नागोराव सा. येवतीकर

Friday, 25 November 2016

भारतीय संविधान दिवस



*** . . . भारतीय संविधान दिन . . . ***

देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असे सुध्दा म्हटले जाते. संविधानातील तरतुदी लेखी स्वरूपात आहेत. याच आधारावर देशांतील लोकप्रतिनिधी नियमांच्या चौकटीत राहून आपला कारभार करीत असतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची रचना व अधिकार हे सर्व या संविधानात नमूद केलेले आहे. यामूळे देशाला बराचसा फायदा होतो जसे की, अधिकाराचा दुरुपयोग होण्यास प्रतिबंध करता येते, नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहतात, जनतेचा राज्यकारभारातील सहभाग वाढतो म्हणून संविधानानुसार राज्यकारभार केल्यास लोकशाही बळकट होते. 
सन 1942 साली झालेल्या चले जाव लढ्याने देशाला आत्ता लवकरच स्वातंत्र्य मिळणार असे चित्र निर्माण झाल्यावर सन 1946 मध्ये संविधान निर्मीतीची प्रक्रिया सुरू झाली. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा आग्रह स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांचा होता. म्हणूनच आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीला संविधान सभा असे म्हटले आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधानाचा कच्चा आराखडा म्हणजे मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समिती तयार करण्यात आली व त्याचे अध्यक्ष म्हणून विविध देशाचा कायदा आणि कलम म्हणजेच तेथील संविधानाचा गाढा अभ्यास असलेले डॉ. भीमराव रामजी अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक करण्यात आली. 
          या संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. यात सर्व जाती धर्माचे, विविध भाषा बोलणारे आणि विविध व्यवसाय करणाऱ्या लोकांचा या समितीत समावेश होता. डॉ. राजेंद्र प्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह पंडीत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे. बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता आदि अनेक मान्यवर या संविधान सभेत सदस्य म्हणून होते. बी. एन. राव या कायदेतज्ज्ञ व्यक्तीची  संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. 
संविधान सभेचे पहिले अधिवेशन या संविधान सभेचे अध्यक्ष असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 09 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली व प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात करण्यात आली. संविधान सभेचे एकूण अकरा अधिवेशने भरविण्यात आले. संविधान समितीचे प्रत्यक्ष कामकाज 165 दिवस चालले. ज्यात सात सदस्य होते मात्र विविध कारणामुळे ते वेळ देऊ शकले नाहीत. म्हणून स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11महीने आणि 17 दिवस असे अहोरात्र अभ्यास व चिंतन करून भारताचे संविधान तयार केले. त्यामुळेच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. संविधान सभेत चर्चा, सल्ला मसलत, विचार विनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. विरोधी मतांचा आधार व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार करून या संविधानास मूर्त स्वरूप देण्यात आले आणि अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे तयार करण्यात आलेले संविधान देशाला अर्पण करण्यात आले. म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात  संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 
               स्वातंत्र्यलढ्याच्या काळात संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सन 1930 मध्ये भरविण्यात आले आणि त्यात 26 जानेवारी हा दिवस " स्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा ठराव करण्यात आला आणि सर्वानी त्यास मंजूरी ही देण्यात आली. इंग्रजांना आत्ता देशातून हाकालून दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही अशी शपथ घेण्यात आली आणि स्वातंत्र्यलढ्याची चळवळ जोर धरू लागली.  इंग्रज भारत सोडून गेले आणि आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वंतत्र झाला. 26 जानेवारी या दिवसाची देशांतील नागरिकांना सतत स्मरण व्हावे यानिमित्ताने या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली. म्हणून 26 जानेवारी हा दिवस 1950 पासून स्वराज्य दिन ऐवजी प्रजासत्ताक दिन वा गणराज्य दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरी करण्यात येत आहे. 
भारतीय संविधानात स्वातंत्र्य, समता, समानता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता, या मूल्यांचा स्विकार केलेला आहे. यात नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य स्पष्ट सांगितले आहे. आपण सर्व या संविधानाचा आदर केला पाहिजे. चला तर मग आज आपण सर्व संविधानाची शपथ घेऊ या " आम्ही भारताचे लोक. . . . . . . . . . . " 
संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. 
      -  नागोराव सा. येवतीकर 
         मु. येवती ता. धर्माबाद 
          9423625769 


No comments:

Post a Comment