नागोराव सा. येवतीकर

Monday, 3 April 2017

परीक्षा गुरुजींची

परीक्षा गुरुजींची

आज सदा पायमोडे गुरूजी फारच चिंताग्रस्‍त दिसत होते. त्‍यांचा चेहरा पूर्ण उतरलेला होता, काय करावे त्‍यांना कळतच नव्‍हते. कारण ही तसेच होते. आज शाळेत प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र कार्यक्रम अंतर्गत सहामाहीची परीक्षा सुरू झाली आणि वर्गातील अर्धे मूले अनुपस्थित होते.  ज्‍यांना काहीच येत नाही ते नेमके आज परीक्षेला हजर होते आणि ज्‍यांना ब-यापैकी लिहिता-वाचता येते ते गैरहजर होते.  त्‍यामूळे गुरूजीला काळजी लागली होती.  तसे गेल्‍या आठवडाभरांपासून गुरूजी परिपाठमध्‍ये सर्व मूलांना सूचना देतच होते की पुढच्‍या आठवड्यात आपली ‘प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र’ कार्यक्रमांतर्गत संकलित चाचणी होणार आहे तेव्‍हा कोणी गैरहजर राहू नका, गावाला जाऊ नका, मुलांच्‍या पालकांना देखील या परीक्षेची आगाऊ सूचना देऊन ठेवली होती.  एवढे सारे करून देखील आज वर्गातील अर्धे मुले गैरहजर होती.  काय करावे?  या प्रश्‍नाने गुरूजींचे डोके सकाळी सकाळीच उठले होते.
शहरांपासून १५-२० किमी अंतरावर असलेल्‍या जेमतेम ५०० लोकसंख्‍या असलेल्‍या बोरगाव वस्‍तीत सदा पायमोडे गुरूजी गेल्‍या दोन वर्षापासून गुरूजी म्‍हणून काम करू लागले होते.  तसे पाहिले तर त्‍यांचे आडनाव पाटील होते. पण त्‍यांचे वडिल जे की याच शाळेत गुरूजी होते.  आणि येथूनच सेवानिवृत्‍त झाले. मुलांना काही आले नाही किंवा गैर‍हजर राहिले तर ते मुलांच्या पायावर मारायचे. एके दिवशी दुस-या वर्गातील रमेश चार दिवस शाळेत आला नाही म्‍हणून दामोदर गुरूजी त्‍यांच्‍या घरी भेटण्‍यास गेले. रमेश अंगणात खेळतांना पाहून गुरूजींच्‍या तळपायाची आग मस्‍तकाला गेली. त्‍याच्या पायावर छडी मारत मारत गुरूजी शाळेत त्याला शाळेत आणले.  पायावर जास्‍त मार बसल्‍यामुळे रमेश जवळपास लंगडूच लागला. त्‍या दिवशी पासून त्‍यांचे नाव पायमोडे गुरूजी असे नाव पडले.  ( शाळेत दोन शिक्षक होते आणि दोन्‍ही शिक्षकांचे नाव पाटीलच होते. मग पाटील सर म्‍हटले की कोणते पाटील?  असा कोणी विचारले की शाळेतील पोरं आणि गावातील लोकं पायमोडे गुरूजी असे म्‍हणायचे ) गुरूजी आपल्‍या संपूर्ण परिवारासह त्‍याच गावात राहायचे. शेवटचे १५-२० वर्षे त्‍यांनी त्‍याच गावात काढले. तेथेच त्‍यांनी शेती विकत घेतली, घर बांधले आणि तेथेच राहू लागले. त्यांचा एकुलता एक मुलगा सतिश हा मुळातच हुशार होता. तो डॉक्‍टर व्‍हावा असे घरातील सर्वांना वाटायचे कारण तसा त्‍याचा अभ्‍यासही होता. मात्र सरकारच्‍या विविध जाचक नियम अटी व असुविधेमूळे त्‍याला कोणत्‍याच मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला नाही. शेवटचा पर्याय म्‍हणून आणि आई-वडिलांच्‍या आग्रहाखातर त्‍याने डी.एड्.चे शिक्षण पूर्ण केले. मूळात हुशार असल्‍यामूळे तो शासनाच्या सर्व प्रकारच्‍या परीक्षा सहज उत्‍तीर्ण होत होता. तीनच वर्षात त्‍याला शिक्षण सेवक म्‍हणून त्‍याच्‍याच गावात नोकरी मिळाली. डॉक्टर होण्याचे स्वप्न विसरून तो शाळेत मन लावून मुलांना शिकवत होता.  स्‍वत:च्‍या ज्ञानाचा फायदा मुलांना व्‍हावा यासाठी त्‍याने सर्व प्रकारे प्रयत्‍न करत होता.  वडिल मुलांना मारत मारत शाळेत आणत होते पण सदा गुरूजी मात्र अत्‍यंत प्रेमाने समजावून सांगून आणण्‍याचा प्रयत्‍न करत असत. 

बघा ना! आज प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र अंतर्गत परीक्षेला सर्व मुले उपस्थित रहावे म्‍हणून त्‍याचा सर्व खटाटोप पाण्‍यात मिसळला होता.  स्‍वत: गावात राहत असल्‍यामुळे गावातील प्रत्‍येक कुटूंबाची जवळून ओळख होती.  गुरूजी सकाळीच लवकर तयार होऊन प्रत्‍येक मुलांच्‍या घरी भेट देत होते.  काल शाळेला जे आले नव्‍हते त्‍यांच्‍या घरी पहिल्‍यांदा भेट द्यायचे ठरविले अन शिल्‍पाच्‍या घरी गेले आई बाहेरच सोयाबीनचे शेंगा खालीवरी करीत होती.  गुरूजी म्‍हणाले, राधा मावशी, शिल्‍पा कोठे आहे? काल शाळेला आली नाही.  ती म्‍हणाली, घरात हाय, अन बापू आजपण येणार नाय ! यावर गुरुजींच्या कपाळावर आट्या पडल्या, चिंतेच्या स्वरात गुरुजी म्हणाले “अहो मावशी, आज महत्‍वाची परीक्षा आहे. आज तरी तिला पाठवा हो”.  यावर शिल्पाची आई जवळ जवळ रागात बोलली “ सोयाबीन कोण जमा करणार ?  आधीच माणसं भेटेनाशी झाली.  तुमची परीक्षा उद्या नाही तर परवा घ्‍या".  नाही मावशी तसे चालत नाही.  आज सगळीकडे परीक्षा आहे तिला शाळेला पाठवा.  शिल्‍पा शाळेला ये ती गुरूजीला पाहून घरात लपून बसली.  तशी ती हुशार म्‍हणता येणार नाही पण ब-यापैकी लिहिता-वाचता येणारी पण आठवड्यातून २-३ दिवस घरकामासाठी शाळा बुडवते ती तरी काय करणार?  गुरूजीला प्रत्‍येक वेळी हाच अनुभव यायचा.
तेथून त्‍यांचा मोर्चा वळला कृष्‍णाकडे त्‍याचे वडिल गाडीवरून पडले होते आणि जबर मार लागला होता. आईला मदत करणेसाठी घरात कृष्‍णाच्‍या व्‍यतिरिक्‍त कोणीच नव्‍हते म्‍हणून तो गेल्‍या दोन दिवसांपासून शाळेला आलेला नव्‍हता.  कृष्‍णाची शाळेला यायची इच्‍छा होती. गुरूजी परिस्थिती पाहून काही एक न बोलता ‘काळजी घ्‍या’ म्‍हणून घराबाहेर पडले. तेथून बाजूलाच स्‍नेहाचे घर होते.  ती काल शाळेला आली होती. हुशार चुणचुणीत आणि रोज शाळेला येणारी मुलगी म्‍हणून तिची शाळेत ओळख होती. गुरूजीला आश्‍चर्य वाटले, की तिच्‍या घराला कुलूप होते. शेजारच्‍यांना विचारले की स्‍नेहाचे घरचे कुठे गेले?  केव्‍हा येणार आहेत ? शेजारच्‍याने सांगितले “गुरूजी, काल रात्री स्‍नेहाला खूप ताप आला होता. ताप डोक्‍याला चढला होता म्हणून सकाळी पहिल्‍या गाडीला स्‍नेहाला घेऊन त्यांचे आई-बाबा शहरात गेलेत. गुरूजींनी लगेच मोबाईल काढले आणि स्‍नेहाच्‍या बाबांना फोन लावला, हॅलो, रामराव काका नमस्‍कार, काय झालं स्‍नेहाला?” “गुरूजी तिला  रात्री डोक्याला ताप चढला होता. सकाळी पहिल्या गाडी ला घेऊन आलोय डॉक्टर कडे "
"काय म्हणाले डॉक्टर ? "
" डेंगू ताप आहे म्हणे एक-दोन दिवस लागतील बरे व्ह्ययला." 
" ठीक आहे काळजी घ्या तिची " असे म्हणून गुरुजी शाळेकडे निघाले. वर्गात येऊन बघतात तर काय अर्धे मुले उपस्थित झाली होती. भारताच्या क्रिकेट टीम मध्ये सचिन, सौरव, राहुल आणि धोनी नसेल तर टिमची जी हालत होते तीच काही हालात आज सदा गुरुजींची झाली होती. कशी बशी परीक्षा घेतली. कोणी ही जास्त मार्क घेऊ शकले नाहीत. दुसऱ्यांच दिवशी ते तपासलेले मार्क ऑनलाइन भरायचे असल्यामुळे लगेच तपासून त्याचे गुण भरण्यात आले आणि सर्व पेपर्सचा गट्ठा मुख्याध्यापकांच्या हाती देऊन सदा गुरुजीं जड पावलाने घरी पोहोचला. परीक्षा मुलांची होती मात्र काळजी गुरुजींना लागली होती. 

नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

10 comments: