नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 19 June 2018

निरोगी जीवनात योगाचे महत्व

निरोगी जीवनात योगाचे महत्व

आपल्याकडे एखादे वाहन असेल तर काही ठराविक कालावधीनंतर आपण त्याची दुरुस्ती किंवा सर्व्हिसिंग करतो. कशासाठी तर ऐनवेळी आपणास धोका होऊ नये आणि आपला प्रवास सुखकारक व्हावे म्हणून. निर्जीव असलेल्या वाहनांची जेवढी काळजी घेतली जाते तेवढी काळजी आपल्या सजीव शरीराची खरोखरच आपण घेत असतो का ? नाही. म्हणूनच अचानक मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग आणि आपण याचा काही तरी संबंध आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊ या. मनुष्य पृथ्वीतलवार जन्म घेतल्यापासून तर मरेपर्यंत मानवाच्या शरीराचा आरोग्याशी संबंध येतो. शरीर सुदृढ असेल तर त्याचे आरोग्य देखील सुदृढ असते. आरोग्य सुदृढ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडत असतात. इंग्रजीत एक म्हण आहे Sound in Body is Sound In Mind अर्थात शरीर मजबूत तर मन मजबूत.  मात्र आपले आरोग्य चांगले नसेल तर आपल्या जवळ सर्व काही असून ते काहीच कामाचे नसते. म्हणून प्रत्येक जण आपले आरोग्य कसे चांगले राहील ? याकडे विशेष लक्ष देत असतो. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले अभिनेता अमिताभ बच्चन आज ही न थकता चित्रपटात काम करताना दिसतो. याचे काय कारण असू शकते तर ते म्हणजे त्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे. सर सलामत तो पगडी पचास अशी एक हिंदी मधील म्हणीचा अर्थ काय सांगतो, आरोग्य चांगले असेल तर किती ही धन कमाविता येऊ शकेल. आपले आरोग्य म्हणजे आपले धन होय. परंतु एकूण लोकसंख्यापैकी फारच कमी म्हणजे 10 ते 20 टक्के लोक आपल्या शरीराची देखभाल करून आरोग्याची काळजी घेतात. बाकी इतर मंडळी मात्र आपल्या अमूल्य अश्या शरीराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांना आरोग्याच्या विविध तक्रारीला तोंड द्यावे लागते. असे म्हटले जाते की, दवाखाना मागे लागले की कुटुंबाचा विकास होत नाही. म्हणून दवाखाना आपल्या मागे लागू नये यासाठी काय करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वप्रथम आपणांस चांगली सवय असावी लागते. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ही सवय माणसाला निरोगी राहण्यास मदत करते. ज्याप्रकारे शाळा-महाविद्यालयात प्रत्येक विषय आणि कृतीचे नियोजनानुसार एक वेळापत्रक असते. अगदी त्याचप्रकारे माणसाने सुद्धा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कृतीचे नियोजन करून त्याचे एक वेळापत्रक आपल्या मेंदूला दिले की, रोज त्या वेळेला मेंदू आठवण करून देते. एखाद्या दिवशी वेळापत्रकात मागे पुढे होईल पण वारंवार त्यात चुका करू नये. स्वच्छतेच्या आपल्या सवयी आपणाला निरोगी राहण्यास मदत करतात. कधी कधी आपल्या वागण्यामुळे इतरांना त्रास होतो, त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते. आपले जेवण हे देखील आपले आरोग्य वाढविण्यासाठी नेहमी मदत करतात. आपल्या जेवणात संतुलित आहार नियमितपणे असेल तर आपल्या आरोग्याच्या तक्रारी खूप कमी प्रमाणात असतात. बहुतांश लोक फळभाजी आणि पालेभाजी खाण्यासाठी टाळाटाळ करतात. रोज एकसारखे अन्न जेवण केल्यास सर्व प्रकारचे जीवनसत्वे मिळत नाहीत. त्यामुळे मग कोणत्या तरी जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते आणि मग आपणांस आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. आपणाला मिळलेले शरीर हे एक अमूल्य वरदान आहे. मात्र त्याची आपणांस काहीच काळजी वाटत नाही हे आपल्या नेहमीच्या वागण्यावरून लक्षात येते. दारू पिणे, तंबाखू खाणे आणि विडी ओढणे यासारख्या व्यसनाच्या आहारी गेलेला व्यक्ती आपल्या शरीराविषयी जरा सुद्धा काळजी घेताना दिसत नाहीत. जर त्यांना खरोखरच आपल्या शरीराची काळजी राहिली असती तर दिवसरात्र दारू पिऊन स्वतः मृत्यूच्या खाईत गेला नसता. तंबाखू आणि गुटखा खाण्याच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातल्या त्यात शाळा-महाविद्यालयातील मुलां-मुलीच्या संख्येत वाढ होत आहे. जे की देशाच्या प्रगतीसाठी फायदेशीर नाही. राज्यात गुटखा बंदी असून देखील कोपऱ्या कोपऱ्यात गुटख्याचे पाकीट सर्रास विकले जात आहेत. यातच आपला देशातील तरूण युवक आपले आरोग्य गमावून बसत आहेत. तिशीच्या आत तो स्वर्गात आपली जागा करीत आहे. पूर्वीच्या लोकांचे जिवंत राहण्याचे सरासरी आयुष्य 100 वर्षे होते परंतु आजच्या लोकांचे वय 60 वर्षावर येऊन बसले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे मनुष्य स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मधुमेह, कँसर यासारख्या रोगांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. लोकांमध्ये एड्स विषयी जनजागृती निर्माण झाल्यानंतर या रोगाचे रुग्ण कमी झाले असले तरी पूर्णपणे संपले असे म्हणता येणार नाही. पोलियोसारख्या रोगांवर मात्र आरोग्य विभागाने चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळविले आहे. सन 1995 पासून भारतात दरवर्षी एकाच दिवशी शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलियोचे दोन थेंब पाजवून त्याचे समूळ उच्चाटन करण्यात यश मिळाले आहे. 
लोकांनी आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी दिवसातून एक तास जरी दिले तरी आपले आरोग्य बिघडणार नाही. रोज सकाळी आणि सायंकाळी अर्धा तास चालणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. इतर काही करा किंवा न करा मात्र रोज अर्धा तास चालण्यासाठी द्या असे प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णाला सांगत असतात. आपल्या पूर्वजांनी देखील शरीराच्या तंदुरुस्ती साठी व्यायाम करण्याचे महत्व सांगितले आहे. त्याच अनुषंगाने करा योग रहा निरोग असे आयुर्वेदामधून नेहमी सांगितले जाते. 
21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसभेत मंजुरी देण्यात आली. म्हणून सर्वात पहिल्यांदा 21 जून 2015 रोजी सर्वात पहिल्यांदा संपूर्ण जगात योग दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसभेत योगाबाबत बोलतांना भारताचे पंतप्रधान म्हणाले की, शरीर आणि मन यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम योग करते. योग ही भारताची खूप जुनी परंपरा आहे. योग हे व्यायाम नसून निरोगी शरीर राहण्यासाठी एक चांगली सवय आहे.  लोकांमध्ये योगाविषयी जागृती निर्माण करणे हे या दिनाचे महत्व म्हणता येईल. म्हणून आज आंतरराष्ट्रीय योग दिनी आपल्या कुटुंबाच्या निरोगी आयुष्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी रोज कमीतकमी अर्धा तास चालणे आणि योगा करण्याचा संकल्प करू या आणि निरोगी जीवन जगू या.

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

शाळा प्रवेशोत्सवाचा उत्सव व

शाळा प्रवेशोत्सवाचा उत्सव

जून महीना उजाडला की सर्वत्र शाळा प्रवेशाची धामधुम चालू होते. शहरात या प्रक्रियेसाठी किती हालअपेष्टा सहन करावे लागते याची जाणीव शहरात गेल्याशिवाय येणार नाही. पालक  आपल्या मुलाना चांगल्यात चांगली शाळा मिळावी यासाठी भरपूर प्रयत्न करतात. वाटेल तेवढे पैसे खर्च करण्याची ही त्यांची तयारी असते. काही शाळेत प्रवेशासाठी रांगाच्या रांगा असतात, मुलाच्या प्रवेशासाठी अनेक जण सुट्टी सुध्दा टाकतात. मोठ्या लोकांची शिफारस पत्र लावतात. मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर लाखो रूपये खर्च करणारे ही पालक आढळून येतात तर एक ही रूपया खर्च न करणारा पालक ही येथे सापडतो. मात्र खेडोपाडी असलेल्या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील प्रवेश प्रक्रिया वेगळीच असते. गरीबाची शाळा म्हणून या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेची ओळख आहे ,त्यामुळे या शाळेकडे लोकांचे आकर्षण व्हावे आणि या शाळेत प्रवेश वाढावा यासाठी शासनच्या शालेय शिक्षण विभागाकडून वेगवेगळ्या योजना तयार केल्या जातात उदाहरणार्थ प्रवेश पंधरवडा, लक्षवेधी नमस्कार मोफत पाठयपुस्तक, मोफत गणवेश यासारखे उपक्रम तयार केले जातात आणि त्या अनुषंगाने कार्यवाही केल्यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या वाढेल अशी प्रशासनाला खात्री आहे.
शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या प्रवेशानिमीत्त प्रवेश उत्सव म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. गावात देशभक्तिपर गीते व नारे देत बालकाची प्रभातफेरी काढणे आणि प्रवेशपात्र मुलांची त्याच्या घराजवळ फुल देऊन स्वागत करून त्याच फेरीतून प्रवेश प्रक्रिया करण्याची योजना खरोखरच मुलाना शाळेत सहजरित्या प्रवेश देऊन जाते. शाळेत आणि परिसरात रांगोळी टाकून वर्ग सजावट करणे, शाळेत तोरण बांधणे असे केल्यामुळे मुले पहिल्या दिवसापासून उत्साही असतात. शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांना त्यांच्या नविन अभ्यासक्रम आणि नविन वर्गशिक्षकाची ओळख करून देणे, हा एक चांगला कार्यक्रम होतो. यावर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे बहुतांश शाळेवर जुन्या शिक्षकांच्या ठिकाणी नविन शिक्षक आलेले आहेत. त्यांची ओळख करून देणे आणि त्यांचे स्वागत करणे यामुळे सर्वाना उत्साह येईल. पुस्तक वाटप करण्याचा कार्यक्रम गावकऱ्यासमक्ष करून, गेल्या वर्षी अभ्यासात चांगली प्रगती केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचा गौरव केल्यास त्याचे फायदे आपणास वर्षभर अनुभवास येतात. शालेय गणवेश वाटप करण्याचा कार्यक्रम सुध्दा याच अनुषंगाने पार पाडल्यास मुले अजुन आनंदुन जातील. अर्थातच शाळेचा पहिला दिवस कोणालाही अवजड वाटू नये ,याप्रकारे खेळीमेेळीच्या वातावरणात पूर्ण केल्यास शाळेत नवागत येणाऱ्या बालकावर अनुकूल परिणाम बघायला मिळतात. याउलट जर चित्र शाळेत पाहायला मिळले तर त्या नव्याने प्रवेश करणाऱ्या मुलांवर प्रतिकूल परिणाम होऊन मूल हळूहळू शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वीच्या काळात शाळेत येणारी मुले सदा रडतच येत होती. आंगणवाडी किंवा बालवाडी नावाचा प्रकार फार कमी होता. मुलाना शाळेचा अजिबात गंध राहत नव्हता. परंतु आज तशी परिस्थिती राहिली नाही. तीन वर्षाच्या मुलापासून शाळेला सुरुवात होत आहे त्यामुळे पहिल्या वर्गात येणारा मुलगा हसत खेळत प्रवेश करीत आहे. या गोष्टीचा विचार करून शासनाने प्रत्येक शाळेला आंगणवाडी किंवा बालवाडी जोडल्यास शाळेच्या गुणवत्तेत आणि शैक्षणिक प्रगतीत नक्कीच वाढ होईल. सर्वाना मोफत शिक्षणाच्या कायदेमध्ये सुधारणा करून सहा ऐवजी तीन ते चौदा वयोगट करणे भविष्यात अत्यंत आवश्यक आहे असे वाटते.
मुलाना शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यँत चालणार आहे. तेंव्हा या उपक्रमाची जबाबदारी ही शाळाप्रमुख या नात्याने मुख्याध्यापकाची आणि शिक्षकांची तर आहेच शिवाय गावस्तरावरील ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच, उपसरपंच व इतर सदस्य , महिला बचतगट आणि इतर समित्यानी यात सहभाग घेतले तर उपक्रम पूर्णपणे यशस्वी होईल. काही गावात बैलगाडीवरून मुलांना शाळेत आणण्याचा प्रयत्न झाला तर काही ठिकाणी ढोल वाजवीत प्रवेशपात्र मुलांची मिरवणूक काढण्यात आली. गावाच्या विकासासाठी शाळेने पूर्ण प्रयत्न करावे तर शाळेच्या विकासासाठी गावातील प्रत्येक घटकानी मदतीच्या स्वरुपात उभे राहिल्यास गावातील शाळा नावरूपास येण्यास वेळ लागणार नाही.
कोणत्याही कामाची सुरुवात चांगली झाली तर अर्धे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असे म्हटले जाते त्यामुळे शाळा प्रवेशोत्सव आपण सर्वानी अगदी आनंदात आणि उत्साहात सहभागी झालात म्हणजे मुलाना शाळेच्या वातावरणचे दडपण वाटणार नाही आणि त्याच्या मनात शाळेविषयी गोडी निर्माण होईल.

नागोराव सा. येवतीकर 
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड 
09423625769

Monday, 18 June 2018

कॉलेजच्या विद्यार्थ्याची बायोमेट्रिक हजेरी!

कॉलेजच्या विद्यार्थ्याची बायोमेट्रिक हजेरी!

खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आल्याचा आदेश शिक्षण विभागाने जारी केल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. सरकारला उशिरा का होईना या बाबीची जाणीव झाली की, कॉलेजमध्ये हजेरीवर जेवढे विद्यार्थी असतात त्यांच्या निम्यापेक्षा कमी विद्यार्थी उपस्थित असतात. असे कॉलेजचे चित्र एकीकडे दिसते तर दुसरीकडे खाजगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा मिळत नाही, मुले मिळेल त्या जागेवर बसून किंवा उभे राहून शिकवणी पूर्ण करून घेतात. कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थित आणि अनुपस्थितीवर कोणाचे ही अंकुश नसल्यामुळे येथील प्राध्यापक मंडळी विना कष्ट वेतन उचलतात तर खाजगी क्लासेस मध्ये अव्वाच्या सव्वा पैसे भरून पालक मंडळीचे आर्थिक स्थिती कोलमडते. जे विद्यार्थी खूप गरीब आहेत त्यांना मात्र कोणतीही शिकवणी लावल्या जात नाही आणि कॉलेजमध्ये कोणी शिकवित नाही त्यामुळे त्यांचे खूप बेहाल होतात. गरीब विद्यार्थी जन्मतः हुशार असून देखील मागे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉलेजशी संपर्क करून काही क्लासेसवाले आर्थिक हितसंबंध सुद्धा तयार करतात. विज्ञान शाखेतील विद्यार्थी फक्त प्रात्यक्षिक परीक्षेस उपस्थित राहतात ही बाब शासनाच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्याचा निर्णय गरीब विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप छान आहे. मात्र येथे ही एक धोका संभवतो. ते म्हणजे मुले अंगठे लावून परत त्यांच्या क्लासेसला हजेरी लावू शकतात. मुले कॉलेज मध्ये उपस्थित असल्याचा पुरावा बायोमेट्रिक देईल. या बायोमेट्रिकमध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता शासनाला वाटते. म्हणजे येथे ही पळवाट निघू शकते. त्यामुळे या बायोमेट्रिक प्रणालीसोबत जर प्रत्येक वर्गखोल्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सक्ती केल्यास कोणते शिक्षक काय शिकविले आणि त्यांच्या या शिकवणीला किती विद्यार्थी उपस्थित होते याची रेकॉर्डिंग पाहायला मिळेल. यात काही भ्रष्टाचार होण्याची शक्यता धुसर आहे असे वाटते. त्याच यासोबत असे केल्यामुळे जे गरीब विद्यार्थी कुठे ही क्लासेस लावू शकत नाहीत अश्या विद्यार्थ्यांना शिकवणीचा फायदा होईल. पुन्हा एकदा कॉलेजमधून मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले चित्र पाहायला मिळेल. याठिकाणी शिक्षक आणि विद्यालय प्रमुख या दोघांची ही कसोटी लागते. असे झाले तरच या खाजगी क्लासेसवर अंकुश राहील असे वाटते. शालेय शिक्षण विभागाने घेतलेला हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769