नागोराव सा. येवतीकर

Saturday, 22 May 2021

All kavita


पूर्वी नि आज

पूर्वी भल्या पहाटे लोकं कामाला जात
आज भल्या पहाटे लोकं वॉक करतात

पूर्वी भल्या पहाटे चिवचिव आवाज होई
आज भल्या पहाटे कानी रिंगटोन ऐकू येई

पूर्वी भल्या पहाटे पाणी भरत असे बाया
आज भल्या पहाटे अंगण झाडतोय राया

पूर्वी भल्या पहाटे सकाळी वासुदेव येई घरी
आज भल्या पहाटे प्रत्येक दारावर भिकारी

आज भल्या पहाटेची चित्र बदलली सारी
पूर्वीचीच दुनिया होती आतापेक्षा लई भारी

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769


बालकविता - आईचा बाळ

आईचा बाळ दिसतो हसरा
दुडूदुडू चाले धरून कोपरा

उचलून घ्यावे म्हणून रडतो
सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो

बाळाचे सारेच लाड करतात 
हे हवे ते नको  सर्व पुरवतात

खुदू खुदू जेव्हा बाळ हसतो
सर्वांचा चेहरा आनंदी दिसतो

- नासा येवतीकर, धर्माबाद
  9423625769


काही तरी हरवलं

शून्य नजरेने आकाशात पाहत
भूतकाळात जरासे डोकावलं
तेव्हा कोठे मला जाणवलं की
माझं काही तरी नक्की हरवलं

बालपणीच्या मित्रांसोबतचा वेळ
मैदानावर दिवसभर खेळलेला खेळ
सायंकाळी चौकात खाल्लेली भेळ
सारं चित्र सर्रकन डोळ्यांपुढून सरकलं 
माझं काही तरी नक्की हरवलं

शाळेत मित्रांसोबत केलेली खोडी
पावसाच्या पाण्यात सोडलेली होडी
उगीच पोरांपोरीची लावलेली जोडी
डोळ्यांत पाणी येतंय जेव्हा हे आठवलं
माझं काही तरी नक्की हरवलं

मित्रांपुढे सारे जग फिके फिके वाटे
मित्रांला दुःखात पाहून मनी दुःख दाटे
घाबरलो नाही वाटेवर असो कितीही काटे
जिवाभावाच्या त्या मित्रांना दुरावलं
माझं काही तरी नक्की हरवलं

- नासा येवतीकर


इच्छापूर्ती

मुलांनी काय काय करावं ?
हे पालकांनी का ठरवावं ?
पालकांचीच ईच्छापूर्ती
करण्यासाठी का जगावं

पालकांना वाटे अधुरे स्वप्न
मुलांच्या रूपाने पूर्ण व्हावं
त्याच्यात असो नसो क्षमता
मात्र त्याने स्वप्न पूर्ण करावं

मनी स्वप्न पूर्ण झाले नाही तर
पालकांचा अपेक्षाभंग होतो
पाल्याचा जातो आत्मविश्वास
जीवनात सदा तो मागेच राहतो

कुणाला असते खेळण्याची इच्छा
तर कुणी छान छान पेंटिंग करतो
कुणी असतो अभिनयात निपुण
कुणी कामाची छान सेटिंग करतो

पालकांनो वेळीच सावध व्हा
पाल्याविषयी थोडा विचार करा
त्याचे स्वप्नं त्याला पूर्ण करू द्या
आपले स्वप्नं लादू नका जरा

- नासा येवतीकर, धर्माबाद
 9423625769


कविता - शब्द
 
शब्द ही मेरा धन
शब्द ही मेरा मन
शब्द से बने सुंदर
मेरा प्यारा जीवन ....1

शब्द ही मेरा प्राण
शब्द पे रखो ध्यान
शब्द से बिघडे नाता
जरा संभालो जुबान ....2

शब्द ही मेरी भाषा
शब्द ही मेरी आशा
शब्द से मिले तसल्ली
दूर करे मेरी निराशा ....3

शब्द बिना मै हुं कोरा
शब्द बिना मै अधुरा
शब्द से ही तो जीते है
सुखी जीवन हमारा ....4

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769


खरे समाजसेवक

लोकांची सेवा करणारी माणसं काळानुसार बदलतात
सेवावृत्ती असणारे परिस्थिती पाहून काम करतात

गुलामगिरीतून मुक्त करण्या लढले अनेक क्रांतिकारक
प्राणांची आहुती देऊन बनले तेच देशाचे खरे सेवक

जनतेचे अज्ञान दूर सारण्या ज्योत पेटविली शिक्षणाची
अनेक संकटे झेलून ध्यास घेतला समाज सुधारणांची

कोरोनाच्या संकटात पोलीस डॉक्टर बनले सेवक
दिवसरात्र सेवा करून तेच बनले खरे समाजसेवक

जीवाची पर्वा न करता दिली सेवा जसे  लढतो सैनिक
खरी देशभक्ती दिसली म्हणून तेच देशाचे खरे पाईक

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
  9423625769



पंखात बळ माझ्या

दोन चिमुकली पाखरे आपल्याच घरट्यात
फडफड करत होती
बाहेर चोच काढून खायला काही तरी
ती मागत होती
तिची आई देखील दूरवर उडत जाऊन
पिलासाठी काहीतरी खाऊ आणत होती
असे काही दिवस चालले 
एके दिवशी घरट्यात कोणीच दिसत नव्हते
पंखात बळ आले म्हणून ती पिले उडून गेली

आपले पोट भरण्यासाठी दूर देशा गेली

माणसाचे आयुष्यदेखील आजकाल या पक्ष्यांप्रमाणे झाले

लेकरं शिकून मोठी झाली चार पैसे कमावू लागली
की त्यांच्या पंखात बळ येते
नि आई बाबाला घरात ठेवून परदेशात नोकरी करायला
चालली कायमची जसे पाखरे उडून गेली कायमची,
कित्येक दिवस वाट पाहतात
डोळ्यातील अश्रू आटून जातात,
पण ती पाखरे पुन्हा त्या
घरट्यात परत येत नाहीत ......
कधीच परत येत नाहीत ......!

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423625769



आयुष्याचे गणित

कुणाच्या आयुष्याच्या थाळीत
खूप काही मांडून ठेवले आहे
सारं बघायला त्याला वेळ नाही

कुणाच्या आयुष्याच्या थाळीत
काहीच मांडून ठेवलेलं नाही
कष्ट करून आयुष्य संपून जाई

निर्माता असे का करतो एक कोडे
सारखे मनात डोकावत असतो
आयुष्यात सारखेपणा का नाही

कुणाला कष्ट करण्याची गरज भासते
तर कुणाला काही करावे लागत नाही
आयुष्याचे हे गणित मला कळत नाही

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
  9423625769


स्वतःसाठी जगा

जगासाठी नाही तर स्वतःसाठी जगा
सध्याचा काळच वाईट आहे ते बघा

कोणी कोणाच्या जवळ जायचं नाही
दुरूनच सहकार्य करीत चांगले वागा

एकमेकांना बोलून धीर देत राहायचं
मनावर ताण घेऊन उगीच नको त्रागा

जीवनावश्यक वस्तूसाठी नको धडपड
जीवन हेच आवश्यक आहे तुम्ही जाणा

एक पाऊल मागे गेल्याने हार होत नाही
हरून जिंकण्यातच खरा समंजसपणा
 
- नासा येवतीकर, धर्माबाद, जि. नांदेड 9423625769


त्या जुन्या वाटा


लहानपणीच्या आठवतात त्या जुन्या वाटा

चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात आनंदाच्या लाटा


लहानपणी अनेक बंधने अनेक आठकाठी

हे करू नको ते करू नकोची आडवीकाठी

खेळतच राहत असे पायी रुतला जरी काटा

लहानपणीच्या आठवतात त्या जुन्या वाटा


शाळेला दांडी मारून मित्रांसंगे फिरायला जाणे

घरात लबाड बोलून आवडता सिनेमा बघणे

खिशात त्यावेळी नव्हते जरी रुपयांच्या नोटा

लहानपणीच्या आठवतात त्या जुना वाटा


ती मलाच पाही म्हणून तिचे नाव वहीत लिहलं

चोरी चोरी चुपके चुपके तिला भेटावंसं वाटलं

माझं प्रेम तिला वाटत असेल जरी खोटा

लहानपणीच्या आठवतात त्या जुना वाटा


लहानपणीच्या आठवणीने आता येते हसू

दुःखात मित्रांना पाहून डोळ्यात येती आसू

मदत करावी गरिबांना होवो किती जरी घाटा

लहानपणीच्या आठवतात त्या जुना वाटा


- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड



विस्तव वास्तवातलं

वास्तव सत्य हे कधीही विस्तावासारखं असते
अनेक अन्यायकारक असत्याला जाळून टाकते

लहानपणापणी मुलांना सत्याची शिकवण दिली जाते
हेच बालपणीचे संस्कार आयुष्यभर सोबत राहते

मोठे झाल्यावर सारे संस्कार विसरून खोटे बोलतात
चांगली शिकवण देणारे ही वाईट मार्गावर चालतात

एक खोटं लपविण्यासाठी शंभर खोटे बोलावे लागते
त्यापेक्षा सत्य बोललं तर मनात कसलीही भीती नसते

दुसऱ्यांनी केलेली स्तुती प्रशंसा सर्वाना आवडते
आपल्यातले दोष कुणी दाखवले की राग येते

काही वास्तव गोष्टी सांगितलं की लोकांना कडू वाटते
सत्य स्वीकार करण्यासाठी खूप मोठं मन लागते

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
  9423625769


कविता वाचल्याबद्दल धन्यवाद.....!


Friday, 21 May 2021

International TEA Day


एक कप चहा


प्रिय चहा
चहा या दोन अक्षरी शब्दांत खूप मोठी ताकत आहे. कारण या चहामुळे दोन मनाचे मिलन होते, थोडावेळ एकमेकांना बोलता येते, कितीही घाईत असलो तरी चहा घेण्यासाठी थोडा वेळ विश्रांती नक्की मिळते. चहाला इंग्रजीत एकाक्षरी शब्द म्हणजे टी असे म्हणतात तर हिंदीत चाय म्हटले जाते. तसे राजेश खन्नावर चित्रित केलेलं एक गाणं सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है, इसिलिए मम्मीने मेरे तुमहें चाय पे बुलाया है। आज ही प्रथा कायम आहे की, मुलगी बघायच्या कार्यक्रमात पोहे खाणे झाल्यानंतर नवरी मुलगी हातात चहाचा ट्रे घेऊन येते आणि आपला परिचय देते. बऱ्याच कामासाठी चहा हे एक निमित्त म्हणून त्याचा वापर केला जातो. एखाद्या ठिकाणी काही सौदा किंवा व्यापार झाला म्हणजे लगेच तोंड गोड करण्याची प्रथा असते. चहा हे एक गोड पेय, त्यामुळे सर्वजण चहा घेतात. दोन मित्र बाजारात खूप दिवसांनी असो वा काही तासानंतर असो त्यांची भेट झाली की, पहिलं वाक्य, चल एक कप चहा घेऊ. चहा पिता पिता मग खूप गप्पाटप्पा, अनेक विषयांवर चर्चा होते. याच दरम्यान गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा रंगतात. म्हणून काहीजण खास करून टी पार्टी आयोजित करतात, चाय पे चर्चा करण्यासाठी. म्हणजे येथे ही चहा हे एक निमित्त असते. तेच जर मित्राने चहा पिऊ असं म्हटलं नाही तर तो चारचौघात सांगतो त्याने मला साधं चहा सुद्धा विचारलं नाही. घरी नातलग किंवा पाहुणे आले की चहा विचारावं लागते आणि चहा पाजवावे लागते. नाहीतर समाजात साधी चहा देखील दिली नाही म्हणून आपली खूप बदनामी होते. घरी आलेल्या नातलगांची सरबराई करण्याचे प्रमुख साधन म्हणजे चहा. सकाळ व सायंकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात चहानेच होते. लहानपणी कपबशीचा आवाज आला की जाग यायची, कधीकधी चहाचा वास देखील नाकात जायचं आणि मग जाग यायचं. पावसात भिजून आल्यावर आणि हिवाळ्याच्या थंडीत गरम चहा खूप चांगले वाटायचे. चहामुळे तरतरी येते, सर्व काही योग्य होते, असे मनाला वाटते.
दुधाची चहा आणि काळी चहा असे चहाचे प्रामुख्याने दोन प्रकार मोडतात. दुधाच्या चहात साखर, चहापत्ती आणि दूध एकत्रित गरम केल्या जाते तर काळी चहा म्हणजे डिकाशन चहा यात दूध नसते. पण ही चहा दुधाच्या चहापेक्षा चांगली असते. या डिकाशन चहात आद्रक, दालचिनी आणि तुळशीची पाने टाकल्यास ते खूप चांगले वाटतेे. लहान मुलांनी शक्यतो चहा पिणे टाळावे असे घरातील वडील मंडळी म्हणतात मात्र लहान मुलांना दुधापेक्षा चहा पिणे खूप आवडते. सकाळचा चहा आणि पेपर याचे अतूट नाते आहे. चहाविना पेपर वाचावे वाटत नाही आणि पेपरविना चहा प्यावे वाटत नाही. चहा आणि बिस्कीट याचे नाते देखील असेच आहे. काही मंडळी चहासोबत पाव म्हणजे ब्रेड किंवा खारी असे पदार्थ देखील खातात. जेव्हा खूप काम करून जरासा थकवा जाणवायला होते त्यावेळी चहा पिण्याची ईच्छा निर्माण होते. माणसाला स्वयंपाकातले कोणते पदार्थ तयार करता येवो किंवा न येवो चहा मात्र करता आले पाहिजे. नाही तर मित्रांमध्ये आपले हसे होते आणि मित्र म्हणतात, तुला, साधी चहा करता येत नाही. चहा करता आली तर त्याचे अनेक फायदे होतात. स्वयंपाक शिकण्याची पहिली पायरी म्हणजे चहा करता येणे.
चहाचा शोध कसा लागला असेल ? हे एक संशोधन करण्याची बाब आहे. एक व्यक्ती झाडाखाली पाणी उकळत ठेवला होता तेव्हा वरून झाडाचे एक पान त्या उकळत्या पानात पडले तेव्हा त्या पाण्याला त्या पानाचा वास आला. त्याने ते पिऊन बघितले तर त्याचा थकवा दूर झाल्याचे जाणवले. अश्याप्रकारे चहाची सुरुवात झाली. भारतातल्या लोकांना हे चहा वगैरे काही माहीत नव्हते. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. अगदी सुरुवातीला सकाळी सकाळी इंग्रज लोकं भारतीय लोकांच्या घरापुढे या पानांची पुडी अगदी मोफत टाकू लागले. भारतीयांना त्या पानांची चव कळाली आणि जरा गोडी लागली. मग तेच पाने फुकट ऐवजी काही पैसे देऊन घ्यावे लागू लागली. यापद्धतीने चहाचा प्रचार व प्रसार वाढला. आज चहा पत्तीचे अनेक कंपनी चहा विक्री करतात. पूर्वी चहा पत्ती म्हणजे सुपर डस्ट एवढंच माहीत होतं. पण आज चहाचे अनेक कंपन्यामार्फत विक्री होत असून मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील करण्यात येत आहे. यातून भरपूर पैसा देखील मिळत आहे. साध्या चहाच्या दुकानावरून अनेक लोकांची प्रगती झाली आहे. यात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. महाराष्ट्रात येवले अमृततुल्य चहा प्रत्येक जिल्ह्यात स्थान मिळविले आहे. कमी भांडवलावर चहाची विक्री कोठेही करता येणे अगदी सोपे आहे. रेल्वेत अनेक मंडळी सकाळी सकाळी चहा विकून आपल्या संसाराला चांगल्याप्रगती पथावर नेले आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारातील मुख्य ठिकाण, थिएटर, मार्केट, शाळा, विद्यालये, महाविद्यालयाच्या परिसरात चहाची विक्री करून आर्थिक स्थिती मजबूत करता येऊ शकते. म्हणूनच वर म्हटले आहे, साधी चहा करता येत नाही, तुला. ते जर जमलं तर आपण सुखी जीवन जगू शकतो. चहाच्या व्यवसायावर आज लाखो लोकं जगत आहेत, कोणी चहाची पत्ती विकून तर कोणी गरमागरम चहा विकून. काहीजण म्हणतात चहा शरीरासाठी घातक आहे पण लाखो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आपला एक कप चहा काही विघ्नसंतोषी ठरणार नाही. म्हणून जास्त विचार करू नका, चला एक कप चहा घेऊ या ....!

*कविता - " चहा "*

टपरीवरचा चहा

एकदा पिऊन पहा

त्यात असते प्रेम

नि थोडं जिव्हाळा

कुठेही मिळत नाही

असा गोड चहा

घोटभर पिताक्षणी

दूर होई कंटाळा

किंमत असते कमी

म्हणून टाळू नका

चव घेतल्याशिवाय

तुम्ही राहू नका

चार पैसे मिळती

संसार चाले त्याचा

एक कप चहा पिऊन

त्यास हातभार द्यायचा


- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद
9423625769


Wednesday, 19 May 2021

Good Man

चांगला माणूस

कधी कधी मनात हा प्रश्न पडतो की, चांगला माणूस कोणाला म्हणावं ? जो आई बाबाचं ऐकतो त्याला चांगला माणूस म्हणावं का जो बायकोचं ऐकतो त्याला म्हणावं ? मित्रांचे सल्ले ऐकून वागतो त्याला चांगलं म्हणावे की बहीण-भावाचे ऐकून वागतो त्याला म्हणावं ? सासू सासाऱ्यांचे ऐकणाऱ्याला चांगले म्हणावे की शेजाऱ्याचे ऐकून वागणाऱ्याला चांगले म्हणावे ? खूप खोलवर विचार केल्यास या प्रश्नांची उकल लवकर होत नाही तेंव्हा डोके गरगरायला लागते आणि डोके दुखू लागते. एखादा व्यक्ती आयुष्यभर जरी चांगला वागला नाही तरी अंत्यविधीच्या वेळी प्रत्येकजण चांगला माणूस होता असे म्हणतात, हे ही कोडे अजून सुटलेले नाही. सर्वांनी आपणांस चांगला माणूस म्हणावं म्हणून प्रत्येकाची आयुष्यभर धडपड चालू असते. आपल्या चांगुलपणाचा कोणी फायदा घेतला की मग तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही. समाजात असे ही पाहायला मिळते की, आपणांस कोणी चांगला म्हणो किंवा ना म्हणो आपण आपल्या मर्जीनुसार वागायचे. कोणाचे काही ऐकून घ्यायचे नाही. मात्र आपले म्हणणे प्रत्येकांनी ऐकलेच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. अश्या लोकांना समाजात वावरतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून चांगला माणूस होणे केंव्हाही चांगले. सर्वांचे ऐकून आपल्या मनाला आणि बुद्धीला पटेल त्याप्रमाणे वागणारे माणसेच या जगात यशस्वी आहेत. आपण मेल्यानंतर आपणांस सर्वजण चांगला माणूस होता असे म्हणावे असे वागू या. चला तर मग आपण ही चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करू या. त्यासाठी एकच करायचं आहे,

बोलणाऱ्या माणसाचे बोलणे पूर्ण ऐकून घ्या आणि त्यानंतर बोला.

🄽🄰🅂🄰