नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 4 September 2019

शिक्षक आणि उपक्रम

शिक्षक आणि उपक्रम

देशाला आणि समाजाला दिशा देण्याचे मुख्य काम शिक्षक करत असतो. शिक्षक जेवढा उत्साही आणि उपक्रमशील असेल तेवढे त्याचे विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत असतात. पाठ्यपुस्तक हे एक साधन आहे, मुलांना शिकविण्याचे. वार्षिक आणि मासिक नियोजनानुसार जे शिक्षक फक्त धडेचे धडे पूर्ण करून विहित वेळेत अभ्यासक्रमपूर्ण करतात त्याच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात हुशार असतील कदाचित मात्र सर्वगुणसंपन्न राहणार नाहीत. विद्यार्थ्यांना कोणते शिक्षक आवडतात ? या प्रश्नांवर जरासा विचार केला तर लक्षात येईल की, जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन शिकवितात तेच शिक्षक विद्यार्थ्यांना खूप आवडतात. विद्यार्थ्यांना नेहमी आनंदी ठेवणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनतात. पण बहुतांश ठिकाणी असे पाहायला मिळते की, शिक्षक विद्यार्थ्यांवर चिडचिड करतात, रागावतात आणि प्रसंगी शिक्षा देखील करतात. अश्या शिक्षकांची विद्यार्थ्यांना खूप भीती वाटते आणि विद्यार्थी शिक्षकांच्या जवळ जाण्यासाठी घाबरतो. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी भीती किंवा राग असेल तर विद्यार्थ्याची प्रगती म्हणावी तशी होत नाही. तेच जर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या मनात शाळा आणि शिक्षण याविषयी लळा निर्माण होते. अर्थातच त्यांची शाळेतील उपस्थितीदेखील वाढते आणि शिक्षणाच्या प्रवाहातून शाळाबाह्य होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी होण्यास मदत मिळते. माजी शिक्षण संचालक आणि शिक्षणतज्ञ मा. वि. वि. चिपळूणकर हे शिक्षकांनी उपक्रम करत राहावे असे म्हणत. शिक्षकांचा आणि समाजाचा खूप जुना संबंध आहे. पूर्वीच्या काळी गावात शिकलेला एकच व्यक्ती राहत असे आणि तो म्हणजे शाळा मास्तर. शिक्षकांच्या शब्दाला त्या काळीमान होता तसा मान आज मिळत नाही तरी देखील चांगल्या शिक्षकांची समाजात आजही वाहवा होतांना दिसून येते. शिक्षकांच्या वर्तनावर त्याचे शालेय आणि समाजातील स्थान निर्माण होते. म्हणून शिक्षकाने शाळेत आणि समाजात चांगले स्थान निर्माण करण्यासाठी चांगले वर्तन करणे आवश्यक आहे. शाळेतील लहान लहान मुले आपल्या प्रत्येक बाबीचे सूक्ष्म निरीक्षण करतात. शिक्षकांचे प्रत्येक वर्तन मुलांसाठी एक दिशा देत असते. आज शिक्षक दिन आहे म्हणजे शिक्षकांचा गौरव आणि सन्मान करण्याचा दिवस. काही उत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रपतीच्या हस्ते दिल्लीला, राज्यपालांच्या हस्ते मुंबईला तर जिल्हा स्तरावर देखील पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. ज्यांना पुरस्कार मिळाले तेच आदर्श शिक्षक असून बाकीचे काही कामाचे नाहीत, असे नाही. सर्वच शिक्षक आदर्श आहेत, जे मुलांसाठी नेहमी धडपड करतात, मुलांना नवनवीन गोष्टी शिकवितात, मुलांना नेहमी आनंदी आणि उत्साही ठेवतात. सक्षम देशाच्या उभारणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे, हे प्रत्येक शिक्षकांनी लक्षात घेऊन उद्याचा सक्षम नागरिक करण्याकडे लक्ष द्यावे. 

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

शिक्षक दिन कविता

शिक्षक दिन

मुलांना देउनी आत्मज्ञान
जागरूक त्यांना बनवी
शिक्षणाने होतो विकास
गुरुजीं सदा हेच शिकवी

जगण्याची रीत कळते
शत्रू असो की दानव 
गुरुच्या संपर्कात येऊन 
बनतात सर्व मानव

गुरु शेवटी गुरु असतो
त्याला जगत नाही तोड
त्यांचे बोलणे ऐकलो नाही
जीवनाला मिळते वेगळे मोड

प्रत्येकाला असतो गुरु
त्याविना मिळत नाही यश
आपल्या अज्ञानामुळे
कोणी ही करतो वश

म्हणून गुरुला देव मानूनी
सदा त्यांची सेवा करू
शिक्षकदिनाच्या निमित्ताने
सदविचाराची कास धरु

 नासा येवतीकर
9423625769


तोच खरा शिक्षक

मुलांच्या हृदयात जाऊन
त्यांच्या संवेदना जाणून
घेऊन जो शिकवितो
तोच खरा शिक्षक

मुलांच्या मनात काय आहे
आपणास करायचे काय आहे
हे ज्याला कळते 
तोच खरा शिक्षक

मुलांची आवड निवड
त्याला मिळणारी सवड
ओळखून जो शिकवितो
तोच खरा शिक्षक

पुस्तकाच्या मागे न लागता
अनुभवाचे बोल ऐकविता
मुलांचे विश्व जो घडवितो
तोच खरा शिक्षक

शिकून मोठे झाले
शहाणे सवरते बनले
रस्त्यात ज्यांना आदराने 
नमस्कार केला जातो
तोच खरा शिक्षक

- नासा येवतीकर, धर्माबाद
94236257698


शिक्षकाभिमान

शिक्षकांचा सदा मला अभिमान आहे
शिक्षकांविषयी मला स्वाभिमान आहे

माणूस घडविण्याचे काम करतो
त्यामुळे समाजात मला सन्मान आहे

माझी वागणूक एक आदर्श ठरते
म्हणून चार लोकांत मला मान आहे

काय करावे अन काय करू नये
पदोपदी याचे मला अवधान आहे

नव्या तंत्रज्ञानांविषयी मुलांना
सजग करण्याचे मला ज्ञान आहे

प्रगतीपथावर नेणारा सुजाण असा 
नागरिक घडविण्याचे मला भान आहे

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जि. प.प्रा. शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

Sunday, 1 September 2019

हरितालिकेची कथा

हरितालिकेची कथा

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.
हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.
नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.
पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला: त्यांन तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात.

समाप्त

याचा विधी असा आहे.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

समाप्त