नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 10 August 2022

रक्षाबंधन ( rakhi )

*राखी एक अतुट बंधन*

कुटुंबात आई वडिलांनंतर भाऊ बहिणीचे नाते अत्यंत महत्वाचे समजले जाते. आईच्या नंतरचे स्थान म्हणजे  बहिणीचे आहे. आपल्या भावाची खरी काळजी घेणारी ती बहीणच असू शकते. फार पूर्वीपासून या भाऊ आणि बहिणीचे नात्यावर आधारित गोष्टी रुपात बोलले जात आहे. कोणतेही जात असो, धर्म असो किंवा पंथ भाऊ बहिणीचे प्रेम प्रकर्षाने दिसून येते. त्याच भाऊ बहिणीचे एकमेकावरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण होय.
हा सण साजरा करण्यामागे पौराणिक दंतकथा सांगितली जाते. एकदा श्रीकृष्णाच्या करंगळीला दुखापत झाली आणि रक्तस्राव होऊ लागला. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला बहिण सुभद्रा आणि पाच पांडवाची धर्मपत्नी द्रोपदी उभे होत्या. हे पाहून सुभद्रा कुठे चिंधी सापडते काय म्हणून इकडे तिकडे शोध सुरु केली होती. त्याच वेळी द्रोपदीने मागेपुढे कसलेही विचार न करता आपल्या अंगावरील भरजरी साडीचा पदर टर्रकन पाडून श्रीकृष्णाच्या करंगळीला बांधली तो दिवस म्हणजे रक्षाबंधन. तेंव्हा श्रीकृष्णानी द्रोपदीला वचन दिले की संकट काळात माझी आठवण कर मी मदतीला नक्की येईन. तसे वचन त्यांनी पाळले देखील. ज्यावेळी भर सभेत दुःशासन द्रोपदीचे वस्त्रहरण करण्यासाठी अंगावर हात टाकला त्यावेळी द्रोपदी मनोमन आपला भाऊ श्रीकृष्ण यांच्या धावा केल्या तेंव्हा श्रीकृष्णानी द्रोपदीला वाचविले. महाभारतातील हा प्रसंग आपणास चांगली शिकवण देतो की, बहिणीने भावाला साथ द्यावी आणि भावाने बहिणीची संकट काळात संरक्षण करण्याचे वचन नेहमी लक्षात ठेवावी.
आज देशात मुलींचे अपहरण, मुलींवर होत असलेले बलात्कार, विनयभंग आणि मुलींचे छेडछाड या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यास विविध कारण देखील आहेत. महिलांना सायंकाळी सहाच्यानंतर घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे. तेंव्हा या उत्सवाच्या निमित्ताने समाजात एक चांगला संदेश जायला हवे. आपली अर्धांगिनी म्हणजे बायकोला सोडून बाकी सर्व माझ्या बहिणी आहेत ही भावना प्रत्येकांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे. पर स्त्री माते समान हे धोरण राजे शिवाजी महाराजाच्या कारकिर्दीत सर्वानी पाळले याचा इतिहास आपण वाचन करतो मात्र प्रत्यक्षात आपली वागणूक शून्य असते. आपण स्वतः आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

शाळेत असताना भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा रोज शपथेप्रमाणे घेतो. मात्र त्याचे अनुकरण प्रत्यक्षात करीत नाही. एका रक्ताचे भाऊ बहिणीनी प्रमाने रहावे यात काही वाद नाही मात्र समाजातील इतर मुलींदेखील माझ्या बहिणी आहेत असे जोपर्यंत समाजातील मुले म्हणणार नाहीत तोपर्यंत रक्षाबंधन सण खऱ्या अर्थाने साजरी केली असे होणार नाही. अगदी लहान वयापासून मुलांना आपल्या प्रत्येक बहिणीचे संरक्षण करण्याची जबाबदारी शिकविणे गरजेचे आहे. समाजातील अनिष्ठ प्रथा बंद करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या घरातील मुलांवर योग्य संस्कार टाकणे ही काळाची गरज आहे घराघरात भाऊ ज्या प्रकारे आपल्या बहिणीची काळजी घेतो तशी परिसरातील, गावातील, शहरातील, राज्यातील नव्हे देशातील मुलींची काळजी भावाने घेणे आवश्यक आहे. एखाद्या विवाहित स्त्रीला आपल्या पतीचा खुप मोठा आधार असते. स्वामी समर्थ यांच्या उक्तीनुसार 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ' पती सदैव पत्नीच्या पाठीशी प्रत्यक्षात नसून देखील असल्याचा विश्वास असतो. तसे प्रत्येक मुलींना आपल्या भावाचा विश्वास निर्माण व्हावे असे वातावरण तयार करायलाच हवे.
आपल्या पारंपरिक पध्दतीनुसार असे विविध सण येतात, आपण मोठ्या आनंदात साजरी करतो. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते पण तो आनंद दीर्घकाळ टिकून राहत नाही. कारण आपल्या मधलाच एक भाऊ दुसऱ्या एका बहिणीवर अत्याचार करतो. निर्भया सारखे प्रकरण घडते. तिचे जीवन बरबाद करून टाकतो. क्षणभराच्या सुखासाठी राक्षस बनतो आणि तिच्या संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी करतो. हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि हे निश्चितपणे थांबू शकते. त्यासाठी प्रत्येक भावाने एक शपथ घ्यायला हवी की ' मी कोणत्याही स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहणार नाही. सर्व मुली माझ्या आई- बहिणी समान आहेत. हे परमेश्वरा माझ्या डोक्यात शुध्द आणि चांगले विचार येऊ दे.' असा विचार करून जो भाऊ रक्षाबंधन साजरी करीत आहे त्याच्या मनात यावर्षी एक वेगळीच भावना असेल एवढे मात्र निश्चित. आज समाजात सर्वत्र दु:शासन तयार होत आहेत तेंव्हा परत एकदा श्रीकृष्ण निर्माण होणे गरजेचे आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती पो. येताळा
  ता. धर्माबाद जि. नांदेड
  9423625769

Monday, 8 August 2022

क्रांती दिन ( kranti din )

                 ।। क्रांती दिन ।।

नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस सालाला
चले जाव हा नारा दिला इंग्रज सरकारला

सर्व भारतीयांना दिली स्वातंत्र्यतेची हाक
क्रांतीच्या मशाली पेटल्या गावोगावी लाख

करू किंवा मरू संदेश दिला गांधीजीनी
अहिंसेचा मार्ग स्वीकारला नागरिकांनी

हजारो आंदोलकांनी दिली प्राणाची आहुती
देशासाठी शहीद झालेल्याची पसरली कीर्ती

इंग्रजी सत्तेविरुद्ध संपूर्ण देश उठला पेटून
सामील झाले सारेच धर्म जात वंश सोडून

महात्मा गांधीजीना केले अटक इंग्रजानी
उद्रेक झाला सर्वत्र देश पेटविला लोकांनी

या दिनामुळेच स्वातंत्र्याची उगवली पहाट
साऱ्या देशभर पसरली स्वातंत्र्याची लाट

अश्या हुतात्म्यांचा आज आहे स्मृतिदिन
आंदोलनाला म्हणती ऑगस्ट क्रांती दिन

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, 
कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769