नागोराव सा. येवतीकर

Thursday, 15 February 2018

बालपणीचे संस्कार भाग 05


शिस्तीचे महत्त्व आणि सवय 

मुलांनो, आपणाला शिस्त म्हटले की राग येतो. घरात शाळेत वा परिसरात कुठे ही जा आपणाला प्रत्येकजण शिस्तीचेच धडे देतात. खरोखर आपल्या जीवनात शिस्तीला एवढे महत्त्व आहे काय ? तर याचे उत्तर मिळते होय. जीवनात आपणाला यशस्वी व्ह्ययचे असेल तर आपल्याजवळ ज्ञान, बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी, प्रचंड श्रम करण्याची तयारी याच्यासोबत काटेकोरपणे काम करण्याची शिस्त असणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे असे समजायचे. आज आपण जेवढ्याही महान व्यक्तीचे नाव स्मरणात ठेवतो जसे की, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि तुमचा आमचा सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हे सर्वच जण आपल्या जीवनात कधीही शिस्त मोडली नाही. त्यामुळेच तर ते महान आहेत. आपल्या रोजच्या दिनचर्येत कसलीही शिस्त नसेल तर ठरविलेल्या वेळात एखादे काम पूर्ण करूच शकत नाही. मग शालेय मुलांसाठी शिस्त म्हणजे काय असते ? शाळेच्या वेळापत्रकानुसार शाळेत उपस्थित राहणे, गणवेषामध्ये शाळेत जाणे, शाळेत दिलेला गृहपाठ व अभ्यास न विसरता पूर्ण करणे, आई-वडील आणि मोठ्याना दररोज नमस्कार करणे, सर्वांशी प्रेमाने बोलणे आणि वागणे इत्यादी ही यादी अजुन लांबलचक होऊ शकते. शिस्तीचे काही नियम स्वतः तयार करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा, असे वागल्यामुळे काय होते ? असाही प्रश्न मनात येत असतीलच. शालेय जीवनात शिस्तीत वागले की, त्या शिस्तीचे रूपांतर हळूहळू सवयीत होते आणि आपण एक आदर्श नागरीक म्हणून जीवन जगू शकतो. सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपी जाणे यात शिस्त असेल तर व्यक्ती अलार्म न लावता उठू शकतो आणि वेळ न पाहता झोपी जातो. शिस्तीचे सवयीमध्ये रूपांतर झाले की, आपले मन द्विधा मनस्थितीत कधीच येत नाही. तर चला मग आपण शिस्तीत वागू या आणि समृद्ध भारत देश घडविण्यास मदत करू या..!

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक 
मु. येवती ता. धर्माबाद 9423625769  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment