नागोराव सा. येवतीकर

Thursday, 28 April 2016



सार्वत्रिक बदल्या आवश्यक : कही खुशी कही गम

बदल हा संसाराचा नियम असतो. पावसाळ्यानंतर हिवाळा आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा मग पुन्हा पावसाळा हा निसर्ग नियम जर मोडीत निघाले तर पर्यावरण चक्र सुध्दा बिघडते. अर्थातच मानवी जीवनासह पशू पक्षी वेली, वृक्ष यांचे ही जीवन संकटात पडते. त्यामूळे ज्या क्रिया जेव्हा घडायाला पाहिजे त्याच वेळेला घडत राहिले तर सर्व काही योग्य होत राहते. हे बदल आठवण येण्याचे कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेले सार्वत्रिक बदल्या. तसेच एप्रिल आणि मे महिना उजाडला की सर्वत्र कर्मचाऱ्याचा बदलीचा प्रश्न सर्वांच्या मनात चर्चिले जाते. बदल्या होणार की नाही, झाल्या तर किती टक्के होणार, प्रशासकीय होतील काय, कोणत्या नियमानुसार होतील या सारख्या विविध प्रश्नांची चर्चा केली जाते. जिल्हा परिषद मध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी कार्यरत असतात मात्र सर्वांचे लक्ष शिक्षकांच्या बदल्याकडे सर्वात जास्त लागून असते. दरवर्षी एप्रिल महीना उजाडला की शिक्षकाच्या बदल्याच्या चर्चेला प्रारंभ होते आणि मे महीना संपेपर्यंत हे चर्चेचे गु-हाळ चालूच राहते. सन 2013 या वर्षापासून विविध कारणांमुळे शिक्षकांच्या बदल्या प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. त्यामूळे शिक्षक वर्गात नाराजीचे सुर पसरले असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता कर्मचाऱ्याची बदली करणे हा काही जनांना क्लेशदायक वाटत असते तर काही जनांना आनंद देणारी वाटते. जे मूळ गावापासून खूप दूर अंतरावर काम करीत आहेत त्यांना आपल्या गावाकडे परत येण्याचे वेध लागलेले असतात. जे शिक्षक शहरापासून 20- 25 किमी दूर अंतरावर खेड्यात, वाडी वस्त्या पाडी तांड्यावर काम करीत आहेत त्यांना शहरांजवळ किंवा सोईस्कर शाळा मिळावी असे वाटते त्यात त्याचे काय चुकले. गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी भागात काम करणारे किती वर्ष अजून तेथेच खितपत पडावे ? त्यांना सुध्दा या भागात काम करण्याची ओढ लागलेली असते. ही मंडळी बदली प्रक्रियेची चातक पक्ष्यांसारखे वाट पाहत असतात. 
बदली प्रत्येकाना हवीहवीशी वाटत नाही. जे आज सुखात आहेत त्यांना बदली कधीच होऊ नये असे वाटते. कारण त्यांचे सर्व काही सुखात, मजेत आणि आनंदात चाललेले असते. मात्र जे दुःखात, कष्टात काम करीत आहेत त्यांना बदल्या हे एक सुखाचा आशेचा किरण वाटतो. नेमके त्यांच्या आनंदावर बदल्या न करता विरजन टाकल्या जाते. आदिवासी तालुक्यांत काम करणारा आमचा शिक्षक मित्र गेल्या पाच वर्षापासून मूळ तालुक्यांत बदली मिळविण्यासाठी खूप धडपड केली. पण दरवर्षी वेगवेगळ्या कारणाने त्याची बदली काही झाली नाही. आपल्या कुटुंबापासून दूर राहून नौकरी केली आणि अचानक एके दिवशी आमच्या सर्वामधुन निघून गेला, त्याची मूळ तालुक्यात येऊन नौकरी करण्याचे स्वप्नं स्वप्नच राहिले. घरापासून दूर नौकरी करीत असलेली मंडळी कौटुंबिक सूखापासून वंचित राहतात. त्यांचे मानसिक समाधान नसते. अशी मंडळी शारीरिक बाजूने सुध्दा खचलेली असतात. मग शाळेत परिणामकारक अध्यापन करू शकतील काय ? या समस्येवर अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना आणि प्रशासन अजिबात विचार करताना दिसत नाही, यामूळे शिक्षक वर्गात नाराजीचे सुर पसरत आहे. यामूळे प्रगत महाराष्ट्र चे स्वप्न खरोखरच पूर्णत्वास जाईल काय ? अशी शंका सुध्दा राहून राहून मनात येत राहते. 
कधी समायोजन झाले नाही म्हणून बदल्या रद्द होतात तर कधी पदोन्नती झाली नाही म्हणून बदल्या रद्द केल्या जातात. बदली हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. मात्र दरवर्षी या हक्कांवर या ना त्या कारणांमुळे गदा आणली जाते आणि बदल्याची प्रक्रिया रेंगाळते. खरोखरच समायोजन किंवा पदोन्नती करण्याचे काम कोणाचे आहे ? या कारणांमुळे बदली झाली नसल्यास किंवा रद्द करावे लागल्यास यांत शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या प्रक्रियेतील दोषी व्यक्तींना जबाबदार धरण्यात येऊन प्रशासन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केल्याशिवाय हे समायोजन आणि पदोन्नतीचा प्रश्नांची सोडवणूक होणार नाही, त्यामूळे वर्षानुवर्षे समायोजन आणि पदोन्नती असेच रखडल्या जातात. पात्र शिक्षक दरवर्षी यापासून वंचित राहतात. यावर सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे अत्यंत गरजेचे आहे, असे वाटते. दोष कुणाचा आणि त्याची सजा कुणाला याचा शिक्षक संघटनानी एकत्र येऊन विचार करायला हवे. यावर्षी सार्वत्रिक बदल्या व्ह्ययल्याच पाहिजे त्यातल्या त्यात शिक्षकाच्या बदल्या झाल्याच पाहिजे यावर भर दिला पाहिजे. आज कित्येक शिक्षक मंडळी या बदल्याच्या प्रक्रियेवर आपली पुढील आशा स्वप्नं रंगवून ठेवलेले आहेत. कर्मचाऱ्याना त्यांच्या सोइच्या जागी बदली होणे, त्यांच्या कार्याची गती वाढविण्यासाठी आवश्यक आहे. मनात आलेली मरगळ दूर करण्यासाठी, शिक्षकामध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण होण्यासाठी बदल्या आवश्यक आहेत. या सार्वत्रिक बदल्याचा कर्मचाऱ्यात कही खुशी कही गम असे दिसून येईल यांत शंका नाही. मात्र बदल्या झाल्याच पाहिजे, बदल्या झाल्या तरच महाराष्ट्र पूर्णपणे प्रगत होण्यास मदतच होईल असे वाटते. 
- नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद

2 comments:

  1. पेसा विभागात सेवा बजावणा-या शिक्षकांची सार्वत्रिक बदल्यांबाबत वाजवी मनोव्यथा समर्थपणे मांडल्याबद्दल मनस्वी आभार !!!!

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete