07

गर्वाचे घर खाली

मुलांनो, माझ्यासारखा कुणीच नाही अशी भावना जेंव्हा आपल्या मनात निर्माण होते तेंव्हा आपला अहंकार जागा झाला असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु त्याच वेळी एखादं दुसरा कोणी आपल्या पेक्षा वरचढ आपणाला भेटला तर मात्र त्यावेळी जो त्रास होतो त्याची जाणीव कदाचित स्वतःलाच येऊ शकते. त्यामुळे आपण किती ही श्रेष्ठ असलो तरी नेहमी कनिष्ठ समजत राहिलो तर आपणास अहंकाराचा त्रास होणार नाही. अहंकारी व्यक्तीला दुसऱ्याचा अहंकार कधीच सहन होत नाही, असे प्लुटार्क या तज्ञानी म्हटले आहे. विशेष करून या अहंकाराची भावना बालवयात प्रबळपणे दिसून येते. शालेय जीवनातील मुले माझ्यासारखा मीच या भावनेतून वागत असतात. त्यांच्या तोडीस तोड कोणी मिळाला की, एक तर हिरमुसले होतात किंवा त्याचा द्वेष करतात. म्हणून या वयातच आपण अहंकाराचा नायनाट करायला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून शाळेत खेळविल्या जाणाऱ्या मैदानी आणि बैठे खेळात, विविध स्पर्धात्मक परीक्षेत, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रमातील गायन, नृत्य, अभिनय, नकला आदि प्रकारच्या स्पर्धेत स्वयंस्फूर्तिने सहभागी व्हावे. यामुळे आपल्या अंगातील कौशल्य आणि उणिवा यांची जाणीव होऊन स्वतःचे आस्तित्व स्वतःला कळते. स्पर्धेत होणाऱ्या हार-जीतमुळे जीवनातील चढ-उतार आणि सुख-दुःखाची आपसुकच आपणाला कल्पना येते. आपण एखादे चांगले काम केले वा यश मिळविले तर त्याचा आपणास गर्व होणार नाही याची काळजी पदोपदी घ्यायला हवी. मराठीतील प्रख्यात साहित्यिक व मराठी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर यांनी म्हटले आहे की, एखाद्या पराक्रमाचा अभिमान जरूर असावा पण त्याचा उन्माद असू नये. प्रत्येकाना कशाचे नाही तर कशाचे अभिमान जरूर असते आणि तो असावाच मात्र त्या अभिमानाचा अहंकारात रूपांतर होऊ देऊ नये. कारण आपल्याला माहितच आहे गर्वाचे घर नेहमी खालीच राहते. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात की, अहंकार नाशावर प्रार्थना हेच सर्वोत्तम उपाय आहे. म्हणून आपण सर्वानी दिवसातून एकदा तरी प्रार्थना करण्यासाठी वेळ दिल्यास आत्मिक समाधान तर मिळेलच त्याशिवाय अहंकार आपल्या जीवनात प्रवेश करणार नाही.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment