नागोराव सा. येवतीकर

Monday, 28 November 2016

खबरदार

खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय

सकाळी सकाळी त्या बातमीने सारा गाव दुःखात बुडालेले होते. कारण गावातील एका तिसीच्या आतील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जीवन जगण्यास सुरुवात ही झाली नव्हती की त्याचा शेवट झाला. त्याच्या मरणावर लोक काही बाही बोलत होते, एकमेकाच्या कानात कुजबुजत होते. त्यास महारोग झाला होता, वाचणे शक्य नव्हते, बरे झाले गेला तो, असे अनेकाचे बोलणे कानावर पडत होते. यावरून माहिती मिळाली की तो युवक एड्सचा रुग्ण होता आणि गेल्या पाच-सहा महिन्यापासून अंथरुणावर पडून होता. वास्तविक पाहता तो एक चांगला धडधाकट आणि मेहनती तरुण होता. गावात काही काम मिळत नाही म्हणून पैसे कमाविण्यासाठी दोन वर्षापूर्वी मोठ्या शहरात गेला होता. भरपूर मेहनत करून दोन वर्षात खुप संपत्ती कमाविली आणि परत आपल्या गावी आला. परत येताना मात्र संपत्ती सोबत एड्स नावाचा रोग ही घेऊन आला होता. त्याचे लग्न होऊन वर्ष ही उलटले नव्हते. एके दिवशी त्याला खुप ताप चढली म्हणून दवाखान्यात नेण्यात आले. तेथे त्याची लघवी आणि रक्ताचे नमुने तपासण्यात आले. याच निमित्ताने कळले की तो HIV पॉजिटिव आहे. असे कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तो अर्ध मेला झाला होता. जसेही ही गोष्ट त्याच्या बायकोला कळाली तसे तिने सर्वात पहिल्यांदा त्याचा त्याग केली. मागे पुढे कश्याचाही विचार न करता तिने घर सोडण्याचा विचार केला. हा जबर धक्का त्यास बसला. तो पूर्वीच शरीराने खंगला होता आत्ता मनाने ही खचला होता. काही दिवसानंतर ही गोष्ट घरात कळाली तेंव्हा घरात चिंतेचे वातावरण तयार झाले. घरातल्या लोकांनी त्यास वेगळ्या खोलीत जागा करून दिली, त्यांचे सर्व साहित्य वेगळे करण्यात येऊ लागले म्हणजे जवळपास त्यास वाळीत टाकल्यासारखी वागणूक मिळाली. त्याचे गावात फिरणे कमी झाले. लोकांशी संपर्क कमी झाला. लोक सुद्धा त्यास फटकारुन राहू लागले. त्याची रोज थोडी थोडी शक्ती कमी होऊ लागली. कामासाठी मोठ्या शहरात गेला होता तेंव्हा त्यांच्या हातून झालेल्या चुकाची आत्ता त्यास पश्चाताप वाटत होता. पण त्यांच्या हातात काही उरले नव्हते. अखेर तो दिवस उजाडला आणि त्याचा शेवट झाला. वास्तविक पाहता तो त्याच दिवशी मेला होता, ज्यादिवशी त्याची बायको त्याला सोडून गेली होती. वास्तविक पाहता ज्याठिकाणी गरज होती मानसिक आधार द्यायची त्याठिकाणी ती मागे पुढे विचार न करता त्यास सोडून गेली. तिने जर आधार दिला असता तर काही दिवस आनंदात जगला असता. घरच्यानी सुद्धा त्यास खुप हीन वागणूक दिली ज्यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाले आणि मी कधी एकदा मरतो की काय असे त्याला वाटू लागले.
     प्रातिनिधीक स्वरूपातील ही कहाणी एका युवकाची नाही तर देशात असे अनेक युवक आहेत जे की कळत नकळत एड्स या आजाराशी जोडल्या गेले आहेत. एड्स रुग्णाची संख्या सध्या लाखाच्या घरात आहे. दहा वर्षा पूर्वीची जी संख्या होती ती संख्या आज नक्कीच नाही. याचे सारे श्रेय आरोग्य विभागला जाते, ज्यानी या विषयी खुप जनजागृती केली आणि त्यावर नियंत्रण मिळविले. ज्या चार कारणा मुळे एड्स चा प्रसार होतो ती कारणे आत्ता सर्व लोकांना कळून चुकले आहे. मात्र तरी सुध्दा काही ठिकाणी याचे रुग्ण जेंव्हा आढळून येतात तेंव्हा परत काळजी वाढू लागते.
संपूर्ण जगात 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘एड्स’ हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना काळीज धस्स करते. हा रोग कुणाला झाला असे कळाले की अंगावर काटे उभे राहतात. एड्स झालेल्या रुग्णाला समाजात वेगळ्या नजरेने पाहिले जाते. पूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सर हा सर्वांत भयानक रोग असे मानले जात असे. कॅन्सर म्हणजे माणूस कॅन्सल असे बोलले जायचे. मात्र जसे ही ‘एड्स’ विषयी लोकांना कळायाला लागले तसे मोठ्या रोगाच्या यादीत वरच्या क्रमांकावर एड्स या रोगाला पाहण्यात येऊ लागले. विज्ञानाच्या प्रगती मुळे कॅन्सरवर आता इलाज शक्य झाले आहे. समाजात अनेक रुग्ण यातून वाचले आहेत असे आढळून येतात. वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया करून कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र एड्सचे तसे नाही त्यामुळे लोकांच्या मनात या रोगाविषयी खुप भीती निर्माण झाली आहे. सन १९८६ साली भारतातल्या मद्रासच्या वेश्या वस्तीत पहिल्या एड्सच्या रुग्णाचं निदान झालं. तसे पाहिले तर सन 1981 साली जगात अमेरिकेत हे रुग्ण सापडले होते. मग त्या पाठोपाठ अनेक मोठमोठ्या शहरातून एड्स विषयीची तपासणी झाली आणि त्या ठिकाणी अनेक रुग्ण सापडू लागले. एड्स नावाचा भस्मासुर देशात उत्पन्न झाल्याची बातमी बघता बघता देशात सगळीकडे पसरली. लोकांना याविषयी सुरुवातीला काहीच माहित नव्हते मात्र आज 30 वर्षा नंतर या रोगाविषयी प्रत्येक जण जाणुन आहे. आजतागायत एड्स ह्या आजारावर कसलाही इलाज, औषध, लस किंवा उपचार  यांचा शोध लागला नाही. यावर उपचार नसल्यामुळे खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय आहे याची माहिती सुध्दा लोकांना आत्ता झाली आहे. 
योग्य वयात योग्य वेळी समज मिळाली तर त्यांचे जीवन सूकर होते. मात्र भारतात लैंगिक शिक्षण हा विषय काढला की लोकं नाक मुरडतात. त्यांना अस्वस्थ वाटायला लागते. पण जेंव्हा पोरगा हातून वाया जातो त्यावेळी विचार करतो की मी एकदा तरी त्याच्या सोबत याविषयी का बोललो नाही. तसा हा विषय खुलेपणाने किंवा मोकळ्या मनाने बोलण्यासारखा नाही. म्हणून त्यास लपवून लपवून बोलेल्या जाते. यामुळे मुले सुद्धा व्यक्त होत नाहीत. मग मित्राकडून चुकीची माहिती मिळविली जाते आणि हा त्याच्या आहारी जातो. आजकाल तर मोबाईलमुळे मुले अजुन जास्त बिघडत चालली आहेत. पूर्वी जे लपून छपुन अश्लील सिनेमा पाहिले जायचे ते आत्ता मोबाईल वर एका क्लिकवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे युवा पिढी नको त्या गोष्टी आत्मसात करीत आहेत. व्यसन करणारी पिढीवर फार लवकर याचा प्रभाव जाणवत आहे. बेरोजगार युवक आपल्या हाताला काही काम धंदा नसल्यामुळे व्यसनाच्या आहारी जात आहे. दारू पिने, गुटखा खाने, नशा करणे या सर्व वाइट सवयी वाइट संगतीच्या मित्रा कडून मिळत आहेत. म्हणून नकळत त्याचे पाय नरकात जात आहे. आई-वडिलांचे फाजिल लाड सुध्दा त्यास कारणीभूत आहेत. आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत ? दिवसभर काय करतात ? या गोष्टीची शहानिशा पालकानी करणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्याने मागितलेली वस्तू त्यास देणे एवढे काम मात्र पालक न चुकता करीत आहेत. आपल्या मुलांना या वयात एका मित्रा प्रमाणे वागणूक देऊन एकमेकास समजून घेतल्यास ही वेळ नक्की येणार नाहीज्या तरुण पिढी वर भारताची प्रगती अवलंबून आहे ती पिढी अश्या रोगाच्या विळख्यात जखडल्या जात आहे. यापासून वाचण्यासाठी खबरदारी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर 
  मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
  9423625769
  nagorao26@gmail.com

No comments:

Post a Comment