नागोराव सा. येवतीकर

Friday, 12 October 2018

वाचन प्रेरणा दिवस

*वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने.......!*

ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि ज्ञान हे वाचनातून मिळते. ज्याचे वाचन अधिक त्याचे ज्ञान सुध्दा अधिक. आपणाला ज्ञान हे वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या मार्गाने मिळविता येतो. मात्र वाचनातून जे ज्ञान मिळते ते चिरकाल टिकणारे असते. प्रसिध्द विचारवंत ऑझक टेलर म्हणतात की, मनुष्याची वाढ ही अवयवानी होत नाही, तर विचारांनीच होते आणि विचारांना वाचनांनी सहज सहकार्य मिळते. जीवनातील अंधकार नाहीसे करण्यासाठी प्रत्येकाना वाचन करता आलेच पाहिजे. याचमुळे तर आपण आपल्या मुलांना वयाच्या सहाव्या वर्षी वाचन-लेखन शिकण्यासाठी शाळेत प्रवेश देतो. त्या ठिकाणी मुलांवर वाचनाचे संस्कार केले जातात. वाचन काय करावे आणि कसे करावे याची प्राथमिक माहिती ज्याला असते तोच उत्तम प्रकारे वाचन करू शकतो. आपल्या मनात चांगले विचार यावेत असे जर आपणास वाटत असेल तर त्यासाठी प्रथम चांगले वाचन करणे आवश्यक आहे. प्रसिध्द विचारवंत टॉलस्टॉय यांनी म्हटल्याप्रमाणे अश्लील पुस्तके वाचणे म्हणजे विष प्यायल्याप्रमाणे असते. यामुळे स्वतःचे नुकसान तर होतेच शिवाय समाजाचे आणि देशाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात की, पुस्तके वाचन करणे म्हणजे आपले मन निर्मळ करणे होय. पुस्तकातल्या विविध बाबीचा थेट परिणाम वाचकांच्या मेंदूत जाऊन भिडतो. जी व्यक्ती वाचन करते तीच व्यक्ती विचार करू शकते. आजच्या संगणक आणि सोशल मीडियाच्या जगात वाचन संस्कृती कमी व्ह्ययला लागली त्यामुळे नैतिकता सुध्दा लयाला जात आहे. सर्व काही वाईट बाबी त्यांच्या डोळ्यासमोर येत असल्यामुळे त्याला चांगले काही सुचत नाही. जीवनात वाचनाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. त्यातल्या त्यात नियमित वाचन केल्यामुळे ज्ञानात देखील वाढ होते. जसे पोटाला भूक लागल्यावर आपण अन्नाचा शोध घेतो. अगदी त्याचप्रकारे डोक्यातील मेंदूचा खुराक म्हणजे वाचन होय. जसे आपण अन्न मिळेपर्यंत शोध चालूच ठेवतो, अगदी त्याचप्रकारे एखाद्या विषयाची माहिती पूर्ण मिळविण्यासाठी अनेक पुस्तकांचा शोध घ्यावा आणि आपल्या डोक्याची गरज पूर्ण करावी. वापर करत गेलो तर ती वस्तू अजून चांगली राहते जर वस्तू दीर्घकाळ वापरात आणली नाही तर त्यावर गंज चढू शकते. वाचनाचे देखील तसेच आहे. वाचन करून डोक्याचा वापर न केल्यास डोकं मंद होऊन जाते. विचार प्रक्रिया करू शकत नाही.  पण ही वाचन करण्याची आवड कशी निर्माण करावी आणि वाचन कौशल्य कसे विकसित करावे ? याबाबत कोणी बोलताना दिसत नाहीत किंवा मार्गदर्शन देखील करताना आढळून येत नाहीत. खरे पाहिले तर वाचनाविषयी चर्चासत्र, व्याख्यान किंवा मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.
प्राथमिक वर्गातील मुलांची वाचन क्षमता वाढली तर त्यांची प्रगती निश्चितपणे होऊ शकते त्यामुळे मुलांची वाचन गती कशी वाढविता येईल यावर थोडा विचार होणे आवश्यक आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड आणि योग्य गती मिळविण्यासाठी खालील प्रकारच्या उपाय योजना करण्यात आले तर त्याचे निश्चित असे परिणाम पाहायला मिळतात. मुलांना रोज पाच वाक्ये वाचन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यापासून सुरुवात करावी. वाचनासाठी तसे वातावरण तयार करणे आवश्यक आहे. अगदी सुरुवातीला लहान लहान गोष्टीची पुस्तके त्यांना वाचण्यास द्यावी. सुरुवात सोप्या वाक्याने केली तर मुलांमध्ये वाचनाची गोडी लागते. त्यानंतर हळूहळू जोडाक्षर किंवा मोठे शब्द असलेले वाक्य वाचण्याचा सराव करून घ्यावे. सध्याच्या काळात मुलांचे वाचनाकडील लक्ष फार कमी झाले आहे. ही वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शाळेतून विशेष प्रयत्न व्ह्ययला पाहिजे. आज मुले भरपूर लिहितात मात्र वाचन करा असे म्हटले की कंटाळा करतात. लहानपणी वाचनाची सवय लागली तर मोठेपणी ही सवय त्यांच्या कामी येऊ शकते. म्हणून शाळाशाळामधून रोज एक तास वाचनासाठी राखीव ठेवून मुलांना त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचण्याची संधी दिली जावी. जेथे लहान वर्ग आहेत तेथे वाचलेल्या पुस्तकांची नोंद शाळानी ठेवायची आणि उच्च प्राथमिक वर्गात मात्र मुले वाचलेल्या पुस्तकांची नोंद ठेवल्यास योग्य परिणाम भविष्यात पाहायला मिळतो.
मुलांचे वाचन करून घेताना काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्यावे म्हणजे वाचन योग्य दिशेने होईल. अगदी सुरुवातीला वाचन करताना प्रत्येक शब्दावरुन पहिले बोट फिरवावे त्यामुळे आपले लक्ष त्या शब्दावर राहते आणि मन एकाग्र राहण्यास मदत मिळते. सुरुवातीला मोठ्याने प्रकट वाचन करावे त्यामुळे त्या शब्दाचे ध्वनी मुलांच्या लक्षात राहील. त्यानंतर मूक वाचनाचा सराव केल्यास वाचन चांगल्या पध्दतीने करता येते. असे वाचन करण्याचा भरपूर सराव झाल्यावर पुढे चालून मौन वाचन करताना जसे शब्दावरुन बोट फिरवत होतो तसे बोट न फिरवता फक्त डोळे फिरवावे. त्यामुळे आपली वाचनाची गती वाढत राहते. एका मिनीटात आपण किती शब्द वाचतो यावर आपली वाचनाची गती ठरविली जाते. अशा क्रियेचा सर्वात जास्त फायदा म्हणजे आजुबाजुला किती ही गोंधळ असला तरी आपले लक्ष विचलित होत नाही, मन एकाग्र राहते. प्राथमिक वर्गात मुलांचे वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी समान आवाज असलेले शब्द, शेवटचे अक्षर समान असलेले शब्द, जोडशब्द, गमतीदार शब्द अशा शब्दांचे वाचन केल्यास त्याचा नियमित वाचन करताना फायदा होतो जसे की, अक्कल शब्दाचे वाचन झाल्यावर त्याच्या सारखेच आवाज असलेले नक्कल, शक्कल, टक्कल अश्या शब्दाचे वाचन केल्यास मुलांची वाचनाची गती नक्की वाढेल. तसेच त्यांची शब्दसंपत्ती देखील वाढ होईल. जेवढे जास्त शब्द मुलांना ओळखीचे होतील तेवढे त्याची वाचनाची गती चांगली होते. त्याचसोबत वाचनात नियमितपणा असणे आवश्यक आहे. डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्त वाचन प्रेरणा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने एक-दोन दिवस वाचायचे आणि बाकी इतर दिवशी विसरून जायचे असे झाले तर वाचनात योग्य गती मिळत नाही. खरी वाचन प्रेरणा घ्यायची असेल तर महात्मा गांधी,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासारखे नियमित वाचन करीत रहावे लागते. तीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. म्हणून रोज किमान एक तास वाचन करण्याची दिवसातील एक वेळ ठरवावी आणि त्याच वेळी वाचन करीत रहावे.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता बिलोली जि नांदेड 
9423625769