डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती संपूर्ण भारतभर नाही तर संपूर्ण विश्वात फार मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. खरोखरच ही सर्व भारतीयासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद नक्कीच आहे यांत शंका नसावी. पण आज बाबासाहेब आपल्यातून जाऊन 61 वर्षे झाली. त्यांची दूरदृष्टीमुळे आज भारतात समता, बंधूता आणि समानता काही अंशी का असेना दिसून येत आहे. जरा मागचा काळ आठवले की आपल्यात खरोखरच किती सुधारणा झाली हे कळून येईल. आजची पिढी यांना बाबासाहेब काय काम करून गेले हे नाही कळणार ? यांना इतिहास ठाऊक असतो मात्र ज्यांनी इतिहास अनुभवलय त्यांना नक्कीच बाबासाहेब देवासमान वाटतात. देशात समानता आणायची असेल तर देशातील अनुसूचित जाती आणि जमाती या संवर्गातील लोकांना आरक्षणाची संधी देणे आवश्यक आहे, त्याशिवाय देशात समानता निर्माण होणार नाही हे 70 वर्षापूर्वी त्यांनी जाणले आणि त्यानुसार राज्यघटना तयार केली. दोन वर्षे अकरा महीने अठरा दिवस अभ्यास करून संविधान तयार करण्याचे काम बाबासाहेब यांनी केले. तेंव्हा ते सर्वांचेच नेते आहेत ना ! जेंव्हा त्यांनी राज्यघटना लिहिली आणि देशाला अर्पण केली तेंव्हा ते साऱ्या देशाचे नेते होते. परंतु समाजात स्पर्श अस्पृश्य जो भेद चालू होता ते भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर संपेल असॆ वाटत होते मात्र इंग्रज भारतातून निघून गेल्यानंतर सुध्दा तो भेदाभेद काही दूर होईना. माणसाला माणसासारखे वागणूक मिळायला हवे मात्र त्या काळात लोकांना पशूपेक्षाही हीन दर्जाची वागणूक मिळत होती. त्याचा अनुभव स्वतः बाबासाहेबाना लहानपणापासून समाजात वावरताना, शाळेत शिकताना, प्रवास करताना प्रत्येक ठिकाणी त्यांना वाईट अनुभव मिळाले. त्यातूनच त्यांचे मन बौद्ध धर्माकडे वळले. लोकांच्या विकासासाठी बौद्ध धर्माशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही या विचाराने प्रेरित होऊन हजारो अनुयायी सोबत दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माचा स्विकार केला. हिंदू धर्माचा त्याग करून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातील तमाम जनता बौद्धमय झाली. बाबासाहेबाच्या नावाने लोकं " जय भीम " करू लागली. पण अजूनही प्रश्न मनात अनुत्तरित राहतात. खरंच बाबासाहेब हे एकाच धर्मापुरते सीमित होते काय ? त्यांचे विचार फक्त त्यांच्याच लोकांसाठी होते काय ? आपण सर्व त्यातून काही शिकू शकणार नाही काय ?
शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा हा संदेश खऱ्या अर्थाने त्यांनी स्वकियाना दिला कारण ही तसेच होते. मुळात भारतात शिक्षणाचा प्रसार म्हणावं तसे झाले नव्हते आणि त्यांच्या जातींतील लोकं खूपच निरक्षर होती. शिक्षणाशिवाय मानवाची प्रगती अशक्य आहे महात्मा फुले यांची शिकवण त्यांना कळाली म्हणून ते असा संदेश दिला जो की संपूर्ण मानव जातीला लागू पडतो. त्याहीपुढे जाऊन त्यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्यांचे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असॆ म्हटले आहे. शिक्षणामुळे माणूस विचार करू शकतो आणि चूक बरोबर समजू शकतो. मनातील अंधश्रद्धा दूर होते. या सर्व बाबी कळण्यासाठी शिक्षण आवश्यक असल्याची जाणिव त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली. लोकांमध्ये नवचेतना निर्माण केली. इंग्रज सरकार विरोधी भारतातील लोकांत जनजागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. गुलामाला गुलाम असल्याची जाणिव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल ही त्यांची शिकवण आज ही आपणांस दिशादर्शक आहे. त्यांच्या अंगी असलेल्या प्रत्येक एक न एक गुणांचा बारीक चिकित्सक पध्दतीने जर अभ्यास केला तर आपले जीवन नक्कीच बदलून जाईल. सव्वाशे वर्षापूर्वी जर मध्यप्रदेश मधील महू या गावी भीमाबाई आणि रामजी यांच्या पोटी भीमराव सारखा तेजस्वी पुत्र 14 एप्रिल रोजी जन्मास आला नसता तर आज आपण कोठे राहिलो असतो आणि भारत कुठे राहिला असता ? यांचा प्रत्येक भारतीयांनी आज विचार करणे गरजेचे आहे. त्यांची धडपड आणि तळमळ माणुसकीची होती हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत बाबासाहेब फक्त आणि फक्त काही लोकांपुरतेच सीमित राहणार. देशात खूप मोठे कार्य करून गेलेल्या व्यक्तींना जाती आणि धर्मामधे बांधून ठेवण्याचे कार्य थांबविणे आत्ता गरजेचे आहे. नाही तर एकेदिवशी परत एकदा आपण सर्व दुरावल्या जाऊ आणि कोणी तरी परका व्यक्ति आपल्यावर नक्कीच राज्य करेल, यांत शंकाच नाही.
या ब्लॉग वरील सर्व लेखाचे हक्क सौ.अर्चना नागोराव येवतीकर यांच्याकडे आहेत. परवानगी शिवाय लेख फॉर्वर्ड किंवा प्रकाशित करू नये पाऊलवाट पुस्तकाचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशन
नागोराव सा. येवतीकर
▼
No comments:
Post a Comment