नागोराव सा. येवतीकर

Saturday, 22 December 2018

फोन इन प्रोग्राम

*उपक्रम : हॅलो, मी बोलतेय*

" हॅलो सर मी बोलतेय "
" हॅलो, बोल "
" सर, माझा आजचा अभ्यास झालंय "
" ओके, ठीक आहे. "
अश्या पध्दतीने मुलं आत्ता रोज फोन लावत आहेत आणि आपला अभ्यास पूर्ण करीत आहेत.

या उपक्रमासाठी मुलांना पहिल्यांदा फोन वर कसे बोलावं हे शिकविले गेलं.
एखाद्या व्यक्तीला आपण फोन लावल्यानंतर पहिल्यांदा नाव सांगावं आणि आपलं काम सांगावं म्हणजे कमी वेळात आपले बोलणे पूर्ण होते.
सरकारी शाळेतील मुलांकडे पालक म्हणावं तेवढं लक्ष देत नाहीत म्हणून ही मुलं घरी गेले की दप्तर फेकतात आणि खेळायला जातात. अभ्यास करीत नाहीत असा आजपर्यंतचा निरीक्षण आहे.

पालक लक्ष नाही दिले तरी मुले अभ्यास करावेत म्हणून हा उपक्रम तयार करण्यात आला.

शाळेत शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करायचा आणि पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी 7 ते 8 या वेळातच फोन करायचं
यामुळे मुलं शाळेतून घरी गेले की अभ्यास करू लागली. अभ्यास झाल्यावर शिक्षकांना फोन करू लागली.
फोनवर शिक्षकांना बोलण्याचा आनंद काही औरच असतो.

फायदा -
पालकांचे लक्ष नसतांना देखील मुले अभ्यासाला लागली.
शिक्षकांना फोनवर बोलल्यामुळे त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो.
शिक्षकांचे बोलणे मुले 100 टक्के ऐकतात. त्यामुळे हा उपक्रम मुलांना अभ्यास करण्यास भाग पाडतो.
परिपाठात फोन केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव घेतल्यास त्यांच्या चेहऱ्यावर खुशी झळकते.
काही वेळा सातत्याने परिपूर्ण काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देणे इतर विद्यार्थ्यांना प्रेरित करते.
पालकांशी संपर्क वाढतो..

त्रुटी -
काही मुलं विनाकारण फोन करण्याची शक्यता आहे. त्यांना वेळीच तंबी देऊन तसे करणे बंद करता येईल.
काही मुले दिलेल्या वेळात अभ्यास न झाल्यामुळे जेंव्हा अभ्यास होईल तेंव्हा फोन करतात.
काही मुले खोटे बोलण्याची शक्यता देखील आहे म्हणून कधी कधी पालकांना देखील बोलत जावे.

त्रुटी कडे जास्त लक्ष न देता हा उपक्रम मुलांच्या अभ्यासाला नक्की गती देईल याचा विश्वास वाटतो.

( हा उपक्रम आवडल्यास आपण ही आपल्या शाळेत राबवावे, यात काही अजून भर घालावी व तसे मला देखील कळवावे. )

शब्दांकन : नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Friday, 21 December 2018

मुलांचे गुण शाळेतून दिसतात

मुलांचे गुण शाळेतून दिसतात

शाळा हे एक असे ठिकाण आहे ज्याठिकाणी देशाचा भावी नागरिक घडत असतो. बऱ्याच वेळेला जेंव्हा दोन शिक्षक एकमेकांशी बोलत असतात तेंव्हा ते एकमेकांना प्रश्न विचारतात की, प्रत्येक गोष्ट शाळेतूनच का शिकावी लागते ? मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी शाळेत पाठवा, मुलांना लिहिण्या-वाचण्यासाठी शाळेत पाठवा, मुले संस्कारी होण्यासाठी शाळेत पाठवा. एखादे मूल काही वाईट केलं किंवा खराब केले की लगेच बोलल्या जाते, गुरुजींनी, तुला शाळेत हेच शिकवलं का ? तसं तर तुला घरी हेच शिकवलं का ? असे फार कमी बोलल्या जाते. वास्तविक पाहता यात गुरुजींचा काहीही दोष नसतो मात्र अगदी सहजपणे असे बोलले जाते. प्रत्येकजण शाळेकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवतात. सहाव्या वर्षी शाळेत प्रवेश करणारा विद्यार्थी आणि पाच वर्षानंतर शाळेतून बाहेर जाणारा पाचवीचा विद्यार्थी याच्या प्रत्येक बाबीचा विचार केल्यास किंवा निरीक्षण केल्यास लक्षात येते की, मुलांना संस्कारी करण्यात शाळेची भूमिका खूपच महत्वाची होती. शाळेत तो प्रवेशित झाला नसता तर कदाचित असा झाला असता की नाही, असे ही कधी कधी वाटते. आजपर्यंत जे कोणी मोठमोठ्या पदावर पोहोचलेली माणसं आहेत त्यांच्यावर प्राथमिक शाळेतील संस्कारच आजीवन सोबत आहेत. शाळेतून असं काय जादू घडते ? जे घरात घडत नाही असं शाळेत काय होत असेल ?  मुलांवर संस्कार टाकण्याची खरी जबाबदारी पालकांची आहे, यात काही संदेह नाही तरी त्याला शाळेतून सर्वच प्रकारचे संस्कार केले जातात, हे ही सत्य विसरून चालणार नाही. शाळेत विविध जातीचे, धर्माचे आणि पंथाचे मुलं शिकण्यासाठी एकत्र येतात. एका वर्गात, एका बाकावर जेंव्हा विविध जाती-धर्मातील मूलं एकत्र बसतात तेंव्हा त्यांच्यात जी देवाण-घेवाण होते ती घरात कधीच होऊ शकत नाही. काही घरात तर इतर धर्माच्या किंवा जातीच्या मुलांना प्रवेश देखील मिळत नाही. लगेच पालक आपल्या मुलांवर बंधन टाकतात की, अमुक मुलांसोबत राहू नको. घरात भेद शिकविले जाते तर शाळेत सर्वधर्मसमभाव शिकविला जातो. ज्या घरात भेदभाव, उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भाव बघितला जात नाही, त्या घरातील मुले देखील तसेच निघतात. शाळेत या सर्व बाबी घडतात म्हणूनच याठिकाणी माणूस घडविला जातो असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. सर्वांसोबत प्रेमाने आणि सहकार्याने वागण्याची रीत मुलांना शाळेत नकळत शिकायला मिळते. मुले एकमेकांना समजून घेऊन काम करीत असतात त्यामुळे ते अगदी सहजरित्या कोणतेही काम करू शकतात. शिक्षकाने शिकविलेली बाब त्याला पटकन कळणार नाही मात्र त्याच्या मित्राने किंवा मैत्रिणीने शिकविलेली कोणतीही कठीण बाब पटकन समजते. घरात पालक आपल्या मुलांना समजावून सांगूच शकत नाही. मुलांच्या मनावर पालकांचा दरारा कायम जाणवतो म्हणूनच ते पालकांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यास असमर्थ ठरतात. जे काम पालक आणि शिक्षक करू शकत नाही ते काम त्याचे शाळेतील मित्र नक्की करू शकतात. नुकतेच एक बातमी वाचण्यात अली की, 30-35 वर्षांपूर्वीचे शाळेतील मित्रांनी एकत्र येऊन गेट टूगेदर केल्यावर सर्वांनी लहानपणीच्या गोष्टीना उजाळा दिला. हे सर्व शाळेतच घडू शकते. शाळा मुलांना नकळत बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. शाळेत फक्त वाचन-लेखन नाही तर भावी जीवनात कामी पडणाऱ्या अनेक गोष्टी शिकविले जातात म्हणून प्रत्येक बाबीसाठी शाळेकडे सर्वप्रथम पाहिले जाते. पण बहुतांश पालक शिक्षकांकडे तक्रार घेऊन येतात, आज मुलांना काहीच होम वर्क दिलं नाही, त्याला खूप काम द्या. असे जेंव्हा ऐकायला मिळतं त्यावेळी खूप नाराजी वाटतं. मुलं म्हणजे काय शेतातील बैल आहेत का ? एवढं काम करायला हवं. त्यासाठी पालकांनी एकवेळ समजून घ्यावं होम वर्क केल्याने मुलं हुशार होत नसतात तर त्यांच्या अंगी असलेल्या कलेचा आविष्कार केल्याने त्यांचा खरा विकास होतो. 
शाळेत शालेय पोषण आहार सुरू करण्यात आले त्याद्वारे मूल जेवण्याच्या अनेक बाबी शिकतो. जेवण्यापूर्वी व जेवल्यानंतर स्वच्छ हात धुणे, जेवताना न बोलणे, अगदी शांततेत जेवण करणे, सर्वप्रकारचे संतुलित जेवण मिळावे म्हणून दररोज वेगवेगळे अन्नपदार्थ तयार केल्या जाते. यातून मुलांवर नकळत जेवण्याचे संस्कार होतात. काही शाळेत जेवण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवित असतात. जसे की जेवतांना पाढे म्हणणे, पुस्तकातील कविता म्हणणे, साउंडसिस्टीमचा वापर करून मुलांना गाणे ऐकविणे असे अनेक उपक्रम राबवून मुलांना संस्कारित केले जाते. शाळेत शौचालयाचा वापर करणे यामुळे त्याला त्याची सवय लागते आणि तो भविष्यात वापर करतो. शालेय जीवनात त्याला त्याचे महत्व कळते म्हणून तो भविष्यात त्याचा नक्की वापर करतो. आजच्या लोकांना किती ही सबसिडी किंवा समजावून सांगितले तरी ते शौचालयाचा वापर करीत नाहीत कारण त्यांनी जेंव्हा शाळा शिकले तेंव्हा त्यांच्या शाळेत शौचालय नावाची वस्तू नव्हती. उघड्यावर मलमूत्र करण्याची त्यांना सवय होती ती कशी जाईल ? भविष्यात काही चांगले बदल बघायचे असतील तर त्या शाळेतील मुलांसाठी स्वच्छ शौचालय असणे आवश्यक आहे. त्याचा नियमित वापर करू लागले की त्यांचे मत परिवर्तन होऊ शकते. शाळेतच शिकविल्या जाते की स्वच्छ पोशाख का वापरायचा ? शाळेत टापटीपपणा टिकवून ठेवला की आयुष्यभर तो तसाच राहतो. शाळेत वेळेवर येणारी मुले मोठी झाल्यावर कोठे ही वेळेचे बंधन पाळतात असे एक निरीक्षण आहे. जी मुलं शाळेत नियम पाळत नाहीत किंवा दिलेले काम करीत नाहीत ती भविष्यात आळशी आणि कामचुकार म्हणून प्रसिद्ध होतात. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे मुलांचे सर्व गुण अवगुण शाळेतच दिसून येतात. शाळेतील वागणुकीवरून कळते की, भविष्यात त्याचे भविष्य कसे आहे ? म्हणून पालक आणि शिक्षकांनी शाळेतल्या प्रत्येक बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. पुस्तकी ज्ञानासोबत इतर ही ज्ञान मिळणे आवश्यक आहे यशस्वी जीवन जगण्यासाठी. म्हणून मुलांना पुस्तकी किडा न बनविता, मुलांच्या पुस्तकी मार्काकडेपूर्ण लक्ष न देता त्याच्या इतर गुणाकडेदेखील लक्ष द्यायला हवं, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. बिलोली जि. नांदेड
9423625769