नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 31 December 2025

नवीन वर्षाभिनंदन ( Happy New Year 2026 )

           आलं रे नवीन वर्ष

आलं रे नवीन वर्ष
सर्वाना झालंय हर्ष 
हसत गाऊ गोड गाणी,
त्याने हृदयास होई स्पर्श ।

हाती घेऊ पुस्तक नि पेन
छोटी स्वप्नं नवी पाहू या
चांगल्या सवयी सोबत
रोज गोड गोष्टी करूया ।

आई-बाबांचा ठेवून मान
शिक्षकांचे रोज ऐकूया
सर्व एकत्र राहून प्रेमाने 
चला नवीन वर्ष जगूया ।

नासा येवतीकर, धर्माबाद 
~~~~~~~~~~~~~~~~
       नवा वर्ष : नवा हर्ष 
नवे नवे सूर घेऊन येताना 
आशेचा एक किरण हसतो
निरोप देता जुन्या गोष्टीला
नव्या स्वप्नांचा रस्ता दिसतो ।

मागे ठेवून कालच्या चुका
आज नवी उमेद घेऊ या
जिद्द, विश्वास नि कष्टाने
उज्ज्वल भविष्य घडवू या ।

गार वारा नव्या पहाटेचा
मनामनात आनंद पेरतो
पालवी नव्या विचारांची
पुन्हा जीवन फुलवतो ।

वैर संपवूनी, प्रेम वाढवू
मनातील द्वेष दूर करू या,
आपण सारे एक भावनेने
वर्ष नवीन साजरा करू या ।

प्रत्येक दिवशी धडा नवा
प्रत्येक क्षणी अर्थ नवा
प्रत्येकाचा संकल्प नवा
प्रत्येकासाठी हा वर्ष नवा ।

नासा येवतीकर, धर्माबाद 
~~~~~~~~~~~~~~~~

सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .......!

नासा येवतीकर, स्तंभलेखक, 9423625769

Tuesday, 30 December 2025

सूत्रसंचालन

      🌸 सावित्रीबाई फुले जयंती  🌸

            🌸 सूत्रसंचालन 🌸
आगतम.... स्वागतम..... सुस्वागतम.......
सर्वाना माझा नमस्कार. 
आज 03 जानेवारी अर्थात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने उपस्थित सर्वांचे मी ________ सहर्ष स्वागत करते.

ज्ञानाचा दीप उजळला, अज्ञानाचा अंधार गेला,
सावित्रीच्या शब्दांनी, इतिहास नवा घडला,
स्त्री शिक्षणाची वाट दाखवली जगाला,
नमन त्या माऊलीला, क्रांतिज्योती सावित्रीबाईला ।

कोणताही कार्यक्रम म्हटलं की त्याला अध्यक्षाची गरज भासते. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक ________ यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकार करण्याची विनंती करते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शाळेतील शिक्षकांना विनंती आहे की, आपण प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारावे. 

सन्माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय प्रमुख पाहुणे, व्यासपीठावरील मान्यवर, शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो…
आज आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत त्या ज्ञानज्योती, स्त्री शिक्षणाच्या आद्य जनक, समाजक्रांतीच्या अग्रदूत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त. 
आता आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करूया.
त्यासाठी मान्यवर पाहुण्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी मंचावर यावे. 🙏

हातात पुस्तक, मनात ध्यास,
समाजबदलाचा होता विश्वास,
दिवा ज्ञानाचा पेटवून गेल्या,
सावित्रीबाई आम्हाला वाट दाखवून गेल्या ।

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन नंतर कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागत गीताने करूया. त्यासाठी ________ यांना विनंती आहे की त्यांनी स्वागत गीत सादर करावे. 👏

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करणे आमचे कर्तव्य आहे. म्हणून 
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ________ यांचे स्वागत ________ हे करतील. 

स्वागताचा कार्यक्रमानंतर मी उपस्थित सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करते. 

शब्द नव्हते फक्त शिकवणीचे,
ते होते परिवर्तनाचे शस्त्र,
स्त्री शिक्षणासाठी उभी राहिली,
सावित्रीबाई – समाजक्रांतीची दृष्टी।

आता आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी ________ यांना आमंत्रित करते.

सावित्रीबाई फुले यांचा परिचय :
सावित्रीबाई फुले म्हणजे
✔ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका
✔ स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणारी क्रांतिकारक
✔ अन्याय, अज्ञान आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारी थोर समाजसुधारक
त्यांचे विचार आजही आपल्याला दिशा देतात.

लहान हातात मोठी मशाल, ज्ञानाची ओंजळ भरी,
सावित्रीच्या पावलांवरून, चालते आजची पिढी खरी,
स्वप्न पाहा, शिका, उभे रहा निर्भयपणे,
हीच खरी मानवंदना, सावित्रीच्या कार्यास सन्मानाने।

यानंतर आपल्या समोर आमच्या शाळेतील काही चिमुकली मुले भाषण करण्यासाठी आतुर आहेत. 
सर्वप्रथम भाषण करण्यासाठी येत आहे..... ________
खूप छान भाषण केले आहे. 

लहान पावलांत मोठे स्वप्न,
ज्ञानाने बदलले जीवन,
सावित्रीच्या विचारांची पालखी,
आजच्या पिढीकडे चालली निश्चित ।

यानंतर त्यांच्या महान कार्याला शब्दरूप देण्यासाठी ________  यांना भाषण सादर करण्यासाठी आमंत्रित करते. 👏

शिक्षणाचा अर्थ कळवणारी,
सावित्री समाज घडवणारी.

• पुस्तक हातात, धैर्य मनात,
सावित्रीबाई प्रेरणा प्रत्येक क्षणात.

• स्त्री शिक्षणाचा पाया रचला,
इतिहासाने तिला वंदन केलं.

सावित्री म्हणजे विचार, विचार म्हणजे क्रांती.

• पुस्तकातली शक्ती, सावित्रीने ओळखली.

• स्त्री शिक्षणाची सुरुवात, सावित्रीच्या नावावर.

• इतिहास घडवणारी, एक शिक्षिका साधी पण थोर.

अंधेरों से जो लड़ी, वो उजाला बन गई,
शिक्षा की राह में, मिसाल बन गई,
नारी को जिसने पहचान दी ज्ञान की,
वो सावित्री इतिहास की मशाल बन गई।

छोटे कंधों पर बड़े सपनों का भार है,
सावित्री के विचारों से रोशन संसार है,
(प्रत्येक कार्यक्रमानंतर थोडेसे अभिनंदन शब्द)

विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर प्रमुख पाहुणे यांचे भाषण - 
ज्या विचारांनी घडवला इतिहास,
त्या विचारांची आजही आहे आस,
मार्गदर्शनाच्या दीपासाठी,
मान्यवरांना करते नम्र आवाहन खास।

यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मुख्य आकर्षण असलेले मा. ________  प्रमुख पाहुण्यांना नम्र विनंती करते मार्गदर्शन करावे. 👏

सर्व प्रमुख पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार. आपण आमच्या मुलांना खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.

सत्कार / गौरव :
नवीन वर्षानिमित्ताने आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सुंदर भेट कार्ड तयार केल्याबद्दल शाळेकडून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याचा कार्यक्रम होईल.
सत्कारासाठी ________ यांना विनंती आहे. त्यांनी पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारावा.

शिका, लढा आणि पुढे चला,
अज्ञानाच्या बेड्या तोडत रहा,
सावित्रीचा वारसा जपू या,
खरी मानवंदना तिलाच देऊ या।

यानंतर कार्यक्रमाला दिशा देणारे अध्यक्षीय भाषणासाठी
आदरणीय ________ यांना आमंत्रित करते. त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे. 

अंधेरों से जो लड़ी, वो उजाला बन गई,
शिक्षा की राह में, मिसाल बन गई,
नारी को जिसने पहचान दी ज्ञान की,
वो सावित्री इतिहास की मशाल बन गई।

आता शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनासाठी ________ यांना आमंत्रित करते.
समारोप :
नुसते स्मरण नको आज, हवे आचरण खरे,
सावित्रीचे विचार जपणे, हेच वंदन सारे,
शिक्षण, समता, माणुसकी, या वाटेवर चालू या,
क्रांतिज्योती सावित्रीबाई, तुमच्याच मार्गी राहू या।

सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेला शिक्षणाचा मार्ग आपण सर्वांनी स्वीकारूया,
स्त्री-पुरुष समानतेचा विचार आचरणात आणूया
आणि त्यांच्या कार्याला खरी मानवंदना देऊया.

याच शब्दांत आजचा कार्यक्रम इथेच संपवते.
आपल्या सर्वांच्या उपस्थितीसाठी मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🌸

जय हिंद....! जय भारत.....!

Monday, 29 December 2025

नवीन वर्ष समृद्धीचे जावो ( Happy New Year 2026 )

         नवीन वर्ष समृद्धीचे जावो 

जुना वर्ष संपून नवीन वर्ष येतो तेव्हा वेळेच्या दारावर अलगद टिकटिक आवाज होते. “मी आलो आहे” असे जणू ते हळूच कानात सांगते. जुन्या वर्षाच्या पायऱ्या ओलांडून ते आपल्या जीवनात प्रवेश करते आणि मनात नकळत नवे विचार, नवी उमेद जागवते. कॅलेंडरवरची तारीख बदलते, पण त्या बदलासोबत मनाच्या कोपऱ्यात काहीतरी नव्याने उमलू लागते.
जुन्या वर्षाच्या आठवणीत मन रमून जाते. सुख-दुःखाच्या कडू-गोड प्रसंग पुन्हा एकदा डोळ्यासमोर तरळू लागतात. त्या सर्व आठवणी म्हणजे रंगीबेरंगी चित्रांसारख्या असतात. काही आनंदाच्या, काही दुःखाच्या, तर काही शिकवण देणाऱ्या. त्या आठवणी मनाच्या कप्प्यात नीट जपून ठेवून पुढे जाण्याचे धैर्य नवीन वर्ष देते. ते आपल्याला सांगते की भूतकाळ विसरायचा नाही, पण त्यात अडकून देखील राहायचे नाही.
तशी तर रोजच्या सारखी पहाट होते पण आज नवीन वर्षाची पहाट ही खास असते. वातावरणात एक वेगळाच ताजेपणा जाणवतो. हिवाळाच्या थंड वाऱ्यासोबत आशेची चाहूल लागते. मनात नकळत विचार येतात की, या वर्षी काहीतरी वेगळं करूया, काहीतरी चांगलं घडवूया. मग संकल्प जन्माला येतात, काही ठाम असतात तर काही हळवे असतात. ते संकल्प कधी पूर्ण होतात, कधी वाटेत हरवतात, पण प्रयत्न करण्याची प्रेरणा मात्र कायम देऊन जातात.
नवीन वर्ष आपल्याला एक नवी दिशा देतो, नव्या दृष्टीने पाहायला शिकवतो. रोजची तीच घाई, मनावर असलेला  ताणतणाव, अपूर्ण राहिलेल्या इच्छा यांमधून थोडावेळ थांबून स्वतःकडे पाहण्याची एक संधी देते. आपण खरंच आनंदी आहोत का ? समाधानी आहोत काय ? आपल्याला नेमकं काय हवं आहे ? या सर्व बाबीचा विचार करण्यासाठी हा क्षण जणू खासच असतो.
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळालेले शुभेच्छांचे संदेश आणि हास्याने भरलेले चेहरे पाहण्यात नवीन वर्ष साजरे होते. एकीकडे खूप घोंगाट, युवा वर्गात नवीन वर्ष साजरा करण्याची क्रेज वेगळीच असते. पण त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते मनातले शांत समाधान. कदाचित हे कळायला खूप वेळ लागतो. त्यापेक्षा गरजू व्यक्तीला दिलेली मदत, कुणाच्या रडवेल्या चेहऱ्यावर फुलवलेले हसू, किंवा स्वतःशी केलेला एक प्रामाणिक संवाद यातच नवीन वर्षाचा खरा आनंद दडलेला असतो.
शेवटी नवीन वर्ष आपल्याला एवढेच सांगतो की, मी फक्त एक सुरुवात आहे. पुढची वाट तुम्हालाच चालायची आहे. प्रेम, मेहनत आणि आशेचा हात धरून जर आपण पुढे चाललो, तर हे नवीन वर्ष नक्कीच आपल्या आयुष्यात उजेड घेऊन येईल. आपण ठरवलेल्या इच्छा, आकांक्षा आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या इच्छा आणि संकल्प पूर्ण होवो, नवीन वर्ष सुख समृद्धीचे, आनंदाचे जावो हीच या नवीन वर्षाच्या आगमन निमित्ताने शुभेच्छा ...... ¡

- नासा येवतीकर, स्तंभलेखक 

नवीन वर्ष 2026 ( New Year 2026 )

महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत कसे करावे ?

प्रत्येकजण नवीन वर्षाचे हर्षउल्लासने स्वागत करत असतो. नवीन वर्ष हे प्रत्येकासाठी एक नवी सुरुवात असते. महिलांच्या आयुष्यातही नवीन वर्ष म्हणजे नवी आशा, नवी संधी आणि आत्मविकासाचा नवा टप्पा असतो. महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत केवळ उत्सव म्हणून न करता स्वाभिमान, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदलांच्या निर्धाराने करणे अधिक उचित ठरेल.
नवीन वर्षाचे स्वागत करताना महिलांनी सर्वप्रथम आत्मपरीक्षण करावे, असे वाटते. सरलेल्या वर्षात आपण आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि स्वतःसाठी काय केले याचा विचार करणे आवश्यक आहे. स्वतःच्या गरजा, आवडी-निवडी आणि स्वप्ने यांना वेळ न देणे ही अनेक महिलांची समस्या असते. त्यामुळे या नवीन वर्षात स्वतःसाठी वेळ काढण्याचा, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचा संकल्प केल्यास स्वचा विकास होईल.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याला विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण घरातील महिला निरोगी आणि सक्षम असेल तर त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य देखील निरोगी राहू शकते. त्यामुळे नवीन वर्षात शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा आपण निर्धार करावा. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि तणावमुक्त जीवनशैली यामुळे आपले जीवन अधिक सशक्त बनते. स्वतः निरोगी असणे म्हणजे संपूर्ण कुटुंब निरोगी असणे होय. त्याचसोबत नव्या वर्षाचे स्वागत करताना महिलांनी शिक्षण, करिअर आणि कौशल्य विकासाकडेही लक्ष द्यावे. नवीन काही शिकणे, आपली आवड जोपासणे, आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपला वेळ मोबाईल मधील रिल किंवा इतर काही बघण्यात घालविण्यापेक्षा एखादे पुस्तक वाचनात घालावावे. त्याचे अनुकूल परिणाम कुटुंबात पाहायला मिळतात. शाळेत जाणारी आपली मुलं आपले अनुकरण करत असतात. त्यामुळे लहान मुलावर योग्य संस्कार होतील असे आपले वर्तन, राहणे, वागणे आणि बोलणे असायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज असे सहज घडले नाहीत तर त्यांना त्यांची आई राजामाता जिजाऊ यांनी घडविले. आपल्या कुटुंबाला घडविण्यात महिलांचा सिंहाचा वाटा असतो. आधुनिक युगात महिलांनी आर्थिक स्वावलंबन आणि आत्मसन्मान यांचा विचार करून पुढे जाणे आवश्यक आहे. आपणाला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वावलंबी होण्याचा मार्ग निवडावे.
महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत कौटुंबिक व सामाजिक जाणीव ठेवून करावे. इतर महिलांना प्रोत्साहन देणे, गरजू स्त्रियांना मदत करणे, मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देणे आणि स्त्रीसन्मान जपणे हे संकल्प समाजाला योग्य दिशा देतात. महिलांनी एकमेकींचा आधार बनल्यास समाज अधिक मजबूत होतो.
घर आणि कुटुंब सांभाळताना स्वतःच्या ओळखीला विसरू नये, हा संकल्प नव्या वर्षात करणे गरजेचे आहे. आपले विचार मोकळेपणाने मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि आत्मविश्वासाने निर्णय घेणे ही महिलांची खरी ताकद आहे.
जाता जाता असे म्हणता येईल की, महिलांनी नव्या वर्षाचे स्वागत आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाने करावे. स्वतःचा विकास, कुटुंबाचे कल्याण आणि समाजाची प्रगती या तिन्ही गोष्टींचा समतोल साधल्यास नवीन वर्ष महिलांसाठी यश, समाधान आणि आनंद घेऊन येईल, यात शंकाच नाही. सर्वाना नवीन वर्ष 2026 च्या खूप खूप शुभेच्छा ...!
- नासा येवतीकर, स्तंभलेखक