नागोराव सा. येवतीकर

Sunday, 29 October 2017

एकता दिन

देशातील एकता कशी टिकेल ?

कोणत्याही देशाचा विकास हा तेथील लोकांच्या एकते मध्ये दिसून येते. भारत देश किती तरी वर्षे गुलामगिरी मध्ये होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे देशातील लोकांमध्ये नसलेली एकता. भारतातील बहुतांश लोक खेड्यात राहत असे. त्याचसोबत ही मंडळी निरक्षर असल्यामुळे लोकांना काही कळत नव्हते. याच गोष्टी चा फायदा अनेक राजे-महाराज आणि इंग्रजांनी घेऊन देशावर राज्य केले आहे. मात्र भारतातील लोक जेंव्हा जागे होऊ लागली तसेच सर्वजन एकत्र येऊ लागली. त्यांना एकताचे महत्त्व कळाल्यावर सर्वानी एकत्र येऊन लढा दिला. म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताच्या या एकता ची संपूर्ण जगाने दखल घेतली. भारत स्वातंत्र्य झाले असले तरी काश्मीर, हैद्राबाद आणि जुनागढ येथील संस्थान आणि लहान मोठे 563 संस्थान भारतात विलीन होण्यास तयार नव्हते त्यामुळे भारताची अखंडता तूटत होती. पण स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेतला. आपल्या कणखर व्यक्तिमत्वामुळे देशातील एकता कायम राखण्यासाठी अल्पावधीमध्ये हे तीन ही संस्थाना सोबत सर्वच संस्थान भारतात विलीन करण्यात त्यांना यश मिळाले. संपूर्ण देशात आनंद झाला. सरदार पटेल नेहमी  देशातील एकतेबद्दल युवकांना संदेश देत असत याच बाबीचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2014 या वर्षापासून त्यांचा 31 ऑक्टोबर हा जन्मदिवस संपूर्ण भारतात एकता दिन साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले. खरोखरच राष्ट्रीय एकात्मता राखायची असेल तर देशातील सर्व लोकांत एकता असायलाच हवी. त्याशिवाय देशाची प्रगती तरी कशी होईल ?
एकात्मतेची सुरुवात स्वतः पासून होते. स्वतः च्या मनात एकात्मता नसेल तर देशाची एकात्मता कशी राहील. भारत हा विविध जाती, धर्म आणि पंथाचा देश आहे. येथील लोक गुण्यागोविंदाने राहतात हे विधान आता इतिहास जमा झाले आहेत असे वाटते. कारण दिवसेंदिवस विविध कारणावरुन देशात अधुनमधून जातीय तणाव दंगली घडत आहेत. त्यावेळी राष्ट्रीय एकात्मतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. वास्तविक पाहता एकता विषयी घरातून सुरुवात होते. घराघरातील वाद किंवा भांडण पाहता हे देशाची एकात्मता काय टिकवून ठेवतील ? असा प्रश्न पडतो. घरात जर आपण एकतेने वागू तेंव्हाच कुठे समाजात या विषयी खुले मनाने बोलू शकतो. नाही तर लोक आपणालाच बोलतात. मी सांगतो लोकांना शेंबुड माझ्या नाकाला या म्हणी प्रमाणे. आपण सर्व देशाच्या एकात्मतेविषयी भरभरून बोलतो आणि लिहितो मात्र प्रत्यक्षात जेंव्हा वागण्याची वेळ येते तेंव्हा मात्र दोन पाऊल मागे सरकतो, असे का ? आपल्या स्वकीय आणि स्वजाती च्या लोकांना आपण जवळ घेतो मात्र जे भिन्न जाती किंवा धर्माचे लोक आहेत त्यांना कोणी जवळ येऊ देत नाहीत, असा अनुभव अनेक लोकांकडून ऐकायला मिळतात. मग कशी राहील राष्ट्रीय एकात्मता ? तीस वर्षा पूर्वी खेडोपाडी जे स्पर्श-अस्पर्श्य किंवा उच्च-नीच जे चित्र पाहायला मिळत होते ते आज जरी नष्ट झाले असे वाटत असले तरी नकळत कुठे ना कुठे याचा अनुभव अजुनही शिल्लक आहे. हे मनातील घाण जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत देशातील राष्ट्रीय एकात्मता टिकून राहणार नाही. एका हाताने टाळी कधीच वाजत नाही, त्यामुळे प्रत्येकाने जागरूक नागरिक होऊन वागले पाहिजे. त्याचबरोबर विविध जाती, धर्माविषयी आपल्या मनात नेहमीच आदर ठेवायला हवे. इतर धर्माच्या चालीरीती वा पध्दतीविषयी काही बोलण्याच्या अगोदर आपण त्यांच्या भावना दुखावत तर नाही ना याचा विचार करणारी पिढी तयार करायला हवे. मात्र सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करून एकता संपविण्याचा घाट चालले आहे असे वाटते. प्रत्येक व्यक्ती माझा मी असा स्व चा विचार करताना दिसत आहे. स्व चा विचार करायला हवे त्याचसोबत इतर लोकांचा देखील विचार करायला हवे. शाळाशाळामधून हेच एकतेचे संदेश शिकवायला हवे. मात्र आज पूर्वीसारखे एकतेचे शिक्षण कोणत्याच शैक्षणिक संस्थेतून मिळत नाही अशी ओरड सर्वत्र ऐकायला मिळते. असेच जर चालू राहिले तर येत्या काही वर्षात भारत महासत्ता होण्याच्या ऐवजी भारत विविध जाती आणि धर्मात विभागला जाईल. बाहेरील कोणी तरी हुशार व्यक्ती परत एकदा आपल्या वर राज्य करतील. पूर्वीचे लोक नकळत गुलामगिरीत होते तर आत्ता सर्व कळून गुलामगिरीमध्ये जाण्याची दाट शक्यता दिसून येते. म्हणून आज एक दिवस महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एकता दिवस साजरा करून देशात एकात्मता खरोखर टिकेल काय ? देश बदलेल किंवा बदलणार नाही याचा विचार न करता सर्वप्रथम आपले विचार बदलायला हवे तरच ही एकात्मता सर्वत्र दिसून येईल.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा साहित्यिक
मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

No comments:

Post a Comment