नागोराव सा. येवतीकर

Thursday, 25 January 2018

प्रजासत्ताक दिन

26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन

आपल्या देशात प्रामुख्याने दोन दिवस राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. एक म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि दुसरे प्रजासत्ताक दिन होय. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन किंवा गणतंत्र दिवस म्हणून सुद्धा ओळखले जाते. व्यापारी म्हणून आलेले आणि राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांनी भारतावर जवळपास दीडशे वर्षे राज्य केले. भारतातील अनेक क्रांतिकारक लोकांच्या आंदोलनामुळे इंग्रजांना अखेर भारत देश सोडावा लागला. 15 ऑगस्ट 1947 या सुवर्ण दिवशी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणून हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. देश तर स्वातंत्र्य झाला पण देश चालवायचे कसे ? त्यासाठी काही नियमावली असणे गरजेचे आहे. म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची समिती तयार करण्यात आली. संविधान तयार करण्यासाठी मसुदा आवश्यक असते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी जगातील विविध देश व त्यांच्या घटनेचा अभ्यास केला. दिवस-रात्र मेहनत करून घटना तयार केली. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. तयार केलेले संविधान त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अर्पण केले. त्यास्तव 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्याचे आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले.  प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारी हाच दिवस का निवडण्यात आले ? असा प्रश्न लहान मुलांच्या मनात पडणे साहजिक आहे. हा भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत, सर्वत्र इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष धुसमुसत होता. त्याच काळात सन 1930 च्या काँग्रेसच्या अधिवेशनात असे ठरविण्यात आले होते की, 26 जानेवारी हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा. पण पुढे चालून असे झाले की, भारत देश 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य झाला. काळाच्या ओघात 26 जानेवारी हा दिवस विस्मृतीमध्ये जाऊ नये आणि प्रत्येक भारतीयांना या दिवसाची जाणीव कायम राहावी, याचसाठी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले असावे. चला तर मग संविधानात दिलेल्या नियमानुसार आचरण ठेवून आपला तिरंगा ध्वज उंच शिखरावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करूया. आज 68 वा प्रजासत्ताक दिन त्यानिमित्त सर्व भारतीयांना हार्दीक शुभेच्छा ! जय हिंद !

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment