नागोराव सा. येवतीकर

Saturday, 27 March 2021

28/03/2021 H O L I

होळी रे होळी
होळी आली रे बघ होळी आली
विविध रंगाची झोळी घेऊन आली

मनातला राग काढून टाका
सांगत आला आहे लाल रंग
सकारात्मक विचार करून वाग
बोलतो आहे हिरवा हिरवा रंग
तुझ्या विचारात क्रांती करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

सर्वाना आपल्यात सामावून घे 
संदेश देत आहे बघ निळा रंग
इतरांच्या दुःखाचे निवारण कर
आदेशाने सांगतो आहे काळा रंग
तुझ्या वागण्यात बदल करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

न डगमगता संकटाला तोंड दे
प्रेरणा देत आहे तुला केसरी रंग
प्रगतीसाठी अविरत चालत राहा
प्रोत्साहित करतोय पिवळा रंग
तुला जागे करण्या करिता आली
होळी आली रे बघ होळी आली

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

28/03/2021

जुन्या चालीरितीचे आजच्या परिस्थितीमध्ये महत्व
लहान असतांना घरातले वाडवडील मंडळी काही गोष्टी आवर्जून करायला सांगायचे त्याचे महत्व आज कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून जी काळजी घेत आहोत, ती काळजी फार पूर्वीपासून आपल्या देशात घेतल्या जात होती याची प्रचिती येते. 
बाहेरून एखादा व्यक्ती मग ते घरातील सदस्य असो वा पाहुणे घरात येत असेल तर त्याला सर्वप्रथम हातपाय धुण्यास सांगितले जाते. ग्रामीण भागात आज ही हात पाय धुण्याची जागा ही घरात प्रवेश करण्यापूर्वीच असते. घरातल्या मुलानी बाहेर खेळून आले की, आई त्यांना हातपाय धुतल्याशिवाय घरात येऊ देत नाही. त्यामागे कारण हेच असू शकते की, बाहेरील कोणते जीवजंतू घरात प्रवेशित करू नये आणि त्याचा त्रास इतरांना होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जायची. 
घरात बाळंतपण झालेली असेल तर आई सर्वाना बजावून सांगत असे की, हातपाय धुतल्याशिवाय कोणीही बाळाजवळ येऊ नये. त्याचे ही कारण तसेच होते, लहानसे बाळ जीवजंतूला लवकर बळी पडतात, त्यांच्याकडे प्रतिकारशक्ती देखील खूप कमी असते. म्हणून प्रत्येक घरातली आई अशी काळजी घेत. 
कुणाच्या अंत्यविधीला जाऊन आले की, अंघोळ केल्याशिवाय घरात प्रवेश करणे त्याज्य होते. अंत्यविधी ह्या प्रक्रियामध्ये अनेक जीवजंतू आसपासच्या परिसरात वावरतात आणि अंत्यविधीमध्ये सहभागी झालेल्या सर्वाना त्याचा संपर्क होऊन घरात जीवजंतू येऊ नये म्हणून अंत्यविधी करून आल्यावर अंघोळ करण्याची प्रथा योग्य वाटते. 
त्यानंतर महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी पाच दिवस सर्वांपासून वेगळे राहणे यात देखील असेच काही कारण आहे असे वाटते. आज आपण ज्या पद्धतीने विलगिकरण पद्धत पाहत आहोत ते काही अंशी येथे लागू पडत असेल असे वाटते. संसर्ग आणि संपर्कातुन प्रसार पावणारे रोगांचे फैलाव रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहण्याशिवाय पर्याय नाही. 
जुने जाणते लोकं काही प्रथा किंवा चालीरिती पाळत असत, त्याचे शास्त्रीय कारण त्यांना कदाचित माहीत नसेल पण जीवजंतू, विषाणू, सूक्ष्मजीव घरात येऊ नये म्हणून ते फार पूर्वीपासून काळजी घेत आले आहेत. तेंव्हा आपणही साध्या साध्या बाबी काळजीपूर्वक करू या. कोरोनासारख्या विषाणूला हद्दपार करण्यासाठी नियमित हातपाय धुणे, परक्याशी संपर्क न करणे, घराबाहेर न पडणे, शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, मास्कचा वापर करणे इत्यादी बाबी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी पाळलेच पाहिजे.

- नासा येवतीकर

27/03/20021 CORONA

कोरोनाची आठवण 
लॉकडाऊन संचारबंदी जनता कर्फ्यु
गेल्यावर्षी हे शब्द कानावर नवे होते 
लोकांमध्ये होती ताणतणाव व भीती
त्याची आठवण ही आज नको वाटते

एका वर्षात संपून जाईल कोरोना
असे सामान्य लोकांना वाटत होते
कोरोनाने ज्यांना करोडपती केले
त्यांना हे संपूच नये असे वाटते होते

म्हणूनच पुन्हा त्याच तारखेला पहा
कोरोनाव्हायरसची दुसरी आली लाट
घरी राहा सुरक्षित राहा ह्याच संदेशाने
भारतीय लोकांची उगवत आहे पहाट

सर्दी पडसे डोकेदुखी आणि ताप
तसे पाहिलं तर सामान्यच आहे आजार
कोरोनाची लक्षणे देखील याच सारखी
म्हणून साध्या सर्दीनेही होतोय बेजार

कोरोनाची मुळात आठवण येऊच नये
म्हणून स्वतःला कामात गुंतवून घ्यावे
वेळच यावर रामबाण औषध आहे
संकटाची ही वेळ घरी बसून टळू द्यावे

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Thursday, 25 March 2021

जादूची पिशवी कथासंग्रह परीक्षण

मनोरंजनासोबत प्रबोधनही करणारे जादूची पिशवी कथासंग्रह
             ना. सा. येवतीकर यांचे हे दहावे ई पुस्तक आणि तिसरे ई कथासंग्रह! मित्रांनो, बदल हा नैसर्गिक जीवनाचा भाग आहे. सातत्याने होणारे बदल मानवाला अंगीकृत करावे लागतात. त्याप्रमाणे स्वतःला बदलून घ्यावे लागते. काही वर्षांपासून सुरु असलेली डिजिटल क्रांती आपण स्वीकारली आहे. जवळपास सर्व कारभार आपण ऑनलाइनच्या माध्यमातून करीत आहोत. साहित्य क्षेत्रातही या डिजिटल क्रांतीने हळूहळू पण ठामपणे पावलं रोवायला सुरवात केली आणि पाहता पाहता हजारो पुस्तके या ऑनलाईन स्वरुपात आपल्याला वाचायला मिळत आहेत. लेखकांनाही स्वतःची पुस्तके याच माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत पोहचविण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. अनेक लेखक या माध्यमाचा सराईतपणे वापर करीत आहेत. या लेखकांमध्ये एक ठळक नाव म्हणजे ना. सा. येवतीकर ! कविता, चारोळी, कथा, पत्र, चरित्र, नाटक आणि कादंबरी असे नानाविध साहित्य प्रकार ऑनलाईन प्रकाशित करणाऱ्या अनेक संस्था आहेत. या ऑनलाईन प्रकाशन व्यवस्थेचे एक प्रमुख लेखक म्हणजे नासा ! बहुतांश ऑनलाईन साहित्य संस्थांच्या वेबसाईटवर नासा यांचे साहित्य वाचायला मिळते. नासा यांची लेखणी केवळ वाचकांचे मनोरंजन करीत नाही तर मनोरंजनासोबत वाचकांचे प्रबोधनही करते. सामाजिक विषय हा त्यांच्या साहित्याचा आत्मा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्यांच्या लेखनीने प्रसवलेले विषय पाहिले तर आपणास याची प्रचिती येईल. बरे, नासा स्वतःचे लेखन प्रकाशित करण्यात धन्यता मानत नाहीत तर ते स्वतःसोबत अनेकांना आपापले साहित्य ऑनलाईन प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतात, व्यासपीठ उपलब्ध करुन देतात. नासा यांनी साहित्य सेवक या नावाचा एक व्हाट्सअप समूह चालविला आहे. या समूहाच्या माध्यमातून ते अनेकानेक साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी लेखकांना आणि वाचकांना देतात म्हणून जादूची पिशवी या कथासंग्रहाच्या प्रास्ताविकात ई साहित्य प्रतिष्ठानचे प्रकाशक सुनील सामंत यांनी म्हटले आहे, 'नासांच्या तळमळीने चालविलेल्या नवभारत निर्माणात आपण सामिल व्हा.'
       'दिसामाजी काहीतरी लिहित जावे...' हा संत रामदास स्वामी यांचे वचन गुरुमंत्र मानून नासा साहित्य क्षेत्रात दमदार, आश्वासक अशी वाटचाल करताना एक आगळवेगळे नेतृत्वही करीत आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्रात बहुतांश वेळा नासा यांचा लेख हमखास असतो आणि म्हणून ते सर्वदूर स्तंभलेखक म्हणून सुपरिचित आहेत.
    जादूची पिशवी या कथासंग्रहात एकूण अठरा कथांचा समावेश आहे. जादू केवळ बालकांनाच आवडते असे नाही तर जादू ही थोरांनाही भुरळ घालते, प्रेमात पाडते. म्हणून हा कथासंग्रह आबालवृद्धांना आवडेल असाच आहे. आपल्या समाजात लहान वयात मुलीचे लग्न हा मुलीसाठी शाप ठरणारा प्रकार पूर्वीपासून आजही सुरु आहे. बालविवाह कायदा करुनही या शापातून मुलींची विशेषतः ग्रामीण भागातील मुलींची सुटका झालीय का हा चर्चेचा नव्हे तर संशोधनाचा विषय आहे म्हणूनच नासा यांना कळी उमलण्याआधी...!' ही ह्रदयस्पर्शी कथा लिहावी लागली. ज्याच्याजवळ जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास आहे त्याला इच्छित ते सारे मिळू शकते. हातावर हात देऊन बसणारांना या समाजात यश मिळत नाही हा महत्त्वाचा संदेश देणारी कथा म्हणजे जिद्द! 
     लॉकडाऊन ! नाव उच्चारताच अंगावर काटे यावेत अशी स्थिती ! सारे काही बंद ! त्यामुळे 'हातावर पोट' असणारांचे अतोनात हाल झाले. अक्षरशः उपाशी पोटी झोपायची वेळ आलेली असताना काही देवमाणसं अशा कुटुंबाच्या मदतीला धावून आली आणि काही कुटुंबाची भूक त्यांनी काही दिवसांसाठी का होईना शमविली. या कथासंग्रहातील डोळे पाणवणारी कथा म्हणजे 
लॉकडाऊन ! या कथासंग्रहातील एक आगळीवेगळी कथा म्हणजे 'निरागस नामा' सर्वसाधारणपणे मुलगा व्हावा या आशेने पाच-सहा मुली झाल्या तरीही कुटुंब नियोजनाचा मार्ग न स्वीकारणारी अनेक कुटुंबं समाजात आहेत परंतु नासाच्या लेखनीला असे एक कुटुंब सापडते की, ज्या कुटुंबात मुलीची वाट पाहता पाहता सातवा मुलगा जन्म घेतो. कथा वाचनीय आहे. ऑनलाईन व्यवस्था चांगली की वाईट हा एखाद्या वादविवाद स्पर्धेचा विषय होऊ शकतो परंतु प्रत्येक व्यवस्थेला दोन बाजू असतात. त्यातील चांगली बाब घ्यायची की वाईट गोष्टीच्या मागे जायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. ऑनलाईन देवाणघेवाण या चांगल्या प्रक्रियेला फसवणूक हे ग्रहण लागले असल्याचे आपल्या लक्षात येत आहे. या फसवणुकीच्या मागे लालच, मोह हा दुर्गण नक्कीच आहे. अशाच आशयाची लालच बुरी बला है। कथा या संग्रहात असून ती ऑनलाईन व्यवहार करणारांना जागे करते.
     शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना, पालकांना प्रोत्साहन देतात अशाच एका शिक्षकाने एका विद्यार्थीनीला प्रोत्साहन दिल्यानंतर ती मुलगी कसा इतिहास घडवते आणि त्यामुळे त्या शिक्षकांना जीवन कसे कृतार्थ झाल्याची जाणीव होते हे कृतार्थ जीवन या कथेत वाचायला मिळते. संशय ही कथा अत्यंत उत्कृष्ट आहे. खेळासोबत अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे मुलांच्या मनावर बिंबवणारी कथा म्हणजे गोट्या !  व्यसन हे आपल्या समाजासाठी एक शाप ठरतेय. या शापामुळे कुटुंब कसे उद्ध्वस्त होते हे नासा यांनी चूक या कथेत तळमळीने सांगितले आहे. रेल्वे प्रवासात सुरज नावाचा चौथ्या वर्गात शिकणारा बालक रेल्वेत चोरी करणारास कसा पकडून देतो हा प्रसंग लेखकाने धाडसी सुरज या कथेत तन्मयतेने लिहिला आहे. भावा- बहिणीच्या प्रेमाचे अनेक कंगोरे उजागर करणारी, काळजाचा ठाव घेणारी कथा म्हणजे बहिणीची शपथ
         काही वर्षांपूर्वी मुलीचे शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा होता पण आता मुलीच्या शिक्षणाच्या आधी मुलीला जन्म द्या, मुलीचा गर्भ पाडू नका, तिला गर्भात मारु नका यासाठी जनजागृती करावी लागत आहे, कायदा करून असे दुष्कृत्य करणारांना शिक्षा द्यावी लागत आहे. हा दैवदुर्विलास ना. सा. येवतीकर यांनी लेक वाचवा, लेक शिकवा! या मनाला भिडणाऱ्या कथेत समर्थपणे लिहिला आहे. आपला देश विविध भाषांचा देश आहे. देशातील प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर भाषेच्या अडचणींचा सामना अनेकांना करावा लागतो. अशावेळी एकमेकांना भाषा समजत नसल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात. परंतु अशावेळी आपल्या राज्यातील, आपली भाषा बोलणारा एखादा इसम भेटला की, अनेक प्रश्न कसे चुटकीसरशी सुटतात याचे वर्णन लेखकाने भाषेचा प्रश्न! या कथेत अत्यंत मार्मिकपणे केले आहे. रेल्वे प्रवास हा आजकाल अत्यंत आवश्यक असाच आहे परंतु अशा युगातही रेल्वेचा प्रवास प्रथम करताना गणू नावाच्या पंधरा वर्षे वयाच्या मुलाचा गमतीदार अनुभव नासा यांनी रेल्वेतील पहिला प्रवास मोठ्या मनोरंजनात्मक रीतीने साकारला आहे.
        मेहंदी ही कथा एक अत्यंत ह्रदयद्रावक अशी कथा आहे. हातावरील मेहंदी वाळण्यापूर्वीच आणि मधुचंद्राच्या रात्री नवविवाहित प्रणिताला कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागते हे वाचताना डोळे पाझरल्याशिवाय राहत नाहीत. कोणताही कथासंग्रह एक शीर्षकथा घेऊन येतो. ही कथा त्या कथासंग्रहाचा आत्मा असतो त्यामुळे वाचक अशी शीर्षक कथा वाचण्यासाठी उत्सुक असतो. ना. सा. येवतीकर लिखित जादूची कथा वाचण्याचीही एक उत्कंठता होती. आत्महत्त्या करणाऱ्या एका युवकाला एक परी जादूची पिशवी देते आणि त्याला आत्महत्त्या करण्यापासून परावृत्त करते. काय असते त्या पिशवीत ? ती पिशवी त्या युवकाला काय काय मिळवून देते ही अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली कथा वाचकांना भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही.
       आपण लोकशाही मार्गाने चालणारे नागरिक ! या देशात एकेक मताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक मताची किंमत ही या संग्रहातील एक वाचनीय कथा ! एक मताने सरकार पडल्याची घटना आपण विसरलेलो नाहीत याच आशयाची ही कथा वाचताना वाचक अंतर्मुख होतो. कुस्ती ही या कथासंग्रहातील शेवटची कथा ! कुस्ती या खेळात शारीरिक शक्तीचा तर कस लागतोच पण बुद्धीचातुर्य, चपळता, लवचिकता याचीही परीक्षा होते. कधीकधी कुस्ती हा खेळ जीवावरही बेततो. असा विषय घेऊन आलेली कथा काळजाला भिडते.
           जादूची पिशवी हा कथासंग्रह वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन वाचकाला भेटीसाठी आला आहे. साध्या, सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्दात, ओघवत्या भाषेत सर्व कथा असल्याने त्या कथा वाचकाला आकर्षित करतात आणि एका बैठकीत वाचून काढायला प्रवृत्त करतात. सदरील ई बुक ई साहित्य डॉट ईन च्या संकतेस्थळावर ऑनलाइन मोफत उपलब्ध आहे. तसेच लेखकांच्या 9423625769 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप्प द्वारे देखील हे ई बुक प्राप्त करून घेता येईल. 
लेखक नासा येवतीकर यांना आगामी लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा! एक इच्छा मात्र जरुर आहे, ती म्हणजे लेखकाचा अभ्यास, आवाका पाहता, त्यांची शैली पाहता कादंबरी या विषयाकडे लेखकाने गांभीर्याने वळावे. अभिनंदन! शुभेच्छा!!
                                                              नागेश सू. शेवाळकर, पुणे                          ९४२३१३९०७१

Tuesday, 23 March 2021

रघुपती राघव राजाराम

"श्रीरामनवमी विशेष"
               "रघुपती राघव राजाराम"
भगवान श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे व जनतेचे अधिष्ठान आहेत. पुन्हा पुन्हा ऐकू येणारी श्रीराम जय राम जय जय रामचा उदघोष याची साक्ष आहे. भारतातील ग्रामीण भागात आजही दोन व्यक्ती समोरासमोर आले की परस्परांना दोन्ही हात जोडून राम राम म्हणतात. यातून एक अर्थ असाही निघतो की, प्रत्येक व्यक्तीत राम वसलेला आहे. कोणत्याही सुव्यवस्थित व संपन्न राज्यव्यवस्थेसाठी रामराज्य हा शब्द पर्याय म्हणून वापरला जातो. कारण त्यांचे राज्यच होते तसे आदर्श. एखाद्या व्याधी समस्येवर किंवा संकटावर शेवटचा उपचार म्हणजे रामबाण उपाय होय. कारण त्यांचा प्रत्येक कर्म हा जीवनातील प्रत्येक समस्येवर शेवटचा उपाय आहे. भगवान श्रीरामाचे प्रेमशासन भारतीयांच्या हृदयावर आजतागायत चालू आहे. 
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी बारा वाजता रखरखत्या उन्हात झाला. जेंव्हा जग आणि जीव आधि व्याधि आणि उपाधी यात तप्त होत होते तेव्हा जगाला सुख शांती देण्यासाठी प्रेम, पावित्र्य व  प्रसन्नतेचा हा पुंजजन्म घेतला. त्यांचा जन्माने संपूर्ण जगाला जीवन जगण्याचा आदर्श मार्ग लाभलेला आहे. श्रीरामाच्या संपूर्ण चरित्राचा अभ्यास करून एकेक गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास रामो भुत्वा राम यजेत. अर्थात राम होऊन रामाची पूजा करणे असा उजाडेल यात शंका नाही. कौटुंबिक सामाजिक नैतिक तसेच राजकीय या सर्वच क्षेत्रात वावरताना आपली मर्यादा कोणती हे कळण्यासाठी भगवान श्रीराम चरित्रांचा अभ्यास करावा. श्रीरामांनी आपल्या विचारात, विकासात किंवा व्यवहारात सर्वच कार्यात कधीही मर्यादा ओलांडली नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते. आजच्या श्रीरामनवमीच्या दिवशी त्यांच्या गुणांचा परामर्श घेऊन त्याचा स्वीकार केल्यास खऱ्या अर्थाने नवमी साजरी केल्यासारखे होईल.
भगवान श्रीरामांनी आपल्या समोर एक कौटुंबिक आदर्श ठेवले आहे. रामाला दुसरे तीन बांध होते. परंतु त्यांच्यात कधीही कलह किंवा वाद झाला असे आपण कधी ऐकलेले नाही. त्यागात पुढे व भोगात मागे असा त्यांचा जीवन मंत्र होता. येथे नेहमी दुसर्‍यांचा विचार करण्यात येतो, त्यागाची तयारी ठेवण्यात येते, तेथे क्लेश, भांडण, झगडा, कलह, वाद  हे सर्व शेकडो कोस दूर रहातात. आज आपणाला या विचारांची नितांत आवश्यकता आहे. पिता राजा दशरथाने वनात जाण्याची आज्ञा दिल्यावर ते थोडेदेखील दुःखी झाले नाही वडिलांची आज्ञा पाळणे हे मुलांचे परमकर्तव्य आहे त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सोसणारा पुत्रच आदर्श बनवू शकतो.
वृद्ध माता पित्याला सहारा देण्यात यावे  असा कायदा सरकारला तयार करावा लागतो. आपली फार मोठी नामुष्की आहे. जिच्या वचनामुळे श्रीराम यांना वनवास भोगावा त्या कैकयी मातेवर त्यांनी कधीच राग धरला नाही. आईला समजून घेणारे पुत्र बनणे म्हणजेच तिने आपणाला जन्म देताना घेतलेल्या त्रासाची परत केलेली पावती नव्हे काय ? श्रीरामाचे तीन ही आईवर सारखेच प्रेम होते. रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवून आणल्यानंतर अयोध्या नगरीतील लोकांची कुजबुज लक्षात घेऊन श्रीरामाने आपली पत्नी सीतेचा त्याग करावा लागला. यामागे राज्यातील लोकांचा विश्वास संपादन करणे हे राजाचे पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे श्रीरामाने सीतेचा त्याग केला. त्यांच्या हृदयात फक्त एकच स्त्रीसाठी जागा होती ती म्हणजे सीता. एकपत्नी निष्ठ पती राहणे म्हणजेच त्याला सितापती म्हटले जाते. आज भारतात जो अनैतिक किंवा अत्याचार बोकाळला आहे त्यावर सितापती हा पर्याय सर्वोत्तम आहे. 
ऋषी विश्वामित्र हे श्रीरामाचे गुरू होते. विश्वामित्रांचे श्रीरामावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा जास्त श्रीरामाचे विश्वामित्रावर होते. आश्रमात एक हृदय दुसऱ्या हृदयाशी बोलत होते. विश्वामित्रांनी श्रीरामांना धनुर्विद्येसोबत जीवन जगण्याचा आदर्श मार्ग सुद्धा नकळत शिकविले. श्रीरामाच्या गुरुभक्तीमुळे व गुरुवर असलेल्या अपार श्रद्धेमुळे त्यांना ऋषींनी जगातील सर्व ज्ञान दिले. गुरुविना जीवन नाही आणि गुरुवर श्रद्धा असल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. याची जाणीव त्यांच्या चरित्राच्या अभ्यासावरून होते. कष्किंध्येच्या असुरी व जुलमी वाली वानराला मारून श्रीरामाने सुग्रीवाचे मन जिंकले आणि सुग्रीवाने लंकेतील सीतेला सोडविण्यात श्रीरामाला सर्वतोपरी मदत करून क
मैत्री कायम केली. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे त्यांचे कार्य होते. संकटात मदत केलेला मित्रच खरा मित्र म्हणून ओळखला जातो. रावण हा रामाचा शत्रू होता. त्यांच्या निधनानंतर बिभीषण अग्निसंस्कार करण्यास नकार देतो त्यावेळी स्वतः श्रीराम हे काम करण्यास पुढे येतात यातून त्यांचे शत्रूवर असलेले प्रेम ही कळते. कष्किंध व लंका राज्य जिंकून त्यांनी आपले साम्राज्य वाढविले नाही. याउलट ते दान करून तेथील लोकांचे मन जिंकले. दुसऱ्याची वस्तू घेण्याने त्याच्यात प्रेम तर राहणारच नाही उलट वितुष्ट निर्माण होते. भगवान श्रीरामाच्या अंगी असलेल्या मातृप्रेम, पितृप्रेम, बंधुप्रेम, शत्रूप्रेन, मित्रप्रेम, पत्नीप्रेम, राज्यप्रेम, जनप्रेम, आणि गुरूप्रेम या नऊ गुणांचा जीवन जगतांना आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास पृथ्वीतलावर असलेले दुःख, क्लेश, तणाव नक्की नाहीशे होतील. राष्ट्रपिता महात्मा गांधी सुद्धा जनतेला रामाच्या जीवनाचे पालन करण्यास सांगितले होते. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम ह्या त्यांच्या धूनमुळे संपूर्ण वातावरण मंगलमय होऊन जाते.

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद, 9423625769

23/03/2021 शहीद

।। शहिदांचे आठवण ।।  
देशाच्या स्वातंत्र्यासाठी 
प्राणाची आहुती दिली 
भगतसिंग सुखदेव राजगुरूना 
लाहोर तुरुंगात फाशी दिली 

मृत्यूला सामोरे जाताना 
कोणी ही डगमगले नाही 
उलट स्वातंत्र्याचा दिला संदेश 
मृत्यू वाया जाणार नाही 

भारतावर त्यांचे थोर उपकार 
नाव घेताना येते स्फूर्ती 
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या 
कार्याने पसरली जगभर कीर्ती 

शहिदांची आज आहे स्मृतिदिन 
कार्यांची आठवण करू या 
ज्यांच्यामुळे मिळाले स्वातंत्र्य 
त्यांच्या कार्याला नमन करू या 

 - नासा येवतीकर, येवती ता. धर्माबाद जि. नांदेड 9423625769

Monday, 22 March 2021

23/03/2021 जलसाक्षरता

*💧 जलसाक्षरता : काळाची गरज💧*
मानवी जीवनच नव्हे तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवन जगण्यासाठी ज्याप्रकारे अन्न आणि हवा याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे पाण्याचीही गरज असते. पाणी कसे तयार होते ?
 याविषयीच्या जलचक्रची माहिती आपणा सर्वांना ज्ञात आहेच. वास्तविक पाहता प्रयोगशाळेतून पाणी म्हणजे H2O हायड्रोजन डाय-ऑक्साइड तयार करणे फार खर्चिक आणि जिकरीचे काम आहे. त्याद्वारे तयार करण्यात आलेले पाणी आपण वापरू ही शकत नाही, त्यास्तव आपण त्या भानगडीत सुद्धा पडत नाही. कारण पृथ्वीवर जमीन कमी म्हणजे 29% तर पाण्याचा भाग जास्त म्हणजे 71% हे आहे. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे पृथ्वीला निलग्रह असेसुद्धा म्हटले जाते. त्यामुळे आपल्याकडे निसर्गतःच पाणी भरपूर आहे अशी समाजाची धारणा होती. त्याचा परिणाम असा झाला की, उपलब्ध पाणीसाठा किती आहे व ते किती महत्त्वाचे आहे याचा विचार करणे माणसाने सोडून दिले.

 पाण्यापासून पैसा तयार करण्याच्या मानवाच्या अति स्वार्थी स्वभावामुळे, स्वतःच्या स्वार्थासाठी व विकासासाठी पाण्याचा पुरेपूर किंवा त्यापेक्षा जास्त वापर करून आज पाणीटंचाई सारख्या भीषण समस्येच्या गर्तेत अडकून पडला आहे. 
आदिमानव किंवा आपले पूर्वज पाण्याचे महत्व ओळखून होते. म्हणूनच त्यांच्या वस्त्या ह्या नदीच्या काठावर किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच ठिकाणी आढळून आल्या आहेत. पाण्याचा वापर करून शेती करता येते याची जाणीव सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. पाण्यामुळे अन्न मिळू लागले याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाल्यावर त्यांनी पाण्याला पंचमहाभूतात समाविष्ट केले. पाणी पावसाच्या रूपाने जमिनीवर येतो हे समजल्यावर पाऊस व त्या पावसाची निर्मिती करणारा समुद्र यांना त्यांनी देवत्व बहाल केले. संगणक युगातील पिढी या लोकांना अशा वागण्यामुळे मूर्खात काढतील कदाचित परंतु त्यांच्या मनात भीती होती आपण निसर्गाचे नियम तोडले तर तो कदाचित आपणाला शिक्षा देऊ शकतो. भीतीपोटी तो निसर्गाने तयार केलेले नियम तोडत नव्हता आणि पर्यावरण संतुलित राहून त्याचा समतोल कधी बिघडत नव्हता. परंतु आज आपण सजग, जागरूक, सज्ञान झालो आहोत म्हणून वरील गोष्टी काही मानत नाही. मात्र आपण जलसाक्षर झालो नाही. लिहिता वाचता यावे म्हणून साक्षर झालो खरे परंतु पाण्याची चणचण तुटवडा यावर मात करण्यासाठी जलसाक्षरता निर्माण होणे ही काळाची गरज आहे.

एका वर्षातून पावसाचे चार महिने ठरलेले असतात. त्या पर्जन्याच्या काळात योग्य प्रमाणात पाऊस झाला तर त्यावर्षी कोणत्याच बाबींची चणचण भासत नाही. मात्र तसे होत नाही. पावसाची वेळ, त्याचा वेग आणि त्याचे प्रमाण याबद्दल काही अंदाज व्यक्त करणे फारच कठीण आहे. हवामान तज्ज्ञ दरवर्षी पावसाचा आपला अंदाज व्यक्त करतात. मात्र त्या प्रमाणात पाऊस पडतोच असे नाही.

 त्याच्याबाबतीत वाट पाहणे एवढेच आपल्या हातात आहे. कधीकधी वर्षभराचा पाऊस एका महिन्यात तर कधीकधी एका महिन्याचा पाऊस एका दिवसात पडतो. पाऊस जास्त पडला तर अतिवृष्टी आणि कमी पडला तर अनावृष्टी यासारखी नैसर्गिक संकट ओढावू शकतात. पावसाचे पडलेले पाणी वाहून जाणे आणि पाण्याचा वाटेल तसा वापर करणे यामुळे पाण्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. म्हणूनच निसर्गतः आपणास प्राप्त झालेले पाण्याचे स्तोत्र जपून वापरणे, पावसाचे पडलेले पाणी साठवून ठेवणे, दैनंदिन जीवनात पाण्याचा योग्य व जपून वापर करणे या गोष्टीबाबत सजगता निर्माण करण्यासाठी जलसाक्षरतेची अत्यंत आवश्यकता आहे.
जलसाक्षरता म्हणजे फार मोठे काम नाही. परंतु लहान-सहान गोष्टीकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाणी कसे वाचविता येईल किंवा बचत करता येईल ? याचा विचार करणे म्हणजे जलसाक्षरता म्हणता येईल. घरात असलेले नळ तर आपण वेळोवेळी तपासणी करतो परंतु नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीमार्फत जे पाणी आपण नळाद्वारे घेतो त्याची वेळोवेळी तपासणी करावी. बहुतांशी ठिकाणी हे नळ उघडेच राहतात. त्याला चालू बंद करायची तोटी नसते त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या गावाला जातो त्यावेळी या नळाद्वारे भरपूर पाणी वाया जाते. ते पाणी तोटी लावून वाचविता येऊ शकते याचा प्रत्येकाने जरूर विचार करावा. सार्वजनिक ठिकाणी असलेले नळ चालू असेल तर लगेच ते बंद करण्याची काळजी आपण घ्यावी. दररोज सकाळी दात घासताना, दाढी करताना, हात-पाय धुते वेळेस नळ चालू करून भरपूर पाणी वापरण्याची प्रथा आपण बंद करावी व कमीत कमी पाण्यात उपरोक्त क्रिया करावी. यामुळे पाण्याची बचत होईल. मोटार चालू करून वाहने धुण्याची बऱ्याच लोकांची सवय असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्याऐवजी बकेटभर पाणी घेऊन स्पंजद्वारे गाडी पुसल्यास पाणी कमी लागेल आणि गाडी साफ ही होईल. पाण्याची टाकी पूर्ण भरल्यानंतर ओवरलोड साठी एक पाइप बाहेर काढल्या जाते. त्याद्वारे जास्त पाणी बाहेर येणार नाही याची काळजी नेहमी घेणे गरजेचे आहे. बहुतांश वेळा आपण पाण्याची टाकी भरण्यासाठी मोटार चालू करतो आणि टाकी भरून पाणी उलटून जाते तरी आपले लक्ष राहत नाही. त्यामुळे बरेच पाणी वाया जाऊ शकते. या सर्व बाबीसाठी घरातील महिलांना सजग करणे गरजेचे आहे. पाण्याची अत्यंत आवश्यकता त्यांनाच असते व त्याची काळजी सुद्धा सर्वात जास्त त्यांनीच घेणे आवश्यक आहे.
घरात पाहुणे मंडळी आली असता त्यांना ग्लास भरून पाणी न देता अर्धा ग्लास भरलेले पाणी द्यावे. ज्यामुळे त्यांना आवश्यक असल्यास पाहुणे अजून पाणी मागतील किंवा कमी पाणी दिल्यास तेवढे संपवतील. परंतु आपण या छोट्या बाबीचा विचार ही सहसा करत नाही. पाहुणे मंडळी सुद्धा आपली तहान लक्षात घेऊन विचार करावा अन्यथा " नको " म्हटलेले केव्हाही चांगले. त्यामुळे पाण्याची नक्कीच बचत होईल. आपल्या घरात पिण्यासाठी किती पाणी लागते याचा अंदाज घेऊन भाडे भरून घ्यावे. पाणी कधीही शिळे होत नसते याची जाणीव सर्वप्रथम महिलांनी करून घेऊन पाण्याची भांडी रोज ओतून देऊ नये. भाजी किंवा फळे धुण्यासाठी वापरलेले पाणी परसबागेतील किंवा कुंडीतील झाडाना टाकणे आवश्यक आहे. घरातील सांडपाणी सुद्धा बागेसाठी वापरावे यामुळे बागेला स्वतंत्रपणे पाणी देण्याची आवश्यकता रहात नाही. झाडांना किंवा शेतात पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा. ज्यामुळे कमी पाण्यावर उत्तम शेती होईलच शिवाय त्या पिकांना मुळापर्यंत पाणी जाऊन त्याची योग्य वाढ होईल. याउपर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाचे पडणारे पाणी साठवणे व त्याचा वापर करणे. आपण या पावसाच्या पाण्याचा शेती वगळता त्याचा काहीही उपयोग करून घेत नाही. दरवर्षी पावसाचे पडणारे कितीतरी पाणी वाहून जाते. त्याची साठवणूक कशी व कोठे करावे आणि त्याचा वापर नंतर कसा करावा याचे ज्ञान नसल्यामुळे आपणास ते पाणी साठविता येत नाही. राज्यातील राळेगणसिद्धी येथे मा. अण्णा हजारे यांनी पावसाचे पाणी वापरून त्या गावाला कसे नंदनवन केले हे प्रत्यक्षात या गावाला भेट दिल्याशिवाय कळणार नाही.
 व्यक्ती अनुभवातून बरेच काही शिकतो त्यासाठी हिवरेबाजारचे आदर्श सरपंच श्री पोपटराव पवार यांना भेटून ही माहिती मिळवू शकतो. रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टिमद्वारे आपण पावसाचे पाणी जमिनीत मुरवू शकतो किंवा भांड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा करून त्याचा वापर करू शकतो. अशाप्रकारे फार लहान लहान घटनांमधून पाणी वाचविता येऊ शकते. थेंबे थेंबे तळे साचे म्हणीप्रमाणे एखादी क्रिया करताना ती लहान वाटते परंतु काही काळानंतर मोठ्या स्वरूपात दिसून येते. त्याच तो प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून उद्यासाठी पाणी।हवे असेल तर आज आणि आजच ते पाणी वाचवावे लागेल हे घोषवाक्य नेहमी लक्षात ठेवावे. संत रामदास महाराजांनी म्हटल्याप्रमाणे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीनुसार आपण सर्वांनी पाण्यासाठी हे काम केले पाहिजे. सध्या राज्यात पाणीदार गावासाठी वॉटरकप स्पर्धा चालू आहे. राजीव तिडके नावाच्या एका शिक्षकाने यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केलाय हे खरोखरच अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे. अश्या कार्यासाठी प्रत्येकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन कार्य करणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेमधून देखील पाण्याचे बचत आणि वापर करता येऊ शकतो. या योजनेमुळे अनेक गावे टँकरमुक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. आत्ता खरी गरज आहे हे होऊ शकते असे  प्रत्येकाच्या इच्छा शक्तीची. 

*! जागतिक जल दिनाच्या शुभेच्छा !*
__ ना.सा.येवतीकर__

💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧

22/03/2021 पाणी

पाणी 
पाणी म्हणजे जल किंवा नीर असे ही म्हटले जाते. सजीवांना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. त्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहूच शकत नाही. पशु-पक्षी, वेली, वनस्पती, झाडे, आणि मानवाना पदोपदी पाण्याची गरज भासते. अश्मयुगीन काळातील लोकं पाण्याचे ठिकाण पाहून आपली वस्ती तयार करत होते. कारण त्याशिवाय त्यांचे जगणे अशक्य होते. आज ही आपली तीच परिस्थिती आहे. शहरात किंवा खेड्यात कोठेही घर बांधण्यापूर्वी पाण्याची व्यवस्था कशी आहे ? याबाबी लक्षात घेतले जाते. त्यानंतरच घर बांधणीचा विचार केला जातो. एखाद्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही म्हटल्यावर तेथे सहसा कोणी घर बांधकाम करत नाहीत, त्या भागातील जमिनीचे दर देखील खूप कमी असतात. वाढती लोकसंख्या आणि वाढते घरं यामुळे प्रत्येकजण पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जमिनीला चारशे ते पाचशे फूट खाली पर्यंत छिद्र करत आहेत. त्यामुळे जमिनीचे अक्षरशः चाळणी झाल्यासारखी अवस्था झाली आहे. पूर्वीच्या काळी पन्नास फूट खोलीवर असणारे पाणी आज दहापट खाली उतरले आहे. काहीजणांना पाणीच लागत नाही तेव्हा ते अजून एक दोन छिद्र करून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे पृथ्वीवरील जमिनीचे संतुलन बिघडत चालले आहे. गावात आणि शहरात नळ योजना असताना देखील लोकं खाजगीमध्ये बोअरवेल करतात. यावर मर्यादा आणणे गरजेचे आहे. सध्या तर पाणी हा एक मोठा व्यवसाय झाला आहे. दहा वर्षांपूर्वी जर कोणी म्हटलं असतं की, पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यात पैसे मोजावे लागतील तर त्याच्यावर आपण मोठ्याने हसलो असतो आणि त्याला मूर्खात काढलं असतं. पण आज परिस्थिती तीच आहे. फिल्टर पाणी पिण्यासाठी योग्य असते म्हणून गेल्या चार पाच वर्षात आपण साधे पाणी पिणेच बंद करून टाकले आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी जे की फुकट मिळत होते त्यास आज आपण मासिक सरासरी तीनशे रु. खर्च करत आहोत तर वार्षिक तीन हजार सहाशे रु खर्च करत आहोत. एका कुटुंबाचा वार्षिक खर्चावरून जर गाव आणि शहरातील लोकांची एकत्रित खर्च काढला तर लक्षात येईल की आपण पिण्याच्या पाण्यासाठी किती खर्च करत आहोत. परंतु ही सेवा स्थानिक प्रशासनाने दिल्यास योग्य राहील असे वाटते. पाण्याच्या दुनियेत जे काही संघर्ष चालू आहे ते थांबेल. कुणीतरी सांगून ठेवलं आहे की यापुढील तिसरे महायुद्ध हे पाण्यावरून होणार आहे. असेच जर चालू राहिले तर भविष्यात नक्कीच होऊ शकते, यात काही नवल नाही.
भारतात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते त्यामुळे त्याचा अपव्यय देखील मोठ्या प्रमाणावर होते. पावसाळ्यात पाण्याची दिवाळी आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी शिमगा असतो. ग्रामीण भागात आजही अनेक खेडी असे आहेत की ज्यांना कोस दोन कोसवरून डोक्यावर पाणी वाहून आणावे लागते. अश्या लोकांना या पाण्याचे महत्व कळते. घरात बसून बटन मारले की हजार लिटरची टाकी भरून घेणाऱ्यांना या पाण्याचे महत्व कधीच कळणार नाही. आज जागतिक जलदिन आहे. तसेच उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे. त्यानिमित्ताने पशु-पक्षी यांना पिण्यासाठी पाण्याची जमेल तशी व्यवस्था करू या, एखादा वाटसरूला तहान लागली असेल आणि आपल्याजवळ महागडे पाण्याचे बॉटल असेल म्हणून दुर्लक्ष न करता त्याला पाणी पाजवा, दारावर येणाऱ्या कामकरी कष्टकरी माणसांना पिण्यासाठी पाणी द्यावे. एखादेवेळी जेवण नाही दिलं तरी चालेल पण तहानलेल्या लोकांना नक्की पाणी द्या, हीच यानिमित्ताने आपणा सर्वांना विनंती. 

- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

Sunday, 21 March 2021

22/03/2021

आनंदाचा दिन
एक गोड बातमी कानावर आली
तसा तो आनंदाने नाचू लागला
मी बाप झालो ... मी बाप झालो
साऱ्या गावाने तो ओरडु लागला

लग्नाच्या दहा एक वर्षानंतर पहा
त्याच्या घरी आज पाळणा हलला
कुटुंबातल्या साऱ्यांना हायसे वाटले
पुत्रप्राप्तीने अवघा आनंद एक झाला

नुपत्रिक म्हणून जिथे तिथे हिणवत होते
टोमणे मारत होते सारे त्याला नि तिला
चार चौघात मिसळायला कंटाळले होते
लाजत ही होते कुणासोबत बोलायला

बाळाच्या येण्याने त्यांचे सारे प्रश्न सुटले
तो बाप ती आई झाली खुश झाला मामला
पूर्वी त्यांचे जीवन शुष्क वाळवंट झाले होते
बऱ्याच तपश्चर्येने आनंदाचा दिन उजाडला

- नासा येवतीकर, येवती, ता. धर्माबाद जि. नांदेड 9423625769

22/03/2021 जलदिन

जागतिक जलदिन - 22मार्च
पाणी 

पाणी नाही म्हणूनी
फिरतोस रानोरानी
पाणी असता घरी 
त्याची बचत न करी

बचत ही आजची
जीवन आहे उद्याची
आपण हे जाणावे
पाण्याचे अपव्यय टाळावे

पावसाचे पाणी असो 
वा असो पाणी नद्याचे 
वाहते पाणी अडवून
जीवन जगू समृद्धिचे

जागोजागी आपण
अनेक शोषखड्डे करूया
वाहत असणारे पाणी
या खड्यात मुरवू या

वाढेल पाण्याची पातळी
मिळेल पाणी पिण्यासाठी
दाहीदिशांची भटकंती
थांबेल तुझ्याचसाठी

- नासा येवतीकर