नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 25 October 2017

नशीब

*आपले नशीब आपल्या हाती*

काय करू राव, माझं नशिबच ख़राब आहे असे वाक्य नेहमी ऐकायला मिळते. ज्याना जीवनात कोणत्याही कामात यश मिळाले नाही किंवा मनासारखे काही मिळाले नाही की, हे वाक्य ठरलेले असते. नशिबात जे असेल ते नक्की मिळणारच असे ही बोलले जाते. परंतु नशीब म्हणजे काय असते आणि नशीब आपल्या हातात आहे की परमेश्वराच्या हातात याविषयी विचार केले असता, नशीब परमेश्वराच्या हाती आहे असे समाजल्या जाते. मात्र खरोखर नशीब कोणाच्या हातात आहे ? याविषयी कधी विचार केले आहे काय ? आपले नशीब आपल्या सवयीवर अवलंबून आहे. चांगल्या सवयी असतील तर आपले नशिब देखील चांगलेच असणार आहे. आपल्याला वाईट सवयी असतील आणि त्यात काही वाईट झाले की आपण नशिबाला दोष देऊन मोकळे होतो. तुम्हाला धोक्याची कल्पना असुनदेखील जीवाची काळजी करत नसाल तर तेथे नाशिबी काय करणार ? सवय चांगली लागण्यासाठी संगत म्हणजे सोबत चांगली असावी लागते. बहुतांश वेळा आपण सोबत निवड करणे चूकतो म्हणूनच आपल्या सवयी बिघडतात. शालेय जीवनापासून कोणत्या प्रकारच्या मित्रांची संगत लाभली यावर आपले नशीब अवलंबून असते. संगतीमधून संस्कार मिळतात जे की आजीवन आपल्या सोबत राहते. त्या संस्कारावरच आपले सर्व जीवन अवलंबून असते. मात्र आपण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. तेवढं मनावर देखील घेत नाहीत. त्यामुळे जीवनात काही तरी विपरीत घडत असते. घरातील वातावरण मुलांना पोषक असावे. घरात जर दूषित वातावरण असेल तर त्याचा परिणाम घरातील लहान मंडळीवर नक्की होतो. जेंव्हा परिणाम दिसायला लागतात तेंव्हा वेळ गेलेली असते. मग नशिबावर खापर फोडून मोकळे होतो. मात्र तसे नाही. आपले नशीब आपल्या हातात आहे फक्त त्यासाठी आपणास चांगली संगत मिळावी म्हणजे चांगले संस्कार होतील आणि चांगल्या सवयी देखील लागतात. यावरून आपले नशीब देखील चांगले आहे असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment