नागोराव सा. येवतीकर

Thursday, 11 August 2016



हे असं का घडतं ?
            - नागोराव सा. येवतीकर
               09423625769

स्त्याने चालता चालता माझे लक्ष का भिंतीवर गेले. त्या ठिकाणी लिहिले होते की, येथे कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे. त्याच ठिकाणी मात्र कचर्‍याचा ढीग दिसून येत होता. त्या कचर्‍यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती आणि त्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होत होता. हे असे का न उलगडणारे कोडे मला पडले. घरात असलेल्या लहान मुलांना आपण नेहमी हे करू नका, ते करू नका, तिकडे जाऊ नका असे विविध प्रकारचे बंधने टाकतो. म्हणजे एक प्रकारे ते मनाईच आहे. परंतु ती लहान मुले आपण ज्या ज्या गोष्टीवर बंधने टाकली किंवा करण्यास मनाई केली तरी त्या सर्व बाबी एकदा तरी करून पाहिल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. बंधने टाकलेली बाब कधी एकदा करून बघू अशी उत्सुकता त्यांच्या मनात दडलेली असते. कदाचित हीच सवय पुढे मोठेपणी दिसून येते की काय, अशी शंका राहून राहून मनात येते.

मोठमोठय़ा शहरात नो पार्किंगच्या ठिकाणी आपली गाडी पार्किंग केली की, आपणाला नक्कीच दंड भरावा लागतो. याची जाणीव असल्यामुळे किंवा दंडाच्या भीतीपोटी सहसा या नियमांचे उल्लंघन फार कमी प्रमाणात बघायला मिळते. असाच प्रकार वन वे मार्गावर दिसून येतो. त्या ठिकाणी सूचना लक्षात घेतली नाही तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूचना फलकांचे अनुपालन न करता त्या ठिकाणी घाई केल्यास त्याचे वाईट परिणाम तात्काळ बघायला मिळतात. मुले लहान असताना त्याला खूप सूचना दिल्या जातात. परंतु ते मूल कोणत्याच सूचनेचे पालन करीत नाही. गरम चहाचा कप मुलाच्या समोर ठेवलेला आहे आणि त्यास हात लावू नको, अशी आईची सूचना आहे. मानवी स्वभावानुसार ते मूल त्या कपाला हात लावते आणि जोराचा चटका बसतो. म्हणजे त्याला शिक्षा मिळते. त्याच्या मनात एवढी भीती बसते की, त्यास नुसते चहाचे कप जरी दाखविले तरी तो दूर पळतो. म्हणजे प्रत्येक नियम भंगास दंडाची तरतूद ठेवावी लागेल असे वाटते.

ज्या ठिकाणी सूचनांचे पालन न केल्यास वाईट परिणाम बघायला मिळत नाही किंवा दंड भरावे लागत नाही, अशा ठिकाणी सूचनांचे उल्लंघन करणे योग्य आहे का? आपणास मिळत असलेल्या सूचनांचे पालन केले नाही तर समाजात खरोखरच आपणाला मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळेल काय. याचे उत्तर अर्थातच नाही असे येते. नियमांचे पालन न करणार्‍या व्यक्तीला समाज उर्मट, उद्धट, बेशरम, नालायक अशा विविध उपाधीने सन्मानित करतो. तेव्हा समाजात वावरत असताना आपणाला ही उपाधी मिळवायची आहे का. याचा एकदा तरी जरूर विचार करावा आणि चांगले राहण्याचा प्रयत्न करावा. दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन तेथील नियमांचे पालन करावे. यामुळे नक्कीच आपण एक आदर्श नागरिक म्हणून सन्मानाने जगता येईल.

आपली जवळची व्यक्ती आजारी असेल तर त्यांना भेटण्यासाठी आपण दवाखान्यात जातो. त्या ठिकाणी एक सूचना टांगलेली असते की, मोबाईल बंद करा किंवा सायलेंट मोडवर ठेवा. ज्यामुळे दवाखान्यात आजारी व्यक्तीला जी शांतता हवी आहे ती मिळू शकते. परंतु आपण ती सूचना वाचूनसुद्धा त्याकडे कानाडोळा करतो. थोड्याच वेळात आपली मोबाईलची रिंग वाजते आणि दवाखान्यातील शांततेचा भंग होतो. दवाखाना जवळ रस्त्यावर नो हॉर्न म्हणून पाटी दिसते. मात्र त्याच ठिकाणी गाड्यांचा फार मोठा गोंगाट ऐकायला मिळतो. कान बधिर होतील एवढे कर्णकर्कश हॉर्न वाजविले जातात. ज्यामुळे रुग्णांना त्याचा त्रास होतो. दुसर्‍यांना मोबाईल बंद करा, अशी सूचना देणारी दवाखान्यातील इतर मंडळी जेव्हा मोबाईलवर दिसतात तेव्हा मात्र सामान्य जणांना राग येणारच. आजारी व्यक्तीला भेटण्यास आलेले नातेवाईक असो वा प्रत्यक्ष रुग्ण यांच्याशी वार्तालाप करण्याच्या ऐवजी ते जर मोबाईलवरील गेम (उदा. कँडी, क्रॅश) खेळण्यात मग्न असतील तर त्यांचे वागणे ही नियम उल्लंघनच आहे.

शाळेच्या नियोजित वेळापत्रकानुसार शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्याचे उल्लंघन केल्यास त्याचा फटका आपणाला जरूर बसतो. वर्गात अध्यापन करताना मोबाईल वापरू नये, अशी सूचना किती शिक्षकांनी अमलात आणली असेल हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. मोबाईल वापरणार्‍या शिक्षकांना ५0 रुपये दंड लावण्याचा फतवा एका जिल्हा परिषदने काढला. परंतु आजपर्यंत मोबाईल वापरामुळे शिक्षकांना दंड भरावा लागला, अशी बातमी ऐकायला मिळाली नाही. शिक्षक मंडळींनीसुद्धा या नियमाचा जरूर विचार करावा. कारण वर्गात आपले उत्साहपूर्ण अध्यापन चालू असताना मोबाईलची रिंग वाजली तर माझ्या मनाला पटत नाही म्हणून वर्ग अध्यापनात मोबाईल वापरणार नाही, अशी दीक्षा घेणे गरजेचे आहे. पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा, असे सूचना फलक असूनसुद्धा मागे शाळेजवळील अपघातात एका शाळकरी मुलांचा अंत झाला. तंबाखू खाणे शरीरास हानिकारक आहे, अशी ठळक सूचना प्रत्येक तंबाखूच्या उत्पादनावर छापलेली असते. तरी त्या सूचनांकडे साफ दुर्लक्ष होते. शासनाने यावर बंदी टाकली असली तरी मानवाच्या या विचित्र स्वभावामुळे त्याची काळय़ाबाजारातून फार मोठी विक्री होत आहे. म्हणजे जनता आता दोन बाजूंनी लुटली जात आहे. एक शारीरिक हानी तर होतच आहे. शिवाय तंबाखूवरील बंदीमुळे जादा दराने खरेदी करून खाण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानसुद्धा आपले वागणे, बोलणे आणि चालण्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. समाजात तयार केलेले नियम व सूचना आपल्या भलाईसाठी असतात. त्यामुळे तेथे घाई करण्यात काही अर्थ नाही. कारण घाईत घेतलेले निर्णय वा कृती बर्‍याच वेळा चुकीचे ठरतात.

No comments:

Post a Comment