नागोराव सा. येवतीकर

Monday, 27 November 2017

शिक्षकांना शिकवू द्या ...

शिक्षकांना शिकवू द्या....!

शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे मुख्य कार्य आहे शाळेत येणाऱ्या सहा ते चौदा या वयोगटा तील मुला मुलींना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे. याच कामासाठी शासन त्यांची वेगवेगळ्या परिक्षेच्या माध्यमातून निवड करतात. मुलांना शिकविणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे. मात्र वेळोवेळी त्यांच्यावर शिक्षणाच्या व्यतिरिक्त अन्य कामाचा बोझा टाकल्या जाते आणि दर्जेदार गुणवत्तेची अपेक्षा केली जाते. शिक्षकां कडून नेहमी विनंती केली जाते की, आमच्यावर कोणतेही अशैक्षणिक कामे लादू नका तर आम्हाला शिकवू द्या. दरवेळी संबंधित विभागाचे मंत्री शिक्षकां वरील अशैक्षणिक काम कमी करू असे आश्वासन देतात. मात्र त्या आश्वासनाचे काही परिणाम पाहायला मिळत नाही. कारण आज ही शिक्षकांना शिकविण्याच्या ऐवजी अनेक शाळाबाह्य कामे करावी लागतात. जनगणना करणे आणि निवडणूक प्रक्रिया पार पाडणे हे राष्ट्रीय कार्य आहे. त्यासाठी मनुष्यबळ देखील लागतो म्हणून या कार्यास कोणीही विरोध करीत नाही. तसे उच्च न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे. मात्र या दोन कामाच्या व्यतिरिक्त आज शिक्षकां कडे अनेक न दिसणारे अशैक्षणिक कामे आहेत. शासन मनावर घेतल्यास ही सर्व कामे कमी होऊ शकतात. त्याच सोबत बेरोजगार युवकांच्या हेतले5काही काम मिळू शकते आणि त्यांच्या खिशात काही पैसे पडू शकतात. मात्र शासन याविषयी विचार करण्यास तयार नाहीत. निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. मात्र या विभागात कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. निवडणूक प्रक्रियेतून या विभागाकडे मुबलक प्रमाणात पैसा उपलब्ध होत असतो. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना तात्पुरते अधिकार देऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्या जाते. या निवडणूक प्रक्रियेतील केंद्रस्तरीय अधिकरी म्हणजेच बी.एल.ओ. एक महत्वाचे पद आहे. या कामासाठी मात्र शिक्षकांची नेमणुक करण्यात येते. या ठिकाणी विचार करण्यासारखी बाब अशी आहे की, हे काम शिक्षकांकडून करून घेण्याऐवजी गावातील तरुण बेरोजगार युवकांना संधी देऊन काम करून घेतल्यास सर्व समस्या मिटतात. निवडणूकाच्या कामा साठी दोन तीन दिवस द्यावे लागते मात्र निवडणूक मतदार यादी तयार करण्यासाठी शिक्षकां ना अनेक वेळा शाळेचे अध्यापनाचे काम सोडून जावे लागते. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. ज्या शाळेत दोन किंवा तीन शिक्षक आहेत त्या शाळेची अवस्था तर जनावरे सांभाळ करण्यासारखेच असते. एवढे च नाही तर आज शिक्षकांना मुलांना अध्यापन करण्यासोबत अनेक ऑनलाइनची कामे करावी लागत आहे. त्यामुळे मुख्याध्यापक वर्ग जेरीस आलेला आहे. त्याच सोबत अधुनमधून येणाऱ्यां विविध शासकीय परिपत्रकानुसार काम करणे हे तर वेगळेच आहे. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्य येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रगत करावयाचे आहे मात्र शिक्षकां ना अध्यापन न करू देता अवांतर शाळाबाह्य कामे लावल्यास खरी गुणवत्ता दिसून येईल काय ? असा ही प्रश्न मनात निर्माण होतो. जर विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता पहायची असेल तर शिक्षकांना फक्त शिकविण्याचे काम करू द्या.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

3 comments:

  1. बरोबर शिक्षकांना शिकउ द्या

    ReplyDelete
  2. शिक्षकाला शिकवु द्या
    इतर कामे नको

    ReplyDelete