नागोराव सा. येवतीकर

Monday, 28 October 2024

आनंददायी दिवाळी ( Happy Diwali )


सर्वांना आनंद देणारा सण : दिवाळी

दिवाळी सण लहानापासून वृद्धांपर्यंत सर्वानाच आवडता सण आहे. प्रत्येकालाच या सणाची उत्सुकता लागलेली असते. कोजागिरी पौर्णिमा संपला की दिवाळीची चाहूल लागते. घराच्या छतावर किंवा अंगणात आकाशकंदील लावला की दिवाळीची प्रतीक्षा सुरू होते. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. अंधार दूर सारून प्रकाश देणारा सण. लक्ष लक्ष दिव्याने सारा परिसर तेजोमय होतो. सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. इतर सर्व सण एका दिवसात संपतात मात्र दिवाळी हा सण पाच दिवस असतो. वसूबारसपासून चालू चालला सण धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलीप्रतिपदा म्हणजे पाडवा अर्थात दिवाळी आणि त्यानंतर शेवटी भाऊबीज सणाने संपन्न केला जातो. प्रत्येक दिवसाचे महात्म्य वेगळे आहे आणि महत्व देखील वेगळे आहे. 
दिवाळी सणामुळे बाजारात एक नवचैतन्य निर्माण होते. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करणारा हा सण आहे. घराघरांत फराळाची तयारी केली जाते, त्यामुळे किराणा दुकानातील सर्वात जास्त खरेदी महिला वर्गाकडून केली जाते. साखर, पोहे, शेंगदाणे, गोडेतेल, रवा, मैदा याची सर्वात जास्त मागणी याच दिवाळीच्या काळात केली जाते. वर्षभर जेवढा माल विकल्या जात नाही तेवढा माल या दिवाळीच्या काळात विकला जातो. त्यानंतर कपड्याच्या खरेदीवर देखील लोकांचा कल दिसतो. दिवाळी म्हटले की नवे कपडे आलेच. लहान मुलांना तर दिवाळीची खास करून कपड्यासाठी आकर्षण असते. तसेच माहेरी आलेल्या मुलींना नवे कपडे करून सासरी पाठविण्याची जुनी प्रथा आहे. नुकतेच लग्न झालेल्या मुलींचा व जावईचा दिवाळीसण देखील करावा लागतो. म्हणूनच या काळात कपड्याच्या दुकानात लोकांची एकच गर्दी दिसून येते आणि दुकानदार देखील एकावर एक फ्री देऊन ग्राहकांना आकर्षित करत असतात. दिवाळी आणि फटाके यांचा अनोखा संबंध आहे. फटाक्यांशिवाय दिवाळी अशक्यप्राय वाटते. खास करून लहान व किशोरवयीन मुले फटाक्यांची मागणी करत असतात. त्यामुळे दहा-अकरा दिवस या दुकानाची देखील रेलचेल असते. काही व्यापारी फटाक्याच्या विक्रीतून वर्षभराची कमाई करत असतात. त्यानंतर लोकांचा खरेदीचा कल असतो तो चैनीच्या वस्तूकडे. दिवाळी निमित्ताने प्रत्येक कंपनी काही ना काही ऑफर ठेवून ती चैनीची वस्तू लोकांनी विकत घ्यावी अशी जाहिरात करत असतात. आपल्या घरात कोणत्या वस्तूची कमतरता आहे आणि आपले बजेट किती आहे ? यानुसार लोकं कलर टीव्ही, फ्रीज, ए सी, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरसह चार चाकी वाहनांची खरेदी करतात. तर काही लोकं पाडवाच्या शुभ मुहूर्तावर सोने वा घराची खरेदी करतात. अश्या लोकांची संख्या जरी कमी असले तरी आर्थिक उलाढालीमध्ये यांच्या खरेदीचे देखील महत्वपूर्ण योगदान असते. त्याचसोबत भाजीपाला मार्केटमध्ये देखील खरेदीची तेजी दिसून येते. फराळासाठी लागणाऱ्या विविध वस्तूची खरेदी करावीच लागते. दिवाळी म्हणजे विद्युत रोषणाई, त्यामुळे वीजेवर चालणाऱ्या विविध आकर्षक लायटिंग वस्तूची बाजारात खूप मागणी होते, त्याच अनुषंगाने दरवर्षी नवनवी डिझाईनच्या वस्तू लोकांना आकर्षित करतात. याच दिवाळीच्या काळात लोकांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येणे-जाणे होते. बच्चे कंपनीला सुट्या असल्याने घराघरात सहलीचे नियोजन होते. काही लोकं यासाठी सार्वजनिक वा खाजगी वाहनाचा वापर करतात तर काहीजण आपल्या स्वतःच्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे ट्रॅव्हल्स, बस आणि रेल्वेमध्ये प्रवाश्याची एकच गर्दी अनुभवयास मिळते. त्यानिमित्ताने पर्यटन स्थळावरील हॉटेल व लॉज फुल्ल होतात. त्यामुळे त्यांची देखील एकप्रकारे चांदीच होते नाही का ! म्हणजेच दिवाळी हा सण माझा, तुमचा एकट्याचा नसून समाजातील सर्व घटकांचा आहे. म्हणूनच दिवाळीच्या पर्वात सर्वत्र आनंदी आनंद वातावरण दिसून येते. 
याच दिवाळीत अजून एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या भेटीला येत असतात ते म्हणजे दिवाळी अंक. विविध नियतकालिक, दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक अंक प्रकाशित करणारे या दिवाळीत हमखास विशेषांक काढतात. त्याचसोबत काही विशेष मंडळी दरवर्षी आपला दिवाळी अंक प्रकाशित करतात. पुस्तकाच्या स्टॉलमध्ये हे दिवाळी अंक वाचकांचे लक्ष वेधून घेतात. काही वाचक खास करून या दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पाहतात. साहित्यिक मंडळी देखील आपल्या लेखणीने वाचकांची दिवाळीच्या फराळासोबत वाचनाची भूक भागविण्यासाठी विविध प्रकारच्या साहित्याची मेजवानी देतात. वर उल्लेख केलेल्या बाजारपेठेप्रमाणे या व्यवहारात जास्त मोठा आर्थिक उलाढाल दिसत नसला तरी दिवाळीची परंपरा जतन करण्याचे काम हे दिवाळी अंक करत असतात. आपण सर्व वाचक वर्गानी दरवर्षी एक तरी दिवाळी अंकाची खरेदी करून वाचन करण्याची सवय लावून घ्यावी म्हणजे आपल्या घरात ही परंपरा कायम चालत राहील आणि दिवाळी अंकाला ही अच्छे दिन येतील, असे वाटते. 
महाराष्ट्रातीलच नव्हे तर मराठी भाषेवर नितांत प्रेम करणारी इतर राज्यातील मराठी भाषिक लोकांनी देखील अंकासाठी लेखन करत असतात. यावर्षी नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, हे आपल्या सर्वच मराठी लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. नुसता अभिजात दर्जा मिळवून चालणार नाही तर त्यासाठी प्रत्येक मराठी माणसांनी आपली मते आपल्या बोली भाषेतून विविध साहित्य प्रकारातून व्यक्त करत राहणे आवश्यक आहे. वाचकांची संख्या वाढविण्यासाठी लेखकांनी नेहमी लिहीत राहायला हवे आणि लिहित्या हातांना बळ देण्याचे काम हे दिवाळी अंक नेहमीच करत असतात. म्हणून वाचकांनी दिवाळीच्या फराळासोबत दिवाळी अंकाचे देखील उत्स्फूर्तपणे स्वागत करावे आणि एका तरी अंकाचे वाचन करावे. सर्व वाचकांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा .......!

- नासा येवतीकर, स्तंभलेखक
9423625769