नागोराव सा. येवतीकर

Thursday, 12 January 2017

तिळगुळ घ्या गोड-गोड बोला

गोड गोड बोलण्याचा सण

नविन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत.
मकरसंक्रांत म्हणजे सूर्य धनू राशीतून मकर  राशीत प्रवेश करतो तो दिवस. सूर्य या दिवशी  दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता, सुर्य उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. याच दिवसापासून हिवाळा हळूहळू संपू लागतो आणि उन्हाळ्याची सुरूवात होते. पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो तो याच दिवशी.
इंग्रजी महिन्यानुसार मकरसंक्रांत हा दिवस १४  जानेवारी रोजीच येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एका दिवसानी पुढे सरकते.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवसात साजरी करण्याची पध्दत आहे. संक्रांतीच्या पूर्वी भोगी, आणि संक्रांती नंतर दुसऱ्या दिवशी किंक्रांती  म्हणजे कर सण साजरा केला जातो. संक्रांती सणाच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या नातलगाना आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला  तिळगुळ देतात आणि 'तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला' असे सांगून स्नेह, प्रेमात वाढ होण्याविषयी शुभकामना शुभेच्छा देतात. थंडीच्या दिवसात उष्ण अशा तीळ आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते. जीवनामध्ये नेहमीच आपणाला हा संदेश उपयोगात येऊ शकतो. जगात बंधुता निर्माण करायची असेल तर सर्वांशी गोड बोलणे आवश्यक आहे. गोड बोलणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्याने त्रास होणार नाही असे बोलणे होय. बहुतांश वेळा मोठ्या भांडणाचे मूळ जर शोधले तर ते बोलण्यावरुन घडल्याचे लक्षात येते. त्यामुळे असे म्हटले जाते की, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणे केव्हाही चांगले. सतत आपले बोलणे म्हणजे पिरपिर चालू ठेवण्यापेक्षा फार कमी बोलल्यास त्याचा फायदा आपणास नक्की होतो. ' उचलली जीभ लावली टाळ्याला ' या म्हणीनुसार जर आपण बोलत असू, तर आपल्या बोलाण्याला काहीच किंमत उरणार नाही. त्यास्तव आपले महत्त्व कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एकही घर शोधूनही सापडणार नाही, ज्यांच्या शेजारी शेजारी भांडण होत नाही. परंतु आपण आजच्या दिवसाचे तत्व जर वर्षभर अवलंबिले तर शेजाऱ्यांसोबतची भांडणे कमी होतील. संकट काळात किंवा अडीअडचणीत आपणाला आधार कोण देतो ? तर तो असतो शेजार. घराला कुलूप लावून जायचे असेल तर आपण कुलुपाची  चावी कुठे ठेवणार ? दुपारच्या सुट्टीत घरी येणाऱ्या मुलांची व्यवस्था कोठे होते ? घरी वडील नसते वेळी घरात काही अपघात घडले तर कोणाला बोलवणार ? अर्थातच या सर्व प्रश्नांची उत्तरे शेजाऱ्यांच्या घरी जाऊन थांबतात. संतानी सांगून गेलत की, शेजाऱ्यांवर प्रेम करा. म्हणून विशेष करून शेजाऱ्यांपाजाऱ्यांना नेहमीच गोड बोलणे फायद्याचे ठरते.
आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे प्रत्येक सणाचा कुठे ना कुठे शेतीशी संबंध येतो. जानेवारीच्या दिवसांमध्ये शेतातून उत्पन्न येण्यास प्रारंभ झालेले असते. शेतातून आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करतात. हरभरे, उस, बोरे गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात तसेच सुवासिनीची ओटी ही भरतात.
भारतातल्या विविध प्रदेशात वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. जसे की उतर भारतातील हिमाचल प्रदेश  आणि पंजाब मध्ये लोहरी या नावाने हा सण साजरा केला जातो. पूर्व भारतातील आसाम राज्यात भोगाली बिहु असे म्हटले जाते. पश्चिम भारतात गुजरात व राजस्थान मध्ये हा सण उतरायण म्हणजे पतंग उडविण्याचा सण म्हणून ओळखला जातो. आबालापासून वृध्दापर्यंत सर्वच जण खुप मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून धमाल करतात. भारताच्या दक्षिण भागातील तामिळनाडू राज्यात हा सण पोंगल या नावाने खुप प्रसिध्द आहे. भारतातल्या  इतरत्र भागात संक्रांती या नावानेच हा सण प्रसिध्द आहे.
मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी यात्रा आयोजित केले जातात. प्रामुख्याने प्रत्येक बारा वर्षांनी आयोजित करण्यात येणारी कुंभमेळा यात्रा, ज्याची बरेच जण प्रतिक्षा करतात. याशिवाय कोलकाता शहराजवळ जेथे  गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते. भारतातल्या विविध भागातील आणि प्रदेशातील लोक यादिवशी एकत्र येतात. भारतातील ही सर्वात मोठी यात्रा समजली जाते. केरळ राज्याच्या शबरीमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते. मकरसंक्रांत हा सण जरी एक असेल परंतु भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पध्दतीने सण साजरी करतात. त्याचा एकमेव उद्देश्य म्हणजे एकमेकांना प्रेम देणे आणि घेणे. तेंव्हा चला तर मग पुढच्या मकरसंक्रांती पर्यंत काळजी घ्या स्वतः ची आणि हो शेजाऱ्यांची सुध्दा.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment