नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 2 January 2019

लेक शिकवा अभियान

 लेक शिकवा अभियान

गेल्या चार दिवसापासून राणी शाळेत आली नाही म्हणून मोळे गुरुजी तिच्या घरी सकाळी सकाळी भेट दिली. राणी भांडे घासत होती आणि बाजूला धुणे ही पडलेले होते. तिची अजून अंघोळ व्हायचे बाकी होते. तिचा अवतार पाहून मोळे गुरुजीला कसे तरी वाटले. गुरुजींनी तिला सरळ प्रश्न केला, 

" राणी चार दिवस झाले तू शाळेला का आली नाहीस ? " 

यावर ती म्हणाली, " सर, आईला बरं वाटत नाही, त्यामुळे आईने मला घरी थांबायला सांगितलं." 

लगेच मोळे गुरुजी आईकडे वळले आणि विचारलं, " काय झालंय ? " तेंव्हा राणीच्या आईने उत्तर देतांना म्हणाली, " सर माझं तबियत बरोबर राहत नाही. त्यामुळे माझ्याने काही काम करवत नाही. त्यासाठी राणीला घरी थांबवलं हो." 

पाहायला गेलं तर राणी दुसऱ्या वर्गातील जेमतेम सात वर्षाची पोरगी. पण ती घरातील सारेच काम अगदी आईच्या कामासारखी सफाईदारपणे करते असे तिच्या घरच्या आजूबाजूचे शेजारचे बाया मोळे गुरुजीला सांगू लागल्या. मोलमजुरी करून आपले पोट भरणारे ते कुटुंब, आई-बाबा दोघे जर कमाविली तर थोडं फार शिल्लक राहते. त्यात आता आई पडली अंथरुणावर आणि बाबा जातात कामाला. आलेले सर्व पैसे खर्च होतात. त्यात मध्येच दवाखाना निघाला तर पूर्ण आर्थिक परिस्थिती कोलमडून जाते. असाच विचार डोक्यात घेऊन मोळे गुरुजी शाळेत गेले तर शाळेत केंद्रप्रमुख आलेले त्यांनी लेक वाचवा लेक शिकवा अभियानाविषयी परिपत्रक दिले आणि माहिती सांगितली. मोळे गुरुजी नुकतेच राणीच्या घरी भेट देऊन आले होते त्यामुळे तिच्या विषयी विचार मनात घोळतच होते. लगेच उभं राहून मोळे गुरुजीनी मनातील दुःख सरांजवळ बोलून दाखविले आणि सर्व परिस्थिती सांगितली. केंद्रप्रमुख साहेब खूपच दयाळू होते त्यांनी लगेच राणीच्या घरी भेट देण्याचे ठरविले. मोळे गुरुजी आणि केंद्रप्रमुख परत राणीच्या घरी गेले. तेथील परिस्थिती पाहून केंद्रप्रमुख साहेब गहिवरले आणि ताबडतोब दवाखान्यात घेऊन जाण्याचे ठरविले. शहरातील मित्राला फोन लावून सरांनी गाडी बोलावून घेतले. काही वेळातच ती गाडी आली आणि दवाखान्याकडे निघाली. मोळे गुरुजी शाळेत गेले आणि मुख्याध्यापकांना सांगून दवाखान्यात जाण्यास निघाले. राणीच्या आईला लगेच दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. डॉक्टरांनी राणीच्या आईला तपासले आणि लवकर आणलेले बरे केले, डेंग्यूची शिकायत आहे आणि पहिल्या स्टेजवर आहे, असे म्हणू लागले. आपल्या येथेच कवर होऊ शकते पण चार दिवस राहावे लागेल. राणी आणि राणीची आई दवाखान्यात राहिले. इकडे राणीचे बाबा कामावरून परतले. शेजारच्यांनी सर्व माहिती दिल्यावर ते देखील दवाखान्यात आले. चार दिवसांनी आजारातून पूर्ण तंदुरुस्त झाल्यावर ते परत आपल्या गावी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी राणीची आई राणीला घेऊन शाळेत आली आणि सरळ मोळे गुरुजीचे पाय धरू लागली. तेंव्हा मोळे गुरुजी म्हणाले, " माझे पाय कशाला धरता, केंद्रप्रमुख साहेबांमुळे हे सर्व घडलं, त्यांचे धन्यवाद माना, कोणताही आजार अंगावर काढू नये. लगेच दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी आणि हो राणीला रोज शाळेत पाठवा." राणीच्या आईला मोळे गुरुजीचे म्हणणे पटले, तिने पक्का निर्धार करत " राणीला रोज शाळेत पाठविणार " असे बोलली. लेक वाचवा ; लेक शिकवा अभियान काही अंशी सफल झाल्याचे समाधान मोळे गुरुजीच्या चेहऱ्यावर दिसू लागले. 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून महाराष्ट्र शासन लेक शिकवा अभियान राबवित आहे. तेंव्हा तमाम पालकांना नम्रतेची विनंती आहे की, मुलींच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. मुलगी परक्या घरची धन आहे असे मनात पक्का समज ठेवून बरेच पालक मुलींना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देत नाहीत मुलांच्या तुलनेत पाहिले तर. तिच्या शिक्षणाने संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून लेक शिकवा अभियान यशस्वी करण्यासाठी शिक्षकांना पालकांची मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे, त्यांच्या मदती शिवाय हे शक्य नाही. 

- नागोराव सा. येवतीकर

प्राथमिक शिक्षक

मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

9423625769

( सदरील लघुकथा काल्पनिक आहे. यातील पात्र आणि त्यांची नावं कदाचित जुळत असतील तर ते निव्वळ योगायोग समजावे. )

Sunday, 30 December 2018

हर कॅलेंडर कुछ कहता है ।

हर कॅलेंडर कुछ कहता है ।

31 डिसेंबर संपला की घरातील भिंतीवर असलेले  कॅलेंडर बदलले जाते आणि त्याठिकाणी नव्या वर्षाची जानेवारी महिन्याची कॅलेंडर लटकविली जाते. पाहता पाहता एक वर्ष संपून जाते. गेल्या एका वर्षात काय काय घडले ? याचा आढावा थोडक्यात घ्यायला बसलोत तर अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून सरकतात. काही बाबी तीव्रतेने आठवतात तर काही बाबी आठवण करण्यासाठी डोक्याला ताण द्यावा लागतो. वर्ष संपले की आपण कॅलेंडर फेकून देतो. पण जर हेच कॅलेंडर आपणास विविध प्रकारचे काम करू शकते. त्यानुसार त्याचा वापर करायला हवे. कॅलेंडरवर लिहिण्यासाठी थोडी फार तरी जागा राहते. तेंव्हा त्या ठिकाणी आपण जानेवारी महिन्यात किंवा एखाद्या महिन्यात काही विशेष घटना घडली असेल तर त्यावर नमूद करून ठेवावे. अगदी सहजपणे ते डोळ्याला दिसत राहते. अश्या नोंदी आपल्या कॅलेंडर वर केल्यास वर्ष संपल्यावर ते फेकावे वाटत नाही तेंव्हा त्याच्या बाजूला नवीन वर्षाचे कॅलेंडर ठेवावे म्हणजे दोन्ही कॅलेंडरवर लक्ष जाते आणि गेल्यावर्षी या तारखेला काय घडले याची भूतकाळातील आठवण होते. त्यानिमित्ताने परत एकदा साऱ्या बाबी आठवणीमध्ये येतात. अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणीचे वाढदिवस या कॅलेंडरवर नोंदी करून ठेवल्यास त्या त्या तारखेला आठवण करून शुभेच्छा देता येतील. कधी कधी वाढदिवसाची आगाऊ तारीख लक्षात राहिल्याने नियोजन देखील करता येईल. विम्याचा हप्ता किंवा आर डी चा हप्ता भरण्याची तारीख नोंद करून घेतल्यास आपण विसरणार नाही. आज काल लेट फी मध्ये खूप मोठी रक्कम भरावी लागते. कॅलेंडरवर नोंद करून ठेवल्यास लेट फी टाळता येऊ शकेल. काही महत्वाचे फोन क्रमांक या कॅलेंडरवर लिहिले तर शोधण्याची गरज राहत नाही. घरात रोज मिळणाऱ्या वरव्याच्या दुधाचे किती पैसे झाले याची माहिती या कॅलेंडरवरूनच मिळते, हे तर आपल्या घरातील गृहिणीमुळे आपणा सर्वाना ज्ञात आहेच. 1990 च्या दशकात क्रिकेटच्या विश्वकपचे घराघरात वारे वाहत होते. त्यावेळी क्रिकेट सामन्याचे वेळापत्रक कॅलेंडरवर लिहिलेले बऱ्याच जाणाला आज ही आठवत असेल.  कॅलेंडरचे असे विविध उपयोग आपणास घेता येऊ शकते. शालेय मुलांनी देखील आपल्या अभ्यासाचे नियोजन व परीक्षेचे वेळापत्रक लिहून ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. बाजारात अनेक प्रकारचे कॅलेंडर विकत मिळतात. आजकाल विविध प्रकारच्या कंपन्या आणि बँकेकडून देखील कॅलेंडर अगदी मोफत वितरित केल्या जाते. काही समाजातील मंडळी आपापल्या समाजाची कॅलेंडर काढून वाटप करतात. जेवढं काही वृत्तपत्र किंवा साप्ताहिक आहेत ते देखील आपले कॅलेंडर काढतात आणि वाचकापर्यंत पोहोच करतात. घरात असे तीन-चार प्रकारचे कॅलेंडर जमा झाले तरी घरातील गृहिणीचे मन कालनिर्णय घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. तिची इच्छा असते की, " भिंतीवरी कालनिर्णय असावे. " बरेचजण डायरी वापरत नाहीत पण घरातील कॅलेंडरचा वापर करतात. त्यामुळे प्रत्येक घरातील कॅलेंडर काही ना काही सांगत असते, असे सांगावेसे वाटते. हर कॅलेंडर कुछ कहता है । चला पुन्हा भेटू पुढील वर्षात काही नव्या विचारासह. आपणा सर्वाना नवीन वर्षाच्या मनस्वी शुभेच्छा .....!

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769