नागोराव सा. येवतीकर

Monday, 16 May 2016

बलमजूरी






* बालमजूरी कशी संपेल ? *

बालपण ही प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. परंतु सर्वांचेच बालपण सुखांत, आनंदात किंवा मजेत जातात असे नाही. संत तुकाराम महाराज यांनी बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा असे म्हटले आहे. पण समाजात वावरताना जे चित्र नजरेस पड़ते ते फारच  भयानक आहे. सकाळी सूर्यकिरण धरतीवर पडत ही नाही की घराबाहेर एक चिरकणारा आवाज कानावर पडतो. त्या आवाजानेच जाग येते म्हटले तरी काही वावगे नाही. " ताई, शिळं काही असेल तर वाढ. " असे ओरडणारे पोरं त्यांचं बालपण काय म्हणत असेल ! आपल्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी हे पोरं दारोदारी भीक मागत फिरतात आणि मिळालेली भीक आपल्या कुटुंबासह वाटून खातात. सूर्य डोक्यावर चढायला लागला की हेच पोरं उकिरडे शोधत फिरतात. मिळेल ती वस्तू आपल्या थैलीमध्ये भरतात आणि सर्व वस्तू नेऊन भंगार वालेल्या विकून मिळेल त्या पैशात काही खरेदी करून खातात. यांना बालमजुरी म्हणावे काय ? हा त्यांच्या पोटाचा प्रश्न असतो ज्याची सोडवणूक स्वतः त्यांनाच करावी लागते. शिक्षण नावाची वस्तू तर त्यांच्यापासून कोसो दूर असते. शाळा म्हणजे काय असते ? या बाबींचे त्या मुलांना सोडा घरातील कोणालाच त्यांची कल्पना नसते आणि शाळेत आपणाला शिकण्याची संधी मिळते याची सुध्दा त्यांना कल्पना नाही हे त्यांना प्रत्यक्षात भेटल्यावर लक्षात येते. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचे शासनाने ठरविले. त्यानुसार सर्वेक्षण चे आराखडे व वेळापत्रक तयार करण्यात आले. संपूर्ण गाव, वाडी, तांडे, शहरातील गल्ल्या सर्व सर्वेक्षण केल्यावर शाळाबाह्य संख्या म्हणावी तेवढी निघाली. शाळाबाह्य आणि बालकामगार हे एकमेकास पूरक आहेत. जे बालकामगार आहेत ते शाळाबाह्य आहेत. किंवा शाळाबाह्य राहण्यामागे काम करणे ही त्यांची मजबूरी आहे. शाळेत अनुपस्थित राहाणाऱ्या मुलांच्या घरी शिक्षक जेंव्हा कारणे समजून घेण्यासाठी भेट देतात तेंव्हा पालकांचे उत्तर ऐकून हसावे की रडावे हेच कळत नाही. काही पालक म्हणतात की शेताकडे बघायला कोणीच नाही. आज मजूरदार मिळणे अवघड झाले किंवा मजूरदाराला देण्याएवढे पैसे नाहीत त्यामुळे याला सोबत घेतो. उद्या नक्की पाठवितो शाळेला असे म्हणून शिक्षकाची बोळवण केली जाते. पण त्या मुलांची उद्या कधीच उजाडत नाही आणि तो शाळेला येत नाही. यांस बालमजुरी म्हणावे का ? घरातील लहान भावंडाची सांभाळ करणे, स्वयंपाक करणे, धूणी भांडी करणे इत्यादि कामासाठी मुली मधुनच शाळा सोडतात हे प्रत्यक्षात भेट दिल्यावर समजते. शेतात काम करणाऱ्या किंवा मजुरी करणाऱ्या लोकांसाठी थोडीशी मदत सुध्दा आभाळाएवढी मोठी वाटते. आई वडीलांच्या कामात मदत करणाऱ्या मुलांना बालमजूर म्हणता येईल काय ? त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या पालकांवर आजपर्यंत कुठे करवाई झाल्याचे ऐकिवात नाही. कारण घरच्या कामात मदत करणे हे बालमजुरी या व्याख्येत बसत नाही असे वाटते. मात्र ती मुले कायमची शिक्षणापासून दूर होतात, शाळाबाह्य होतात, त्यांचे जीवन अंधकारमय होते यावर काही पर्याय मिळेल काय ?

यानंतर आपण अश्या क्षेत्राकडे वळणार आहोत. ज्यांना शाळेचा अजिबात गंध नाही. पालकांना शिक्षणाचे महत्व माहीत नाही, ते कधी शाळेलाच गेले नाहीत ते आपल्या मुलांना काय शाळेत पाठवणार ?
अश्या लोकांच्या घरी जेंव्हा सर्वेक्षण करणारी मंडळी पोहोचली तेंव्हा त्यांना काय अनुभव आला असेल ? फारच विचित्र अनुभव याठिकाणी मिळाला. यापूर्वी सर्वेक्षण करणारे कर्मचारी एक दोन वेळा येऊन गेले होते. त्यामुळे तिसर्यांदा जेंव्हा सर्वेक्षण करणारी मंडळी त्यांच्या गल्लीत गेल्याबरोबर पालकांचा मोठा आवाज ऐकू आला " शाळेत घेऊन जाणारी माणसे आलीत रे पोरं हो लपुन बसा " खूपच आश्चर्य वाटलं की हे माणसे असे का बोलत आहेत. मागील वेळेस असाच एक माणूस आला आणि त्यांनी येथील पाच - सहा पोरं घेऊन गेला. त्यांना माहीत नाही की ती पोरं आज तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या शाळेत शिकत असतील पण त्यांना वाटते की ही माणसे आपले पोरं घेऊन जात आहेत आणि त्यांच्या पोटाचा प्रश्न अनुत्तरित राहत होता असे त्यांच्याशी संवाद केल्यावर कळले. तेथे शालेय वयातील बरीच मुले दिसत होती पण पालक सहकार्य करीत नव्हते त्याठिकाणी काय करता येणार ? हा एक मोठा प्रश्न आहे. मागे काही दिवसाखाली एक बातमी वाचण्यात आली की फासेपारधीच्या मुलांसाठी मतीन भोसले नावाचा व्यक्ती प्रश्नचिन्ह नावाच्या माध्यमांतून मुलांचे शिक्षण पूर्ण करीत आहे. ना सरकारची मदत ना त्यांच्याजवळ गडगंज संपत्ती आहे. फक्त समाजातील काही दानशूर व्यक्तीच्या मदतीने ते प्रकल्प राबवित आहेत. मूठभर धान्य, एक वही, एक पेन एवढीच आपली मदत या भटक्या मुलांच्या जीवनात प्रकाश पसरू शकते. या  मुलांना आपल्या नियमित शाळेत प्रवेश दिल्यानंतर ते शिकणार नाहीत हे ही सत्य आहे. याचा सुध्दा अनुभव एका शाळेत आला. एका भीक मागणाऱ्या पोराला वयानुसार शाळेत प्रवेश देण्यात आले. पण त्यांच्याजवळ कोणीच बसायला तयार होईना. त्याच्या अंगाचा पूर्ण वास येत असल्यामूळे ती मुले त्यांना दूर करीत होती. दुपारी जेवणाच्या वेळी सुध्दा तोच अनुभव आला. मग काय दोन तीन दिवसांनी ती मुले स्वतःहून शाळेत न येण्याचा निश्चय केला.
शिक्षणातून समानतेचे धडे शिकविले जावे हे अगदी सत्य आहे. मात्र मुलांना जे डोळ्यांना दिसते त्यात काय बदल करता येणार ? त्याऐवजी प्रश्नचिन्ह सारखे प्रकल्प राबविण्यासाठी काही संस्था पुढे येणे गरजेचे आहे. आणि समाजातील लोकांनी सुध्दा अश्या प्रकल्पाला सढळ हाताने मदत करणे गरजेचे आहे. एखाद्या देवाला रक्कम दान केल्याने खरंच पुण्य मिळते की अश्या सेवाभावी संस्थेला मदत केल्याने पुण्य मिळते याचा विचार करण्याची आज खरी वेळ आहे. देवाच्या नावाने संपूर्ण गावाला भंडारा खाऊ घालण्यापेक्षा या गरीब लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविली आणि त्याना खाऊ दिले तर जास्त पुण्य मिळेल. एखाद्या भूखेल्या व्यक्तीला जेऊ घातल्यानंतर जे समाधान मिळते कदाचित ते लाख रू देवाला दान केल्या नंतर ही मिळणार नाही. त्यामूळे समाजातील दानशूर व्यक्तीनी यावर एकवेळ जरूर विचार करावे असे वाटते. हॉटेलात, वीटभट्टीवर, किंवा इतरत्र काम करणारे चौदा वर्षांखालील मुले बालकामगार म्हणून आपणांस ठळकपणे दिसून येतात मात्र वर उल्लेख केलेले अशी बरीच मुले आहेत जे की अप्रत्यक्षरित्या बालकामगारच नव्हेत का ? अश्या बालकामगार बालमजुरांची संख्या भरपूर आहे. यांवर काही उपाययोजना करता येईल काय आणि बालमजुरी कशी संपविता येईल याचा प्रशासनासह समाजातील सर्व घटकांनी गंभीरतापूर्वक विचार करणे अगत्याचे आहे. बालमजुरी किंवा बालकामगार आणि शाळाबाह्य मुले हा कधीच न संपणारा विषय आहे. तसेच ही समस्या फक्त भारतातच नव्हे तर जगाला भेडसावणारी समस्या आहे.
@ नागोराव सा. येवतीकर
     मु. येवती ता. धर्माबाद
    09423625769

No comments:

Post a Comment