नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 13 December 2016

Brother


प्राणप्रिय दादास ...........

प्रिय दादास,
सप्रेम नमस्कार
सनविवि
खुप दिवसा नंतर असे पत्र लिहित आहे त्यामुळे मनात एक वेगळा उत्साह संचारलेला आहे. माझ्या अंधारमय जीवनात आपल्या प्रेमाचा प्रकाश पसरल्यामुळे आज मी एक यशस्वी व्यक्ती म्हणून जीवन जगात आहे. आपले जीवन माझ्यासमोर नेहमीच एक आदर्श आहे. बालपणापासून तर आतापर्यंत आपल्यासोबत माझा सहवास तसा कमीच आहे, तरीही आपला प्रभाव माझ्या वर सदोदित आहे आणि राहील. आपली प्रत्येक सवय मी जवळून पाहिलो आणि तीच सवय माझ्या अांगी नकळत येत गेले. शिक्षणासाठी तुम्ही
परगावी गेलात तेव्हा मी खूप लहान होतो जेमतेम दहा वर्षाचा. महिन्या दोन महिन्यानी आपली एक किंवा दोन दिवसासाठी भेट होत होती. सुट्ट्यात घरी आल्यानंतर पुस्तकाला कधी तुम्ही वेगळे केले नाही विरंगुळा म्हणून रेडीओ ऐकण्याची व क्रिकेट
खेळण्याचा छंद आजही मला आठवतो. आकाशवाणी औरंगाबाद-परभणी केंद्र आणि  नागपूर केंद्रावर मराठी गाण्याची आवड पाठवायची आणि दर रविवारी दादाचे नाव येणार म्हणून मी रेडीओ लावून बसायचो. आज मी सुद्धा अधूनमधून आकाशवाणी केंद्रावर आवड कळवतो. रेडीओवरील सुप्रभातम ऐकल्याशिवाय आपली सकाळ झाली नाही .बी.बी.सी. हिंदी ऐकाल्याशिवाय झोपायचे नाही. क्रिकेट समालोचन ऐकण्याची आपल्या सवयीमुळे मी लहानपणी मनिंदरसिंगच्या आवाजात क्रिकेट समालोचन केल्यावर तुम्ही माझी तोंड भरून स्तुती करत. या सवयीमुळे माझी वक्तृत्व कला सुधारण्यास मदत झाली. शब्दकोडे सोडविण्याचा छंद सुद्धा जगावेगळे कोडे सोडविण्यासाठी
शब्दार्थ पाठ हवेत या शिकवणीमुळे मी मराठीतले शब्दार्थ पाठ केले आणि माझी शब्दसंपत्ती वाढीस लागली. माझ्यात आणि तुमच्यात दहा-बारा वर्षाचे अंतर त्यामुळे कधी कोणत्या वस्तूसाठी भांडण झालेच नाही त्यामुळे आयुष्यभर भांडण म्हणजे काय मला कळलेच नाही. यामुळे शत्रू कमी आणि मित्र जास्त बनवत गेलो .एके दिवशी दै.लोकमत मध्ये आपला छोटेखानी लेख प्रकाशित झाला. तेव्हा माझ्यासह घरातील सर्वाना खूप आनंद झाला. माझ्या मनात उत्सुकता होती की असे पेपरमध्ये लेख आणि नाव कसे प्रकाशित होतात ?  याबाबत तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनामुळेच आज मी विविध वृत्तपत्रातून लेखन करीत आहे. सगळ्याच्या मनात आपल्या विषयी आदर आहे, कारण आपण शांत, संयमी, व अभ्यासू आहात. अडीअडचणीच्या वेळी गावातील युवक आपल्याकडे येवून मार्गदर्शन घेत होते आणि तुम्ही त्यांना सोप्या शब्दात मार्गदर्शन ही देत आलात. त्यामुळे संपूर्ण गाव आपल्या प्रति अभिमानी आहेत. यासारख्या अनेक गुणाचा परिपोष आज माझ्यात आणि कुटुंबात नकळत दिसून येतो. प्रेम हे व्यक्त करता येत नाही परंतु नकळतपणे अनुभवास येतो. मी दहाव्या वर्गात असताना आपणास मराठवाडा ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून नोकरी लागली, तेंव्हा परिवारातील च नव्हे तर गावातील सर्वानाच खूप आनंद झाला. तुमच्या बुध्दिमत्तेनुसार तुम्हास ही नोकरी मिळाली. आपले आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशीच नोकरी मिळवावी म्हणून मी सुध्दा अभ्यासाला लागलो. दहावीच्या परिक्षेपूर्वी मिळालेल्या आपल्या अनमोल मार्गदर्शनामुळे मी दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालो. घरातल्या सर्वांची ईच्छा होती की, बाबासारखे मी सुध्दा एक शिक्षक व्हावे. परंतु तुमच्या मनात मला पुढे शिकवायचे होते म्हणून मला तुमच्यासोबत ठेवून घेऊन माझी पुढील शिक्षणाची सोय केली. माझ्या जीवनातील हे दोन वर्ष अत्यंत महत्वाचे होते. कारण याच काळात आपला सहवास मला जास्त लाभला. या दोन वर्षात मला अनेक धडे शिकायला मिळाले, ज्याचा फायदा मला पुढील आयुष्य जगताना खूपच कामाला आले. दहावीला असतानाचा एक प्रसंग मला आजही जशास तसा आठवतो. शनिवारचा दिवस होता. आमच्या शाळेला दुपारी सुट्टी होती. म्हणून शेजाराच्या घरी टीव्ही वरील चित्रपट पाहण्यासाठी गेलो. सायंकाळी चार ते सात या वेळात तो चित्रपट प्रसारित होत असे. तुम्ही पाच वाजता खोली वर बसलात. बाबाची आई म्हणजे आजी मला जेवण तयार करून देण्यासाठी होती. ती घरी असल्यामुळे तुम्ही खोली वर बसू शकलात. वास्तविक पाहता सायंकाळी सहाच्या बसला तुम्हाला घरी जायचे होते पण बराच वेळ मी घरी न आल्यामुळे तुम्ही गावाकडे जायचे टाळून खोलीवर थांबलात. मला काही माहित नाही. चित्रपट संपल्यावर सात वाजता घरी परतलो. खोलीत तुम्हाला पाहून मी पुरता घाबरून गेलो. माझ्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. कसेबसे जेवण उरकल्यावर तुमची प्रश्नांची सरबत्ती सुरु होईल असे वाटले. पण तुम्ही एकही प्रश्न विचारले नाही कारण आजीने सर्व काही सांगितली होती. त्यावर एकच वाक्य म्हणालात, ' आत्ता टीव्ही बघण्यात वेळ न घालविता अभ्यास केल्यास भविष्यात खुप वेळ टीव्ही पाहता येईल. जर आत्ता अभ्यास न करता टीव्ही पाहत बसलास तर आयुष्यभर टीव्ही पाहता येणार नाही '. आपले हे साधे बोलणे मला खुप जिव्हारी लागले त्यानंतर मी कधीच शनिवारी चित्रपट पाहिला नाही. खुप मन लावून अभ्यास केलो आणि विशेष प्रावीण्य सह उत्तीर्ण झालो. आपला हाच उपदेश मी माझ्या स्वतः च्या मुलांना आणि शाळेतील मुलांना देतो.
मला आज ही आठवतो तो दिवस, ज्या दिवशी माझा डी.एड.ला क्रमांक लागला आणि मी प्रवेश घेऊन घरी परतलो. तेंव्हा तुम्ही म्हणालात, " तुझ्या मनासारखे क्षेत्र मिळाले." एवढीच आपली प्रेरणा मला खुप काही प्रोत्साहन देऊन गेले. खरोखरच मला शालेय जीवना पासून ज्याची आवड होती त्याच क्षेत्रात प्रवेश घेतल्याचा मला ही आनंद झाला. बारावी ची परीक्षा आणि त्या अनुषंगाने अभ्यास यामुळे लेखानाकडे जो दुर्लक्ष झाला होता तो परत सुरु करता आले. जर या क्षेत्रा कडे आलो नसतो तर कदाचित मी माझी अभिव्यक्ती शोधू शकलो नसतो. शिक्षकी व्यवसाय निवड केल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी प्राप्त करता आल्या. आवड असल्यामुळे आपोआप सवड निर्माण होते असे मटल्या जाते याची प्रचिती मला आली. मन लावून अभ्यास केल्यामुळे चांगल्या गुणाने मी डी. एड. उत्तीर्ण झालो. निवड मंडळाची परीक्षा कठीण असते, म्हणून माझ्या बऱ्याच मित्रांनी क्लासेसला जाऊ लागले पण मी मात्र घरीच बसून अभ्यास केलो कारण स्पर्धा परीक्षेची सर्वच प्रकारची पुस्तके घरात उपलब्ध होती. वर्तमानपत्र वाचण्याची सवय तर होतीच त्यामुळे रोज किमान पाच सहा वर्तमानपत्र वाचन करणे ठरलेले असायचे. घराजवळ वाचनालय असल्यामुळे तिथे सुद्धा जाण्याची सवय आपल्यामुळे लागली. डॉक्टर किंवा इंजिनियर होऊन मी खुप पैसा कमविला असता कदाचित पण ह्या सर्व बाबी गमविलो असतो असे वाटते. तुमच्यामुळे माझे जीवन यशस्वी झाले असे मी मानतो. माझ्या प्रत्येक हालचालमध्ये आपली सावली आढळून येते. मी स्वतः ला खरोखरच भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारखा मोठा भाऊ मिळाला.
नोकरी मिळाल्यानंतर सुध्दा तुमचे पुढील शिक्षण चालूच होते. टीव्हीवर फक्त बातम्या तेवढेच पहायचे. तुम्ही थिएटरला जाऊन सिनेमा पहिलात, असे कधीच दिसले नाही. आई आणि ताईच्या आग्रहाखातर सर्व परिवारासह फक्त एकदाच चित्रपट पहिलेले आजही मला आठवते. अर्थात आपल्या जीवनात काल्पनिक गोष्टीला कधीही थारा नव्हता. आपल्या मित्रमंडळी व स्वकीयासोबत तुम्ही प्रेमाने वागायचे, संकटात असलेल्या मित्रांना हातभार द्यायचे संस्कार मला आपल्याकडूनच मिळाले. डॉ. रमेश भूमे आणि डॉ. हृदय कुमार कौरवार सारखे हुशार मित्र भेटल्यामुळे तुम्हाला  अभ्यासाची दिशा मिळाली आणि गतीही मिळाली. रात्रंदिवस केलेल्या अभ्यासचे फळ म्हणजे तुमची ग्रामीण बँकेत ऑफिसर म्हणून निवड झाली. घरात सर्वाना आनंद झाला. आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ते औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ व्यवस्थापक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. अधिकारी पदावर असून देखील तुम्ही खूपच साधे राहता अशी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही शिकवण आपल्याकडून मिळाली. बाबांचे तुमच्यावर खुप प्रेम तसे त्यांचे सर्वा वर सारखेच प्रेम आहे मात्र विशेष प्रेम असल्यामुळे किंवा काळजीपायी आजही ते वडिलांना फोन केल्याशिवाय झोपत नाहीत. ज्यादिवशी त्यांचे दोघांचे फोनवर बोलणे होत नाही त्यादिवशी दोघांना सुध्दा रुखरुख वाटते. मुलगा म्हणजे कसा असावा ? याची प्रचिती तुमच्या वागणुकीतुन स्पष्टपणे झळकते. स्वतः खुप हुशार होते मात्र त्याचा त्यांना कधीच गर्व नव्हता. त्यामुळेच त्यांच्या अंगी विद्या टिकली विद्या विनयेन शोभते या उक्तीप्रमाणे. शालेय जीवनापासून गणित विषयाची खुप आवड होती म्हणून कोणतेही गणित चुटकी सरशी सोडविण्यात त्यांचा हात कुणीच धरत नसे. पुस्तक वाचत राहणे ही एक चांगली सवय होती. नेहमी काही ना काही वाचन करण्याची सवय आज ही कायम आहे. पुस्तकाचे वाचन करण्याचा छंद आपल्याकडून मला शिकायला मिळाले. आज ही तुम्ही रिकामा वेळ कोणते ना कोणते पुस्तक वाचन करण्यात घालवित असता. मोत्यांसारखे अक्षर काढण्याची ईश्वरदत्त देणगी वडिलांकडून तुम्हाला मिळाली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण बाबाचे अक्षर सुंदर आणि वळणदार होते.  त्यामुळेच तुमचेही अक्षर मोत्यांसारखे सुंदर झाले. तुमचे अक्षर पाहून मला सुद्धा वाटत असे की माझे ही अक्षर असेच सुंदर व्हावे. नियमित लेखनाने अक्षर सुंदर होते, याचा धडा मला तुमच्यापासून मिळाला आणि हस्ताक्षर सुधारले ते तुमच्यामुळे. माझे अक्षर सुंदर झाले, तरीही तुमच्यासारखे नक्कीच नाही.  गावात तुमच्या एवढा हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेचा आजपर्यंत जन्माला नाही आणि पुढेल जन्मेल की नाही माहित नाही असे तुमच्या बाबतीत आज ही बोलले जाते. शांत स्वभाव, इतराना मदत करण्याची वृत्ती आणि मितभाषी व्यक्तिमत्व, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असल्यामुळे मलाच नाही तर सर्व गावाला आपला अभिमान आहे.
तुम्ही कधी मला चापट किंवा मार दिलेले तरी मला आठवत नाही. चूक केलेल्या व्यक्तिवर रागावल्याने त्यात सुधारणा होत नाही मात्र प्रेमाने समजावून सांगितल्यावर त्यात नक्कीच फरक पडतो ही आपली शिकवण मला संपूर्ण जीवनभर कामाला पडत आहे. आज आपले आयुष्य सेटल आहे, आपणास काही ही करायचे गरज नाही तरी वरील सर्व सवयी आजही जशास तसे आहे. आज ही टीव्ही वर बातम्या फक्त पाहतात, चित्रपट कमी पाहतात असे म्हणता येणार नाही कारण वर्षातून एक चित्रपट पाहिले तरी खूप झाले ते ही मित्रांच्या आग्रहाखातर. माझे दादा असल्या मुळे मला त्यांचा अभिमान आहेच शिवाय माझ्या कुटुंबासह संपूर्ण गावालाही त्यांचा अभिमान वाटतो. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

तुमचाच छोटा भाऊ

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment